चांगल्या झोपेसाठी वेटेड ब्लँकेट - उत्पादन समीक्षा (प्रॉडक्ट रिव्ह्यू )

Submitted by चामुंडराय on 24 January, 2020 - 22:51

आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी उत्पादने (प्रॉडक्टस्) वापरतो परंतु सगळी उत्पादने सगळेच वापरतात असे नाही म्हणजे जी उत्पादने तुम्ही सध्या वापरत नाही परंतु वापरायची इच्छा आहे अशा लोकांनां ती उत्पादने वापरणाऱ्या लोकांच्या अनुभवाचा फायदा व्हावा ह्या हेतूने ह्या धाग्याचे प्रयोजन. तुम्ही तुम्हाला हव्या त्या उत्पादनाबद्दल येथे लिहा किंवा त्या उत्पादनाची इतरांनी केलेली समीक्षा वाचा आणि तुमच्या शंकांचे समाधान करून, अधिक माहिती मिळवून ठरवा ते उत्पादन विकत घ्याचे कि नाही ते.

सध्याच्या आधुनिक जगात समाजातील मोठ्या वर्गाला झोपे संबंधीच्या समस्येने, निद्रानाशाच्या तक्रारीने ग्रासले आहे. त्याची कारणे विविध आहेत आणि बहुधा ह्या तक्रारींचे मूळ आधुनिक जीवनशैली मध्ये आहे. परंतु आजच्या धाग्याचा विषय तो नाही. निद्रानाशावर उपाय शोधण्या साठी अंजात्खनन करताना वेटेड ब्लँकेट नावाच्या प्रॉडक्टची ओळख झाली. काय आहे हे वेटेड म्हणजेच वजनदार ब्लँकेट? ते आधी बघूया.

ब्लँकेट मध्ये आकाराने छोट्या गोळ्या, चकत्या (डिस्क्स) किंवा मण्यांसदृश वजनदार वस्तू (ऑब्जेक्टस) भरतात. ह्या वस्तू सहसा पॉलीप्रोपेलिन किंवा काचेच्या असतात आणि ब्लँकेट मध्ये सगळीकडे सारख्याप्रमाणात भरून शिवलेल्या असतात. त्यामुळे ह्या वस्तू ब्लँकेट मध्ये एकाच ठिकाणी गोळा होत नाहीत आणि ब्लँकेटचे वजन सर्वत्र सारख्या प्रमाणात विभागले जाऊन झोपताना अंगावर घेतल्यावर सर्व अंगावर सगळीकडे सारखा परंतु हळुवार दाब पडतो. ह्या ब्लँकेटचे बाह्यावरण हे खादीचे व तलम कापडाचे असते जेणेकरून त्याचा स्पर्श सुखद होईल. ब्लँकेटचे वजन ५ ते १५ किलो असते. तुम्ही तुमच्या वजनाच्या साधारणतः १०% वजनाचे ब्लँकेट घ्यायचे असते. आणि त्याच बरोबर प्रत्येकासाठी वेगवेगळे घ्यावे म्हणजे ते झोपलेल्याच्या सर्वांगाला स्पर्श करून सगळीकडे समान आणि सुखद दाब देऊन जास्त परिणामकारक ठरते.

ज्या लोकांची झोप खूपच सावध असते व त्यामुळे ज्यांना रात्री वारंवार जाग येते त्यांना ह्या वजनदार ब्लँकेटचा खूप फायदा होतो. सर्वांगावरील हळुवार व सुखद दाबाने cortisol हे तणाव निर्माण करणारे मुख्य संप्रेरक कमी होऊन serotonin हे आनंद आणि स्वास्थ्यपूर्ण अनुभूती देणारे संप्रेरक तयार होते त्यामुळे सुरक्षतेची भावना निर्माण होऊन शांत आणि आरामदायी झोप येते व सकाळी झोपेतून उठल्यावर ताजेतवाने वाटते.

निद्रानाश, लवकर झोप न येणे, अपुरी झोप येणे, मधेच जाग येऊन परत झोप न येणे, चिंता, अनावश्यक काळजी, नैराश्य इत्यादी विकारांवर वजनदार ब्लँकेट मुळे मात करता येते आणि सर्वसाधारणपणे चांगला फायदा होतो.

हे वजनदार ब्लँकेट कोणी वापरले आहे का? याचा खरंच फायदा होतो का? भारतासारख्या उष्ण देशात ह्या ब्लँकेट मुळे जास्तच गरम होईल का? ब्लँकेटची किंमत बरीच जास्त असल्याने विकत घ्यायच्या आधी हे जाणून घ्यायची इच्छा आहे.

कृपया ह्या ब्लँकेटचा रिव्ह्यू लिहावा जेणे करून सर्वांनां फायदा होईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मदर वॉरिअर id ने लिहिलेल्या लेखांमधील एक धागा पहा
त्यात हे ब्लॅंकेट घरी बनवायची कृती दिली होती.

यस्स मला पण मदर वॉरिअर च्या लेखाचीच आठ्वण आली. उप योग नक्कीच होतो. मी परवा माणदेश महोत्सव मधून एक साधी कापसाची गोधडी घेतली आहे. ती एका पातळ गादी सारखीच आहे. तेव्हा नशिबाने इथे थंडी पण होती. मग ओढुन घेतली अंगावर पण दहा मिनि टा त अन कंफर् टेबल व्हायला लागले. हे मराठीत कसे लिहायचे? अवघड वाटू लागले अवजड गोधडीच्या आत. मग मी ती बाजूला ठेवून दोन लेयर्ड पांघ रूण घेतले. हे बरे पडते म्हणजे एक रग किंवा घरातील जाडे पांघरूण व एक सुती चादर किंवा शाल किंव सोला पुरी चादर. जोडून . हे जास्त आराम दायक व कस्टमायझेबल आहे. वजन व हीटची गरज आपल्या गरजे नुसार कमी जास्त करता येइल. मी ती गोधडी आता स्प्रेड म्हणून ड्रा रुमात टाकली आहे टीव्ही समोर. वर झोपता पण येते. ही फक्त सिंगल ९५० रु ला मिळाली आहे. असे काही ऑप्शन अस्तील तर बघा. अप्रुवल बेसिस वर घेउन एकदा ट्रायल घेउन मग फुल पैसे देता आले तर बेस्ट.

सोबतीने फुल बॉडी पिलो मिळतात त्या ही घ्या. माझा स्वस्त व मस्त मामला आहे. झोपेचा काही इशू नाही. मेंटल इशूज आधीच क्लिअर केले.
त्यामु ळे पांघरुणाला काही पण टेन्शन नाही. आता तर इथे उकाडा येउ घातलेला आहे.

मी वजन असलेल्या ब्लॅंकेटच्या बद्दल एकंदर साहित्य वाचलं तेंव्हा मला लक्षात आलेल्या काही गोष्टी.

१) बहुसंख्य साहित्य हे त्या ब्लॅंकेट विकणाऱ्या कंपनीकडून आलेले होते. ADHD किंवा ऑटिझम असलेल्या मुलांना याचा उपयोग होतो असे लिहिलेले आहे
परंतु हे सर्व उपयोग पाश्चात्य देशात आहेत जेथे "कितीही लहान मुलाला वेगळ्या खोलीत" झोपवले जाते.

भारतात लहान मुले साधारण ८-१० वर्षेपर्यंत आई च्या कुशीतच झोपतात त्यामुळे आईचा हात अंगावर असल्याने आणि आई झोपताना मुलाला थोपटते त्यामुळे बाळाला आईच्या पोटात असल्यासारखे सुरक्षित वाटते. (गर्भजलातून आईच्या हृदयाचा आवाज मुलाला जास्त परिणामकारक ऐकू येतो. कारण पाण्यात आवाजाचा वेग चौपट असतो. )

शिवाय एखादं असा आजार असलेलं मूल असेल तर आई अजून काही वर्षे त्याला एकटं झोपवत नाही त्यामुळे बाळाला सुरक्षित वाटण्याचा मुद्दा भारतात बऱ्याच काळासाठी निकालात निघतो.

बाकी वजन असलेल्या ब्लॅंकेट साठी त्यात काचेचे मणी किंवा पॉलिमरच्या/ धातूच्या चकत्या घातल्या तर रात्री त्या अंगाखाली येण्याची शक्यता आहे. शिवाय हे ब्लॅंकेट कमीत कमी तीन थरांचे असल्याने भारतात वातानुकूलित खोलीत झॉपात नसाल किंवा थंडीचा मोसम नसेल तर गरम होण्याची शक्यता जास्त आहे.

याऐवजी आतमध्ये आईची/ आजीची जुनी सुती साडी आणि त्यावर सोलापुरी चादर (ज्याचे वजन बऱयापैकी असते) आणि फार थंडी असेल तर दोन सोलापुरी चादरी हा उपाय मला जास्त सोयीचा वाटतो (नक्कीच स्वस्त आहे). आमच्या घरी पातळ दुलई पासून रेमंडच्या जाड लोकरीच्या ब्लॅंकेट पर्यंत सर्व तर्हेची पांघरूणे उपलब्ध आहेत आणि ऋतू प्रमाणे त्याचा वापर करता येतो.

अर्थात ज्यांना निद्रानाशाचा विकार आहे त्यांना सुरुवातीचे काही दिवस "वजनाच्या मानसिक आधारामुळे" झोप चांगली लागण्याची शक्यता आहे परंतु काही काळाने "अतिपरिचयात अवज्ञा" या न्यायाने निद्रानाश परत येईलच.

मी जालावर वाचलेल्या वैद्यकीय साहित्यामध्ये या ब्लॅंकेटचा नक्की उपयोग होतो असे कोणतेही साहित्य माझ्या नजरेस पडले नाही.

कुणाच्या नजरेस पडले तर ते वाचण्यास मला आनंदच होईल.

>>>> मदर वॉरिअर id ने लिहिलेल्या लेखांमधील एक धागा पहा >>>>
"मदर वॉरिअर" च्या नावाने शोधाशोध केली परंतु धागा काही सापडला नाही.
इथे लिंक डकवा प्लिझ.