स्मारक

Submitted by mess-age on 21 April, 2009 - 00:47

स्मारक नको म्हणालात तरी शेवटी
पुतळा उभारला त्यांनी भर चौकात.
पुतळ्याच्या हातात तलवार होती
इवली झालेली.
मी पुस्तकांच्या हाताने नमन केले.
बाजुला कुंपण होते, समंजसपणे बांधलेले
समोर काही आधीच माना तुकवून पाठीतून वाकलेले
वाटले, ह्याच्या हातात शस्त्र आहे म्हणून हा हिंस्त्र वाटतो.
जमावातले थोर म्हणाले,
हातात पुस्तक असते तर अधिक हिंस्त्र वाटला असता.
मग मी स्मारकाच्या सावलीत
दप्तरातून शस्त्र असलेल्या मुलांची शाळा घेतली.

तूर्तास
ह्या देशाला मूठभर अशिक्षित मुलांची गरज आहे
एवढंच.

- संदेश ढगे

गुलमोहर: 

>>ह्या देशाला मूठभर अशिक्षित मुलांची गरज आहे
एवढंच.
>>
सुंदर

अप्रतिम...माझी भाषेची समज तशी कच्ची आहे त्यामुळे मला कवितेचा पुर्ण अर्थ कळला नसावा पण कविता मनाला भीडली आणी कवीला समाजा बद्द्ल वाटणारी तळमळ जाणवली Happy

२६ एप्रिलपर्यंत बाहेरगावी असल्याने ही कविता पाह्यली गेली नव्हती. छान आहे. अभिनंदन.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

सुरेख !
हातात पुस्तक असते तर अधिक हिंस्त्र वाटला असता. >>> अहाहा !
प्रकाशित झाली तेव्हा निसटली. मग कवीने माबोला रामराम ठोकल्यावर वाचली. पण तेव्हा तरी प्रतिक्रिया का दिली नाही ? चांगले काही आणखी वाचायला मिळणे यात माझाच स्वार्थ आहे, तोही न कळण्याइतका आळस की निर्बुद्धपणा की माज ?

  ***
  Freedom is just another word for nothing left to lose... - Janis Joplin

  स्वातीच्या विवेचनानंतर अजून चांगली समजली. अभिनंदन मेसेज.
  ************
  धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची | झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ||

  अर्र. स्वातीनी हाणेपर्यंत पाहिलीच नव्ह्ती.
  हार्दिक अभिनंदन.

  अप्रतिम.. Happy
  माझीही हुकली खरंच. नवीन लेखनाच्या पहिल्या पानावर दिसली तेव्हा वाचली गेली.
  तुमच्या 'घर', एवढं कर', 'फोन नंबर' वगैरे वाचल्या होत्या आणि काही आशय भावल्याचे तुमच्या निरोपवाल्या कवितेत सांगितलेही होते.
  आणखी कविता करा.. Happy

  --
  उत्कट-बित्कट होऊ नये.. भांडू नये-तंडू नये;
  असे वाटते आजकाल, नवे काही मांडू नये..!

  कविता सणसणीत आणि झणझणीत आहे. अर्थ माझ्या मते अगदी सुस्पष्ट आहे.
  'पोथी-निष्ठ' माणसे दिवसेंदिवस अधिकाधिक उग्र आणि हिंसक बनत चालली आहेत. पोथ्यांचा वापर शस्त्र म्हणून केला जातोय. शिक्षणही पोथी-आधारीत होत चालले आहे. त्यामुळे आता, हातांत पोथी न धरण्यार्‍या -म्हणजेच- अशिक्षित मुलांची गरज भासते आहे. असा अर्थ मी घेतला.पण आपल्याला जे साधे, सोपे वाटते, तसे ते कधी कधी नसतेही. तेंव्हा, चु.भू.दे.घे.

  कवीने मायबोलीचा संन्यास का आणि केंव्हा घेतला? आता तरी पुनरागमनाची अपेक्षा ठेवायची का?

  बापू करंदीकर

  सु रे ख !!! खुप छान मांडली आहे कविता..खरंच ह्या कवितांच्या पावसात अशा चांगल्या कविता वाहुन जातात कधी कधी...पण मागच्या महीन्याची सर्वोत्तम कविता म्हणुन मान मिळाला म्हणुन कळली. अभिनंदन !!

  *******************
  सुमेधा पुनकर Happy
  *******************

  वार्‍याची बात !
  वार्‍यावरची नाही !! ---
  " संदेश तुझा अप्रतिम संदेश वाचायचा राहिला खरा. सॉलिड, जाम सॉलिड!
  ता. क. - तुझ्या या कवितेला बक्षिस मिळालं म्हणून ही प्रतिक्रिया नाही. ती खरोखरच 'सॉलिड' आहे म्हणूनच. "

  संदेश फार छान लिहलयत हे.

  *********************

  आपण प्रेमात पडतो म्हणजे नक्की कुठे पडतो? Biggrin Wink

  सुरेख, अप्रतिम आवडली.
  आधी वाचायची राहुन गेली. Sad
  >>>>>
  प्रकाशित झाली तेव्हा निसटली. मग कवीने माबोला रामराम ठोकल्यावर वाचली. पण तेव्हा तरी प्रतिक्रिया का दिली नाही ? चांगले काही आणखी वाचायला मिळणे यात माझाच स्वार्थ आहे, तोही न कळण्याइतका आळस की निर्बुद्धपणा की माज ? >>>>

  खरंय, negative प्रतिक्रीया देण्यासाठी सर्व पुढे असतात एका अमुक कविला आपण सर्वांनी सांगितले कि तुम्ही रतिब घालत आहात, फार वाईट कवीता करत आहात, आता थांबवा,
  पण चांगल्याला चांगले म्हणतांना मात्र आपण कंजुषपणा करतो. असे का?. बर्‍याचवेळा अशा चांगल्या कलाकृतींची दखल हि घेतली जात नाही.

  हि प्रतिक्रीया केवळ एक विचार म्हणुन लिहीली आहे ह्यात कुणालाही दुखाविण्याचा हेतु नाही.

  खुपच सुंदर... भिडली मनाला... खरंच आज अशिक्षितांची गरज आहे.
  विष्णु....

  अभिनंदन आपले.
  आशय छान आहे.

  मग मी स्मारकाच्या सावलीत
  दप्तरातून शस्त्र असलेल्या मुलांची शाळा घेतली.

  येथे दुसर्‍या ओळीची रचना बदलायला हवी होती असे वाटलेले.

  ..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

  जमावातले थोर म्हणाले,
  हातात पुस्तक असते तर अधिक हिंस्त्र वाटला असता.

  "मार्मिक!"
  आणखी काही बोलायला नाही आणि नको.