:- छत्तीस गुण -:

Submitted by jayshree deshku... on 20 January, 2020 - 09:21

:- छत्तीस गुण -:
“ धनु इकड ये, ऐकलस का?” बाबा मला हाक मारत होते.
“काय बाबा, सुप्रभात, आज सकाळी सकाळी माझ्याकडे काम?”
“ गधडे अजून एवढी पण मोठी झाली नाहीस की बापाने काम असेल तरच लेकीशी बोलाव” “आले बाबा” म्हणत मी कॉफीचा कप घेऊन हॉल मध्ये गेले. बाबा म्हणत होते,
“ अग धनु, त्या श्रेयस चिवटे आणि त्याच्या घरच्या लोकांकडून निरोप आला आहे, म्हणे श्रेयसची आणि तुझी पत्रिका जुळते आहे आणि पत्रिकेत छत्तीस गुण जुळत आहेत.”
“ धनु मुलगा एम.इ.कंप्युटर झालेला आहे. आणि कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. मी म्हणल होत न तुला तन्वीच्या लग्नात श्रेयसने आणि त्याच्या घरच्या लोकांनी म्हणे तुला पाहिलं होत आणि तुझी पत्रिका मागून घेतली, मी पण दिली.” आईने बाबांच्या बोलण्याला पुष्टी दिली. आई खूप खुश झाली होती. एवढच नाही तर, तिने पुढची बोलाचाली, साखरपुडा, मानपान, लग्न याची दिवास्वप्न सुध्दा रंगवायला सुरुवात केली.हे करताना तिच्या मनात माझा विचार का येऊ नये? मला आई- बाबांना दुखवायचं नव्हत पण, मला लग्न करायचं तर माझ पण मत विचार घ्यायला नको का? मी विनम्रपणे पण निक्षून आईला बाबांना म्हणाले,
“ पत्रिकेत जरी छत्तीस गुण जुळत असले तरी प्रत्यक्षात किती गुण जुळतात याचा विचार नको का करायला? आयुष्य काढायचं आहे मला त्याच्याबरोबर. त्यासाठी मी आधी त्याच्या सहवासात एक दिवस घालवेन, त्यावर विचार करेन आणि मगच पुढचा निर्णय सांगेन.” माझी आजी त्यावर म्हणाली, “बाई बाई हल्लीच्या पिढीपुढे काही बोलायला नको. आमच्या वेळी नवरा नवरी एकमेकांना बोह्ल्यावरच लग्नाच्या वेळी बघत. तरी जन्मभर एकमेकांची साथ करत. आणि आता प्रेमात पडतात, मनाप्रमाणे लग्न करतात, आणि घटस्फोट पण क्षुल्लक कारणाने घ्यायला तयार असतात.”
“ हो ना, मग काय एका घरात दोघांनी दोन दिशेला तोंड फिरवून, लोक लज्जेस्तव संसार करत राहायचं का? जसा तुम्ही लोकांनी मन मारून केला!”
“बाई ग तुझ्यापुढे बोलण्याची सोय नाही, आळीमिळी गुपचिळी” म्हणत आजीने खरोखरीच तोंडावर बोट ठेवल. त्या लोकांशी फोनाफोनी करून, माझी मनधरणी करत आईने शेवटी आमच्या दोघांच्या भेटीचा दिवस ठरवला. एका गार्डन हॉटेलमध्ये आम्हां दोघांचे भेटायचे ठरले. मी पण श्रेयसची माहिती काढलीच होती. काही विचार करूनच मी घराबाहेर पडले.
सकाळी सव्वादहा वाजता मी माझा कॉमप्यूटरचा क्लास उरकून परस्पर ठरलेल्या ठिकाणी हॉटेलवर पोहचले. श्रेयस माझ्या आधीच येऊन पोहचला होता. चेहऱ्यावरची नाराजी लपवत तो माझ्याकडे बघून हसला आणि हातातला पुष्पगुच्छ मला देत म्हणाला,
“ सुप्रभात धनु, दिवस मजेत जावो आपला.”
पुष्पगुच्छ स्वीकारत मी त्याला पर्समधली कॅडबरी दिली. त्यावर पुन्हा तो म्हणाला,
“ धन्यवाद, सो स्वीट ऑफ यु धनु.”
एकदम धनश्री ऐवजी ‘धनु’पहिल्या भेटीत इतकी लगट! मला थोडे खटकले. लगेच तो नाराजी दाखवत म्हणाला, “हे काय तब्बल पंधरा मिनिटे उशीर! मी कधीच दहा वाजायच्या आधीच येऊन थांबलो आहे.” मी मनात म्हणल, ‘अरे हा तर का उशीर झाला हे विचारण्याचा सभ्यपणा सुध्दा दाखवत नाही. डायरेक्ट आरोप बरोबर नाही ना! पुण्याच्या जाम ट्राफिक मध्ये कसरत करत गाडी चालवून यावे लागते. हा समंजस विचार नको का करायला? मग मी तस त्याला ट्राफिकच कारण सांगितल. त्यावर तो म्हणाला, “आज क्लास बुडवायचा ना!”
“शक्य नव्हत, एक्झाम होती.” मी म्हणल . त्यावर विषय संपला. श्रेयसने भडक रंगाचा शर्ट घातला होता.त्यावरच डिझाईन खूप गिचमिड होत. एकमेकात सगळे आकार इतके मिसळलेले कि डिझाईन काय हेच कळत नव्हत. भडक वासाचा सेंट मारलेला होता. माझ मनातल्या मनात गुणांचं गुणमिलन चालू होत. प्रत्यक्षात आपले ह्याच्याशी किती गुण जमू शकतात ह्याचा मी विचार करत होते. तो मला म्हणाला, “ चल ना आपण प्रथम चहा घेऊ.”
चहा घेता घेता तो मला म्हणाला, “बाकी लग्नाविषयी बोलणी करण्यासाठी तुझ्या आई-बाबांना उद्या संध्याकाळीच आमच्या घरी यायला सांग. मी तसे माझ्या आई बाबांना कल्पना देऊन ठेवतो.”
मला पुन्हा खटकले. एवढा उतावीळपणा कश्यासाठी? जोडीदाराला त्याच्या मनाचा विचार न करता प्रत्येक बाबतीत गृहीत धरणे आणि आपली मते त्याच्यावर लादत रहाणे हा दोषच नव्हे का? मी काहीच प्रतिकिया दिली नाही.
हॉटेलच्या आसपास बरीच मोठी मोकळी जागा होती. त्या जागेचा कलात्मक रीतीने वापर केलेला होता. मुलांसाठी आणि मोठ्यासाठी सुध्दा झोका, घसरगुंडी, असे अनेक तरतऱ्हेचे खेळ होते. स्वीमिग पूल होता. तसेच आवारात एक गणपतीचे देऊळ होते. आम्ही गणपतीचे दर्शन घेतले.देवळाबाहेर पडता पडता एक दोन-अडीच वर्षाची मुलगी धावता धावता आम्हाला येऊन धडकली. मी तिला धरून उठवलं. पोरगी खूप गोड होती म्हणून मी तिला कडेवर घेतल आणि माझ्या पर्समधली एक कॅडबरी काढून दिली. ती काका काका म्हणून श्रेयस कडे पहात होती, पण श्रेयसने दुर्लक्ष केले. तेवढ्यात समोरून तिचे आई बाबा आले. मी तिला त्यांच्या सुपूर्द केले. ती आम्हां दोघांना टाटा करून गेली. मी म्हणल, “किती गोड पोरगी आहे नाही?” श्रेयस म्हणाला,
“तुझ्या पर्समध्ये तर बऱ्याच कॅडबरी आहेत. मला वाटल होत तू फक्त माझ्यासाठी घेऊन आलीस. लग्नानंतर अशा तुझ्या आवडी संभाळण मला जड जाईल. बाय द वे त्या पोरीला तू कशाला कॅडबरी दिलीस? ती ना नात्याची ना गोत्याची.”
“ निखळ प्रेम करायला कशाला हवं नात? सुंदर गोष्टीवर माणूस प्रेम करतोच ना! प्रत्येक गोष्टीत व्यवहार थोडाच पहायचा असतो.”
“जगात व्यवहाराला जास्त महत्व असत. भावनेला नाही. पण आपल्याला मात्र मुलगाच हवा बरका! मुली म्हणजे जीवाला घोर आणि डोक्याला ताप.”
“ पण संसारात भावनेचा ओलावा असेल तरच नाती टिकतात आणि फुलतात पण. बाय द वे तुम्ही खूप पुढचा विचार करता, आपली मुल वगैरे, एवढा पुढचा विचार करू नये तस नाही झाल तर अपेक्षाभंगाच दुख पदरी पडत.”
“माझ्या बाबतीत अस कधी घडत नाही.” छातीठोकपणे श्रेयस बोलला.
“नियतीपुढे कुणाच काही चालत नाही. अति आत्मविश्वास उपयोगाचा नसतो.”
“तू काही फिलोसोफीवर पी.एच डी. केली आहेस का?” श्रेयसच्या बोलण्यावर मी फक्त हसले.
इथ आलोच आहोत तर चला मजा करून घेऊ, म्हणून मी तिथल्या मोठ्या घसरगुंडी वरून घसरत येण, झोके घेण, छोट्या आगगाडीत बसण, उंटावरून सफर अशी आम्ही म्हणजे मी जास्त मजा लुटली. श्रेयस मात्र हिशेबात गुंतला होता. त्याच्या चेहऱ्यावरची काळजी पाहून मी हसत हसत म्हणल देखील, “ तुम्ही काळजी करू नका श्रेयस आपण टी टी एम एम करू.” त्यावर त्याने सोडलेला सुटकेचा श्वास माझ्या नजरेतून सुटला नाही. उंटावरून उतरता उतरता एका माणसाचा पाय चुकून मला लागला. तो मला लगेच ‘सॉरी’ म्हणाला सुध्दा. मी पण त्याला ‘इट्स ओके’ म्हणल. श्रेयसने लगेच लागट बोलून त्याचा अपमान केला. मला आवडल नाही. समोरच्या माणसाने जर आपल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली तर त्याला क्षमा करण्यासाठी आपल मन तेवढ उदार हवं. माणूस आयुष्यात बऱ्याच वेळा क्षुल्लक चुका करत असतो, अशावेळी जोडीदाराकडून त्याला पांघरुणाची अपेक्षा असते. श्रेयस हळू हळू माझ्या मनातून उतरत चालला होता. माझ्या मनात सुद्धा भावी जोडीदारा बद्दल एक काहीशी विचारांची चौकट फिट होती, त्याच्या बाहेर तो चालला होता. जोडीदाराच्या क्षुल्लक आवडी निवडी सुध्दा तो प्रथम भेटीपासून व्यवहारात तोलू पहात होता. तो संसारात आपल्याला कसा सुखी करू शकणार?
इकडे तिकडे भटकता भटकता वेळ कसा गेला ते कळलच नाही. जेवणाची वेळ झाली. श्रेयसच्या आवडीनुसार आम्ही पंजाबी डिश मागवली. आणि आईसक्रिम माझ्या आवडीप्रमाणे घेतल. श्रेयसच माझा ड्रेस, माझ बाह्यरूप, माझ्या हालचाली न्याहाळण चालू होत,हे माझ्या नजरेतून सुटल नाही. श्रेयस कविता छान करतो आणि त्याचा एक कवितासंग्रह प्रसिध्द झालेला होता हे मला माहित होत. आणि तो मी वाचला सुध्दा होता. मला काव्यातल विशेष काही कळत नाही, पण मला त्याच्या कविता आवडल्या. पण जे भाव त्याच्या काव्यातून प्रगट झालेले होते,म्हणजे मला उमजलेले होते, ते त्याच्यात शोधण्याचा मी प्रयत्न करीत होते.पण ते मला आभावानेच जाणवले. कवीने त्याच्या कविता जगल्या पाहिजेत, तो नुसता शब्द संसार नसावा. अस करण म्हणजे स्वत:शी प्रतारणा आणि लोकांची फसवणूक अस माझ प्रामाणिक मत आहे.
नुकतच जवळच्या मैत्रिणीच लग्न होऊन गेल म्हणून मी हाताला आणि पायाला मेंदी लावली होती. माझ्या पाउलांकडे दृष्टी गेल्यावर श्रेयसला लगेच काव्य स्फुरले, तो म्हणाला,
मेंदी रेखिल्या पाउलाने सखे
ओलांडशील का मम उंबरठा
प्रीत भरला सुखाचा प्याला
लावेन तुझ्या मी ओठा.
मी श्रेयसच्या काव्याला दाद दिली. ती देत असताना मला माझ्या मावस बहिणीची मैत्रीण रेखा तिची आठवण झाली. माझ्या बहिणीने मला सांगितल होत, रेखाला श्रेयसने नादी लावल होत आणि नंतर पत्रिका जमत नाही म्हणून तिचा नाद सोडला होता. ती बिचारी खूप दिवस डिप्रेशन मध्ये होती. अशाच अजून चार पाच मुलींना त्याने नादी लावून नंतर पत्रिका जमत नाही म्हणून नाकारलं होत. श्रेयसचे वडील सनातन विचाराचे. त्यांचा जन्मपत्रिकेवर खूप विश्वास आणि श्रेयसचा आपल्या वडिलांवर विश्वास आणि त्यांच्या विचारांचा पगडा त्याच्यावर होता. तेव्हा पत्रिका जमल्यावर त्याने मुली बघणे वगैरे करायला हवे होते. पण दिसली चांगली मुलगी की लगेच हा गळ लावायचा, तिच्याबरोबर फिरून घ्यायचं आणि मग पत्रिका मागून घ्यायची. आणि मग पत्रिका जमत नाही म्हणून नकार द्यायचा. असा त्याने आपल्या सहवासातल्या मुलींचा विश्वासघात केला. अस करताना त्याचं मन दुखावताना श्रेयसला त्यात काहीही वावग वाटल नाही. माझ्या बाबतीत मात्र आधी पत्रिका पाहिली. माझ विचारमंथन चालू असतानाच श्रेयस मला म्हणाला,
“माझ आयुष्यात कोणत्याच मुलीवर एवढ प्रेम बसल नव्हत, पण तू मला जिंकलस, तुला माहित आहे ते गाण,
‘ ती पाहताच बाला, कलिजा खलास झाला.’
मला एकदम हसू आलं. श्रेयस म्हणाला, “ हसायला काय झाल?” इतका वेळ गप्प बसलेली मी एकदम त्याला म्हणाले,
“अस किती मुलींना तुम्ही म्हणाला? किती मुलींवर आत्तापर्यंत फिदा होता? तुम्ही जरी आकडा सांगितला नाही तरी तो मला माहित आहे. तुम्ही कवी पण तुम्हाला लोकांची कदर कमी.किती जणींच्या भावनांची तुम्ही प्रतारणा केली.” श्रेयस थोडा कावराबावरा झाला. एकदम चिडला. मला म्हणाला,
“तुला काय करायचं आहे. तुझा काय त्याच्याशी संबंध?”
“नाही कसा? तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं आहे ना? तेव्हा अप्रत्यक्षपणे त्याच्याशी संबंध येतो. तुम्ही मला या गोष्टीची आधीच कल्पना द्यायला हवी होती. आपल्या जोडीदाराशी आपण प्रामाणिक नको का रहायला? मी खुश व्हाव म्हणून तुम्ही मला अंधारात ठेवू पहात होता. आज मी छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्या स्वभाव मिलनाचे गणित मांडत होते. पण आपले जमू शकेल अस वाटत नाही. तसेच हे बघा एका लग्नाने दोन घर जोडली जात असतात. घरातली माणसेही आपल्या संसारात मोडतात. तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांशी मी जमवून घेऊ शकते पण तुमचे बाबा आपल्याला आपल्या आवडीनुसार संसार करू देतील अस वाटत नाही. कारण आत्तापर्यंत सगळ्या मुलींना तुम्ही नादी लावून नंतर पत्रिका जमत नाही म्हणून वाटाण्याच्या अक्षता लावल्या. एवढा जबरदस्त तुमच्या बाबांचा आणि त्यांच्या भविष्याचा तुमच्या मनावर पगडा आहे. सासू सासर्यांना आदरपूर्वक वागणूक द्यावी, त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असावेत याबाबत माझे दुमत नाही. पण आपल्या संसारातले निर्णय घेण्यासाठी आपण स्वत:हा खंबीर असाव. कारण आपले अनुभव हे आपलेच असतात. त्यानुसार पुढे पाऊले टाकायची असतात.
हे पहा श्रेयस माझ्या माहिती प्रमाणे तुमच्या आई अतिशय सरळ साध्या आहेत. घरच्या लोकांच्या विश्वात त्याचं विश्व सामावलेलं आहे. त्यांनी आपल असं स्वतंत्र व्यक्तित्व निर्माण केल नाही म्हणण्यापेक्षा त्या तसं जगल्या नाही. घरच्या जबाबदारीच दडपण हेच त्याचं आयुष्य झाल. माझ तस होऊ शकत नाही श्रेयस. मी एक Pathologist आहे मला lab मध्ये लोकांच्या ब्लड, युरीन इत्यादी टेस्ट कराव्या लागतात. मी देव मानते पण देवघरातील देवांची पूजा मी नेहमी करू शकणार नाही. देवाला स्मरून दिलेला लोकांचा डायग्नोसिस रिपोर्ट हीच माझी खरी देवपूजा असते. मी माझ्या कामाच्या गडबडीत देवाला पुरणाचा नैवेद्य, नवरात्रीचे उपास ह्या गोष्टी करू शकेन की नाही हे सांगू शकत नाही. सकाळी आठला labगाठायच्या गडबडीत माझा स्वत:चा नाश्ता, डबा उरकताना मी घरच्या लोकांच्या नाश्त्याची चिंता कितपत करू शकेन ह्याची खात्री देता येत नाही. तुम्ही फक्त माझ्या बाह्यरूपाचा आणि पत्रिकेतल्या गुणांचा विचार करत आहात. पुढे संसारात उपयोगी पडणारे आपल्या दोघांचे किती गुण जुळतात ह्याचा विचार करा. म्हणजे तुम्हाला आपल्या दोघांच्या दोन समांतर वाटा दृष्टीस पडतील. तेव्हा आपला संसार कोणत्या गुणांवर टिकणार?”
एका दमात मी भराभर बोलत सुटले होते. श्रेयसला धडा शिकविण्याची माझी इच्छा होती. पण स्पष्ट बोलूनच. म्हणून मी बोलून घेतल. एखाद्या मुलीकडून नकार स्वीकारण्याची श्रेयसची ही बहुतेक पहिलीच वेळ होती. श्रेयस माझ्याकडे आवाक होऊन पहात राहिला होता. ह्या प्रकरणात आई दुखावली जाणार याची मला कल्पना होती. पण ती नंतर मला समजून घेईल याची मला खात्रीपण होती. माझ नशीब, योगायोगाने मला समोरच माझे कलीग डॉक्टर सचिन भेटले. हातातल्या रिमोटने गाडी अनलॉक करत होते.
“हाय! घरी जायचं आहे का? सोडू का तुला?” मी मान डोलावली. आणि श्रेयसला ‘बाय’ म्हणल त्यानेही मला कोपऱ्यापासून नमस्कार करत बाय केल.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

३६ गुण जुळले म्हणजे परफ़ेक्ट जोड़ी जमुन प्रत्यक्षात पूर्ण सुखाने संसार करेल हे घडत नाही आणि अश्या जोडप्यांचा ३६चा आकड़ा कोर्टात डिवोर्स घेवून निकालात लागलेलाही पाहिलाय. ह्यादृष्टीने डोळ्यात अंजन घालणारा लेख म्हणून नक्कीच आवडले.

मात्र हया कथानकात काही प्रसंग फारच अतिशयोक्तिपूर्ण वाटले.

काही प्रसंग फारच अतिशयोक्तिपूर्ण वाटले.
+१००
पहिल्या भेटीत माणसे फार जपून वावरतात आणि शक्यतो खटका उडणार नाही याची काळजी घेतात. आणि ज्या मुलाने तीन चार मुलींना नादी लावलं त्याच्या कडून तर अशा गोष्टी होतील असे वाटत नाही.
बाकी कथेचा मूळ विचार योग्य आहे.

ती मुलगी परीक्षा घेऊन नकार द्यायच्या आणि 3-4 मुलींना नादी लावलं त्याचा बदला घेण्याच्या हेतूने भेटायला आली होती असे वाटले. तुम्ही नेहमी किती छान लिहिता, तुमची निरिक्षण शक्ती पण छान आहे. ही कथा बालीश वाटली.

छान.

पहिल्या भेटीत माणसे फार जपून वावरतात आणि शक्यतो खटका उडणार नाही याची काळजी घेतात. आणि ज्या मुलाने तीन चार मुलींना नादी लावलं त्याच्या कडून तर अशा गोष्टी होतील असे वाटत नाही.
बाकी कथेचा मूळ विचार योग्य आहे.

नवीन Submitted by सुबोध खरे on 20 January, 2020 - 20:43>>+१११११

कथा नाही आवडली

अशी मुलींना नादी लावणारे पुरुष खूप पोहोचलेले असतात, शक्यतो सुरुवातीला खूप सभ्य वागतात

बाकी लग्न करताना फक्त गुण जुळून काही उपयोग नाही हे मात्र खरे☺️

जसा आहे तसा वागला श्रेयस- फेक बनून राहू शकला असता तिला इम्प्रेस करायला. पण जसा आहे तसा ट्रान्सपरंट राहिला...
मुलगी जाम डोक्यात गेली पण ही...

पहिल्याच भेटीत जुण्या गर्लफ्रेंड्स बद्धल विचारतेय..

वाचला श्रेयस !!!

जसा आहे तसा वागला श्रेयस- फेक बनून राहू शकला असता तिला इम्प्रेस करायला. पण जसा आहे तसा ट्रान्सपरंट राहिला...
>>>>>>

खरंय.. हेच नाझ्याही मनात आलेले. मी जेव्हा माझ्या प्रेमात असणारया मुलींसोबत डेटला जायचो तेव्हाही माझी ईमेज त्यांच्या मनात चांगलीच राहील हे जपायचा प्रयत्न करायचो. व्यवहाराचे म्हणाल तर आता बायकोसोबत पिक्चरला जाताना तिने ईंटरव्हलमध्ये ९० रुपयांचे समोसे आणि दिडदोनशे रुपयांचे सॅण्डवीच खाऊ नये म्हणून आधीच बाहेर तिला दोनचार वडापाव खाऊ घालतो. तेच एकेकाळी तीच मुलगी माझी गर्लफ्रेंड असताना कोक पॉपकॉर्न पिझा नाचोस जे तिला हवे ते आणि हवे तितके खायला द्यायचो. याच कारणास्तव ती आता तू मला फसवलेस म्हणून शिव्या घालत असते. ते पाहता हा श्रेयस नक्की कुठल्या मातीचा बनला होता हे समजत नाही. मला तर काळजी त्या पोरीची वाटतेय जी आता एखाद्या पहिल्या भेटीत ईम्प्रेसिव्ह आणि तिच्या कलाने वागणारया भामट्याच्या नाटकाला फसणार आणि नंतर आपल्या नशीबाला दोष देत बसणार..

असो,
कथेतले प्रसंग पटले नाही पण शैली छान. लिहीत राहा. अजून वाचण्यास उत्सुक Happy

मुलींना नादी लावणारा असे वागणार नाही असे वर लिहिले आहे त्याच्याशी सहमत. पहिल्या भेटीत प्रत्येकजण चांगुलपणाचा आव आणणार, मग मुलगा असो वा मुलगी.

पण मुलीची शेवटची बडबड आवडली. विवाहोत्तर आपला दिनक्रम व प्राधान्यक्रम काय असणार हे दोघांनीही एकमेकांना व घरात सांगायला हवे.

बाकी सगळं ठिकय. वर वेगवेगळ्या प्रतिसादात चर्चा चालूच आहे. पण
> कवीने त्याच्या कविता जगल्या पाहिजेत, तो नुसता शब्द संसार नसावा. अस करण म्हणजे स्वत:शी प्रतारणा आणि लोकांची फसवणूक अस माझ प्रामाणिक मत आहे. > हे काही पटलं नाही Lol

पण मुलीची शेवटची बडबड आवडली. विवाहोत्तर आपला दिनक्रम व प्राधान्यक्रम काय असणार हे दोघांनीही एकमेकांना व घरात सांगायला हवे.
>>>>> सहमत

Amy, ते का बर पटल नाही>>>>

कथानायिकेच्या साहित्यिकांबद्दलच्या अपेक्षा पूर्ण करतील असे साहित्यिक खऱ्या जगात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही निर्माण झालेले नाहीत/ होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. निदान माबोवरती तरी बोले तैसा चाले वागणारे साहित्यिक सापडतात का पहा बरे एकदा.

पण प्रसंग अगदीच विनोदी सिनेमातल्या साईड हिरोचे वाटाताहेत >>> +१११ म्हणुनच मी नाही आवडली लिहीले होते.

ईतके असे कोणी नसते , न मुली न मुले

> Amy, ते का बर पटल नाही?? > कथा, कविता लेखन हे 'काल्पनिक' असते. त्यात लेखक स्वतःला कितपत रिव्हिल करतो हे नक्की सांगता येणं अशक्य आहे. लोलीता पुस्तकात नोबोकोव्हला शोधले किंवा हनिबल लेक्टरच्या व्यक्तीरेखेत थॉमस हॅरिसला शोधू लागलो तर अवघड होईल.
Misaimed Fandom हे वाचा.