नाचू या डोलू या-बालकथा

Submitted by बिपिनसांगळे on 19 January, 2020 - 11:15

नाचू या डोलू या-बालकथा

(बालकथा - वयोगट छोटा )
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
संध्याकाळची वेळ होती. संजू टीव्हीवर मॅच पहात होता. चहरचा कहर चालू होता.
त्यावेळी विजू बाहेरून आला. शांतपणे. संजूने त्याच्याकडे पाहिलं. विजूला मॅच आवडत नसे. त्याला फक्त डान्सचे कार्यक्रम पहायचे असत. मग चॅनेल बदलण्यावरून भांडाभांडी ठरलेली. दोघांचं अजिबात पटत नसे. एकमेकांच्या खोड्या काढायची संधी ते वाया घालवत नसत.
विजू म्हणायचा, “ मी सुद्धा एके दिवशी टीव्हीवर दिसेन.”
त्यावर संजू म्हणायचा, “ हो बाबा…’ ढ मुलांची शाळा ‘ असा कार्यक्रम असला तर दिसशील त्याच्यात.”
पण आज विजू शांत होता. संजूला ते कळलं. त्याने विचारलं, “काय झालं रे ?”
त्यावर विजूने सांगितलं ,” मी आत्ता डान्स क्लासहून घरी येत होतो. माझ्या पुढे एक आजीबाई चालल्या होत्या. त्याचवेळी बाईकवरून दोन मुलं आली. त्यांनी त्या आजींच्या गळ्यातली सोन्याची साखळी ओढली व ते क्षणार्धात पसार झाले.”
“ बापरे ! त्या आजी दिसायला कशा होत्या ? “ काही आठवल्याने संजूने विचारलं.
“ गोऱ्यापान, थोड्याश्या वाकलेल्या, हातात काठी. रोज चालायला ग्राऊंडवर येतात -त्या.”
“ त्या ? अरे, ती नक्की मंदारची आजी, तो माझा मित्र आहे !”
दोघांनाही धक्का बसला होता. पण तो विषय नंतर थांबला.
त्यानंतर काही दिवसांनी -
संध्याकाळी विजू टीव्ही पहात होता. ‘नाचू या डोलू या’ कार्यक्रम लागला होता. अचानक तो ओरडला, “ संजू, हा पहा त्या दिवशीचा चोर !...”
स्क्रीनवर त्या दिवशीची चोरांची जोडी नाचत होती.
“ नक्की ? “ संजूने विचारलं, “ कशावरून ? “
“ नक्की ! माझ्या लक्षात आहे त्या माणसाचा चेहरा. मोठ्ठा चेहरा. वेडेवाकडे कापलेले केस. वरच्या बाजूला बांधलेली शेंडी. कानात चमकणारा खडा अडकवलेला. बघ ना,हाच तो ! “
मग संजूने मंदारला फोन केला. त्याच्या बाबांनी पोलिसांना. पोलिसांनी कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडे चौकशी केली. आणि ती दुक्कल अलगद पोलिसांच्या जाळ्यात सापडली.खरं म्हणजे ती तरुण मुलं चोर नव्हती; पण नाचाच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी, कपड्यांसाठी, त्या मुलांनी चोरी केली होती. मोठी चूक केली होती.
त्या मुलांचे आई- वडील म्हणाले ,” आमच्या मुलांची चूक झाली. पण पुन्हा ते असं करणार नाहीत. त्यांना एक संधी द्या.”
मंदारच्या बाबांनी त्याला संमती दिली. ती मुलं रडत होती. पोलिसांचे आणि मंदारच्या बाबांचे आभार मानत होती. त्या मुलांच्या आईवडलांनीही सगळ्यांचे आभार मानले, पाणावलेल्या डोळ्यांनी.
पोलीस त्यांना म्हणाले, “ आपल्या मुलांवर लक्ष ठेवणं किती गरजेचं आहे , पाहिलं ? “
“ आणि मुलांनीही आईवडलांचं ऐकलं पाहिजे “ , मंदारचे बाबा म्हणाले.
ती सोनसाखळीही पुढे परत मिळाली.
पुढे, ‘ नाचू या डोलू या ‘ कार्यक्रमाच्या निर्मात्यांची या प्रसंगावर चर्चा झाली. सगळी !
एके दिवशी विजूच्या घरी फोन आला. तो आईने उचलला. तो ठेवल्यावर आईने सांगितलं, “ आपल्या विजूला डान्ससाठी बोलावण्यात आलंय – ‘ नाचू या डोलू या ‘ मधून. वाइल्ड कार्ड एन्ट्री !...”
दोघेही भाऊ ‘ हुर्रे ‘ करून ओरडले.
आई पुढे सांगत होती - “ ते म्हणाले, अशा मुलाला संधी दिल्याने आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढेल. तो स्मार्ट आहे. त्याची कामगिरी लोकांपर्यंत पोचली पाहिजे. त्याची ओळख कार्यक्रमामध्ये करून दिली जाईल. पण जिंकण्याचं, पुढच्या फेरीत जाण्याचं काम त्याचं “
“तेवढं टॅलेंट तर आपल्या विजूमध्ये आहेच !“ संजू ओरडला.
“ आणि आपण खास तयारीही करू या ,” आई म्हणाली.
“ - पण त्या मुलांचं काय ? ते टीव्हीवर जाहीर होईल ना ? “ विजूने विचारलं.
“ नाही ! “ आई म्हणाली, “ त्यांची ओळख जाहीर करण्यात येणार नाही. ते सिक्रेटच ठेवलं जाईल. त्यांच्या आयुष्याचा प्रश्न आहे.”
“ मग हरकत नाही ! “ विजू म्हणाला.
त्यावर संजू आनंदाने नाचू लागला. वेडावाकडा. नाचता येत नसताना.’ नाचू या डोलू या ‘ ओरडत . ते पाहून विजूने डोक्याला हात लावला. तर आई हसतच सुटली.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

किती छान गोष्ट. मोठ्यांसाठी जेवढ्या ताकदीचं लेखन
करता तेवढंच लहानांसाठी मस्त लिहिता. लहानपणी किशोर मासिकात अशा कथा वाचायला मिळायच्या, त्याची आठवण झाली.

छान

छान.
> लहानपणी किशोर मासिकात अशा कथा वाचायला मिळायच्या, त्याची आठवण झाली. > +१