त्यांची दिवाळी

Submitted by jayshree deshku... on 13 January, 2020 - 05:07

:- त्यांची दिवाळी -:
एक होता राजा आणि एक होती राणी. पाहूया दोघांची अनोखी कहाणी. म्हणजे तशी आपल्या सारखीच सामान्य बरका! दोघांच तसं एकमेकांवर प्रेम. पण ते त्यांना एकमेकांशी व्यक्त करायला जमत नव्हत. म्हणजे समजत नव्हत. कारण दोघांच्या स्वभावात खूप तफावत. अस असताना आपण एकमेकांवर प्रेम करू शकतो हे त्यांना खरच वाटायचं नाही. दोघांना एकमेकांमधले चांगले गुण मान्य होते आणि त्याचे कौतुकही होते. पण तरिही... दोघ भांडायचे खूप, पण दोघांना एकमेकांवाचून बिलकुल करमायचं नाही. राणीचा स्वभाव मुळात गरीब आणि सहनशील, लोकांच ऐकून घेण्याचा, लोकांच्या स्वभावाला सवलत देण्याचा. लोकांच्या चांगल्या गोष्टींना दाद देण्याचा. तर त्याच्या विरुद्ध राजा तापट अरेला कारे करणारा. आपल्या अपेक्षेप्रमाणे लोकांनी वागावं अस त्याला वाटे. लोकांच्या चुकांना त्याच्याकडे माफी नसे. तसेच स्वत:च्या चुका कबूल करण्याचा मोठेपणा त्याच्याजवळ होता. आपल्या शाब्दिक बाणांनी तो सहज समोरच्याला घायाळ करीत असे. प्रेमही तितकेच उदारपणे करत असे. त्याची अशी कलंदर वृत्ती तो स्वत: त्याच्या मनाचा राजाच होता. राणीच्या उदार स्वभावाचे राजाला कौतुक होते, पण काही एका विशिष्ट मर्यादेनंतर राजाला तिचा तो दुबळेपणा वाटायचा आणि दुबळ्या माणसांची राजाला भयंकर चीड! कारण त्याच्या मते दुबळ्या माणसांना लोक गृहीत धरतात आणि त्यांच्यावर सहजपणे अन्याय करू शकतात.हे एक दोघांच्या भांडणाच कारण होत तसचं राणीचा स्वभाव खूपच रसिक तिला रोजचा सामान्य दिवस सुध्दा सणावाराप्रमाणे व्यतित करायला आवडे, तर सणावाराला तर ती समारंभाच स्वरूप द्यायला बघे. त्यामुळे घरात होणारी माणसांची वर्दळ त्यामुळे राजाला हवी असणारी न मिळणारी शांतता. पर्यायाने त्याची होणारी चिडचिड हे भांडणाच दुसर गृहीतक ठरून गेलं होत.
“ अरे आज माझी भिशी आहे. संध्याकाळी १०-१२ बायका येतील बरका! तू एकतर बेडरूममध्ये बस किंवा संध्याकाळी उशिरा घरी ये.”
“सारख्या कशा ग तुझ्याकडे मैत्रिणी नाहीतर नातेवाईक येत असतात? मला त्रास व्हावा म्हणून तू मुद्दाम हे सार करतेस.”
“आई, बाबांचं बरोबर आहे. ऑफिसमध्ये मैत्रिणी भेटतच असतात की, पुन्हा घरी काय ग?” “झाल! बाबाची सुपुत्री मध्ये बोललीच. तुला कशाला ग मध्ये लक्ष घालायला हवं? तुम्हा दोघा बहीण भावाचे मित्र मैत्रिणी येतात, तुमच्या बाबांचे मित्र येतात सगळ्यांची उस्तवारी मी हसतमुखाने करते तेव्हा नाही ग तुम्हाला माणसांचा त्रास होत, माझ्या मैत्रिणी येणार, किंवा मी हळदी-कुंकवाचा समारंभ करणार म्हणल की तुमची तोंड लगेच वाकडी होतात. लगेच घराची शांती भंग होते. तुमची प्रायव्हसी की काय नष्ट होते वगैरे वगैरे....”
“आई आजकाल पूर्वीसारखी गप्प बसत नाही यार, धडाधड बोलत असते.”
“कुलदिपका तू पण बोलायलाच हवं का? मी म्हणते का म्हणून आणि किती दिवस गप्प बसायचं? माझ पण घर आहे ना! का मी मोलकरीण आहे घराची? मी घरी कधी कुणाला बोलवायचं नाही. आणि तुमच्याकडे येणाऱ्या लोकांचा राबता मात्र संभाळत राहायचा?ठीक आहे तुम्हाला त्रास होत असेल तर मी हॉटेलमध्ये बाहेर भिशी करते.”
“ नको बाई खर्चाच कलम वाढवू, माझी मुल आणि मी चुकलं बाई आम्हां सगळ्याचं तुला काय करायचं ते कर.” राजाच्या या बोलण्यावर घरातला वाद मिटत असे.
राजाराणीची मुल हुशार. इथल कॉलेज शिक्षण पूर्ण करून दोघही मुलगा मुलगी उच्च शिक्षणासाठी परदेशी गेली. थोड राजाच्या मनाविरुद्धच राणी मुलांच्या पाठीशी उभी राहिली. तिने त्यांना उंच झेप घेऊ दिली. कर्ज काढली. पण मुलाचं मन दुखावलं नाही. मुल परदेशात गेल्यानंतर घरात काटकसर करून कर्ज फेडून टाकली. सुरुवातीला मुलांचे नियमितपणे फोन यायचे. मग त्यांची नोकरी सुरु झाली, लग्ने झाली, ते त्यांच्या संसारात रममाण झाले. आणि खऱ्या अर्थाने राजा-राणी एकमेकांसाठी राहिले, आणि एकमेकांसाठी जगू लागले. मुलांचे नियमित फोन जरी आले नाही तरी लगेचच राजा राणीवर चिडचिड करीत असे.
“बघ तुझ्या सुपुत्राचा ह्या आठवड्यात फोन नाही आला. आई बापाची गरज संपली ना! मग कशाला आठवण होईल.”
“अरे आपल्याला आठवण झाली तर एखादेवेळी आपण फोन करावा. त्यांच्या फोनची कशाला वाट बघायची? आहेत ना आता साऱ्या सोई सुविधा.”
“झाल! माझी सोडून आख्या जगाची बाजू तुला पटते. इथेच, इथेच तुझे चुकते. सगळ जग कसं बरोबर आणि मी कसा वाईट हेच तू दाखवून देत असते.”
“ अरे तुझ चूक अस मी कुठे म्हणलं? तू बाबा ना सारखी भांडणाला सुरुवात करू नकोस, मला नाही आवडत. भरल्या घरात भांडू नये. वास्तू तथास्तु म्हणत असते.”
“हो , तूच आता मला आचार विचार संस्कार शिकव. पहिल्यांदा मुल तरी माझी बाजू घ्यायची आता तेपण तुझीच री ओढतात.”
राजा राणीचं सेवानिवृत्ती नंतरच आयुष्य असचं बारीकसारीक कुरबुरी होत चालू होत. सण- वार आले की राणीची घराची साफ-सफाई सुरु व्हायची, स्वच्छता झाली की, हौसेने सजावट सुरु व्हायची. मग राजा म्हणायचा,
“ आता मुलही इथे नाहीत मग कशाला एवढे करत बसतेस? नाही त्या गोष्टीत दांडगा उत्साह असतो तुला.”
“अरे मुल नसली म्हणून काय झाल? आपल्याला आपल देखण घर बघायला चांगलच वाटत ना! मग त्यासाठी नको का कष्ट घ्यायला? मुल इथ नाहीत म्हणून दु:ख करत बसण्या पेक्षा ती तिकडे सुखात आहेत हा विचार करून आपण आनंदात नको का रहायला? आपला आनंदी चेहरा पाहिला की मुलांना पण बर वाटत रे! आणि देवाने घरात उदंड दिल आहे मग कशाला नाही त्या गोष्टीचा शोक करत रहायचं?”
“ मला ना तुझ तत्वज्ञान ऐकायचा हल्ली कंटाळा येतो.”
“ मी जाते स्वंयपाकघरात, नाश्त्याच बघते. तू शांतपणे टीव्ही बघत बस. चिडू नकोसं,” राणीला राजाची चिडचिड आवडत नसे म्हणून ती विषय बदलून माघार घेत असे. ती मनात म्हणत राही, ‘ आपण दोघेच इथे राहतो. नाही म्हणायला नातेवाईक आहेत, पण शेवटी दूरच ना! आजकाल सगळे बिझी असतात. कुणाला कुणाकडे लक्ष द्यायला वेळ आहे? आपण चिडून रागावून आपल्या तब्येती बिघडवून घ्यायच्या. आणि आपलच नुकसान ओढवून घ्यायचं, त्यापेक्षा आनंदी राहिलं तर दुखणी तरी येणार नाही. हा सारखा चिडतो. ह्याच बी.पी. वाढेल म्हणून भिती वाटते. तेव्हा त्याला शांत ठेवल पाहिजे. आपण एकमेकांना जपलं पाहिजे, कधी कळणार ह्याला? बर आहे टीव्हीची करमणूक आहे ते! वेळ तरी चांगला जातो. नाहीतर या flat संस्कृतीत शेजारी कोण हे पण माहित पडत नाही. संवाद तर दूरची गोष्ट. मी बाई अजूनी हळदी-कुंकू करते. मग नवरात्राच असो, नाहीतर चैत्रागौरीच किंवा संक्रातीच.मला घरी माणसांना बोलवायला आवडत. सोसायटी मधल्या बायका माझ्या घरी येतात तेव्हाच काय ते एकमेकींची तोंड पाहतात, म्हणतात, ‘अय्या कित्ती दिवसांनी भेटतोय नाही? आपण ना भेटण्यासाठी कारण काढली पाहिजेत. गेटटुगेदर केल पाहिजे. एवढ म्हणायचं फक्त आणि दुसरे दिवशी दहा जणींची तोड दहा दिशेला. हा कधी कधी चिडतो ते बरोबर आहे म्हणा. म्हणतो, “बिल्डिंगमध्ये तू एकटीनेच हळदी-कुंकू करण्याचा मक्ता घेतला आहे का? इतर बायकांना काय झाल? अंगाला झळ लावून घ्यायला नको, आणि तू बस राबत, आणि सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत.”
घरात गणपतीच आगमन होऊन गेल. मग नवरात्र झालं दोन्हीवेळा राणीकडे हळदीकुंकू समारंभ झाला. राणीचं म्हणजे कधी थोडक्यात करण नाहीच. ती हळदीकुंकू करणार म्हणजे डिश ठेवणारच. बायकांना तसचं कधी पाठवणार नाही. बायका तृप्त होऊन गेल्या की राणीचा चेहरा समाधानाने उजळला जायचा. तिला एकटीला हल्ली झेपत नव्हत तरी तिचा सोस काही कमी झाला नव्हता. ती म्हणायची, ‘घरातून माणस तृप्त होऊन गेली पाहिजेत, म्हणजे घरही तृप्त होत. घरात समाधान नांदत.’ आता राणीची दिवाळीची तयारी सुरु झाली. घरात चकलीची भाजणी झाली. लाडवाच,चिवड्याच सामान आलं. उटणी, साबण, तेल आलं. राजा कुरकुरत होता.
“ अग आपण दोघच आहोत. दोघंचीही पथ्य आहेत. आपण किती आणि काय फराळाच खाणार? कशाला एवढा फराळ बनवण्याचा उपद्व्याप करत बसतेस?”
“तू गप्प बस तुला कळत नाही. हा वर्षातला मोठा सण असतो. घरात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची अपेक्षा असते. त्यांच्या साठी कराव लागत सगळ.”
“ बस सगळा उठारेठा करत. मला स्वयंपाकातल काही येत नाही. तेव्हा तुलाच सगळ कराव लागणार.”
“अरे करेन हळू हळू. आता तुझ्या म्हणण्याप्रमाणे करंज्याचा आणि अनारसा यांचा घाट ह्या वर्षी घालणार नाही. मग तर झाल? पण रीतीच तरी करायला हव ना!”
राणीने हळू हळू करत सगळे फराळाचे पदार्थ बनवले. दुसरे दिवशी दिवाळी तेव्हा पहाटे रांगोळी काढणे होणार नाही म्हणून आदल्या दिवशीच घरासमोर सुंदर रांगोळी रेखली. जरबेराची ताजी फुले आणून फ्लॉवरपॉट सजवला. लाईटच्या माळा सोडल्या, आकाशकंदील लावला. सजवलेल्या घराचे मुलांना फोटो पाठवले. व्हॉटस अप वर मुलांनी टाकलेले स्माईली पाहून तिची पण कळी खुलली. पुढच्या वर्षी दिवाळीला भारतात येण्याचा मुलांनी वायदा पण केला. राणी राजाला म्हणाली,
“खरच पुढल्या वर्षी मुलांनी आणि नातवंडानी भरलेलं घर पाहिला किती मजा येईल नाही? घरात माणसांशिवाय सणाची मजा नाही. आपण ह्यावर्षी अस करू या का? भाऊबीजेच्या दिवशी तुमच्या बहिणीला आणि माझ्या भावाला आपल्याच घरी बोलावूया का? म्हणजे घर माणसांनी भरल्या सारखे वाटेल. लक्ष्मीपूजनाला बिल्डींग मधल्या बायका मी बोलावल्या आहेत.” हे ऐकून राजाचा मूड बदलला. रागाने त्याचा थरकाप झाला. तो चिडून बोलला,
“आख्खं गावच बोलावं ना! आपली जहागिरी उतू चालली आहे. आणि सगळ्या गावाला भेटी आणून वाट. कामाला येणाऱ्या सगळ्यांना बोनस तर देऊन झालेच आणि आता भेटी पण वाट.”
“अस काय बोलतोस रे? नेहमी कुणाला काही करतो का आपण? नेहमी लोक आपल्याकडे येतात का?”
“सारखीच तर कारणे शोधत असतेस लोकांना बोलवायला. जा बर तिकडे, पुढचे सात जन्म मला तुझे तोंड दाखवू नकोस. आयुष्यात माझ कधी तू ऐकणार नाहीस.”
राणीच्या डोळ्यातून आसवं ओघळायला लागली. काही न बोलता ती तिथून उठली आणि बेडरूममध्ये गेली. मनात म्हणाली, ‘असा काय मी घोर अपराध केला? काय कमी केलं घरासाठी? तरी हा इतक घाणेरड का बोलतो? ह्याला आत्ता तोंड दाखवायलाच नको.’ विचार करत ती संध्याकाळच जेवण न करताच झोपी गेली. राजाने पण राणीला जेवणासाठी उठवले नाही. आपले जेवण उरकून तोही बेडवर आडवा झाला.
दुसरे दिवशी दिवाळीचा पाहिला दिवस! पहाटे राजाला जाग आली. तो उठला त्याने आकाशकंदील लावला. लाईटच्या माळा लावल्या. राणीने तयार करून ठेवलेल्या पणत्या लावल्या. स्वत:चा चहा केला. पण अजुनी राणी का उठली नाही म्हणून तो तिला शेवटी उठवायला गेला. राणीच्या हाताला त्याने स्पर्श केला तर, तिचे अंग तापलेले होते. कण्हतच राणी म्हणाली,
“ सॉरी राजा, मला खरच उठवत नाही रे. सगळ अंग ठणकत आहे. डोळे पण उघडायला नको वाटत आहे.” कालचा थोडा राग राजाच्या मनात होताच, त्यामुळे ‘ठीक आहे’ म्हणत तो तिथून निघून गेला. स्वत:ची अंघोळ, देवपूजा उरकून तो देवळात जाऊन आला. तोपर्यंत सकाळचे साडेआठ वाजले. तरिही राणी झोपलेलीच होती. मग मात्र राजा बेचैन झाला. सणांच अस राणीला झोपलेलं त्याला पाहवेना. घरात तिची सणाची लगबग, देवाला नैवेद्य बनवण, देवासाठी नवीन अत्तर काढण, राजाला बळजबरीने नवीन कपडे घालायला लावण, बेडवर ठेवितल्या बेडशीट घालायची गडबड हे सार ठप्प झालेलं पाहून त्याला चुकल्या सारखे झाले. घरात दिवाळी आहे असे वाटेचना. आणि मुख्य म्हणजे राणीला अशा झोपलेल्या अवस्थेत त्याला बघवेना.
“चल आधी राणी, आपण दवाखान्यात जाऊ या, आरश्यात बघ जरा काय पण रया गेली आहे. तू आजारी आहेस पण सर घरचं आजारी वाटतय.”
“हो रे राजा, मला सार कळतंय, पण काय करू? डोळे सुध्दा उघडायला नको वाटत आहेत.अरे आणि दिवाळीचे सगळे दवाखाने बंद आहेत. मी बघते, क्रोसिन घेते. उतरेल ताप. नाहीतर उद्या बघू.”
कामवाल्या बायका आपली काम करून निघून गेल्या. अंघोळीसाठी ती बाथरूममध्ये गेली पण थंडीने अंगावर रोमांच उभे राहिले. नुसत तोंड धुवून ती बाहेर आली. राणीने कसाबसा कुकर लावला. कोणती भाजी करावी या विचारात फ्रीज उघडला. दिवाळीसाठी रोज नवीन नवीन चांगल काही तरी करायचं म्हणून फ्रीजमध्ये भाज्या भरलेल्या होत्या. पण तिला चक्कर आल्यासारखं वाटायला लागलं म्हणून ती पुन्हा बेडरूममध्ये जाऊन झोपली.
फ्लॉवरपॉट मधल्या फुलांकडे लक्ष न दिल्याने संध्याकाळी त्यांनी माना टाकल्या होत्या. दिव्याची माळ खिडकीवरून घसरली होती. पण राजाला काही ती नीट करणे जमल नाही. राणीने पाहिलं असत तर आधी जावून तिने ती व्यवस्थित बसवली असती. एक मिणमिणती पणती राजाने कशीबशी तुळशीपुढे लावली. राणी ठीक असती तर म्हणली असती,
“ कंजूसपणा नको हं राजा चांगल्या १०-१२ पणत्या लावू या, दिव्यांचा उत्सव आहे. सगळी टेरेस उजळून निघाली पाहिजे. अरे आकाशकंदीला मध्ये झिरोचा बल्ब नको लावूस मी चांगला जास्त मोठा बल्ब आणला आहे. तो लावू या. त्या रंगीत कागदातून प्रकाश तरी बाहेर यायला हवा ना!”
राजाच्या आग्रहामुळे राणीने कसाबसा घासभर भात खाल्ला. आणि संध्याकाळी आठ वाजताच ती झोपी गेली. रात्री मध्ये एकदा उठली आणि पुन्हा झोपली. सकाळी राजा उठल्यावर त्याने तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तिचा डोळाच उघडत नव्हता. अंगाला हात लावला तर चटका बसत होता. इतका अंगात ताप होता. मग राजाने धावपळ करून तिला हॉस्पिटलमध्ये हलवलं.
रात्री हॉस्पिटलमध्ये राणीच्या सोबत झोपायला गेलेला राजा सकाळी घरी आला. पेपरवाला दाराला पेपर लावतच होता, राजाने त्याला थांबवल, हॉस्पिटलमध्ये रात्री झोपताना राणीने राजाला आठवण केली होती.
“अरे सर्व लोकांसाठी फराळाचे पुडे तयार करून ठेवलेले आहेत. ते प्रत्येकाला आठवणीने दे.”
राजाने किचनमधल कपाट उघडल तर त्याने पाहिलं, राणीने दहा बारा फराळाचे आणि त्याचबरोबर भेटवस्तूचे पुडे तयार केलेले होते. प्रत्येकावर नाव घालून ठेवली होती. सर्वाना बोनस तर तिने आधीच दिला होता. राजाने पेपरवाल्याचा पुडा आणि भेटवस्तू शोधून त्याला देऊन टाकली. खुश होऊन तो म्हणाला,
“दादा बाई दिसत नाहीत? सगळ्या बिल्डिंगमध्ये फक्त तुमच्याकडूनच फराळ आणि भेटवस्तू मिळते बघा. बाकी सारे फक्त बोनस देऊन मोकळे होतात. बाई खूप उदार आहेत. थंडी सुरु झाली की अधून मधून चहा सुध्दा देतात.”
राजाला गलबलून आलं. आपली बोलणी खाऊन सुध्दा राणी आपल्या सहवासातल्या सगळ्या लोकांसाठी प्रेमाने काहीना काही करत असते. आज प्रथमच राजा पहात होता. राणीने किती शिस्तीत सगळ्या लोकांसाठी भेटवस्तू आणि फराळाचे पुडे तयार करून ठेवले होते. पुन्हा त्याच्यावर सुवाच्य अक्षरात सर्वांची नावे टाकली होती. त्यावर शुभेच्छाच्या चार ओळी लिहिल्या होत्या. हे सर्व राणी किती वर्ष करीत आहे आणि आपले एकदाही ह्या गोष्टीकडे कधी लक्ष गेले नाही! ही गोष्ट राजाला जाणवली आणि त्याला वाईट वाटले. राणीचे बोल त्याला आठवले, “ अरे आपल्या ऑफिसमध्ये आपल्याला दिवाळीच्या गिफ्ट वस्तू कुणी कुणी देत असत. पण ह्या लोकांना कोण देणार? आपण ह्यांना आपल्याला नको असलेल्या जुन्या पान्या वस्तू देत राहतो. पण आपल्याला सुध्दा नवीन गोष्टी मिळाव्यात अस त्यांना वाटणारच ना!. नवीन भेटवस्तू मिळाल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद एकदा पहा. म्हणजे आपण भरून पावतो.”
फुलवाला, इस्त्रीवाला, कामवाल्या बायका सगळ्यांचे पुडे राजाने त्यांच्या हवाली करून टाकले. शेवटी दारात कचरा गोळा करायला आलेला सोनू त्यालाही राजाने पुडा दिला तो त्याने आपल्या आठ-दहा वर्षाच्या मुला जवळच्या पिशवीत ठेवला. पिशवी मुलाच्या हातून निसटली.आणि त्यातील वस्तू बाहेर पडल्या. तो लगेच मुलावर खेकसला,
“ कायबे चरबी वाढली काय? मर जा तिकड. एक काम धड करत नाय!” राजा लगेच सोनुला म्हणाला,
“अरे सणांच वेडवाकड बोलू नकोस मुलाला, वास्तू तथास्तु म्हणत असते. नेहमी चांगल बोलावं. म्हणजे सगळ चांगल होत.” त्यावेळी राजाच्या मनात येऊन गेलं आपण तरी रागाच्या भारत काय करतो? आणि ह्या सोनुला चांगल बोल म्हणून सांगतो.
सगळे आवरून राजाला आता हॉस्पिटलमध्ये जाण्याची घाई झाली होती. तेवढ्यात माळी आला त्याचाही पुडा राणीने तयार करून ठेवला होता. तो त्याला देऊन राजा दाराला कुलूप लावत होता, समोरचे जोशी काका बाहेरून येत होते. त्यांनी विचारलं,
“ कशी आहे वहिनींची तब्येत? हॉस्पिटलमध्ये आहेत ना? अगदी दिवाळीच दुखण आलं वहिनींना”
“ती कोमात गेली आहे. मुलांना फोन करून बोलावून घेतलं आहे.” म्हणताना राजाचा कंठ दाटून आला. जोशी काकांनी राजाचा खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले,
“ काळजी नका करू, वाहिनी म्हणतात त्याप्रमाणे आपण चांगल चिंतू या, म्हणजे चांगलच होईल सगळ.”
जोशी काकांचे साधे शब्दही राजाला खूप मोठा आधार देऊन गेले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुरेख!

राजसी आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपल्या मताचा नक्कीच आदर आहे. पण माणसांनी नेहमी चांगल बोलावं ह्या मुद्यावर लक्ष केंद्रित व्हाव यासाठी राणीला कोमात पाठवलं.