अस्तित्व !!! (भाग २) 

Submitted by Sujaata Siddha on 10 January, 2020 - 06:25

अस्तित्व !!! (भाग २) 

हॅलो S S … पाठीमागून आवाज आला तसं शुभ्रताच्या छातीत धडधडलं , मधुरा मावस बहिणीच्या लग्नासाठी पुण्याला गेली असल्यामुळे आज ती एकटीच शेतात फिरायला आली होती , आणि विहिरीच्या कट्ट्यावर बसलेली असताना , खरं तर तिला मनातून नकळत वाटून गेलं होतं की आज ‘नील ’ आपल्याला गाठणार , तसंच झालं ,’तो’ पाठीमागून आला आणि थेट तिच्या शेजारी येऊन बसला, असं डायरेक्ट तिच्यशेजारी बसण्याच्या त्याच्या आगाऊ पणाचा तिला जरा रागही आला होता पण तितक्यात तो हसला आणि ती खडीसाखरे सारखी विरघळून गेली ,तरीही वरकरणी तसं न दाखवता तिने त्याच्याकडे थोडं रागाने बघितलं
“काय ? .. आवडलं नाही ? मी असा एकदम येऊन बसलो ते ? “
“तसं नाही “
“म्हणजे आवडलं “ तो तिच्याकडे तिरप्या नजरेने बघत ,मिश्कील स्वरात म्हणाला .
, “ मुळीच नाही आवडलं , “ ती ठसक्यात म्हणाली .( हा इतका का confident आहे स्वतः:बद्दल ?)
“Oh I am sorry , मी जाऊ मग ? “ तो उठायच्या पवित्र्यात म्हणाला .
“कशाला जाता ? I mean , बसलात तरी चालेल,(बसताना विचारलं नाही बसू का ,आणि आता विचारतोय जाऊ का ? मूर्ख… निळ्या !! …. )
तो परत बसला , त्याच्या ‘Eau de Cologne.’ चा मंद सुगंध तिच्या आजूबाजूला दरवळला आणि तिच्या चित्त वृत्ती प्रफुल्लित झाल्या. किती तरी वेळ कोणीच काही बोललं नाही , इतक्या वेळा ती इथे बसली होती पण इतकं छान कधीच वाटलं नव्हतं ,तिला नवल वाटलं , हि याच्या सहवासाची जादू आहे ? तितक्यात तोच म्हणाला , “मस्त वाटतंय ना ? बघ ना समोर मावळतीला जाणारा सूर्य , आकाशात मुक्तपणे विहरणारे हे पक्षी , हि समोरची प्रचंड विहीर , त्याच्या बाजूंनी लगबग करणाऱ्या त्या गोंडस पिटुकल्या खारोट्या ,आपल्या डोक्यावर फांद्याची सावली धरणार हे डेरेदार झाड आणि …… “ तो बोलायचा थांबला , इतका वेळ त्याच्या त्या वर्णनाने आणि आवाजातल्या मार्दवाने भारावलेल्या तिने अभावितपणे विचारले ,
“आणि ?..... “
..... “आणि मी… ! तुला एकदम भारी वाटलं असेल ना ? जादू झाल्यासारखं ? “
“ ओ हॅलो ....मी आणि मधुरा असताना पण एवढंच भारी वाटतं , तुझं काय कौतुक ? हि इथल्या जागेची जादू आहे “ शुभ्रता फणकाऱ्याने म्हणाली .
“हाहाहा , कसला झटका आहे मिरचीचा तो,...त्या नादात आपण अहो जाहो वरून एकेरी वर आलो ते पण कळलं नाही तुला .पण तुला सांगू ? मला मात्र मनापसून वाटतंय , कि जादू तुझ्यात आहे ,जागेत नाही . तू जिथे आहेस तिथला अख्खा परिसर जादूचा होतो , you know whenever i see your face , a wave of happiness touches my heart so intensely “ तो तिच्या डोळ्यात खोलवर बघत म्हणाला आणि ती एकदम गोरी मोरी झाली . त्याचे बदामी आकाराचे आणि तपकीरी रंगाचे डोळे खूप बोलके होते , मघाचा तिचा फणकारा कुठल्या कुठे पळाला , पण तिला लगेच वाटून गेलं , कुणास ठाऊक सगळ्या मुलींशी हे असलंच काहीतरी बोलत असेल , “
“ Never मी हे असं सगळ्यांशी असं नाही बोलत , तुझ्याशी बोलतो कारण तु मला आवडतेस खूप “ तो तिच्याकडे रोखून बघत म्हणाला.
“अरे देवा !.. याला मनातले विचार कळतात कि काय ? “ शुभ्रा ला कसंनुस झालं .
“ हो “
“क्काय ? “ ती हबकली .
“हो मला मनातले विचार वाचता येतात , अर्थात सगळ्यांचे नाही वाचू शकत , त्यांचेच वाचतो ,ज्यांच्या आणि माझ्या मध्ये काही connection झालं आहे , “
“कसलं कनेक्शन ? कशा बद्दल बोलतोयस ? मला काही झेपेल असं बोल ना !.” शुभ्रता आता जरा नर्व्हस झाली .
“ऐक शुभ्रता काही दिवसांपूर्वी तू आणि मधुरा , तुम्हा दोघींशी मी बोललो , मला सांग तेव्हा आपण पहिल्यांदाच एकमेकांना पाहिलं होतं का ?”
“हो “ ती पट्कन म्हणून गेली पण तिच्या एकदम काहीतरी लक्षात आलं आणि एक पॉज घेऊन मानेनेच नाही म्हणाली .
‘ शुभ्रता मी तुमच्याशी बोलायला आलो त्याच्या कितीतरी आधी कॉलेज च्या पहिल्या दिवशी कॅन्टीन मध्ये तू मला पाहिलेलं आहेस आणि त्याचवेळी मी तुला आवडलो आहे , हो ना ? आणि हे तू कोणाशीही बोललेली नाहीस , अगदी मधुराशी देखील , हो ना?”
“हं “
“मग हे मला कसं कळलं ? “
यावर ती गप्प बसली , तो एकदम आवेगाने म्हणाला ,
“ My love !.. you are mine ज्या क्षणी मी तुला पाहिलं त्या दिवसापासून वेड लावलंयस literally मला तू..do you know that ? and i know you have the same feeling for me ..isn’t it ? बोलताना त्याचे डोळे तिच्या हृदयाचा ठाव घेत होते ,त्यात काहीतरी शोधत होते , मात्र त्यातून त्याला अपेक्षित प्रतिसाद आला नाही.
“गप्प का झालीस ? बोल ना “
“...... “
“ शुभ्रा please बोल ना काहीतरी, मनात तरी बोल ,काही problem नाही,मी वाचेन, i can read your mind very well !.. ” तो पुन्हा त्याच मिश्किल स्वरात म्हणाला ,पण शुभ्रता हसली नाही , त्याचं असं एकदम उथळपणे व्यक्त होणं तिला झेपलं नाही , आवडलं पण नाही , आपल्या भावनांच्या खाजगी विश्वात आगाऊ पणे शिरणं , सरळ सरळ आपले विचार वाचणं ,तिला हे सगळं चमत्कारिक वाटलं ,हा खरंच एवढा फास्ट फॉरवर्ड असेल, तर याला इथेच थांबवायला हवं , ती त्याला निक्षून म्हणाली ,“हे बघ ,मला असं काही वाटत नाही , एखादा दिसायला आवडतो , छान वाटतो ,त्याचा अर्थ असा नाही होत कि लगेच आपण त्याच्या प्रेमात पडलो , हे खरं खुरं आयुष्य आहे ,एखादी हिंदी फिल्म नाही , आपण असे किती ओळखतो एकमेकांना ? काय माहिती आहे तुला माझ्याबद्दल ? आणखी एक गोष्ट, you are not allowed to entre in my mind without my permission .जरी तुला अशी काही विद्या अवगत असली तरी तुला हे हि माहिती पाहिजे की एखाद्याच्या परवानगी शिवाय त्याच्या मनात प्रवेश करता येत नाही , आणि तुला तर मी असा access कधीच देणार नाही “ ,प्रत्येक शब्दावर जोर देत ती म्हणाली आणि काहीशा तिरीमिरीने उठून तिने टेकडीवरून खाली उतरायाला सुरुवात केली . तेवढ्यात तिच्यामागे धावत जाऊन तिचा हात पकडून त्याने तिला थांबवलं . “OMG !.. शुभ्रा I am sorry !.. मी तुझी गमंत करत होतो . मला असं काही करता येत नाही , मी उगाच खडे टाकून बघत होतो , ऐक ना … शुभ्रा थांब ना . मला वाटलं नव्हतं तु इतक्या चट्कन माझ्यावर विश्वास ठेवशील , really i am very sorry .!तुला खरच वाटलं मला असे विचार वाचता वगैरे येतात आणि मी तुझ्या प्रेमात वगैरे पडलोय म्हणून ? “ त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे आणि खोडकर असे भाव होते ,ते बघून तिचा अहंकार दुखावला गेला आणि पुढच्या क्षणाला त्याचा हात झटकून ती निघून गेली . ती निघून गेली तरी तो तिथेच थांबला , कितीतरी वेळ ती गेली त्या दिशेने बघत राहिला , शुभ्रता तणतणत घरी आली . खोलीत जाऊन धाडदिशी बेड वर कोसळली , उष्ण आणि कढत अश्रू तिच्या गालावरून ओघळायला लागले .
“ “शुभ्रा ssss जेवायला चल ss “ काकूने आतून जेवायला आवाज दिला ,
“काकू , भूक नाहीये .”
“का गं ? भूक नसायला काय झालं ? काही खाऊन आलीस का बाहेर ? “काकू आता आत खोलीत आली
“ नाही ग , असच भूक नाहीये आज.”
“ ऑ !.. अगं मघाशी शेतावर फिरायला जाताना तर सांगून गेलीस की , लवकर जेवणार आहे आज ,खूप भूक लागलीये “
यावर शुभ्रता काही बोलली नाही .
काकू तिच्याजवळ येऊन तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली .
“आई -बाबांची आठवण येतेय ? “
“हो ! ..” डोळ्यातल्या अश्रूंना वाट देत शुभ्रा काकूच्या कुशीत शिरली “
काकूने ने एक उदास सुस्कारा टाकला आणि कसनुसं हसली , “चल जेवायला, थोडं तरी खाऊन घे , रात्री उपाशी झोपू नये राजा असं .माझ्या नमीला पण अशीच सवय होती ,ताल गेला मॅडमचा कि जेवणावर राग काढायच्या ,आता कोण देत असेल जेवायला ?” ते ऐकून पुढे काही घडायच्या आत शुभ्रता उठली आणि दोघी स्वयंपाक घराकडे निघाल्या . शुभ्रता साधारण नवंवीत होती तोवर त्यांच्या घरात माणसांची आणि आर्थिकही संपन्नता होती,आई-वडील , काका -काकू,आजी-आजोबा , दोन लहान चुलत बहिणी ,सगळं घर गोकुळा सारखं नांदत होतं , तिच्या बाबांचा सावकारीचा वडिलोपार्जित व्यवसाय होता वसुलीसाठी ते निरनिराळ्या गावी जात ,स्वभावाने ते उदार होते पण बोलायला अतिशय परखड त्यातूनच त्यानां बरेच शत्रू निर्माण झाले होते ,त्याचप्रमाणे त्यांच्या उत्कर्षावर जळणारेही कमी नव्हते . एकदा, तालुक्याच्या गावी गेले असताना त्यांची एका गाव गुंडांशी बाचाबाची झाली ,प्रकरण पुढे चिघळत गेलं आणि त्यानंतर च्या एका अमावस्येला घरावर दरोडेखोरांचा हल्ला झाला, या जीवघेण्या हल्ल्यात शुभ्राताचे आई-वडील , काका , आजी आजोबा , दोन्ही लहान बहिणी सगळे बळी पडले , आणि एका रात्रीत होत्याचं नव्हतं झालं , घटना घडल्यावर त्या स्थळावर जी काही परिस्थिती निर्माण झाली होती त्यावरून कोणाच्याही लक्षात येत होतं कि दरोडेखॊरांचा मुख्य उद्देश चोरी हा नसून घरच्या सगळ्या माणसांना संपवणे हा असावा , हे त्याच त्या गावगुंडाचं कृत्य होतं , त्यांच्या उत्कर्षावर जळणाऱ्यांचं , हितशत्रूचं की अजून कोणाचं हे शेवटपर्यंत कळलं नाही ,त्या भीषण हत्याकांडाची चर्चा पूर्ण पंचक्रोशीत किती तरी दिवस रंगली होती , वेगवेगळ्या तर्कविर्तकांना त्यानंतर खूप दिवस ऊत आला होता ,त्यावेळी शुभ्रा काकूबरोबर काकूच्या माहेरी गेली होती ,त्या दोघीच इथे नव्हत्या त्यामुळे त्या वाचल्या ,नमी आणि चिमी ची परीक्षा दोन दिवसांनी संपली की त्या वडिलांबरोबर हि गावी जाणार होत्या , पण त्याआधीच हा भयंकर प्रसंग घडला, पुढे दरोडेखोर अर्थातच सापडले नाही आणि फाईल close झाली . या सगळ्या घटनेचा काकूच्या मेंदूवर विपारित परिणाम झालाच , ती हिस्टेरिक झाली ,मधूनच हसायची मधूनच रडायची ,कधी तासनतास एका जागी बसून राहायची तर कधी भराभर स्वयंपाक करून नमी चिमी ला जेवायला ताटं वाढून ठेवायची , कधी शाळेची वेळ झाली म्हणून लगबगा बाहेर जाऊन हाक मारत सुटायची अशावेळी तिला आवरताना शुभ्रता आणि काकूच्या माहेरच्या लोकांना नाकी नऊ येत. या आणि अशा सगळ्या वातावरणातच शुभ्रता तरुण होत गेली , जगण्यासाठी आधाराला काकू हि तिची एकुलती एक फॅमिली , तिला जपण्यासाठी आपलं दुःख बाजूला ठेवून ती खंबीरपणे उभी राहिली ,काकूच्या माहेरचे जमतील तसे वरचेवर येऊन जात ,पण सतत काकूला सांभाळणे हे मुख्य काम शुभ्रतालाच करावं लागे , त्याच वेळी तिला कळून चुकलं कि मरण सोपं असत , खरा कस लागतो जीवन जगतानाच , एकाच वेळी आपल्या जिवाभावाच्या माणसांना इतक्या निर्घृण पणे कुणी तरी मारतं आणि आपल्या हातात काहीही उरत नाही, एका रात्रीतून भरलं घर रिकामं होताना बघितल्यावर आयुष्य नश्वर असतं आणि कोणत्याही क्षणी होत्याच नव्हतं होऊ शकतं , हे तत्वज्ञान समजण्यासाठी तिला कुठल्या प्रवचनांना जाण्याची गरज पडली नाही ,फक्त हे सगळं घडून गेल्यानंतर आता नव्याने आयुष्य सूरू करायचं कसं आणि एकट्याने जगायचं कसं ? हा मूलभूत प्रश्न तिला पडलेला , आपणही आत्महत्या करावी असं कितीदा तरी तिला वाटून गेलं पण शुभ्रता भ्याड नव्हती ती उभी राहिली . कोणाचीही सहानुभूती न घेता हळूहळू सावरली , त्या कटू आठवणींशी स्वतःला बांधून न घेता स्वतंत्रपणे जगायला शिकली, हसायला शिकली , तिच्या या परिस्थितीची कल्पना तिच्या शाळेत ,आजूबाजूला सगळ्यांना होती , त्यामुळेच तिला लहानपणापासून ओळखणाऱ्या सर्वाना तिच्याबद्दल प्रेम आणि लहान वयात क्वचितच मिळणारा आदरही होता . साठवलेल्या काही ठेवी वर त्या दोघींची काही वर्ष निभावून गेली , पण आता शुभ्राला स्वतः:चा आणि काकूचा चरितार्थ स्वतः:च चालवायचा होता , त्यामुळे , तसंही प्रेमाबिमाचा विचार करायला तिला वेळच नव्हता , तिच्या दिशा तिने आखून घेतल्या होत्या तशा मर्यादाही , एखाद्या गोष्टीचा मोह व्हायच्या आत, मनाला आक्रसून आवरून घेणं तिला जमायचं ,आयुष्याच्या सुरुवातीलाच झालेल्या दुर्दैवी आघातांनी तिला दिलेली ती देणगी होती.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users