सांजशकुन - जी. ए. कुलकर्णी

Submitted by अतुल ठाकुर on 7 January, 2020 - 07:27

82512874_2085751974903197_3749143748009787392_o.jpg
सध्या जीएंच्या "सांजशकुन" चे वाचन सुरु आहे. असंख्यवेळा हे पुस्तक वाचले तरी मला ते संपूर्ण कळेल याची खात्री वाटत नाही. पण मी ते वाचत असतो याचे कारण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्याचा मला वेगवेगळा अर्थ लागतो असे वाटते. त्यामुळे यापुढेही या पुस्तकाचे वाचन सुरु राहिलच. जीएंच्या इतर कथासंग्रहांपेक्षा हा कथासंग्रह वेगळा आहे. जीएंच्या इतर कथांपेक्षा यातील काही कथा तुलनेने छोट्या आहेत. यातील कथांमधल्या बहुतेक माणसांना नावे नाहीत. जीए ती माणसे कोण आहेत इतकंच सांगतात. जीएंना ते पुरेसं वाटतं कारण या कथांमध्ये त्या नावांची गरजच नाही. म्हणून मग त्या कथांमध्ये बैरागी असतो, प्रवासी असतात, साधक असतात, वाटसरु असतात, व्याध असतो. काहीवेळा नुसता समुद्रच असतो. योद्धे असतात. थोडक्यात सांगायचं तर काही विशिष्ट प्रवृत्ती ठळकपणे दाखवणारी माणसे येथे आढळतात. मात्र इतर कुठलीही माहिती जीए देत नाहीत. कथांमध्ये येणार्‍या प्रदेशांच्या वर्णनामध्ये हा वेगळेपणा आहेच.

बहुतेक कथांमधले प्रदेश हे वेगळ्या वाटेवरचे आहेत. सामान्यपणे माणसे जी वाट चोखाळत नाहीत तेथले आहेत. मग ते दुर्गम भागातील भग्न मंदिर असेल. एखादे आडवाटेवरचे गाव असेल. गुहा असेल. या कथांमधील मार्ग बहुधा एकाकीच आहेत. काहीवेळा सोबत असते पण अंतिम प्रवास हा एकट्यानेच घडणार असतो. जेथे घटना घडतात त्या वास्तूही नेहेमीच्या नाहीत. मंदिर तर आहेच पण ते फार प्राचीन, मनोरा आहे, दीपस्तंभ आहे.अगदी साधी पण एकाकी झोपडीदेखिल आहे. या सार्‍या कथांमधील निर्जन एकाकीपणाला विराट पार्श्वभूमी आहे ती अथांग सागराची, घनदाट अरण्याची, जीएंच्या भाषेत सांगायचे तर हाताने गोळा करता येण्यासारख्या दाट अंधाराची. कथानायकाव्यतीरिक्त इतर माणसे या कथांमध्ये जेव्हा येतात तेव्हा ती माणसे हे वेगळे वातावरण जास्त गडद आणि अधोरेखित करत जातात. आणि नेहेमीप्रमाणेच जीएंच्या या कथांमध्येदेखील सामना हा माणसामाणसांमधला नसून माणूस आणि नियतीमधला आहे.

मग एखाद्या बैराग्याला आपण नियतीच्या हातातले बाहुले आहोत का असा प्रश्न पडतो आणि तो निसर्गाचा रौद्रभीषण चमत्कार काहीक्षणापुरता का होईना बदलण्याचा प्रयत्न करतो. कुणीतरी आपले अश्रू आणि रक्त यांचे शिंपण करून प्रेमाचे, मैत्रीचे रोप लावण्याची धडपड करतो. कुणी प्रवासी वासनांचे अत्त्युच्च टोक गाठून त्यातून मुक्त व्हायला पाहतात. तर कुणी आयुष्याने घातलेली निरनिराळी कोडी सोडवत मुक्तीच्या प्रवासाकडे वाटचाल करु पाहतात. सार्‍या कथांमधले एक महत्वाचा समान बिंदू म्हणजे कुंपणापलिकडे काय आहे ते पाहण्याची घडपड कथांमधील ही माणसे करीत असतात. येथे ऐहीक जीवनातील समस्या नाहीत. आपल्याकडे काही परंपरांमध्ये ऐहीक आयुष्यातील सारे भोग आणि वासना पुर्ण झाल्यावर अध्यात्माचा प्रवास सुरु होतो. काहीसा त्या तर्‍हेचा या कथा नायकांचा प्रवास आहे. काही कथांमध्ये तर नायक मानव नाही. समुद्र आहे, गोरीला आहे, सर्प आहे. किंवा काही ठिकाणी नुसत्या प्रसंगांचे वर्णन आहे.

असे म्हणतात की ब्रह्म पाहिलेला माणूस ते कसे आहे सांगायला परत येत नाही. तो त्यातच विलिन होऊन जातो. या कथांमधली माणसे जेव्हा या जगावेगळ्या प्रवासाला निघाली आहेत ती परत न येण्यासाठीच. त्यांना ऐहीकाची ओढ नाही. ती सारी बंधने निश्चयाने बाजूला सारुन, मायेचा पसारा बाजूला करून त्यांचा प्रवास सुरु झाला आहे. हा प्रवास कुठल्या वाटेने होणार आहे? त्याची दिशा काय आहे? या प्रवाशांचे ध्येय काय आहे? ते त्यांना लाभते की नाही याबद्दल सुस्पष्ट उत्तर सर्वच कथांमध्ये मिळत नाही.आणि मिळालेले उत्तर स्पष्ट वाटले तरी त्यात काहीतरी उणे राहून गेलेले आहे हेही वाचकाला जाणवावे अशी किमया जीएंनी या कथांमध्ये केली आहे. कथा या तपशीलाने भिन्न असल्या तरी नियतीशी मनस्वी मानवाने घेतलेली झुंज हा धागा जीएंनी या कथांमधून एकसारखा गुंफला आहे. सांजशकुन मधल्या या कथा वाचताना दम लागतो. या कथांबद्दल लिहिणे माझ्यासारख्याला पेलवणारे नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीही एक (अयशस्वी का होईना पण) प्रयत्न करावासा वाटतो. त्याची सुरुवात या कथा संग्रहातील "अस्तिस्तोत्र" या कथेने करायची आहे.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जी ए कुलकर्णी यांचं नाव वाचूनच हा धागा उघडला. अप्रतिम! जी'ए'ओ!!! Happy
त्यांचं विश्वच वेगळं, जेव्हा मराठी लेखक हिरवाई, नटवाई, सरदार, प्रेमकथेतला नायक यांच्यामध्ये गुंग होते,त्या काळात जीए आपल्याला रानोमाळ फिरवत, उदास, भकास, उजाड जागांमध्ये घेऊन जातात.
निओ नोयर थ्रिलरच आजकाल जे फॅड आलय, त्यातल्या कित्येक सर्वोत्कृष्ट मांडण्या जी ए नी अनेक वर्षांपूर्वी केल्या.
काजळमाया नक्की वाचा.

जी ए कुलकर्णी यांची पुस्तके वाचली पण फारशी काही भावली नाहीत. गूढ अनाकलनीय असे लेखन आहे.

जी ए कुलकर्णी हे हाईप्ड लेखक आहेत असे माझे मत आहे.

परंतु दिग्गज साहित्यिकांनी त्यांना नावाजले असल्याने आपल्याला ते कळत नाहीत (आधुनिक चित्रकले सारखं) असे समजून मी ते सोडून दिलं आहे.

नाही तरी आमच्या सारख्या यःकश्चित वाचकाला कोण विचारतो

आपली पट्टी काळी दोन उगाच पांढरी पाच मध्ये गायचा प्रयत्न कशाला करायचा?

रसग्रहण छान जमलय.

जी. ए. कुलकर्णी आणी ग्रेस ह्यांचं लिखाण मला कधी कळलच नाही. पण बरीच दर्दी, रसिक, जाणती लोकं चांगलं म्हणतात म्हणजे आपल्याला कळत नसलेलं पण चांगलं असावं असं मानून मी त्या दिशेचे दोर कापले आहेत. अर्थात त्या चाहत्यांमधे काही 'लखू रिसबूड' सुद्धा असतात (जे आपल्याला कळते ते सामान्य आणी कळत नाही ते असामान्य म्हणणारे Happy ).

जी ए जबरदस्त लिहितात.
त्यांच्या काही कथा खास करून फँटसी प्रचंड पोटेनशियल वाल्या आहेत.प्रत्येक कथा नवंच काही देऊन जाते.सामान्य गरीब माणूस वाल्या कथा आवडतात पण शेवट सर्वांचा भयाण असतो.

फँटसी मध्ये 'कागद' घेऊन देवाच्या शोधात फिरणारा माणूस, उंच डोंगरावरचं गरगर फिरणारं देऊळ पाहायला भटकणारा म्हातारा,अस्सल जातिवंत नाग पकडणारा दानय्या(कथा तळपट) या खूप आवडतात.एकलव्याच्या धर्तीवर शाप मिळालेला आदिवासी तरुण आणि त्याला शापातून सोडवू शकणारी आंधळी राजकन्या, ऑर्फीयस,विदूषक, प्रवासी या खूप आवडतात.

वा! लिहा पुढे.

"अस्तिस्तोत्र" या कथेवर लिहिलेले वाचण्यास उत्सुक आहे.>>+१

बाप माणूस !
जी ए समजण्याचे नाही जाणवण्याचे नाव आहे
एकदा का तुम्हाला जी ए आवडले ना मग बाकी सगळे किरकोळ वाटायला लागतात
रमलखुणा माझं सगळ्यात आवडत पुस्तक आहे.

वाचतो आहे.. लिहा बिन्धास्त

सर्वांचे खुप खुप आभार Happy

"अस्तिस्तोत्र" या कथेवर लिहिलेले वाचण्यास उत्सुक आहे.
फार अपेक्षा ठेवू नका प्लिज. पण लेखन पडले तरी जीएंच्या कथेवर लिहिताना पडले या भावनेचाही मला आनंदच आहे.