प्राजक्ताची फुलं

Submitted by बिपिनसांगळे on 31 December, 2019 - 11:45

प्राजक्ताची फुलं
---------------------------------------------------------------------------------------------------------------------
समोर प्राजक्त आहे !
इथे असं व्हरांड्यात बसून पाहिलं की समोरच तो दिसतो.
पण प्राजक्ताच्या मागेही बरंच काही आहे की !...
उजाडून थोडाच वेळ झालाय. श्रावणाची सुरुवात झालीये. हवा मस्त आहे. मोकळी न स्वच्छ. गात्रं न गात्रं ताजीतवानी करणारी. मन प्रफुल्लित करणारी.उगीच राखाडी, काळ्या ढगांची, पावसाळी कुंद हवा नाही. पहाटे एखादी सर पडून गेली असावी. मातीला शिंपून. एखाद्या गावाकडच्या गृहिणीने पूर्ण अंगण शिंपून घ्यावं तशी.पाण्याचे थेंब गवताच्या गळ्यात पडून सलगी करताहेत. थोड्या वेळाने ऊन आलं की मोत्यांसारखे चमकतील ते . मध्येच एखादा मखमली काळ्या रंगाचा बुलबुल नाजूक शीळ घालतोय. मादीला साद घालतोय. अंगणात जाई-जुई, जास्वंदी बहरल्यात.
मी इथे मस्त, व्हरांड्यात बसून निसर्गाचा नजारा पाहत असते. लांबवर धूसर, राखाडी रंगाची डोंगररांग दिसते. क्षितिजावर फराटा मारल्यासारखी, लांबलचक रेषेसारखी. जवळचे डोंगर हिरवे हिरवे झालेत. त्यांचे माथे हिरवा मुकुट ल्यायल्यासारखे,
आजूबाजूला कुठे कातळ, कुठे मोठा खडक. त्यांची जागा सोडता अनेक झाडं -झुडपं . तर काही ठिकाणी दाट झाडी. त्यामध्ये बसून, लपून कुठकुठले पक्षी ओरडत असतात, राम जाणे.नजर ताणून पहिलं तरी दिसत नाहीत.
आजूबाजूला टेकाडांसारखा भाग. समतलपणा कसा तो नाहीच. मध्येच आमची ही माळासारखी जागा. त्यावर हाच एक तुकडा काय तो भोवतालच्या निसर्गाशी विसंगत. प्लॉट्स पाडलेला. बंगलो कॉलनीसाठी. आमचाच बंगला पहिला.आता दुसरा बांधायला घेणार आहेत म्हणे. होईल हळूहळू वस्ती. पण जरी ती झाली तरी दूरदूरपर्यंत मोकळंच राहणार. निदान माझ्या हयातीत तरी. कॉलनी सोडून.
पहाटे उठून व्हरांड्यात बसलं की वातावरण हळूहळू एकेक दिवा लावल्यासारखं उजळत जातं .
पहाटे अंधार. मग प्रकाशाची चाहूल. मग थोडासा लालसरपणा. समोरचं दृश्य उजळायला लागतं. मग स्वच्छ प्रकाश. नंतर लख्ख प्रकाश. दुपारी कडक ऊन , हळूचकन उन्हं नकळत कलती होतात. संध्याकाळी लांबलेल्या किरणांचा नाजूक पिवळसर प्रकाश. पक्ष्यांची घरट्याकडे परतायची लगबग. घरी जाणाऱ्या गायींच्या गळ्यातली घंटांची किणकिण.त्यावेळी संधिप्रकाश पसरतो. मनाला हुरहूर लावणारा. मग अंधार . नंतर काळोख. चांदण्या चमचमवणारा. मी हे सारं पाहत असते. अनुभवत असते. एखाद्या कवीच्या, एखाद्या चित्रकाराच्या वृत्तीने.
मला खूप वाटतं की हे समोरचं चित्र कॅनव्हासवर बद्ध करावं . चित्र तेच . पण पहाटेपासून ते रात्रीपर्यंतच्या प्रकाशाच्या एवढ्या विविधतेत त्याला बांधून ठेवावं .
पण मी चित्रकार नाही . कवी म्हणाल तर किंचितकवी आहे
मी महिनाभर झाला अशी व्हरांड्यात बसते . जसं जमेल , जसं वाटेल - केव्हाही . समोरचं दृश्य पहात.पहाटेपासून ते रात्रीपर्यंतचं त्याचं प्रकटन पहात . वर सांगितल्याप्रमाणे . मला ते आयुष्यासारखंच वाटतं . हळूहळू उजळत, हळूहळू विझत जाणारं. अगदी आसपासच्या साऱ्या भवतालासकट.
पण अशी नजर साऱ्या आसमंताची सैर करून आली तरी पुन्हा शेवटी ती त्या प्राजक्तावर थांबतेच.
त्या प्राजक्ताच्या मागेही बरंच काही आहे की ! ....
त्याच्याकडे प्रेमानं पाहिलं की बाकीचं सारं चित्र धूसर होत जातं. मग ते फक्त झाड रहातं... प्राजक्ताचं.
----------
प्राजक्ताचं झाड मला पहिल्यांदा भेटलं ते अभिरामच्या वाड्यात.
ही खूप जुनी गोष्ट आहे. तेव्हा पुण्यात वाडा संस्कृती भरात होती. माणूसघाणी फ्लॅट संस्कृती जन्माला यायची होती. सगळीकडे वाडेच वाडे. वेगवेगळे वाडे. वैविध्यपूर्ण. प्रत्येकाची रचना वेगळीच. प्रत्येकाची अंगभूत तऱ्हा न्यारीच.
आमचं घर अशाच एका वाड्यामध्ये होतं. भवानी पेठेमध्ये. भवानीमातेच्या मंदिराजवळ. घर मोठं पण एकत्र कुटुंब. वाड्यामध्येही खूप घरं. वाडा खूप दाटीवाटीचा होता. बाहेर रस्त्यावर जायला एक बोळकांड्यासारखा पॅसेज होता. रात्रीच्या वेळी त्यामधून बाहेर जायचं म्हणजे मी जीव मुठीत धरून जात असे. त्यामध्ये एक साधा बल्ब नसे. असं वाटायचं की अंधारात आपल्यावर एखादं भूतच झडप घालणार आहे. हवेतच त्या भुताला ठोसे लगावत बाहेर जायचं. नवीन माणूस तर हमखास ठेचकाळलाच पाहिजे.अंधारा लांब पॅसेज ! दिवसा सुद्धा तिथे नीट काही दिसायचं नाही. लपाछपी खेळताना तर ती हक्काची जागा होती, दडायची.
काकांच्या मुलाचं लग्न ठरलं तसं बाबांनी दुसरं घर पहायची सुरवात केली. ते ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये कामाला होते. तिथे त्यांचे विनायकराव नावाचे सहकारी होते. त्यांचा शनवारात नदीकाठी मोठा वाडा होता. त्यांनी बाबांना घर द्यायचं नक्की केलं. अर्थात भाड्याने.
बाबा आईला सांगत असताना मी ते ऐकलं. मी खुश .
अहा ! कसली मज्जा !
नवं घर, नवा वाडा, नव्या मैत्रिणी. माझ्या बालजीवाला कोण आनंद झाला होता. जीव फुलपाखरासारखा हलका, नाजूक झालेला.
उन्हाळ्याची सुट्टी पडली तेव्हा आम्ही तिथे राहायला गेलो .
विनायककाकांनी आमचं स्वागत केलं. बाबांना म्हणाले , " ही गोड पोरगी आता आमच्या वाड्यात राहणार तर ! "
त्यावर रामची आई सहमती म्हणून हसली .
एखाद्या माशाला फिश टॅन्कमधून काढून दुसऱ्या टॅन्कमध्ये घातल्यावर, नवीन पाण्यात तो जसा भिरभिरतो , तशी मी त्या वाड्यात भिरभिरले . शाळकरी लहान पोर मी.
नवा वाडा मस्त होता. बदामी रंगात रंगवलेला . बाहेरून तीन मजली. आतमध्ये बैठीच घरं.आतमध्ये जायला छान फरशी बसवलेला रस्ता. फ़रश्याही सुस्थितीत. त्या पॅसेजमध्ये चक्क बल्बही होता. रात्रीच्यावेळी प्रकाशासाठी. मला एक मोठाच बदल तेव्हा जाणवला. मला वाटलं, चला ,भुतांची भीती तर संपली. आत गेलं कि मोठं, मोकळं अंगण. अंगणाच्या आजूबाजूला घरं.
तिथे हवा मस्त मोकळी होती . वरच्या मजल्यावर गेलं की तिथून छान नदी दिसायची . त्यावेळी नदीमध्ये छान छान मासे असायचे . रंगीबेरंगी , वेगवेगळे . मी मनानेच त्यांचं सुळसुळणं अनुभवत असे ... नदीचं अजून गटारात रूपांतर व्हायचं होतं !
चौकाच्या मध्ये तुळशीवृंदावन होतं. आणि त्या शेजारी ते प्राजक्ताचं झाड होतं . त्यावेळी माझ्या मनाने त्याची दखलही घेतली नव्हती. त्यावेळी ते फक्त एक झाड होतं. दहा- पंधरा फूट उंचीचं . मध्यम आकाराचं .फुलं नसलेलं . ते प्राजक्ताचं आहे , हेदेखील तेव्हा माहित नव्हतं .
एका कोपऱ्यातलं घर आमचं होतं. दोन खोल्यांचं . दोन पायऱ्या चढून वर जावं लागायचं. घराला फिकट गुलाबी रंग होता . नवा नवा . मला जाम आवडलं , घर आणि वाडा दोन्हीही. त्या पायऱ्यांवर बसून अभ्यास करायचा हे मी ठरवूनही टाकलेलं,शेजारी दप्तर वगैरे ठेवून. कविता पाठ करायला तर तीच जागा , हे मी मनाशी कितीदा घोकलं.
पण वाड्यात तशी कुटुंब कमी होती. तीनच कुटुंब. सगळे विनायक काकांचे भाऊबंदच. एका काकांना मूलबाळ नव्हतं. अजून एका काकांना दोन मुलं होती; पण ते दोघे बरेच मोठे होते. त्यांचा अवतार काही फारसा नीट नसे. त्यांच्या घरात कोणीच काही कामधंदा वगैरे करत नसावेत. त्यात काका तऱ्हेवाईक !
तर विनायककाकांना एकच मुलगा होता,अभिराम. तो माझ्यापेक्षा थोडाच मोठा होता. स्मार्ट वाटला. काकांच्या त्या दोन मुलांपेक्षा तर नक्कीच जास्त . गव्हाळ वर्णाचा . एका बाजूला वळवलेले , उडणारे , कपाळावर येणारे केस असलेला .
वाड्यात एक मुलगी नव्हती . म्हणजे मैत्रिणींचा प्रश्न निकालात निघाला होता. मी एकटीच खेळत असे त्यामुळे. कधी दोरीच्या उड्या तर कधी बॉल. किंवा आईबरोबर बैठे खेळ .
कधी वाड्यात शिरलेल्या एखाद्या मांजरामागे पळायचं तर कधी पारिजातावर बसलेल्या कावळा- चिमणीकडे पहायचं.घाणेरड्या कबुतरांची भरताड आसमंतात वाढली नव्हती त्या काळी . कधी एखादी साळुंकी किंवा कोकिळा दिसली म्हणजे फारच भारी. तसा वाडा नदीकाठी असल्याने बरेच वेगवेगळे पक्षी दिसायचे .
मी प्राजक्ताच्या झाडाभोवती पळत असे,नकळत प्रदक्षिणा घालत असे, त्याला धरून अंग झोकत असे.
हळूहळू पावसाळा सुरु झाला.
प्राजक्त फुलांनी डवरु लागला .
मी प्राजक्ताचं झाड त्या वाड्यात येईपर्यंत कधी पाहिलं नव्हतं. पण आता फुलांनी नटलेल्या नव्या नवरीसारखं ते झाड मला खूपच म्हणजे खूपच आवडलं. आणि त्याला येणारी ती नाजूक , छोटी , पांढरी पांढरी फुलं . नाजूक केशरी देठाची. धुंद मंद सुगंधाची. ओलसर, आठ पाकळ्यांची .
त्या फुलांचा वास घेतला की मला देवळात गेल्यासारखं वाटे. आणि ते फूल पाहिलं की मला आईच आठवे . देवपूजा झाली की आई केशरी अष्टगंधाचं बोट कपाळी लावे. आईचा गोरापान प्रसन्न चेहरा म्हणजे फूल अन भाळी तो टिळा म्हणजे प्राजक्ताचं देठच की !
फांद्या हलवल्या की अंगावर पावसाचे थेंब पडल्यासारखी फुलं टपटपायची . त्याची फार गंमत वाटायची .
ते झाड वयात येऊ लागल्यासारखं वाटू लागलं मला... माझ्यासारखं !
सकाळची शाळा असे. त्यामुळे लवकरच उठावं लागायचं. अंगणात गेलं की वृन्दावनावर फुलांची बरसात करणारं ते झाड दिसायचं. झाडाखाली फुलांचा सडा पडलेला असे. चहूबाजूंनी , झाडाभोवती गोलाकार, पांढऱ्या-केशरी रंगाची पखरण केलेल्या रांगोळीसारखा.
दिवसाची प्रसन्न सुरुवात तिथून व्हायची. संध्याकाळीही त्याच्याजवळ थांबलं की मस्त वाटायचं. जे लहानपणी माहित नव्हतं ते पुढे कधीतरी ऐकलं . देवलोकी उर्वशी तिचा थकवा घालवण्यासाठी पारिजातकाच्या सान्निध्यात वेळ व्यतीत करत असे.
त्याच्याकडे बघताना मला वाटायचं ,ते झाड एखाद्या विशाल हिरव्यागार कुरणावर उभं आहे - एकटंच. आणि त्या झाडाखाली मी उभी आहे-एकटीच. त्याच्या गळ्यात पडलं की फुलं टपटपायची अंगावर. काहीतरी वेगळंच वाटायचं, त्या फुलं अंगावरून घरंगळत होणाऱ्या, किंचित नाजूक स्पर्शाने. पण ते काय ? - ते कळायचं नाही . जणू मी परीच !
माझी अशी ही स्वप्नाळूवृत्ती तेव्हा पासूनची.
एके दिवशी सकाळी उठले होते . सकाळची शाळा . आईची घाई . बाहेर अंगणात आले . श्रावण सुरु झालेला . त्यामुळे पावसाचा जोरही कमी झालेला . पहाटे एखादी सर पडून गेली असावी . मस्त वाटत होतं. इतकं प्रसन्न वातावरण .
त्यात मी स्वच्छ , पांढऱ्या - निळ्या रंगाचा शाळेचा गणवेष घालून तयार झालेले होते . ऐटीत दुडकत होते . दोन वेण्या उडवत.
मी प्राजक्ताजवळ गेले . झाड कसं ? - सुंदर खासं सुबक ठेंगणं . उगा वडा - पिंपळासारखं आडदांड नाही . आणि त्याला लटकणारे ते पांढरे सुगंधित फुलांचे गुच्छ . वरती फुलं , खाली फुलं . फुलंच फुलं , मन सुगंधित करणारी,प्रफुल्लित करणारी.
मला कविता आठवली, नुकतीच शिकलेली -

टपटप पडती
अंगावरती
प्राजक्ताची फुले

मी त्या ओळी गुणगुणले आणि मजाच वाटली . त्याच त्या ओळी परत परत म्हणत मी फुलं गोळा करू लागले. देवपूजेसाठी .
आणि एक मोठा भसाडा आवाज आला -

रपरप पडतील
अंगावरती
काठीचे रट्टे

मी चमकले . आवाजाच्या दिशेने पाहिलं तर विष्णूचे वडील . तऱ्हेवाईक काका माझ्याकडे डोळे वटारून पाहत होते .
" टाक ती फुलं खाली . झाड आमचं आहे . फुलं आमची आहेत ," ते खेकसले .
मला रडूच कोसळलं .मी फुलं खाली टाकली . मी घराकडे पळाले . काही क्षणांपूर्वी गोळा केलेली ती फुलं माझ्याच पायाखाली तुडवली गेली .
ते पाहून आणखी काही फुलं अश्रुंसारखी टपटपली .
आईने मला जवळ घेतलं . माझी समजूत घातली .
ते विष्णूचे वडील म्हणजे जमदग्नी होते . तोऱ्यात राहणारे . घरमालकाचा रुबाब दाखवणारे . त्यात आम्ही एकटेच भाडेकरू , जे त्यांच्या तावडीत सापडलो होतो.
दुसऱ्या दिवशी मी उठले . प्राजक्ताला , त्या वाड्यातल्या माझ्या एकुलत्या एक मित्राला मी दुरावले होते . आम्हा दोघांची ताटातूट केली होती त्या राक्षसकाकांनी .
रोजच्या सारखीच फुलांची गोलाकार रांगोळी पडली होती . पण आज मी तिकडे गेलेच नाही . मी पायऱ्यांवर बसून नुसती पहात होते .
तेवढ्यात राम आला. तो फुलं गोळा करू लागला . त्याला काय ना ? तोही घर मालकांचा मुलगा होता .
त्याने भरपूर फुलं गोळा केली . त्याने तिथूनच माझ्याकडे पाहिलं . तो हसला . माझ्याजवळ आला व त्याने थोडी फुलं मला दिली . मी गप्पच . पण मनातून कुठेतरी आनंदले होते , सुखावले होते .
" रामा , " तोच भसाडा आवाज आला , " का दिलीस तिला फुलं ?"
" काका, मी माझ्या वाटेची फुलं तिला दिलीत ! "
" काय ? मोठ्या माणसांना उलटं बोलतोस ?" काका खूपच रागावले . ते तरातरा अंगणात आले व त्यांनी रामच्या एक मुस्काटात लगवली . त्याचा गाल लालेलाल झाला . त्याच्या डोळ्यात पाणीच आलं . पण त्याने हूं की चू केलं नाही .
त्याची ओंजळ तशीच होती. थोडी फुलं असलेली, उघडी. मी चटकन माझी फुलं त्याच्या ओंजळीत टाकून दिली.
मला पुन्हा रडू फुटलं . मी मागे फिरले.
माझ्यामुळे त्याला मार मिळाला होता. माझ्या डोळ्यांसमोर दिवसभर तो लाफा होता.
आणि माझ्या डोळ्यांसमोर दिवसभर त्याची ती ओंजळ होती. उघडी . फुलांनी भरलेली.
काही माणसं अशीच असतात,उघड्या ओंजळीसारखी . स्वतःकडचं दुसऱ्याला भरभरून द्यायला तयार असणारी !
मला त्या काकांची भीतीच वाटू लागली. पुन्हा म्हणून मी त्या प्राजक्ताकडे फिरकले नाही.
पण विनायकरावांचं आणि काकांचं त्यावरून भांडण झालं. राम मला फुलं देऊ लागला.
त्याच्याशी दोस्ती झाली . खेळायला मित्र मिळाला .
एकदा कशावरून तरी माझं आणि त्याचं भांडण झालं. म्हणजे मीच भांडले त्याच्याशी. लहानपणी भांडायला काही मोठं कारण थोडंच लागतं . मी बोलायचं बंद केलं . त्याच्याकडून फुलं घ्यायचं बंद केलं. मी आईला सांगितलं, "आपल्याला नकोत त्यांची फुलं. हवी असेल तेव्हा मी चौकातून फुलपुडा आणून देत जाईन."
मग आईने मला एक गंमतीचं गाणं सांगितलं.
‘ पारिजात फुलला दारी
फुले का पडती शेजारी
पारिजातक हा दिव्यवृक्ष समजला जातो. समुद्रमंथनातून तो वर आलाय. कृष्णाने तो इंद्राकडून सत्यभामेसाठी मागून आणला. त्याने तो पारिजात लावला सत्यभामेच्या दारी;पण फुलं मात्र शेजारी रुख्मिणीच्याच दारी पडायची .’
ते ऐकल्यावर मला मजाच वाटली. मला वेडीला वाटू लागलं की त्या झाडाची फुलं अशीच माझ्या दारात पडावीत. पण कसचं काय? झाड आमच्या घरापासून लांब होतं.गंमत म्हणजे त्याची एक फांदी शेजारच्या वाड्यापर्यंत गेलेली . तिथे मात्र फुलं पडायची.माझ्या अंगणात सोडून शेजारच्या वाड्यात .गंमतच होती . म्हणून ती गोष्ट मला आवडली .
मला वाटायचं आपला स्वतःचा असा एक वाडा असावा. त्यात असं झाड असावं. भरपूर फुलं असावीत आणि गदागदा झाड हलवून फुलं अंगावर पाडून घेतली तरी आपल्याला कोणी ओरडणार नाही.बरं ती फुलं आपण इतर मुलांनाही देऊ. काकांसारखं नाही !
--------------
एकदा वाड्यात मांजरीचं एक गोंडस पिल्लू आलं. काळसर मेंदीच्या रंगाचं. त्यावर काळे चट्टेपट्टे असणारं. चमकदार हिरव्या डोळ्यांचं. मला ते खूप आवडलं. मी त्याला पाळलं. विशेष म्हणजे त्यालाही माझा लळा लागला. विशेष म्हणजे आईनेही त्याला पाळू दिलं.
आणि काका ? ते मात्र त्याला सारखं हुसकवायचे.
एकदा ते चिमणीच्या मागे लागलं. अन गेलं की प्राजक्ताच्या झाडावर. त्याला खाली उतरताच येईना. ! ते ‘ 'म्याव -म्याव ' करून ओरडू लागलं. अन इकडे माझ्या काळजात कालवू लागलं.
त्याला खाली उतरता येत नव्हतं. मला त्याला खाली घेणं शक्य नव्हतं . आई नेमकी कुठे गेली होती. मला रडूच यायला लागलं.
तेवढ्यात राम आला. त्याने ते पाहिलं. तो घरून एक शिडी घेऊन आला. सोपं काम नव्हतं ते . पिल्लू गोंधळलेलं . त्याने बिचाऱ्या रामला चांगलंच बोचकारलं . तरी त्याने त्या पिल्लाला खाली घेतलं. मी त्याच्याशी कट्टी असताना.
माझा जीव भांड्यात पडला. पिल्लू मला चिकटलं .
" थँक्यू राम !" मी म्हणाले.
तो नुसता हसला. आश्वासक .
त्यादिवशी मला तो खूप 'ग्रेट' वाटला !
पण काकांचं बिनसलं ना .
त्यांनी कुठूनतरी एक कुत्रं आणलं . घाणेरड्या , काळ्या रंगाचं. पिवळ्या डोळ्यांचं. त्याचे दात चक्क माणसांसारखे फावडे होते. त्यामुळे ते बावळट वाटायचं. बावळट तरी गुरकावणारं.
काही प्राणीही मालकांसारखेच असतात .
पण ते पिल्लाच्या मागे लागायचं. ते बिचारं घाबरायचं. जिवाच्या भीतीने सैरावैरा पळायचं. उंचावर जायचं. पत्र्यावर जायचं, पन्हाळीत लपायचं . ते खाईना -पिईना . खंगायला लागलं.
शेवटी आईने त्याला कोणाला देऊन टाकलं. मला खूप रडू आलं. दुःख झालं. सारखी त्याची आठवण यायची.
काकांना मात्र आनंद झाला.
मी तरी काय करणार ? मी पडले छोटी. आणि बाबा तरी काय करणार ? आम्ही पडलो भाडेकरू.
----------
हळूहळू दिवस जात होते.
राम माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा होता. तो दहावीची परीक्षा पास झाला. आमच्या घरी पेढे द्यायला आला. त्याला ऐंशी टक्के पडले होते.म्हणजे त्या काळात खूपच !
केशरी पेढा तोंडात कोंबतानाही मला त्याच्या विषयी असूया वाटली. मला एवढे मार्क्स कधीच पडले नव्हते .
त्यात आई म्हणाली , " बघ मधुमालती , अस्से - अभिरामइतके मार्क्स तुलादेखील पडायला हवेत . "
आई पण ना , बोलली ते बोलली . त्याच्यासमोर कशाला बोलायचं ?
----------
तो कॉलेजमध्ये जाऊ लागला .
पुन्हा पारिजात फुलण्याचे दिवस सुरु झाले.
रामचं आणि माझं बोलणं पुन्हा सुरु झालं.पण त्याची अन माझी वेळ जमत नसे.
आता तो मोठा वाटू लागला होता. त्याचं व्यक्तिमत्व आकर्षक होऊ लागलं होतं. भुवया जाड अन डोळे पाणीदार वाटू लागले होते . कोवळ्या मिशा त्याला खुलून दिसत . टापटीप रहायचा . छान टी शर्ट घालायचा . वाढवलेल्या केसांचा कोंबडा पाडायचा . आमची नजरानजर झाली की हसायचा. त्याची नजर आणि हसणं वेगळं वाटू लागलं होतं.
एके दिवशी सकाळी अशीच पावसाची सर पडलेली होती. वातावरण न्हायल्यासारखं वाटत होतं. प्रसन्न हवा होती.
राम फुलं गोळा करत होता. मी घराबाहेर आले. त्याला पाहिलं. मी त्याच्याजवळ गेले.
त्याने माझ्यापुढे फुलांची ओंजळ केली.
" मला ही फुलं खूप आवडतात ." मी म्हणाले.
" अन मला तू !..." तो म्हणाला
तो काय म्हणाला, ते मला क्षणार्ध कळलंच नाही.
जेव्हा कळलं मी लाजून गोरीमोरी झाले.
झटक्यात पाठ फिरवून घराकडे चालू लागले तरातरा.
----------
त्यानंतर मी त्याला टाळू लागले. तो दिसला तरी पहायचे नाही. तो पहातोय , निरखतोय हे जाणवायचं.
गणपती आले. उत्सवाचे, मांगल्याचे दिवस.
घरात उकडीच्या मोदकांचा वास सुटलेला होता .पहिल्याच दिवशी राम प्राजक्ताची फुलं घेऊन माझ्या घरी आला. त्याने आईला फुलं दिली .
" काकू ,तुमच्या गणपतीसाठी ," तो म्हणाला.
"बरं झालं ", आई म्हणाली . तिने त्याला मोदक दिले .
" अरे ,पण तू मधुशी का बोलत नाहीस ?" नंतर आईने विचारलं .
" मी - मी ? .....बोलतो की."
" मला बऱ्याच दिवसात तुम्ही बोलल्यासारखे दिसला नाहीत."
त्यावर तो वरमला व गेला.
शहाणा कुठला ! मी गोऱ्यापान हातांवर कशी छान लालचुटुक मेंदी काढली होती . अशीच . नागपंचमीला शिल्लक राहिलेली . मला दिली असती फुलं , तर हात पुढे करताना ती त्याला दिसली असती . दोन कौतुकाचे बोल ऐकायला मिळाले असते . पण हाय ! कसचं काय !
त्या संध्याकाळी आमची दोघांची गाठ पडली.
" काय गं तू , बोलत नाहीस ते नाहीस अन वर माझं नाव आईला सांगतेस होय ?" तो रागाने पण दबक्या आवाजात बोलला.
" मी आईला काही सांगितलं नाही."
त्यावर तो गप्प झाला. मग मीच त्याला विचारलं , " तू कॉलेजमध्ये जातोस. तिथे खूप मुलं असतील ना ?"
"हो" .
" म्हणजे मुली ?"
" हो, " त्याचा आवाज वाढला,” का ?"
" छान छान, सुंदर मुलीही असतील !"... माझा बावळटपणा वाढतच चालला होता.
" आहेत ! " तो जोर देत म्हणाला.
" मग - त्याही आवडत असतील !"...
त्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे हावभावच बदलले ," असंच नाही काही . आवडणारी मुलगी कॉलेजमध्येच असावी लागते , असं काही नाही. ... ती आपल्या आसपासही असू शकते ! " ... तो नजर रोखून म्हणाला .
त्याचं बोलणं जेव्हा कळलं . मी लाजून अश्शी गोरीमोरी झाले. चेहरा ओंजळीत लपवून मी सावकाश चालत घराकडे वळले. नशीब माझं ! कोणी पाहिलं नाही ते .
----------
पावसाने गणपतीमध्ये विश्रांती घेतली होती . रात्री गार वारं सुटायचं .
त्याच दिवशी रात्री -
जेवणं उरकली होती . आईची आवराआवर चालू होती.
मी आईला म्हणाले " मी जरा शतपावली करते."
मी अंगणात आले .मला पारिजातकाची फुलं उमलताना त्यांच्या सहवासात रहायचं होतं. माझंही मन उमलून आलं होतं ना !
...रामची चाहूल घ्यायची होती .
त्या शांत वातावरणात संगीताचे सूर उमटले.रामच्या वडलांना गाण्याची आवड होती. त्यांच्याकडे ग्रामोफोन होता. गाण्यांच्या असंख्य तबकड्या होत्या .लांबून, आसमंत सुरेल करणारे स्वर कानावर पडताना काय भारी वाटत होतं ! छान वाटलं . ते नाट्य संगीत नक्कीच माझ्या रामने माझ्यासाठी लावलं असावं –

अंगणी पारिजात फुलला
बहर तयाला काय
माझिया प्रीतीचा आला
----------

आम्ही दोघे बोलू लागलो ; पण फार नाही . कोणी ऐकेल याची भीती वाटायची . जुने दिवस . फार मोकळीक नसायची , अलीकडच्यासारखी . त्यात वाडा संस्कृती .
पण माझ्याशी बोलण्यासाठी तो संधी शोधतच असायचा . कधी काही विशेष असेल , म्हणजे सणाचे दिवस वगैरे असतील , त्याने छान छान कपडे घातले असतील तर मग ? ... त्याला पाहून अंगात काही सरसरून जायचं . सुंदर क्षणांच्या फुलांचा सडा मनावर पडायचा !
पण मनात सरसरलं तरी मी काही बोलून दाखवत नसे .
एकदा दिवाळीला आईच्या चांगल्यापैकी साडीचा पंजाबी ड्रेस शिवला होता . चिंतामणी कलरचा . तो पाहून राम बेधडक म्हणाला ," मधू , अगं ड्रेस भारी दिसतोय - का तू ? कळतच नाहीये ! "
छान वाटलं. नंतर आरशात कितीदा स्वतःला न्याहाळलं .
-----------
मी दहावीत गेले ."अभ्यास करा आता "- आईचा धोशा असायचा. कधी मी घराच्या पायरीवर बसून अभ्यास करत असे . मला कळायचं , समोरच्या खिड्कीतून दोन डोळे मला निरखत आहेत . मग माझं अभ्यासात लक्ष लागत नसे .
खिडकीतून तो मला पाहतच असणार हे कळायचं . तो खूप आधीपासून मला तसं पाहत असणार ; पण त्याचं हे गुपित मला आता कळलेलं .
पण मी अभ्यासाच्या बाबतीत गंभीर होते. लक्ष विचलित व्हायला लागलं की मी घरात निघून जात असे .
आई म्हणायची , " जरा एका जागी शांत बसत नाही ही पोरगी ! "
मी तिला काय सांगणार ना ,की माझं मनही एका जागी शांत बसत नाहीये ते !
----------
माझी दहावी झाली . चांगले मार्क्स पडले ; पण रामपेक्षा कमी . जवळच्याच , नावाजलेल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला . रामचंही तेच कॉलेज होतं .माझी वेळ दुपारची तर त्याची वेळ सकाळची असायची .
एके दिवशी स्वारी कॅम्पसमध्ये थांबलेली. माझी वाट पाहत. मस्त आंबा रंगाचा टी शर्ट घालून .
" मधुमालती ... " तो म्हणाला .
" काय हे ? पूर्ण नावाने मुद्दाम हाक मारतोयंस ना ? "
" आता आपण मोठ्या झालात . कॉलेजमध्ये आलात ! "
अहो - जाहो ? मला तर रागच आला .
"अगं , तू तर माझ्याशी बोलतच नाहीस . तेही मी आवडूनसुद्धा ! "
आँ ! हा तर शुद्ध आगाऊपणा आहे ! कोणी सांगितलं हे या वेड्याला ? पण हे मनात . मी काहीच बोलले नाही .
"कॉफी घेऊ या ? कँटीन मध्ये ?" त्याने विचारलं .
"नको " -मी म्हणाले .
"मधू, चल गं , हा काही आपला वाडा नाहीये . वाड्यामध्ये फार बोलता येत नाही. संधीही मिळत नाही ."
मी अंगठ्याने माती टोकरत राहिले . खाली मान घालून .
त्याने आग्रहच केला म्हणून मी निघाले .
मन हो म्हणत होतं , तर पाय उचलत नव्हते .जाताना मला खूप दडपण वाटत होतं.असं वाटत होतं की अख्खं कॉलेज फक्त माझ्या कडेच बघतंय .
आमच्या भेटी गाठी सुरु झाल्या .
एकदा मी त्याला विचारलं ,'" मी तुला का आवडते ?"
" अगं , तू कोणालाही आवडशील अशीच आहेस ."
" तसं नाही ".
" छान गोरीपान आहेस . तुझा चेहरा प्रसन्न आहे . "
" बस ? "
“स्वप्नाळू डोळे…”.
“बस ?”
"... आणि तुझा प्रेमळ स्वभाव ."
ते ऐकून जणू प्राजक्ताची फुलं अंगावर टपटपली ! ...
----------
केव्हातरी आमच्या प्रेमाचा पत्ता घरच्यांना लागलाच .
आईने मला खूप बदडलं .
" कार्टे, बट्टा लावलास तू आमच्या नावाला ! "
तऱ्हेवाईक काका काही एकटेच डेंजर नव्हते ... विनायक रावांनी आम्हाला वाड्यातूनच बाहेर काढलं .
ते वाड्यातून बाहेर काढू शकत होते ; पण कॉलेज मधून ?-
आणि मनातून ? ...
ते तर आईबाबाही काढू शकत नव्हते .
पण ही जुन्या काळची गोष्ट . आमचं बोलणं -भेटणं थांबलंच. त्यावेळची मुलं आई - वडिलांचं ऐकायची . त्यांच्या शब्दाबाहेर नसायची .
विनायकराव आणि बाबांमध्येही कटुता आली .
----------
एकदा मुलींचा प्रेम वगैरे असा विषय निघाला .
माझ्या एका मैत्रिणीला माझं प्रकरण माहिती होतं . माझी दुःखी, द्विधा अवस्था माहिती होती .तिने एक गोष्ट सांगितली -
" अगं , माझी आजी कीर्तनाला जाते ना, तिथे ऐकलेली एक गोष्ट तिने काल मला सांगितली . एक राजकन्या होती .ती सूर्याच्या प्रेमात पडली. राजाने तिचा हट्ट पुरवायचा ठरवलं .त्याने सूर्याला लग्नाची मागणी घातली .तोही तयार झाला. विवाहाच्या दिवशी राजकन्या वधूच्या वेषात सजून तयार झाली . राजकन्याच ती . तिला अलंकारांना काय कमी ? पण सूर्य लग्नाला आलाच नाही. त्याच्या फसवणुकीने , विरहात तिने प्राणत्याग केला. तिचं रुपांतर एका झाडात झालं . ते म्हणजे पारिजात . म्हणून सूर्य मावळल्यावर पारिजात फुलतो आणि सूर्य उगवला की त्याची फुलं त्या राजकन्येच्या अश्रुंसारखी टपटप गळून जातात. "
"अय्या ! खरंच की, म्हणून प्राजक्ताला इंग्लिशमध्ये ‘ नाईट जस्मिन ‘ म्हणतात , " दुसरी एक स्कॉलर मैत्रीण म्हणाली .
राम कॉलेजमध्ये दिसायचा; पण आता मी त्याच्याशी बोलत नव्हते. विरहामध्ये दोघेही जळत होतो .
मी प्राजक्ताला दुरावले होते .
वय वेडं असतं .दुःखी गाणी आवडायला लागली होती . रामही त्यांच्या ग्रामोफोनवर तसलीच गाणी लावत असणार ; पण त्यांचे स्वर माझ्या कानावर पडणं आता शक्यच नव्हतं .
माझं मन कविता गुणगुणायचं

कळेना हा अपराध कोणाचा
पारिजात जळाला माझा

पुढे सुचायचंच नाही .डोळेच भरून यायचे .
----------
रामचं कॉलेज संपलं. तो नोकरीला लागला .
पुढे माझंही कॉलेज संपलं. मीही नोकरीला लागले .
समाज बदलला होता .
रामने घरच्यांचं मन वळवलं. त्यांनीही परवानगी दिली . तेव्हा रामची आई आनंदाने म्हणाली , " ही गोड पोरगी आता आमची सून होणार तर ! "
त्यावर विनायककाका सहमती म्हणून हसले .
आता - आईलाही जावई पसंत होता आणि बाबांचा आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता .

रीतसर ठरवून, वाजत गाजत आमचं लग्न झालं .
मी रामच्या घरी आले .
पण घरी म्हणजे -फ्लॅटमध्ये ! ...
तिथे सिमेंटची एक ठोकळेबाज इमारत उभी होती . आता तो वाडा नव्हता , ते विक्षिप्त काका नव्हते , ते अंगण नव्हतं ...आणि तो प्राजक्तही तिथे नव्हता .
आमची पहिली रात्र होती ! ...
मनात अनेक भावना दाटून आलेल्या . आनंद , ताण , अस्वस्थता आणि दिवस भराचा शीण .
त्यावेळी आजच्यासारखे प्रकार नव्हते. गंमती- जंमती नव्हत्या . बेड सजवणं वगैरे फक्त हिंदी सिनेमातच. सत्यनारायणाची पूजा झाली की संपलं .
जेव्हा रामने मला मिठीत घेतलं ... तो चिरपरिचित वास आला. माझ्या पाठीमागे त्याने हातांनी पुड्याचा कागद सोडवला . त्याने आठवणीने कुठून तरी प्राजक्ताची फुलं मिळवली होती . पहिली रात्र सुगंधित करण्यासाठी . माझ्यासाठी !
मी मोहरले ... त्या फुलांनी, त्यांच्या वासाने , रामच्या त्या प्रेमळ कृतीने .
समुद्रमंथनात पारिजात मिळाला होता . तर माझ्या आयुष्याच्या मंथनामध्ये आता मला माझा पारिजात मिळाला होता .
----------
आमचं सहजीवन सुरु झालं .
मी एकदा त्याला म्हणाले , " मि . अभिराम , मला ते जुनंच घर आवडतं . त्या वाड्यात जी मजा होती ती या फ्लॅटमध्येही नाही . "
"खरंय मिस शेफाली !" तो चेष्टेने म्हणाला .
लाडात आला की तो मला ‘शेफाली’ म्हणायचा .शेफाली म्हणजेही पारिजातच. अलीकडेच त्याने हा शब्द कुठे ऐकला होता. अन माझ्यावर रागावला की - शेफ़ारलेली !
"तसं नाही रे राम , मला खरंच तसं आवडतं . म्हणजे खूप आवडतं, मनापासून . आपण लहान होतो तेव्हा ते काका रागवायचे ,त्या वेळीही मला वाटायचं की आपला स्वतःचा एक वाडा असावा आणि त्यामध्ये स्वतःचा पारिजात असावा . घेता येईल का रे असा एखादा वाडा आपल्याला ?"
"आता वाड्यांचे दिवस कुठे राहिलेत मधू ! "- तो गंभीर झाला .गप्प झाला .
तो विषय तिथेच थांबला ; पण नंतरही मी त्याला त्या तीन-तीन वाड्यांच्या आठवणी सांगत असे. एक पहिला वाडा- जिथे आमचं एकत्र कुटुंब होतं , दुसरा रामचा वाडा , जिथे मनांचे प्राजक्त फुलले होते आणि तिसरा ,रामचा वाडा सोडल्यानंतर जिथे रहायचं होतं म्हणून मी राहिले तो .
----------

पुढे आयुष्य सुरु राहीलं . छान गेलं. अर्थात सगळ्यांच्याच आयुष्यात असतं तसं चढ-उतारांसहित . दोन मुलं झाली . शिकली . मोठी झाली. परदेशी गेली. त्यांची मुळं तिकडेच रुजली .
राम निवृत्त झाला.
तेव्हा आलेल्या पैशांमधून त्याने हा प्लॉट घेतला. शहरापासून लांब. एका गावामध्ये . लांब घेण्याचं कारण म्हणजे शांतता आणि किंमत .
सगळ्यात आधी त्याने त्या जागेवर प्राजक्त लावला आणि मग बंगला बांधायला घेतला.
----------
तोच बंगला ज्याच्या व्हरांड्यात मी बसते. वाऱ्याने उडणारे पांढरे केस सावरत .
जशी आता बसले आहे रामची वाट बघत. कविता जुळवत - मनासारखी.
पहिला चहा व्हायचाय अजून. त्याला माझ्या हातचा चहा आवडतो खरं तर. अंगणात गवती चहा फोफावलाय. तो आणि आलं घालून केलेल्या चवीचा .
तो मॉर्निंग वॉकला जातो . मग तिथून आला की गुपचूप अंगणातल्या प्राजक्ताची फुलं वेचतो . मी व्हरांड्यात बसून पाहतच असते. तो पायऱ्या चढून वर येतो .ओंजळ माझ्या पुढे करतो ,जसा तो वाड्यात असताना करत असे आणि म्हणतो " माझ्या मधूसाठी !"
रोज !
मग मी व्हीलचेअरच्या दांडीवर दणादणा हात आपटून आनंद व्यक्त करते . आणि ती फुलं स्वीकारते .
----------
राम आला .लांबवर कॉलनीचं फाटक आहे , ते उघडल्याचा आवाज आला .त्याने हाक मारली " आनंद S "
ओ आली नाही . रोज दिवसपाळीचा येणारा वॉचमन आनंद आणि त्याचा कुत्रा वाघऱ्या अजून यायचे होते.
त्याने व्हरांड्यात पाहिलं. त्याला मी दिसले नाही .त्याने नित्याप्रमाणे प्राजक्ताची फुलं वेचली आणि तो भराभर पायऱ्या चढून वर आला . त्याने हाक मारली " मधू S".
मी ओ दिली नाही.
तो हॉलच्या दारातून आत शिरला .
लपलेली मी अचानक त्याच्या समोर आले- त्याने तो दचकला , चमकला.
"मधू? "..
"हंS"
"हे काय ?"
"हे काय म्हणजे मी तुझ्या समोर उभी आहे - शेफाली !"
त्याने मला जवळ घेतलं ;पण माझा एक हात मागेच होता .
त्यात चहाच्या आधणाचा वास आला .
"आज तुझ्या हातचा चहा !" ... तो आनंदाने , आश्चर्याने म्हणाला .
"हो मिस्टर, किती दिवस तुमच्या हातचा चहा प्यायचा ? लाडक्या नवऱ्याला त्रास द्यायचा ?"
त्यावर तो खट्याळ हसला.
मग आम्ही एकमेकांच्या मिठीत नि:शब्द झालो .

खरं तर आम्ही दोघे मॉर्निंग वॉकला जातो .थोड्या दिवसांपूर्वी असेच चाललो होतो . मागून एक गाडी आली . जोरात , धडधड खडखड करत . त्या आवाजाने , मी बाजूला सरकले. रस्त्याकडेला चिख्खल होता . पाय घसरून मी कडेला पन्हाळीसारख्या खड्ड्यात पडले . पाय चांगलाच फ्रॅक्चर झाला .लवकर बरा झालाच नाही .मग व्हील-चेअर वगैरेचं कौतुक झालं.
राम मदत करायचा. चहापासून, घरकामापासून ते जेवणापर्यंत. त्याला या साऱ्याची अजिबात सवय नव्हती ;पण करायचा सारं माझ्यासाठी .
रोज थोडा थोडा प्रयत्न करून उभं राहत चालताही यायला लागलं . माझी इच्छा शक्ती होतीच आणि जोडीला रामचं प्रेम .
मग आज जरा जास्त मोठा प्रयत्न केला होता ... अंगणापर्यंत पोचले होते - प्राजक्तापर्यंत !...

त्याला मिठीत तसंच ठेवून मी त्याच्या कानात गुणगुणले -

तू माझा पारिजात सखया
दरवळतो मनाच्या अंगणी
उमलतो मनात माझिया
जेव्हा नभी रात चांदणी

त्याने आश्चर्याने मिठी सोडवून मला मागे केलं .
" आज दिवस कुठे उगवलाय , शेफाली ? "
त्यावर मी माझ्या लपवलेल्या हाताची मूठ त्याच्या समोर केली . त्यामध्ये प्राजक्ताची फुलं होती .
" ही माझ्या रामसाठी ! ...रोज तुझ्याकडून आज माझ्याकडून." मी म्हणाले .
त्यावर त्याच्या डोळ्यांत पाणीच आलं .त्याने त्याची फुलं माझ्या ओंजळीत घातली व माझे हात त्याच्या हातात धरले.
आता आमच्या दोघांच्या ओंजळी एकच झाल्या होत्या आणि त्यामधली ती प्राजक्ताची फुलंही !
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
बिपीन सुरेश सांगळे
Bip499@hotmail.com

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सर्व वाचक , प्रतिसादक ,

सर्व लेखक आणि सर्व प्रिय माबोकर

नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा .
तुमचे संकल्प सिद्धीस जावोत !
लेखन वाचनाला बहर येवो

पुढे लिहीन न लिहीन
स्नेह असू द्यावा हि विनंती

खूपच छान!
सुरुवातीचं निसर्गदृश्याचं वर्णन सुरेख जमलं आहे. नंतरचं वाड्यातलं, अबोल प्रेमाचं वर्णनही छानच!
एवढं सुंदर निसर्गवर्णन वाचून आधी उगीच वाटलं, ही बिचारी एकटी असणार. नंतर अभिरामबद्दल वाचून वाटलं, बिचारीचा प्रेमभंग झाला असणार. मग अभिरामशीच लग्न झालंय होय, असं म्हणता म्हणता व्हीलचेअर आली. परत वाटलं, अरेरे! तेवढ्यात कळलं, साधं फ्रॅक्चरच आहे होय! Lol Lol
एकंदरीत मस्त गोष्ट!

सुरुवातीचं निसर्गदृश्याचं वर्णन सुरेख जमलं आहे. नंतरचं वाड्यातलं, अबोल प्रेमाचं वर्णनही छानच!
एवढं सुंदर निसर्गवर्णन वाचून आधी उगीच वाटलं, ही बिचारी एकटी असणार. नंतर अभिरामबद्दल वाचून वाटलं, बिचारीचा प्रेमभंग झाला असणार. मग अभिरामशीच लग्न झालंय होय, असं म्हणता म्हणता व्हीलचेअर आली. परत वाटलं, अरेरे! तेवढ्यात कळलं, साधं फ्रॅक्चरच आहे होय! >>>> अगदी अगदी !!! सुरुवात आवडली पण शेवटाकडे जाताना खूप पसरट झाली.

तुम्हांलाही नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! नवीन वर्षात खूप लिहा Happy

छान गोष्ट.
गोष्ट वाचताना मन किती वाईट विचार करत रहातं.
पण ह्या गोष्टीत सगळं छान छान वाचुन एकदम छान वाटलं.
लिहित रहा.

तुम्हालाही नववर्षाच्या शुभेच्छा! कथा आवडली. “किंचितकवी“ हा शब्दप्रयोग मस्तच Happy
पहाटे अंधार. मग >>> संपूर्ण परिच्छेद ( घरी जाणाऱ्या गायींच्या गळ्यातली घंटांची किणकिण वगळून Sad ) रिलेट झाला.
सूर्योदयानंतर संध्याकाळी ऊन कलेपर्यंत खिडक्यांमधून घरात येणारे कवडसेही मोहक असतात. ते जर एखाद्या झाडाच्या पानांतून घरातल्या भिंतीवर, जमिनीवर उतरत असतील तर एक सुंदर पण मंद हलणारे चित्र नजरेस येते. सुट्टीच्या दिवशी ते न्याहाळणे हा एक आनंदाचा आणि श्रमपरिहाराचा भाग असतो.
पुलेशु!

छान गोष्ट. एखाद्या कसलेल्या गवयाने गायलेल्या विलंबित रागाप्रमाणे ताना हरकती आलाप घेत घेत सावकाश अलगद समेवर आली.
लिहित रहा.

गोष्ट वाचताना मन किती वाईट विचार करत रहातं.
पण ह्या गोष्टीत सगळं छान छान वाचुन एकदम छान वाटलं.
लिहित रहा. >>> +१ खूप आवडली गोष्ट.. Happy

बिपिनदा, तुम्हालाही नववर्षाच्या शुभेच्छा! Happy

कथा नेहमीप्रमाणे खुपच सुंदर.. आवडली.

नवीन वर्षाच्या शुभेच्छा ! तुम्ही कथा लिहीता तेव्हा त्याचे रेखाचित्र डोळ्यासमोर स्पष्ट उभे राहते. हीच तुमच्या लेखनाची खरी ताकद आहे. Happy

बिपिन, तुमच्या कथा खूप आवडतात. ही कथा पण खूप छान लिहिली आहे. निसर्ग आणि स्थळ वर्णनं अगदी चित्रदर्शी असतात.
कथा आवडली.

छानेय कथा.

वावे आणि सस्मितचा प्रतिसादपण आवडला.

अप्रतिम!! तरल भावनांनी ओथंबलेलं लिखाण वाचताना संपूच नये असं वाटलेलं. बदामी, चिंतामणी, आंबा रंग खूप आवडलं. सुखान्त वाचायला मजा येते.
तुम्ही इकडं लिहित रहावं ही माझी तुम्हाला प्रेमळ आज्ञा आहे.

आदेश २०३
तुम्ही इकडं लिहित रहावं ही माझी तुम्हाला प्रेमळ आज्ञा आहे.

प्रेमळ आज्ञा ?

इतका स्नेह दाखविल्याबद्दल खूप आभारी आहे

मस्त Happy

वावे
तुमच्या प्रतिक्रिया नेहमी हुरूप वाढवणाऱ्या असतात
खूप आभार

सस्मित

छान गोष्ट.
गोष्ट वाचताना मन किती वाईट विचार करत रहातं.
पण ह्या गोष्टीत सगळं छान छान वाचुन एकदम छान वाटलं.
लिहित रहा.

सुंदर प्रतिक्रिया
खूप आभार

चंद्रा
वाह मस्त प्रतिक्रिया

फक्त ते गायीच्या गळ्यातील घंटा हे रिलेट का झाले नाही
एक कुतूहल म्हणून विचारतो

Pages