डोंगर!

Submitted by अज्ञातवासी on 26 December, 2019 - 21:51

"डोंगर फोडायला पाहिजे."
सदानंदाने आज्ञा सोडली, तसा बाग्या खुशीत हसला.
"डोंगर फोडाया पैका लागतुया मालक."
समोर नोटांची गड्डी... बाग्या खुश.
◆◆◆◆
'जिंदगी... कैसी ये पहेली हाय...'
गोविंदा ड्रायवर धुरळा उडवत गाडी चालत होता.
"ये गोंदया, तुझी बाय मेली की काय? आरं जरा नीट गाणं लाव की." पाटील ओरडलाच.
'कुण्या गावाचं आलं पाखरू...'
"आत्ता कसं..." पाटील खुशीत आला.
पाटील बाहेर बघू लागला. उजाड माळरान. त्यापुढे पोट फाडून दगड बाहेर काढलेले डोंगर. पिवळं खुरपट गवत...
...आणि पाटलाच्या समोर तो आला...
चिंनाईचा हिरवागार डोंगर. दगड काय, मातीही दिसायची नाही. भलामोठा...नागासारखा फणा काढून उभा ठाकलेला.
"त्यो चिंनाईचा डोंगर अजून फोडलाच नाई व्हय रं?"
"धाकले मालक म्हणत्यात, देवीचा डोंगर आहे, फोडला तर देवी आरिष्ट आणील."
"त्याचा बा सांगतुया फोडाया." पाटील करवादला.
अचानक टायर करकरल्याचा आवाज झाला. गोविंदाने मोठ्या शिताफीने गाडी नियंत्रणात आणली.
"टायर सपाट..."
"आरं बदल की मग."
"पुढचे दोघबी सपाट हायेत."
तेवढ्यात पाटलाच थोडं मागे लक्ष गेलं.
खिळ्यावाली फळी?????
"गोंदया..." पाटलाने आवाज दिला.
गवतामागून खुसपुस ऐकू आली.
...आणि चार डोकी पाटलाच्या दिशेने धावली.
पाटील तसाच जीव घेऊन पळत सुटला. मागून गोंदयाची किंकाळी ऐकायलाही तो थांबला नाही.
चिंनाईचा डोंगर... हिरवागार...
पाटील झाडाझुडुपांमध्ये लपत होता. बाग्या आणि त्याची माणसे त्याला शोधत होती.
"देवी चिंनाई... आज वाचीव, पुढच्या सात पिढ्या तुला निवद देतील..." तो मनाशीच म्हणाला.
"आरं त्यो बघा." पाटलाला बघून बाग्याने आवाज दिला.
पाटील पळत सुटला.
चिंनाईचा दगड...देवी चिंनाई.
...पुढच्याच क्षणी गोफणीतून एक दगड पाटलाच्या टाळक्यात बसला, आणि पाटील खाली पडला.
चिंनाईचा दगड दूरवर दिसत होता.
हळूहळू डोळ्यासमोर अदृश्य होत होता.
"...इथेच तुला मालकांनी माराया लावलं पाटील..."
बाग्याने कोयता वर उचलला...
धडाम!!!!!!!
भीषण स्फोटाने डोंगरही थरारला.
◆◆◆◆
पाटलाच्या घरात आकांत माजला होता.
पाटलाचा पत्ता नव्हता. खूप शोधल्यावर चिंनाईच्या डोंगरावर पाटलाचं छिन्नविच्छिन्न झालेलं शरीर मिळालं होतं.
पाटलाबरोबर अजून काही लोकांच प्रेत मिळालं होतं.
त्यात फक्त बाग्याची ओळख पटली.
"कितीदा आबांना सांगितलं, चिंनाईच्या डोंगराकडे नजरही ठेवू नका. ऐकलंच नाही शेवटी. गुपचूप सुरुंग लावला, आणि अचानक फुटला. गोविंदाच तर प्रेतही मिळालं नाही."
"नका रडू धाकले मालक. चला, आवरा सोताला. आता दुःख बाजूला ठिवून डाग द्यावा लागल."
...सदानंदाने डोळे पुसले, आणि तो डाग द्यायला निघाला...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"डोंगर फोडायला पाहिजे.">>ह्यातला डोंगर म्हणजे पाटील का?सदा ने बाबाचीच सुपारी दिली का बाग्याला??
ईस्कटून सांगावे वाईच Wink

डोंगर फोडायला पाहिजे.">>ह्यातला डोंगर म्हणजे पाटील का?सदा ने बाबाचीच सुपारी दिली का बाग्याला??
ईस्कटून सांगावे वाईच>>>

बहुतेक.

सगळे डोंगर चिनाईदेवीच्या ताब्यात जावेत व डोंगर फोडण्याचा विचार डोक्यात येणाऱ्यांची टकुरी अशीच फुटावीत ....

चांगली आहे. सदानंदने वडिलांना का मारले हे मात्र कळत नाही. अन्यथा अजून चांगली वाटली असती.

सर्वांचे धन्यवाद!!!
सदानंदला बापाची जागा हवी असते. मात्र ती मिळत नसते. म्हणून तो बाग्याला सुपारी देतो.
मात्र बाग्याचा नकळत तो डोंगरावर सुरुंग पेरतो, आणि स्फोट घडवून आणतो.
यामुळे पाटीलही जातो, आणि बाग्या सुद्धा. खुनाचा पुरावाच राहत नाही...
आणि चिनाईच्या नावाखाली 'देवीने अद्दल घडवली' याखाली ते खपूनही जातं.