सोनचाफा : २ . . . .

Submitted by सोहनी सोहनी on 26 December, 2019 - 06:44

सोनचाफा : २ . . . .

"तन चिंब कराया आला बेभान पावसाळी ऋतू
मन चिंब कराया तुझ्या स्मरणांचा अवकाळी ऋतू "

ह्या वर्षी बराच पाऊस झाला, जुलै महिन्यात तर खुपचं. संपूर्ण धरेला हिरवी शाल ओढावून हि असंख्य फुलं फुलून शालीचं नक्षीकाम अगदीच तन्मयतेने करत आहेत.
डोळ्यांचा दाह शमवणारी हि हिरवी धरा अशी नटली कि आतून काहीतरी सुखावल्या सारखं वाटतं.

हलकासा पाऊस होतोय आजच्या रात्री श्री असती तर नक्कीच भिजली असती इथे, मी आपला खिडकीत माझ्या सोनचाफ्याला पावसात शहारताना, पावसाला स्वतः मध्ये सामावून घेताना पाहत हरवून गेलो....

" अरे येना, किती छान पाऊस पडतोय, त्या कवितेंत रात्र रात्र भिजण्यापेक्षा माझ्यासोबत भिज कधीतरी..."

मुळापासून परिवर्तनाला सुरुवात व्हावी आणि पापणी मिटते ना मिटते तोच हवा तो परिवर्तन डोळ्यांस अचंबित करून सोडावा तशी नखशिकांत भिजलेली श्री माझ्यासमोर एका सुंदर मूर्तीप्रमाणे दिसत होती.
त्या दिसण्याला केवळ सुंदर आणि त्या नजरेला निव्वळ प्रेम म्हणता येईल ह्याचा मी आटोकाट प्रयत्न करत होतो.
पावसाची रिमझिम झेलीत त्या थेंबांना धन्य करत ती आनंदाने बागडत होती.

"अरे ये ना "

नकळत तिच्याकडे ओढली जाणारी पावले आवरत "नको, आणि तुही बस कर आता, ये इकडे चल घरी जाऊयात, पाऊस जास्त येईल असं वाटत आहे आणि सर्दी झाली तर मी चिडवेन तुला. मी तिला म्हणालो .

"तू पण ना केदार, अरे आजचा आताच क्षण जागून घ्यायला शिक रे, उद्या काय होईल कोणाला ठाऊक?? मी असेन तू नसशील, तू असशील आणि मी नसेन.नाहीतर आपण दोघेही असू आणि हा पाऊसच नसेल"

मी तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष्य करून तिच्यात, तिच्या भिजण्या, बागडण्यात हरवून गेलो,
वीज कडाडली तशी ती धावत घाबरून माझ्या मिठीत शिरली, मी मुद्दामून हा हा हा करत चिडवायला हसलो.
ओले चिंब केस, भिजलेल्या पापण्या, आणि ओले अधर, ना काजल, ना लिपस्टिक, निव्वळ निरागसता आणि लाज ह्या दोन नैसर्गिक प्रसदनांनी ती इतकी मोहक आणि सुंदर का होती त्या क्षणाला ???

ओल्या कपड्यांची जाणीव होऊन ती जमेल तसे अंग ओढणीने झाकू पाहत होती, मी तिची मान वर करून हलकेच ओठ तिच्या माथी टेकून मिठी घट्ट केली, कितीतरी वेळ ती तशीच शांत, समाधानाने मिठीत सामावून होती.

बाहूंची मखमल तुझी मज तू आज पांघरली
विसावली मनं तिथे केव्हाची आसुसलेली . . .
कवेत तुझ्या उमगले मज कधी संध्या झाली
भान ना तुलाही अन वाट हि अंधारली...
कासावीस ओढ ह्या नयनांची तुझ्या हेरली
अन स्वर्गीय मिठी मी अजून घट्ट केली...
स्पंदने गुंतली अशी काळजासही आली लाली
त्या हृदयाची कळली ह्या हृदयास बोली...
देहगंध तुझा मी स्तनांत खोल भरुनी घेई
सैलावता उब मिठीची पापण्यांस जाग येई . . .

पाण्याच्या शिडकावाने मला खडबडून जाग आली, केव्हापासून खिडकीतच झोपलो होतो म्हणजे मी, श्या काय कटकट आहे ह्या पावसाची. नुसती रिपरिप रिपरिप. मुद्दामून त्रास देणाऱ्या त्या रडणाऱ्या लहान बाळासारखी.
कधीकाळी ह्या पावसाच्या सौंदर्यावर असंख्य कविता लिहणारा मी आज मला हा पासून अतिशय कंटाळवाणा आणि नकोसाच वाटतो.

धडधड जिना चढत हि आली, काय तर म्हणे मैत्रिणींनी पावसात फिरायला जायचा प्लॅन केलाय, आपण दोघेही जाऊयात ना, म्हणून खूप रिक्वेस्ट करत आहे.

मला नाही आवडत पावसात उगीच मला नेऊन तुझी ट्रिप खराब होईल त्यापेक्षा तू जा त्यांच्यासोबत.

"त्यांच्या नवर्यासोबत भिजायला" हि रागाने बोलली. मी फक्त रागाने एक कटाक्ष टाकला.

झाली बाया शांत मग. चला ना जाऊयात ना प्लिज. ते इथे जवळच आहे ना कडा तिथे जायचं आहे, सांगू हो त्यांना मी.
नकळत मी तिच्यावर इतका ओरडलो कि ती घाबरून रडतच खाली परतली.

- - - - -
पाऊस कमी झाला तसं काहीतरी आठवल्यागत श्री म्हणाली,
"२ दिवसांनी ना आम्ही मैत्रिणी कड्यावर जाणार आहोत, म्हणजे कालच ठरवलं सगळ्यांनी, मी नाहीच म्हणत होते, पण....."

मला भिजायला किती आवडतं तुला माहीतचं आहे ना, तिचं वाक्य तोडून मी पूर्ण केलं..
मला तरी वाटत तू नको जायला, आपण नंतर सोबत जाऊ, चालेल?? आणि काही झालं तर तुला?? ते किती निसरडे असतात रस्ते तिथे, नको जाऊस प्लिज, मी तिला मानवायचा प्रयत्न करू लागलो.

"काहीतरीचं तुझं, लगेच येणार आहोत, आणि मी जरा दूरच राहीन, प्लिज प्लिज प्लि......ज .."
मी खूप नको नको म्हणालो, पण तिने कसंतरी मला मनवलंच..तिने आनंदाने पुन्हा जोरात मिठी मारली.
- - - - - -

पाठिवर होणाऱ्या स्पर्शाने मी पुन्हा बाहेर आलो श्रीच्या विश्वातून, मागे हि उभी, नाक ओढत आणि नाकानेच बोलत.

"माझ्या सवतीचे स्वप्न पाहून झाली असतील तर चला ना थोडे पावसात भिजूयात"

तुला भिजायचं आहे तर तू जा, मला पाऊस अजिबात आवडत नाही, आणि भिजायला तर नाहीच नाही आणि अजून एक शेवटचं तिकडे जायचा पुन्हा विषय घेतला तर . . .
माझं बोलणं पूर्ण व्हायच्या आधीच ती तरातरा नाक मुरडत खाली गेली.

माझं हिच्याशी वागणं चुकत नेहमीच पण माझाही ना इलाज आहे असो... जास्त विचार केला कि मला त्रास होतो म्हणून विचार करणं सोडून दिलं आहे सद्ध्या ...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults