सोनचाफा : १

Submitted by सोहनी सोहनी on 26 December, 2019 - 04:13

सोनचाफा : १ ...

दिवसभराच्या घमघमी नंतर आणि शांतपणे जाळणाऱ्या उन्हानंतर ही अशी मनाला भुरळ घालणारी रात्र मनाला सुखावून जाते अंगाला झोंबणारा हा वारा ही गुलाबीशी थंडी मनाला शांत करुन जाते...
खिडकीतून हवेचे येणारे झोत आणि हा निसर्ग मनाला खिळवून ठेवतो एकाच जागी तासंतास.

गर्द गुलाबी टप्पोरी जास्वंद, कळ्या आलेला मोगरा, सडा पाडणारा अनंत, फिक्कट निळी सदाफूली, नाही नाही म्हणता बागेत किती फुलझाडं आली आणि कशी वाढली कळली देखील नाहीत. ती त्या डाव्या रांगेत काही आहेत नवीन, त्यांची तर मला अजून नावं देखील कळली नाहीत आणि तो सगळ्यात कडेचा सोनेरी पिवळा शेंदरी मिश्रित चाफा...
त्याचा सुवासाने तर जणू माझं अंतरंग व्यापल आहे ...
मी नेहमीच असा त्या सुवासाच्या सम्मोहनात तासनतास ह्या खिडकीत असतो स्वताला हरवून आजही...

"हळुवार आली सोनपावली आभाळी माझ्या विसावली,
दावून अलवार स्वप्न मोत्यांची प्रीत सावली पानावरुन निसटली"
- - - - --

"मी तिथे आली तर काय देशील??

हे बघ वाढदिवसाच्या रात्री अशी पुर्ण न होणारी आशा लावुन त्रास देऊ नकोस, आणि दहा वाजल्या नंतर ज्यांचा फ़ोन बंद होतो ना त्यांनी असल्या फुशारक्या मारूच नयेत.

फ़ोन ठेव आणि आवाज न करता दार उघड...

श्री, उगीच मझाक नको करुस, हे बघ उघडलं दार कुणी आहे....... मला ४४०चा धक्का देऊन निळ्या रंगाची छान चुडीदार ड्रेस घालून ती माझ्यासमोर उभी होती.
आई शप्पथ श्री तू इथे, ह्या वेळेस, कशी ? कुणी पहिलं तर?? आणि घरचे?? मी भूत पहिल्या सारखं तिला पाहत होतो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा केदार ... तिने हळूच माझ्या कानात म्हटलं.

ह्या सुखद आणि स्वप्नवत धक्क्यातून बाहेर यायला मला वेळ लागला तोपर्यंत तिने आधी दार बंद केलं, आणि सोबत आणलेल्या छोट्याश्या केकच्या डब्ब्यात इवलीशी मेणबत्ती लावली.

मी इथे आल्यावर तू असा पुतळा होऊन राहशील असं तरी नक्कीच वाटलं नव्हतं मला.

तू घरी स्वतः बनवलास हा केक?? माझ्यासाठी?? इतक्या रात्री? मी आश्चर्याने तिला विचारत होतो.

का खायला भीती वाटते?? आणि मी नाही तर अजून कुणी आहे का बनवणारी?? तिने मिस्किलपणे विचारलं.
तुला असं छान छान स्वतःच्या हाताने करून खायला घालता यावं म्हणून मी कूकिंगचा क्लास लावलाय, कळलं?? ती छान हसत बोलत होती.

कसला भारी झाला होता तो केक, आयुष्यात विसरणार नाही मी ती चव आणि ती वेळ, ती रात्र, आणि ते क्षण...

केव्हापासून मंद असा सुगंध येतोय सोनचाफ्याचा, तू फुलं आणलीत माझ्यासाठी??

तिने हळूच दार उघडून तिच्या कमरे इतक्या उंचीच झाड माझ्यासमोर ठेवलं, त्याला सोनचाफ्याचे ३ ४ फुलं आली होती, त्यांचाच सुगंध दरवळत होता.
हे काय आणि ???

तुझं गिफ्ट. तुला आवडतो ना सोनचाफा, फुलं दिली तर तू वहीत पुस्तकात ठेवतोस मग सुकल्यावर मलाच तक्रार करतोस म्हणून म्हटलं झाड घेऊन जाऊयात.
हे नव्याने रुजेल तुझ्या मातीत, असंख्य फुलं उगवेल, वाऱ्याच्या प्रत्येक नव्या झुळकीने तो गंध ती दरवळ तुझं अंतरंग माखवून जाईल आणि पडलेली फुलं देखील त्या मातीत विरून त्या मातीला सुगंधित करून जातील.

तिने ते झाड आणि ते केक कसं सांभाळत आणलं देव जाणो पण मला खूप भारी वाटत होतं. आयुष्यातला सगळ्यात बेस्ट वाढदिवस.

थँक यु श्री म्हणत मी तिला माझ्याकडे ओढलं, लाजेने पाठमोरी झालेली तिला मी जवळ घेत तिचे मुलायम हात हातात घेत तिच्या बोटांत माझी बोटं विणू लागलो.
मानेवर होणाऱ्या माझ्या श्वासांच्या स्पर्शाने तिच्या वाढलेल्या श्वासांची धडधड, हलकेच थरथरणारी काया आणि तिला गंध मी प्रथमच अनुभवत होतो.
डोळे बंद कर श्री ..

तिच्या फिक्कट गुलाबी ओठांवर माझे ओठ हलकेच ठेवले तशी ती लाजून स्वतःला माझ्यापासून दूर करून धावतच घरी पळाली.
"नाही कळले मनपैंजणं कोणत्या गंधास भुलली
ती सोनसळी अंतरंगी सुगंधी जखमा कोरून गेली"

- - - --
दरवाज्याचा अजून जोरात आवाज येतोय, अजून हि आवाज येतोय, त्या आवाजांनी माझी तंद्री उडाली,
पाहतो तर दरवाज्यात ओठांना लाल भडक लिपस्टिक लावलेली, आणि मादक अशी सारी घालून माय वाइफ उभी.
केव्हापासून दार वाजवतेय, लक्ष्य कुठे असत तुमचं?? बसला असाल त्या खिडकीत, सगळ्या मूडचा सत्यानाश केला ती वैतागून म्हणाली, हाताच्या मुठ्या आणि डोळे घट्ट मिटून ती स्वतःचा राग शांत करून आत आली.
हिची मला हीच एक सवय खूप आवडते, तिला वेळेत तिचा राग शांत करता येतो, आश्चर्याची गोष्ट आहे तरी खरी आहे.
तिने आत येऊन मला लाल गुलाबांचा गुच्छा दिला, छान हसली आणि श्रीच्या ओठांचा रंग मिसळलेल्या माझ्या मरून ओठांवर तिच्या लाल ओठांची परत चढली, ती २ मिनिट माझ्याकडे तशीच पाहत राहिली, मी काही हालचाल केली नाही, शांत तिच्या पायांच्या नखांच्या नैलकलर कडे पाहत राहिलो. हिटलर नाराज होऊन पुन्हा बेडरूम मध्ये झोपायला गेली, मी हि गेलो.
मला काय वाटलं माहित नाही पण, राग आला, वाईट वाटलं आणि खूप काही, मी सॉरी बोलून शेजारच्या सोफ्यावर उलट्या दिशेला तोंड करून झोपलो.

सकाळी उशिराच उठलो, आजची सुट्टी आहे ना, सगळं उरकून वर रूम मध्ये चाललो होतोच तर हिटलरने आवाज दिला, मला थोडी खरीदीसाठी बाजारात जायचं आहे, त्यामुळे नाश्ता करून घ्या आणि चला, काम उरकून घ्या मग वर जा टाईमपास करायला, काय सोनं चिकटलं आहे त्या खिडकीत देव जाणो, फिरायला तर नाही नेऊ शकत कमीत कमी बाजारात तरी चला राजे...कचाकच भांडी घासत (आदळत) मला ऑर्डर देत होती.

काय किटकिट आहे हिची सकाळी सकाळी आणि कविता करतो मी तिथे जाऊदेत तुला काय कळणार. गेल्या आठवड्यातच कपाटभर मेकअपचं सामान आणलं आहे तरीही अजून पाहिजेच.
आणि हिम्मत तरी बघा हिची, लग्नाला सहा महिने नाही झाले तरी कशी फाडफाड बोलते मुरलेल्या बायकोसारखी, अरेंज मॅरेज झालं असूनदेखील हि इतकी हिम्मत आणते तरी कुठून??

तोंडात आलेले शब्द नि भाव मी तसेच गिळून टाकले. . .

- - - -

" तू इतका कसा रे रागीट?? जरा बोललेलं सहन होतं नाही, बघ कसा फुगून बसलायेस, अरे इकडे तर बघ ना.

तुला माहितेय ना माझ्याशी असं फाटकून बोललेलं मला आवडत नाही, आणि तू तर नाहीच नाही.

अरे सॉरी मला राग आला होता, तू भेटायला येतो बोलून आला नाहीस मग रागावणार नाही का मी??
आणि दोन घर सोडून राहतो तरी दिवसभर दिसत नाहीस मग ओरडू पण नको का??

अचानक काम निघालं म्हणून जावं लागलं आणि बकायदा दहा वेळा कॉल केले, आपण उचलेले का रागात?? आणि वर स्वतः फोन करून असं काहीबाही बोललीस.

तिच्या नाजूक हाताच्या स्पर्शाने माझे शब्द आणि ओठ शांत होऊन मी तिच्या गहिऱ्या नजरेत कैद झालो.

- - - - - -

समोर हलणाऱ्या गुलाबी आणि निळ्या सारीकडे पाहून माझी तंद्री भंगली, हिटलर केव्हा पासून कोणती सारी लावू विचारत होती, माझं लक्षच नव्हतं.
मी म्हणालो जी घातलीय तीच छान आहे, तिला खरंच वाटलं आणि तशीच निघाली माझ्यासोबत...

एक श्री आहे जिच्या सोबत राहण्यासाठी जवळ जाण्यासाठी तिच्या नाजूक स्पर्शासाठी, तिच्या गंधमयी सहवासासाठी मी कासावीस व्हायचो आणि ती एक आहे जी नेहमीच जवळ यायला आतुर असते, आता हेच पहा, नुसता खांद्यावर हात ठेवायचा सोडून हिचा हात छातीवर येतो माझ्या आणि बोटांनी अदृश्य रांगोळ्या काढत बसते नेहमीच...
कधीकधी मला माझ्या ह्या असल्या मनस्थितीत खरंच किव येते.

असेच दिवस पुढे ढकलत आहे, हि खूप किरकिर करते, मी लक्ष देत नाही, बोलते बोलते आणि स्वतःच गप्प होते.
पण कधीतरी हीच गप्प बसणं जेवघेणं वाटतं, घालमेल होते मनाची पण. . .

दोन किनारे क्षणिक भेटीस तळमळती
लाल केशरी तळछटासम दोन सागरांस त्या भरती

खोल छटांतून उठे आठवांचा गहिवर
सक्त पहारा सागराचाच तुडुंब काठांवर

नद्या न मिळता पुरे त्या सागरांस आठवांनी सर
कळे न मला कधी उतरेल तुझ्या स्मरणांचा चांदणज्वर . . . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान आहे,
पण ते कुणी बोलताना अवतरणचिन्हे टाकाल का??? जरा कन्फ्युजन होतंय!