वीण (संपूर्ण कथा )

Submitted by jayshree deshku... on 25 December, 2019 - 07:32

:- वीण -:(संपूर्ण )
‘ए दोस्ती हम नहीं छोडेंगे.....’ गाण्याचे सूर कानात घुमत होते.
माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाची पार्टी जोरदार चालू होती. ऑर्केस्ट्राच्या साथीने जुनी हिंदी गाणी गायली जात होती. जी माझी आवडती होती. सर्व मित्र मैत्रिणी. स्नेही पार्टीत रमले होते. पण माझ मन आणि नजर स्नेहलचा शोधत घेत होती. मी तिला आमंत्रणाचा फोन केला तेव्हा ती फोनवर नेहमीप्रमाणे उत्साहाने बोलली नाही.
“माझ्याकडे पाहुणे येणार आहेत. मला जमेलच असं नाही.” एवढ तुटक बोलून तिने फोन ठेवून दिला. मला ती गोष्ट खटकली. माझ्या कडच्या पार्टी पेक्षा असे कोणते महत्वाचे पाहुणे तिच्याकडे येणार होते? तिचे सगळेच पाहुणे आणि नातेवाईक मला माहीत असणारेच. आज तीस वर्षा पासून म्हणजे कॉलेज पासून दोघी एकमेकींना ओळखतो. लग्ना नंतरही पुन्हा दोघी पुण्यातच आलो. त्यामुळे दोघींत कौटुंबिक जिव्हाळा पण वाढत गेलेला. कौटुंबिक सहली आणि पार्ट्या पण काही कमी नाही झाल्या. तिची मुलगी सोनल आणि माझा मुलगा शुभम सुद्धा आमच्या प्रमाणेच वयाने वर्षभरातल्या अंतरातले. त्यामुळे त्या दोघांत सुध्दा घट्ट मैत्रीची वीण विणली गेली होती. आणि त्यांच्या मुळे आमच्या मैत्रीचे धागेही चांगलेच पक्के झालेले. अर्थातच आमचे नवरेही एकमेकांचे तसे चांगले मित्र बनले. असे दृष्ट लागण्या सारखे मैत्रीचे संबंध असताना स्नेहल माझ्याकडे पार्टीला का नाही आली? मला पटण्यासारखे ठोस कारणही तिच्याकडे नव्हते. ऑफिसचे कारणही नव्हते. अनायसे रविवारच पार्टी दिवशी आला होता. तिच्याकडचे पाहुणेही पार्टीला आले असते तरी चालले असते. माझ्या जीवाची घालमेल होत होती. सगळ्याच गोष्टी एकमेकीना आम्ही शेअर करत होतो. मग अस काय घडल की मला तिला सांगावस वाटल नाही? पार्टीला येऊ शकत नव्हती तर साधा फोन करून तरी शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. पण तेही नाही! सोनल तर आधी पार्टीत मिरवायला यायला हवी होती, पण आली नाही.
शुभम आणि सोनालमध्ये नकळत गुंफली जात असणारी प्रेमाची नाजूक वीण माझ्या लक्षात आल्यावाचून राहिली नव्हती. आणि मी तसं स्नेहलला लक्षात आणून दिल होत. पण तिचा चेहरा कोरा होता. मला नवल वाटल. पण मी तो विषय तिथेच सोडून दिला. सोनलला सून म्हणून स्विकारायला माझ्या मनाची मी तयारी केली होती. मग अचानक काय झालं?
मी दुसरे दिवशी स्नेहलला फोन करण्याचा प्रयत्न केला पण माझा नंबर तिने आणि सोनलनेही ब्लॉक केला होता. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं
पंधरा दिवसा नंतर बाहेरून मला सोनलच लग्न ठरल्याच कळल आणि लग्न लगेचच आठ दिवसात होत. अर्थातच आम्हाला आमंत्रण नव्हत. मी खोदून खोदून शुभमला विचारलं पण त्याचही तेच म्हणण होत. “आई मला काही माहीत नाही. मी परदेशात जाण्याचा माझा plan सांगितल्या नंतर ती एवढच म्हणाली, ‘आपलं जमू शकणार नाही.’ त्यानंतर भेट नाही आणि फोनही नाही. आता माझाही फोन सोनलने ब्लॉक केला आहे.
मी रोज विचार करत रहायची, ह्या सोनलला मी लहानपणापासून पहात आले. मुलीप्रमाणे तिचं कोडकौतुक करत आले. मावशी म्हणून धावत येऊन माझ्या गळ्यात पडणारी सोनल अशी एकदम टोकाची कशी वागू शकते? तिला एक जाण नसेल पण स्नेहल सुध्दा! एवढा दुरावा धरताना एकमेकी सोबत घालवलेले सुख-दुखा:चे सोनेरी क्षण, ती कसे काय विसरू शकते? माझा नवरा म्हणतो ते बरोबर म्हणायला हवं. मला माणसाची पारख नाही हेच खर!
सोनलच लग्न पार पडलं आणि त्यानंतर स्नेहलची एक जुनी मैत्रीण योगायोगाने मला एका पार्टीत भेटली. तिने सांगितल, सोनलला प्रवासात एक मुलगा भेटला तिचं त्याच्यावर म्हणे प्रेम बसल. आणि लग्न ठरवण्या आधी शाररिक संबंध पण आला होता. स्नेहल आणि माझ्या दुराव्यातल कारण मला कळल. पण लग्नासारख्या गोष्टी ह्या योगायोगाच्या असतात. हे मान्य करण्याचा संमजसपणा आमच्या कुटुंबात नक्कीच होता.
एकदा स्नेहल रस्त्यात गाठ पडली. मला चुकवून जाण्याचा ती प्रयत्न करत होती. पण मी जाऊन तिचा हात पकडला, तर म्हणाली, “मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही.”
तरी मी निर्लज्जपणे म्हणल, “अग मग कधी वेळ काढतेस? घरी ये.”
“ माझ्याशी उगाच लगट करण्याचा प्रयत्न करू नकोस.” मला फटकारून ती निघून गेली. मी कितीतरी वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वेड्यासारखी पहात राहिले. मागून स्कूटरवाल्या माणसाने हॉर्न वाजवला आणि मी भानावर आले.
दाट घट्ट होत जाणारी आमच्या नात्यातली वीण कुठतरी उसवली होती. मी सांधण्याचा प्रयत्न केला पण ती जास्तच उसवली, कधीही न सांधण्यासाठी.
झाल्या प्रकारामुळे, सोनलच्या दुरावण्यामुळे शुभम सुध्दा खूप डिस्टर्ब होता. फक्त तो बोलून दाखवत नव्हता. सोनल, स्नेहलच आमच्या आयुष्यातून दूर जाण आम्हाला पडलेला एक कोडच होत.
शेवटी काळ हेच प्रत्येक दुखण्यावरचे औषध असते हेच खरे. नात्यातील दुराग्रहाची कोळीष्टके, जळमटे आपोआप कधी कधी दूर होतात आणि आकाश कसे निरभ्र होते ते समजत नाही. मी माझ्या आणि स्नेहलच्या मैत्रीच पान आयुष्यातून उलटवून पुढे मार्गक्रमणा सुरू केली होती. तरीही कधीतरी मागे वळून पाहताना माझी ती दुखरी नस ठसठसत रहायची. पुस्तकातली नको ती पाने फाडून टाकता येतात पण आयुष्याच्या पुस्तकाच तसं होत नाही ना! ते कायम आपल्या बरोबरच असत. मनात असो अथवा नसो कधीतरी ते पान अचानक समोर येत.
एका शॉपिंग मॉल मध्ये खरेदीसाठी गेले होते. बिलिंग काऊटरवर माझ बिल चालू होत. एक दोन अडीच वर्षाचा खुप गोड मुलगा रडत होता. बहुदा चुकलेला असावा. आणि आपल्या आईला शोधत असावा. मी त्याला उचलून कडेवर घेतलं, त्याला त्याचं नाव विचारलं, पण ते न सांगता तो रडतच राहिला. आणि मी त्याला थोपटत राहिले. मी लगेचच काऊटरवरून अनाऊन्समेंट द्यायला सांगितली. त्याची आई येईपर्यंत तिथे थांबायचे ठरविले. एक मॉडर्न मुलगी घाई घाईत येताना दिसली. मनात म्हणल, ‘चला,बाळाची आई आलेली दिसत आहे.’ ती जवळ आली तर माझे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. ती सोनल होती. स्नेहलची लेक! तिच्या डोळ्यातही मला पाहून आश्चर्य होत. तो सोनलचा मुलगा होता. आईला पाहून तो तिच्याकडे झेपावला. मग मीच बोलायला सुरुवात केली.
“गोड आहे ग तुझा मुलगा, कशी आहेस? सगळ काही ठीक आहे ना?”
“मी ठीक आहे मावशी, शुभम कसा आहे?”
“मजेत. तुझही छान चालल आहे ना, आनंद आहे. डोळ्यासमोर मोठी झालेली मुल तुम्ही, तुम्हाला सुखात पाहिलं की बर वाटत.”
सोनलने माझा हात हातात घेतला आणि दाबत म्हणाली,
“सारे आभास आहेत मावशी. मागच्या महिन्यातच माझा घटस्फोट झाला.” तिच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. मी तिचा खांदा थोपटला आणि म्हणलं, “जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हक्काने घरी ये, मन मोकळ करण्यासाठी. बघू काय मार्ग सापडतो ते!” तिला बाय करून मी घरी आले.
डोक्यात सारखे सोनलचे विचार घोळत होते. असं कसं झाल आणि का? शुभमच दोन वर्षापूर्वीच लग्न झालं होत. त्याला त्याच्या क्षेत्रातली उच्च शिक्षित बायको मिळाली होती. अमेरिकेत तो त्याच्या बायको बरोबर संसारात रमला होता. देवापुढे सांजवात लावताना मी हात जोडून म्हणलं, “देवा शुभमचा संसार सुखाचा होऊदे बाबा, ती दोघ आनंदात असली, म्हणजे आम्हालाही आनंदच आहे.” सोनलच असं व्हायला नको होत. तिचं बालपण डोळ्यासमोर येत राहिलं. हल्ली कुटुंबात एक किंवा दोनच मुले असतात. लाडात वाढलेली असतात. तडजोड करण्याची सवय नसते मुलांना. मग संसारात खटके उडू शकतात. सोनल पण लाडातच वाढलेली आहे. आली घरी कधी भेटायला तर आपल्याकडून समुपदेशन करून बघू. स्नेहलला फोन करण्यासाठी मी फोन उचलला पण पुन्हा वाटल, सोनलच अस झाल म्हणून मी मुद्दाम फोन केला असा गैरसमज होईल. गैरसमजाचा गुंता अजूनच वाढेल.आणि कोण जाणे माझा नंबर कदाचित अजुनी ब्लॉक असू शकेल. हा विचार मनात आल्या सरशी मी फोन ठेवून दिला. दोन दिवस सोनल आणि स्नेहल बद्दलचे विचार मनात घोळत राहिले, नंतर माझ्या रोजच्या दैनदिनीत ते पुसट झाले.
दुपारच्या जेवणा नंतर वामकुक्षी घेऊन मी उठले. मनातून खूप उत्साह वाटत होता म्हणून मी चिवडा बनवायचे ठरवले आणि तयारी सुरु केली. चिवडा बनवून होतच आला होता तोच बेल वाजली. कोण असेल असा विचार करतच आयहोल मधून पाहिले, तर सोनल होती. मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. मी तिला घरात घेतल आणि विचारल,
“का ग एकटीच आलीस? छोकरा कुठे आहे तुझा?”
“अग त्याला आईजवळ ठेवून आले. खूप मस्ती करतो, बोलू देत नाही.” जवळ जवळ साडेपाच सहा वर्षांनंतर सोनल घरी येत होती. मध्यंतरीच्या काळात बरच काही घडून गेल होत. सोनलच लग्न, शुभमच अमेरिकेला जाण, एम. एस. करण नंतर त्याचं लग्न, माझी सेवानिवृत्ती, आणि सोनलला मुलगा होऊन आता घटस्फोट झालेला. सोनलच्या चेहऱ्यावरचे लग्नाआधीचे अल्लड भाव लुप्त झाले होते. ती आता परिपक्व दिसायला लागली होती. चेहऱ्यावरचा मिश्कील गोडवा जाऊन त्याची जागा काळजीच्या रेषांनी घेतली होती. तिच्याशी बोलताना पूर्वीचा सहजपणा माझ्या कृतीत आणणं मलाही जड जात होत. पण मी प्रयत्न करीत म्हणल, “ बघ कशी टेलीपथी आत्ताच तुला आवडतो तसा पातळ पोह्याचा चिवडा बनवला आहे. बघ टेस्ट कर. आणि हो डिंकाचे लाडू पण केले आहेत कालच देते ह तुला.”
“मावशी ते तर मी वसूल करेनच, पण आधी कॉफी कर, कॉफी घेता घेता गप्पा मारू.”
“..........”
“मावशी माझे निर्णय खूप चुकले ग, आणि हे चुकीचे निर्णय कसे बरोबर आहेत हे सिद्ध करण्याच्या खटाटोप मी करत राहिले. त्यात आईच्या आणि तुझ्या मैत्रीला कलंक लावण्याचे काम सुध्दा मीच केले. मला माफ कर.”
मी सोनलचा खांदा थोपटला. तिला पाणी दिले आणि कॉफी करायला वळले. सोनल स्तब्ध बसून घराचे निरीक्षण करत होती. मग म्हणाली,
“मावशी तू घराचा चेहराच बदलून टाकलास ग, एकदम नवीन लुक! एकदम मॉड घर केल आहेस. pop पण छानच झाल आहे.”
“अग हो शुभमच्या लग्नाच्या वेळी रिनोव्हेट केल. नवी सून येणार म्हणून घराला नवा लुक दिला. लग्नाची पत्रिका पोस्ट केली होती तुम्हाला, यायचं ना!”
“उपचार म्हणून आलेल्या आमंत्रणावर कसं यायचं? नातीच नव्हे तर मन पण दुरावली होती ना! हे माझ्यामुळे झाल म्हणून तर जोडण्यासाठी मीच आता पुढाकार घेणार आहे.”
कॉफीचा कप मी सोनलला दिला आणि मी पण घेतला. कॉफीचा घोट घेत ती म्हणाली,
“ मावशी मस्त झालीय कॉफी. एकदम तरतरी आली.” मी गालातल्या गालात हसले, म्हणले,
“ आयुष्यात अशीच तरतरीत आणि हसत रहा. गोष्टी जोडता येतात. फक्त कमीपणा घेण्याची तयारी हवी. आता आलीसच ना तू आपणहोऊन माझ्याकडे.”
“ त्यादिवशी तुला पाहिलं आणि माझीच मला लाज वाटली. खोटेपणाने वागल्याचा पश्चाताप झाला. एवढ करून माझ्या हातात काय आलं?”
“ असं म्हणू नकोस परमेश्वर कृपेने ओंजळ भरून जाईल.” मी म्हणल.सोनलने रुमालाने डोळ्याच्या कडा पुसल्या. आणि पुढे बोलायला सुरुवात केली.
“ मावशी मला परदेशात जायचं नव्हत. तुला माहित आहे मी घरात लाडात वाढलेली. मला घरात तशी कामाची सवय नव्हती. प्रत्येक कामाला घरात बायका. त्यामुळे बायकांना हुकुम सोडत काम करवून घेणच मला आवडायचं. घरच्या स्वयंपाका पेक्षा हॉटेलच खाण मला आवडत. तिकडे अमेरिकेत जाऊन सगळी काम आपण घरी करायची आणि सुखाचा जीव दु:खात घालायचा यासाठी माझ्या मनाची तयारी नव्हती. शुभम पण तसा लाडात वाढलेला त्यामुळे तो घरातली काम करील असं वाटत नव्हत. पुढे जाऊन आमच जमेल अस मला वाटल नाही.”
“आपण कल्पना करतो तश्या सगळ्या गोष्टी नसतात सोनल. शुभमने जेव्हा अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा, तिथल्या परिस्थितीशी जमवून घेण्याची त्याच्या मनाची पूर्णपणे तयारी झाली होती.त्याने जिद्द धरली. समोरचा कप पण न उचलणारया शुभमने कुकिंग क्लास लावला. क्लासमध्ये जाऊन आणि माझ्याकडून त्याने सगळा स्वंयपाक शिकला. जाण्याआधी त्याने मला सगळ्या भाज्या करून, कुकर लावून दाखवला. आता लग्नानंतरही तो त्याच्या बायकोला घरकामात सगळी मदत करत असतो. माणस बदलतात. पण त्यांना वेळ द्यावा लागतो.”
“शुभमची अमेरिकेला जाण्याची प्रोसेस सुरु झाली आणि त्याचं दरम्यान पुष्कर माझ्या आयुष्यात आला. तेव्हा शुभमचा पत्ता कट करायचा माझा पक्का निर्णय झाला. पुष्करच्या घरची श्रीमंती होती. आणि त्याला त्यावेळी शुभम पेक्षा जास्त पगार होता. माझ्या शॉपिंग साठी मला नक्कीच जास्त पैसा मिळाला असता. माझे जास्त लाड झाले असते; तसेही काकांचा शिस्तीचा स्वभाव मला कधी कधी जाचक वाटायचा.”
“अग ह्या गोष्टी तू स्पष्टपणे बोलून दाखवायच्या आम्ही थोडीच तुझ्यावर लग्नाची बळजबरी करणार होतो? पण ही आपली नात्याची वीण संभाळून ठेवायला हवी होती.”
“पण माझ्या बाबांना शुभम लहानपणापासून पाहिलेला म्हणून जास्त पसंत होता. म्हणून मग मी आई-बाबांना शुभम माझ्याबरोबरच आणखी एका मुलीच्या रिलेशनमध्ये आहे आणि मावशीला पण ती मुलगी माझ्यापेक्षा जास्त चांगली वाटते. अस खोटच सांगितल. शुभम मुळे मला खूप मनस्ताप झाला आणि माझ मन पुष्कर समजू शकतो. त्याच्याबरोबर मन मोकळ करत असताना आमचा शाररीक संबंध पण आला असही खोट सांगितल. त्यामुळे आई-बाबा बिथरले, हे सगळ तुझ्यामुळे झालं, तू शुभमला अमेरिकेला जाण्यासाठी फूस लावली असा मी आईचा समज करून दिला. त्यामुळे आईने नाराज होऊन माझ लग्न पुष्करशी ठरवल आणि आई तुला सगळ्या गोष्टीचा जाब विचारणार होती पण मीच तिला म्हणल,’तुझी मैत्रीण तुझ्यापासून दूर गेली आहे. तू तिच्याशी बोलणार असलीस तर मी तुला मेले म्ह्णून समज’ मग आईने माझ्या तोंडावर हात ठेवला. आणि तुमच्याशी असलेले संबध तोडले.”
“ हे सगळ विचित्र करून ठेवलस सोनल तू! तुला माहित आहे, शुभमला स्वत:च्या कर्तृत्वावर काही तरी आयुष्यात करून दाखवायची जिद्द होती. आम्ही जरी त्याच्यासाठी भरपूर कमवून ठेवलल असल तरी त्याला स्वत:च्या मेहनतीने पुढे जायचं आहे. इथल्या रिझर्व्हेशन पद्धतीला तो कंटाळला. त्याला आहे त्या जॉब मध्ये समाधान वाटत नव्हत. पुढे जाण्यासाठी स्कोप दिसत नव्हता. त्याचे मित्र अमेरिकेत जाऊन सेटल होऊन चांगली कमाई करत होते, ते पाहून त्याने तिकडे जाण्याचा निर्णय घेतला. जर आम्ही त्याला सपोर्ट दिला नसता तर तो इथे कदाचित डिप्रेशनमध्ये गेला असता. आणि आपणच आपल्या हट्टापाई त्याचं नुकसान केलं हा सल कायम मनात राहिला असता. म्हणून मी त्याला उंच भरारी घेण्याची, हवं ते करण्याची, स्वत:ला प्रुव्ह करण्याची परवानगी दिली. ही गोष्ट तुला समजायला हवी होती सोनल. ठीक आहे. झाल्या त्या गोष्टी आता आपण विसरून जाऊ. नव्याने सुरुवात करू. पण तुझा संसार मोडण्याच कारण काय झाल?”
“ अग पुष्कर माझ्याशी खोट बोलला. त्याने आमचे तीन flat आहेत. फार्म हाउस आहे. माझा भाऊ परदेशात सेटल झाला आहे आणि त्याला इथली काहीही इस्टेट नको आहे. सगळ आहे ते आपलच आहे म्हणून सांगितल. पण प्रत्येक्षात त्याच्या बाबांनी फार्म हाउस कधीच विकून टाकून तिसरा flat घेतला. दोन मुलांसाठी दोन आणि स्वत:साठी असा त्यांचा विचार होता. माझा दीर तर काही परत येणार नव्हता. पण मागच्या वर्षी तो त्याच्या बायकोच्या हट्टा पाई परत आला. आणि त्याने त्याच्या falt वर रहायला सुरुवात केली.” ह्यावर मी म्हणलं,
“हे पुढे मागे कधीतरी होणारच हे तू आधीच गृहीत धरायला हव होत.पण तुला काय कमी आहे? तुला तुझा नवरा सुखात ठेवत होता ना! तुला रहायला चांगला flat होता. मग बाकी गोष्टीचा विचार तू कशाला करत राहिलीस?”
“तस नाही ग मावशी माझी जाऊ माझ्या वरतीच राहते. तिने इकडे आल्यावर घराचे नूतनीकरण केले. परदेशातला पैसा जवळ असल्यामुळे आहे त्या घराजवळच आणखी एक flat घेतला. नवे नवे दागिन्याचे सेट सारखे घेत असते. आणि माझ्यासमोर सारखा तोरा मिरवत असते. मला नाही सहन होत. मग मी पुष्करला काही मागितले की, तो उगीचच माझ्यावर चिडचिड करीत राहायचा.” मी सोनलचा हात हातात घेत म्हणल,
“ बाळा पुष्करच काय चुकलं? आपणही आपले अंथरूण पाहून पाय पसरायला नको का? त्याच्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला नको का? सर्व गोष्टी पैशात नाही मोजू.”
“ एवढच नाही तर तो मला हल्ली म्हणत होता, तू एवढ शिक्षण घेतल आहेस ना, मग सर्व्हिस कर, हात पाय हलव आणि तुझ्या हौशी पुरव. आपल्या वाढत्या संसारात प्रत्येक ठिकाणी मी पुरा नाही पडणार.”
“ मग काय हरकत आहे सर्व्हिस करायला? तूपण कामात राहशील. नव्या मैत्रिणी मिळतील. त्यांची दुख पाहिलीस तर तुला तुझ किरकोळ वाटेल. देवाने एवढा गोड मुलगा दिला आहे ना!”
“मावशी तू पण ना, बुरसटलेल्या विचारांची आहेस. मी शिक्षण माझं स्टेट्स वाढावं म्हणून घेतलं मला सर्व्हिस करायला अजिबात आवडत नाही. मला घरात आणि मुलात रमायला आवडत. घरात आई बाबा, नवरा सासरे सगळे पैसे कमवत असताना मी पण ऑफिसमध्ये जाऊन खर्डेघाशी कशासाठी करायची? मी शॉपिंग करेन त्यापेक्षा”
सोनलच्या विचारांची मला कीव करावीशी वाटत होती. तिचा ऐदी स्वभाव बदलायला हवा होता. अशा स्वभावामुळे ती तिच्या सहवासातल्या कुणाला सुखी करू शकणार नाही.आणि स्वत: सुध्दा दु:खी राहिल. मी तिला बोलण्यासाठी तोंड उघणार तेव्हढ्यात ती म्हणाली,
“ मावशी कहर म्हणजे, मी साधा नवीन ड्रेस जरी मागितला तरी पुष्कर चिडायला लागला होता. सारखं ऑफिसच्या कामाचं निमित्त काढून बाहेर राहायचा. बाहेरच्या टूर घ्यायचा. एकदा तर त्याला ऑफिसमध्ये उशीर होत आहे म्हणून त्याचा मला फोन आला. मी पण असेल काम म्हणून गप्प बसले. माझा मुलगा रडायला लागला म्हणून त्याला चक्कर मारून आणायला मी बाहेर पडले तर पार्किंग मध्ये मला पुष्करची कार दिसली म्हणून पाहिलं तर हा पठ्ठा कारमध्ये ए.सी. लावून झोपला होता. मग मला राग येईल नाहीतर काय? माझी एवढी प्रतारणा आयुष्यात कुणी केली नव्हती. तेव्हापासून सगळ फाटतच गेल ग.”
माणसाचं अस असत, स्वत: आपण कुणाची फसवणूक केली तरी चालते. पण आपली कुणी फसवणूक केली की मात्र आपला संताप होतो. आमच्या घराशी, आमच्या नात्याशी सोनलने प्रतारणा केली होती. आमची फसवणूक केली होती. पण अजाण म्हणत, आपली म्हणत आम्ही सर्व माफ करायला तयार होतो. मी तिला म्हणलं ,
“सोनल अजुनी तू उसवलेल्या नात्यांना वीण घालू शकतेस. अजुनी तू पुष्करकडे परत जा. त्याने तुझ्यावर खरे प्रेम केले असेल तर तो तुला माफ करेल. तू त्याला समजून घे. हट्ट करू नकोस.”
“ मावशी मी त्याला चाटायला अजिबात जाणार नाही.वेळ पडली तर एकटी राहीन, नाहीतर पुन्हा एखादा मासा गळाला लागेलच की! मी आई बाबांची एकुलती एक आहे. मला काही कमी नाही. बाबांना जरी माझ परत येण आवडलेलं नसल तरी लोकलज्जेस्तव ते मला घरातून बाहेर काढू शकत नाहीत. कारण शेवटी त्याचं मीच तर बघणार आहे ना! शुभमच एवढ चांगल होईल अस वाटलं नव्हत. आणि तुम्ही दोघ पण एवढ कमावून ठेवाल असही वाटल नव्हत.माझा निर्णय चुकलाच.”
“सोनल तुझा निर्णय पक्का आहे, तुला काही ऐकायचं नाही म्हणल्यावर मी काय बोलणार? पण मग हे सगळ मला सांगायला का आलीस तू?”
“ तुझ्या पुतण्याचा पण डिव्होर्स झाला आहे ना? तो पण परदेशात जाऊन आला आहे. त्याने पण खूप कमावलं आहे असं ऐकलं. तेव्हा बघ त्याला माझं नाव सुचवून. म्हणून तर तुला सगळ सांगत बसले.”
सोनलचा हा वेगळाच दृष्टीकोन पाहून मी चक्रावून गेले. उलट सुलट टाके घालत नात्यांची अशी विचित्र वीण मला विणायची नव्हती. आहे ही नात्याची वीण उसवलेली राहिली तरी मला चालणार होते. पण मला पुन्हा कुणा एका पुष्करचा बळी द्यायचा नव्हता.

Group content visibility: 
Use group defaults

हम्म.
पण सोनलसारख्या मुली हे एवढं सगळं असं स्पष्ट बोलून, मान्य करतील का शंका आहे.

> इथल्या रिझर्व्हेशन पद्धतीला तो कंटाळला. > हे नाही आवडलं.

उत्तम कथा

सोनल सारख्या मुलींमुळे अनेक संसार उध्वस्त होतायेत ही आजची खरी शोकांतिका आहे पण त्या मुलींना स्वताच्या स्वार्थापुढे नात्यातील प्रेम आपुलकी वगैरे भावना डावून मार्केट वाटत असतात.
इकडच्या रिझरवेशन सिस्टिममुळे कितीही ज्वाजल्य देशप्रेम असले तरी अनेक होतकरु मुले (ओपन कटैगरी अर्थातच) परदेशातील नोकरीच्या संधी स्विकारत असतात हिसुद्धा आपल्या भारताची अजुन एक शोकांतिका आहे !

कथा पटेलशी वाटली नाही, लिखाण छान आहे पण काहीतरी गंडलंय, सोनल पटली नाही.
एकदम ब्लॅक अँड व्हाइट लिखाण वाटले.
तुमच्या इतर कथा फार छान असतात.

शीतल, सायो, aami. सिध्दी,सुहृद, सोहनी, भिकाजी,नौटंकी ,अनघा सर्वाना प्रतिसादा बद्दल धन्यवाद, माझ्या बहुतेक कथा ह्या सत्य कथांवर आधारित असतात. आणि ही सुध्दा सत्यकथा आहे. असे व्यक्तित्व अस्तित्वात आहे. जेव्हा आपल्याला गरज असेल तेव्हा ती त्या व्यक्तीच्या अगदी शब्दशः गळ्यात पडते. आणि एखाद्याला टाळायचं असेल तेव्हा वाटेल ते खोट बोलते. स्वभावाचा पटकन थांग लागत नाही.

ण सोनलसारख्या मुली हे एवढं सगळं असं स्पष्ट बोलून, मान्य करतील का शंका आहे.> + १
कथा म्हणून ठीक आहे.
पण सोनलला जर पुतण्यासाठी चान्स मारायचा आहे तर ती एवढं सगळं सांगणार नाही.
काहीतरी बनेलपणा केला असता तिने. घटस्फोटासाठी पुष्करला दोषी ठरवलं असतं. सहानुभुती मिळवली असती.

सोनलला जर पुतण्यासाठी चान्स मारायचा आहे तर ती एवढं सगळं सांगणार नाही.
काहीतरी बनेलपणा केला असता तिने. घटस्फोटासाठी पुष्करला दोषी ठरवलं असतं. सहानुभुती मिळवली असती. >> हेच मला म्हणायचं होतं.