कोंबडी

Submitted by अजिंक्यराव पाटील on 24 December, 2019 - 06:25

नुकतीच मारुतीच्या देवळात आरती झाली होती. पारावर नेहमीचीच चार सहा डोकी फाकाल्या मारत बसली होती. पारावर जमिनीच्या वर आलेल्या पिंपळाच्या दोन जाडजूड मुळ्यांनी खुर्चीगत खोबण तयार झाली होती. त्या खोबणीत, मळकट धोतर, वर एक बंडी, आणि डोईवर कसंतरीच गुंडाळलेलं पटकं, (जे, डोकं झाडाला टेकून रेलून बसल्यामुळे आता डोळ्यांवर आलं होतं) धारण केलेला एक काटकुळा देह आपली पाठ टेकवून निवांत बसला होता. त्याच्या शेजारीच चट्ट्यापट्ट्यांची विजार, अंगात जय गुरुदेव लेझीम मंडळ लिहिलेला भगवा टी-शर्ट आणि डोक्यावर गांधी टोपी घालून उकिडवा बसलेला अजून एक देह उंट छाप बिडी तोंडात धरून आणि हातात काडीपेटी घेऊन नुसताच खाली मान घालून बसला होता. हि दोघं म्हणजे अनुक्रमे बजाबा जाधव आणि तात्या पिंगळे.

"हिच्यायला ह्या कुत्र्यांच्या, आता भटकं कुत्रं दिसलं घरापाशी कि मी खांडोळीच करणार हाय बघ!" नुकताच आलेला संतू नाना करवादला.
"क्वाय यायं या शंतू नाना?" दात टोकरता टोकरता दत्तू न्हावी विचारता झाला.
"आरं ती काडी काढून तरी बोल दत्त्या, झालं असं का माझ्या बायलीनं घरी चार कोंबड्या आणि एक कोंबडं पाळलं हाईत"
"मंग कोंबडं पाळलं म्हणून तुला घराभाईर काढला का काय?" एक डोळा मारून खीखी करत पांडू सुतारानं दत्तू न्हाव्यापुढं टाळीसाठी हात केला. पण, फुरगुंटलेल्या बायकोगत दत्तूनं त्याच्याकडे दुर्लक्ष करत दातातली काडी काढून विचारलं, "कुत्र्यांचं काय म्हनला?"
"म्हणायचं काय ऱ्हायलंय आणि, आरं चांगलं ७ किलूचं कोंबडं माझं, त्ये तर ग्येलंच वरून दिवसाला ३ अंडी देणारी कोंबडी पण पळवली माझी."
"७ किलूचं कोंबडं?" तात्या तोंडावर हात ठेवून डोळे मोठे करत म्हणाला आणि त्यानं एकदाची विडी पेटवून डोळे बारीक करत विचारता झाला, "संतू, नक्की कोंबडंच होतं कि बकरं होतं?" पारावर परत खसखस पिकली.
"आणि ३ अंडी दिवसाला? कोंबडी व्हती का मशीन?" परत पांडबानं पिंक टाकली.
संतू एव्हाना चिडीला आलेला, "तुझ्यापेक्षा कमीच अंडी घालायची, बघावं तेव्हा पार गरम करीत बशीता, काही मदत हुईल म्हणून आलू तर तुम्ही माझीच हजामत करता व्हय.. एक पीस पण दिसू दिलं न्हाई माझ्या कोंबड्याचं..
"असं व्हय" इतका वेळ निवांत पहुडलेला बजाबा बोटाने डोळ्यावरचा पटका वर सरकवत म्हटला तशी तात्यानं आपली बिडी त्याच्या हाती सोपवली. एक झुरका मारून बजाबानं आपली नजर पडल्या पडल्या संतूकडे वळवली, "मी तुला मदत करतो, पण मला काय भेटणार?"
"तू आणि काय मदत करणार? माझी गेलेली पाखरं कुत्र्यांच्या पोटातून काढून देणार का?"
"ते मी नंतर सांगतो, आधी तुझं घर बघू चल"

तशी पारावरची सगळी लोकं उठली आणि संतूच्या खोपटाकडं निघाली. संतूनं बजाबाला गोठ्यातली कोंबडी डालायची खुराडी दावली. एक मिनिटभर नजर मारून बजाबा परत पाराकडं निघाला. परत आपल्या खोबणीत बसून बजाबा म्हणाला, "संतू, जर मी तुला भरपाई मिळवून दिली, तर उद्यापासून पुढचे १५ दिवस मला रोज एक अंडं उकडून देशील काय?"
संतू: "हो देईन कि"

बजाबाने आपली नजर दत्तू न्हाव्याकडं वळवली आणि म्हणाला, "दत्तू, सकाळधरणं बघतोय, बूड टेकून तू बसला नाहीस.. मसाला जास्त झाला व्हता व्हय कोंबड्याचा?"
हे ऐकल्याबरोबर संतू दत्तू न्हाव्याकडं खाऊ का गिळू नजरेनं पाहू लागला, आणि दत्तू बजाबाला खुन्नस देऊ लागला. एवढ्यात संतू धरमपाजीच्या आवाजात करवादला, "माझं सात किलूचं कोंबडं.." तेवढ्यात बजाबा त्याला म्हणला, संतू, तुझं कोंबडं लै झालं तर ३ किलो आसल. उगा घावलं म्हणून वरबाडू नगं.
"त्ये काही नाही, मला भरपाई पाह्यजे"
एवढ्यात दत्तू अजीजी करत संतूला म्हणाला, "संतुबा, माझ्याकडं काही पैकं न्हाईत, मी तुला ४ महिने हजामत फुकाट करून देईन.."
थोडा विचार करत बोटांवर आकडा मोडीत संतू म्हणाला, "वा रं वा, माझं येवढं नुस्कान काय ४ महिन्यात भरून येईल? मी, माझी पोरं आणि माझ्या ३ म्हशी वरीसभर भादरायच्या, न्हायतर चल पाटलाकडं.."
शेवटी बजाबाच्या मध्यस्थीने ६ महिने संतू, त्याची पोरं आणि म्हशी भादरण्याच्या अटीवर तंटा सुटला, आणि सगळी घरोघर पांगली.
एकटे जीव सदाशिव असलेले बजाबा आणि तात्या मात्र अजून पारावरच बसले होते. बिडी शिलगावत तात्यानं बजाबाला विचारलं, "पर तुला कस कळलं चोर दत्त्याच हाय म्हणून.. "सकाळ पासून दत्त्या ६ वेळा परसाकडं जाऊन आला, आणि दात कोरत उकिडवा बसला तेव्हाच मला शंका आल्ती, त्यात संतूच्या गोठ्यात मला एक तुटकं रज्जलपत्तं दिसलं, अन माझी खात्री झाली. आता एक काम कर, माझ्या घरात जा, लाकडी कपाटातून आपली लालपरी ओल्ड मंक काढ आणि चल दत्त्याच्या मळ्यात.. कोंबडं संपवलं असलं, तरी कोंबडी अजून बाकी हाय!"

- राव पाटील

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

रज्जलपत्तं म्हणजे ?
न्हावी वापरतात तो वस्तरा.

अश्या टाइपची पण बोकडाबाबत एक फार फार जुनी कथा इकडेच वाचल्यासारखी वाटतेय.

रज्जलपत्तं: इंग्रजी रेझर ब्लेडचा अपभ्रंश.

भिकाजी: कृपया लिंक द्याल का? मी 2010 पासून मायबोली आणि मिपा वाचतोय, माझ्या वाचनात तरी आलेली नाही.