अनाहूत : १ . . .

Submitted by सोहनी सोहनी on 24 December, 2019 - 02:04

अनाहूत . . .

हैक हैक, सरज्या, थांब कि माझ्या सोन्या, पांडबा जागीच धूळ ऊधळणाऱ्या त्याच्या लाडक्या बैलाला गोंजारत होता. आजची शर्यत तुला जिंकायचीच हाय. आज एकट्या माझ्या नाय तर रिया बाईसाहेबांच्या बी मानाचा सवाल हाय. आज शर्यतीत त्या बी बसणार हायेत बैलगाडीत.

लाल मातीने भरलेल्या सागरासारखं ते प्रचंड मैदान, चार पाच एकर मिळून खास शर्यतींसाठी ओसाड शेताचं शेतांच्या बनवलेल्या मैदानात एका वेळेस दहा बैलगाड्या एकमेकांच्या समोर उभ्या ठाकल्या. फक्त शर्यतींसाठीच पोसलेले आडदांड बैल दिमाखात उभे होते. मैदानाच्या चारही बाजूंनी सगळी माणसे उत्साहाने ओरडत होती. जिंकल्यावर जरी स्टीलची बादली, हंडा, एखादं बोकड आणि चार ते पाच हजार रोख रक्कम मिळायची तरीही त्या शर्यती म्हणजे खेळणाऱ्याच्या आणि खेळवणाऱ्याच्या इज्जतीचा प्रश्न असायचा.

तशी गाडीत जास्त माणसं बसवणं धोक्याचं असतं तरीही केवळ रियाच्या हट्टामुळे गाडीवाहक पांडबा सोबत रिया रियाची जिवलग मैत्रीण श्री, आणि रियाचा जीव रिषभ असे बसले होते. पांडबा हजारदा तिघांना हात जोडून जोडून सगळ्या सूचना पाळायला सांगत होता.

तिघांनाही ह्या शर्यतींचा प्रत्येक्ष अनुभव घ्यायचा होता, त्यांच्या मते तो थ्रिल त्यांना त्या गाडीत बसूनच मिळणार होता.
पुढून लाल झेंडा जोरात फडफडला. बैलगाड्या सुसाट्याने पळत सुटल्या.
हैक हैक, सरज्या, राज्या, काळ्या, प्रत्येक गाडी वाहक बैलांना जमेल तितक्या जोरात पळवायला उत्साहित करत होते. कुणी जोरात परांडी मारत होते, कुणी टोचत होते, कासरे जोराने फडकावत अर्धे वाहन चालक उभे राहून धुळीचे लोट मागे टाकत पुढे धावत होते. पांडबा बऱ्याच जणांच्या पुढे होता. ह्या तिघांनी बैलगाडीच्या साठीला एकदम घट्ट पकडलं होतं.
गाडी चालवायला पुढे पांडबा त्याच्या मागे रिया रिषभ आणि सगळ्यात शेवटी श्री बसली होती. गाडी अत्यंत वेगाने पांडबा चालवत होता.
एव्हाना सगळीकडे धुळीचे वादळ उठले होते. कोण कुठे हे हे देखील दिसेना, आजूबाजूची लोक जल्लोष करत होते, डोळ्यांना ताण देऊन कोण कुठे आहे पाहत होते. हि शर्यत कधीच न हरलेला पांडबा आपले मालक म्हणजे रियाचे आजोबा यांच्या इज्जतीखातीर जिवाच्या आकांताने गाडी चालवत होता.
धुळीच्या लोटांमुळे डोळे अक्षरशः धुळीने भरले होते. जवळ जवळ काहीच दिसत नव्हतं, बैलगाडीत मागे बसलेल्या श्रीला धुळीमुळे खोकला आला ती आपली ओढणी एका हाताने तोंडावर धरायला गाडीला पकडलेल्या दोन्ही घट्ट हातांपैकी एक हात सोडला आणि दुसऱ्या हाताला अचानक झटका लागला आणि ती मागच्या मागे खाली कोसळली. मागेच पाठलाग करत धावत असलेल्या दुसऱ्या बैलगाडीचा चाक क्षणार्धात तिच्या मानेवरून गेला.

एका भयानक किंचाळीने सगळे हादरले. त्या भयानक स्वप्नाने घामाघूम रिया भीतीने अक्षरशः थरथरत होती. धावत जाऊन ती भिंतीच्या कोनाड्यात जमेल तितकं अंग आकसून बसून पूर्णपणे थरथरत होती. झोपेच्या इंजेक्शनचा असर उतरल्यावर ती पुन्हा बिथरल्यासारखी, वेड्यासारखी वागू लागली.घरातले सगळेजण तिच्याकडे घाबरून तर काही आश्चर्याने पाहत होते.
आईने पुन्हा हंबरडा फोडला. वडिलांचे डोळे देखील पाणावले, तिथे असलेल्या सगळ्यांना रियाच्या परिस्थितीची कीव येत होती.
काहीच महिन्यांत हसतं खेळतं पोर पार वेड्यासारखं वागायला लागलं होतं.
श्रीच्या मृत्यू नंतर रियाला पुन्हा पुन्हा तेच तेच स्वप्न पडत होते, तिला तिचे भास होत होते, ती दिसायची, तिला तिच्याकडे बोलवायची असं रिया झोपेत आणि जागेपणीदेखील बडबडत असायची.
श्रीच्या मृत्यूला स्वतः जबाबदार आहोत असं मनात बसल्याने तिचे मानसिक संतुलन पार बिघडले होते, वरवर पाहता सगळ्यांना असंच वाटत होतं.

खूप उपाय केले, दवाखाने, बाहेरचे उपाय पण काही फरक पडला आणि उलट तिला अजून जास्त मानसिक त्रास होऊ लागला.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults