थ्रिल : ३ ( शेवट )

Submitted by सोहनी सोहनी on 19 December, 2019 - 06:17

थ्रिल : ३ ( शेवट )

एक दरवाजा दिसला जो जरासा उघडाच होता, त्यातून त्यांचे आवाज येत होते, मी धावत जाऊन तो दार उघडला तर विजेचा झटका लागावा तर मागे पडलो. एका खुर्चीवर तीच मला दिसलेली मुलगी हात पाय बांधून मोकळे केस तोंडावर अशी बसलेली दिसली, तर तिच्या बाजूला दोन माणसं जमिनीवर खाली तशीच हात पाय बांधून शरीराचं मटकूळ करून पडली होती.
ती माणसं मेलेली होती, ठीकठिकाणी त्यांचे कापलेले शरीर स्पष्ट दिसत होते त्यांच्यातून प्रचंड दुर्गंधी येत होती, आणि शरीर थोडं थोडं कुजत होतं. मला ते सगळं पाहून अक्षरशः उलटीच झाली. मी कसंतरी श्वास घेत डोकं दाबत सावरतोय तोच माझ्या पायावर अचानक काही वळवळलं, कुजलेल्या शरीरात झालेले किडे होते ते, मला त्यांच्या स्पर्शाने शिसारी आली मी पुन्हा उलटी केली इतकी घाण वाटली, अंग पूर्णपणे थरथरत होतं.

मी तसाच उठलो, मोठे श्वास घेत मी एकवार तिच्याकडे पाहिलं आणि पळणार तोच तिने डोळे उघडले,. कमालीची आर्जव होती तिच्या नजरेत, ती खूप क्षीण आवाजात म्हणाली "मला वाचवा, पाणी पाणी" खूप आर्जवाने तिचा क्षीण हात पुढे करून मला मदतीला बोलावत होती, समोर पाहत होतो मी तिला.
मघाशी हॉल मध्ये जे झालं ते काय आणि आता काय हे समजण्याच्या पलीकडचा मी, एक अडचणीत सापडलेली, जीवन मृत्यूशी झगडत असलेली मुलगी पाहून कसा पळणार होतो. मी तिला सोडवायला पुढे जात होतोच तर मला अचानक आठवलं, मघाशी हसणारा आवाज पण हाच होता म्हणजे काय ते मी समजून मागे सरकू लागलो तशी तिची नजर हिंसक झाली. तिच्या गुरगुरण्याचा मला स्पष्ट आवाज येत होता तसा मी जिवाच्या आकांताने वाट मिळेल तसा पळालो.

वर आलो, पूर्ण घरभर फिरलो पण बाहेर जायचा रस्ता मिळत नव्हता, वर अंधार होता मी वेड्या सारखा फक्त ह्या खोलीतून त्या खोलीत पळत होतो, आणि तिचं गडगडाटी काळीज भेदणारं हास्य पूर्ण घरभर पसरलं होतं. ती जणू मला शिकारी सारखी खेळवत होती आणि माझ्या असहाय्यतेवर हसत होती.

मी धावताना कितीतरी ठिकाणी पडलो, आपटलो, ठोकरलो त्यामुळे बरंच रक्त वाहत होतं. माझ्यात होती तेवढी ताकत लावून मी स्वतःची सुटका करण्याचा प्रयत्न केला, मी ज्या दरवाज्याने आत आलो तो जिवाच्या आकांताने बडवत होतो पण एक क्षण असा आला कि मी खाली बसलो सगळी शक्ती संपली, ती अजून जोरात हसायला लागली.

मृत्यू समोर होती, तिच्या पावलांचा आवाज येऊ लागला, मी माझ्याकडेच येत होती. एवढा अंधार असून देखील मला तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. नावाला पांढरा असा ड्रेस, पूर्णपणे सुकलेल्या रक्ताने भरला होता, केसांच्या जट झाल्या होत्या,जिला मी गाडीवर धडकताना पहिली होती, तिचं खर रूप पाहून मला भोवळ येत होती. तोंडावर आलेले केस, हिंस्र हसू, डोळ्यात निखारे, खोबणीत गेलेले डोळे, तोंडातून टपकणारी लाळ, पूर्णपणे सुरकुतलेलं कुजलेलं शरीर, अशी ती माझ्या जवळ येत होती. मी भीतीने जागीच थरथरत होतो.
ती माझ्या तोंडासमोर गुढग्यावर वाकून माझ्याकडे हिंस्रपणे पाहत होती. अगदी तोंडासमोर तोंड अशी ती माझ्याकडे हसत, माझ्यावर तुच्छ कटाक्ष टाकत मला सगळ्याबाजूने न्याहाळत होती.
हृदय जवळ जवळ चिरून फुटणारच होता. मी भीतीने गुढग्यात तोंड लपवलं, मला ते पाहवत नव्हतं, गोष्टी ऐकून बाथरूमला जायला घाबरणारा मी हे असं समोर पाहत होतो, माझ्या मते मी काहीच क्षणांत मारणार होतो. मी पूर्णपणे समर्पण केलं होतं.

मी मुख्य दरवाज्याला लागूनच बसलो होतो, मी डोळे मिटले असताना मला चेतना सर्वेश प्रसाद आठवले मी शेवटचं त्यांना पाहून घेतलं असं वाटलं. इतकाच साथ आपला असा विचार आला आणि मी अक्षरशः हुंदके देऊन रडायला लागलो. ती समोरच होती, चेतना सर्वेश प्रसादला आठवताना मला आठवलं माझ्या खिशात मामांनी पूजेचा धागा दिला होता. इतक्या वेळेत मला देवाची आठवण काय देवाचं नाव देखील घेता आलं नव्हतं, मी इतका घाबरलो होतो कि मला मृत्यू आणि भीती शिवाय काही सुचत नव्हतं.

ती मला स्पर्श करणार तोच मी विजेच्या वेगाने ती पुडी उघडली तसा त्यातला देवाचा भंडारा तिच्यावर उडाला आणि आश्चर्य म्हणजे ती वेड्या सारखी किंचाळत राहिली. तिला काही इजा होतं असाव्यात, चटके लागत असावेत तिला असं मला वाटलं.

तो धागा मी घट्ट पकडून हृदयाला लावला, तेव्हा का रडतो ते शब्दांत नाही सांगू शकत. पण बुडत्याला जातीचा आधार तसा तो अभिमंत्रित धागा त्यातल्या भंडाऱ्याने माझ्या मनातील सकारात्मकतेला जागं केलं.
मी नाही सांगू शकत कि त्या धाग्यात त्यात भंडाऱ्यात काय होतं पण मनात देवाची भक्ती विश्वास आणि सकारात्मकता असते, अश्या काही प्रसंगी जेव्हा अमानवी शक्ती मनाच्या सकारात्मक संवेदनावर हावी होतात तेव्हा अश्याच एखाद्या सहार्याची आपल्या मनातल्या त्या सकारात्मक शक्तीला जागं करायला गरज असते, तो धागा पाहून मी स्वतःला शेवटचा वाचवण्याचा प्रयत्न म्हणून मनावर लहानपणापासून उमटलेली हनुमान चालिसा जोरात म्हणू लागलो.

ती अजून जोरात किंचाळत आत पाळली, मी ज्या हातात धागा घेतला होता त्या हाताने जोर लावून सर्व ताकतीनिशी श्लोक म्हणत दार लोटलं, एकदा दोनदा आणि तिसऱ्या वेळेस ते पूर्णपणे उघडलं. मी जीव मुठीत घेऊन वाट फुटेल तसा पळत सुटलो, कितीवेळा पडलो, किती रक्त सांडलं काही पाहिलं नाही. पायवाट संपून मी गाडीजवळ आलो, मी तसाच गाडीच्या बाजूला बसून मन रिकामं होई पर्यंत रडलो, हे रडणं मरणाच्या दारातून परत आलेल्या व्यक्तीला व्यवस्थित कळेल ...

बराच वेळ झाला मी वेड्या सारखा रस्त्यावर गाडीला टेकून रडत बसलो होतो. तोच एक दुचाकीवरून दोन लोकं माझ्या इथून पुढे गेली. मी भानावर आलो तेव्हा ती गाडी परत मागे येऊन गडबडीने मला म्हणाले

"पावणं, इथं थांबू नका जास्त येल, हि जागा भुताटकीची हाय, इथं ती हाडळ दिसतीय लोकास्नी, तरास देते" मी त्यांच्या कडे पाहतच राहिलो. मी खरंच ते अनुभवून आलो होतो.
हे नक्की काय आहे सगळं? प्लिज मला सांगा, मी त्यांना विनंती करत होतो. मी आताच तिथून वाचून परत आलोय हे सांगितल्यावर ते दोघे अवाक होऊन घाबरून माझ्याकडे पाहू लागले. मी पुन्हा रडवेला झालो होतो. माझी हालत पाहून त्यांच्यातल्या एकाने मला सगळं सांगितलं.

"ती त्या बंगल्यातल्या पाटलाची इसेक वर्साची तरणीबांड पोर शहराच्या पोराच्या मागं व्हती, इथं बंगल्याव येऊन तो तिला भेटायचा, असं समदे म्हणत्यात. पाटलाला कळलं तवा त्यांना रंगेहात पकडलं, त्या पोरानं घाबरून पळ काढला, पण पाटलानं संतापानं पोरीला तळघरात खुर्चीला हातपाय बांधून ६ ७ दिवस ठीवली, बिचारी पाण्यावाचून तडफडून मेली तवा पासून ती तुमच्या सारख्या पोरास्नी फसवून तिकडं बंगल्यावर नेती आणि त्यास्नी हालहाल करून जीवानिशी मारते. आता काळोख बी झालाय, इथं थांबनं जीवाव बेतल, निघा, बेगी."
माझी दया येऊन कि माणुसकी म्हणून त्यांनी माझी गाडी मेन रोडला लागेपर्यंत साथ सोडली नाही.

हा अनुभव मी आयुष्यभर लक्षात ठेवेन, विसरायचं ठरवलं तरी विसरणार नाही, कदाचित माझा काळ आला होता पण वेळ आली नसावी आणि देवावर असणाऱ्या विश्वासाने माझा नाहक बळी जाऊ दिला नाही.

कदाचित आई बाबा आणि मित्रांचं प्रेम असावं जे वेळेत मी माझ्या मनावर भीतीवर आवर घालून स्वतःला वाचवलं.

कदाचित ह्या प्रसंगानंतर प्रसादच्या गोष्टी माझ्यावर असर करणार नाहीत.
किंचित क्षीण अशी स्माईल करून मी घरी निघालो. ..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

३न्ही भाग मस्त
टिप - पुढील खेपेस अश्या प्रसंगी बोकलतांना बोलवेन अशी धमकी द्यायची फक्त. उगीच पळून दमछाक करायची नाही.

Gurucharitra pothi gheun nighalelya 3 mitranchi katha whatsapp var firat hotee kahi varshanpurvi.. Tasa dhacha vatala.
Pan itakya patapat takatay hyache manaasun kautuk! Adhichi katha awadali.

डेंजर गोष्ट आहे
तुम्ही गोष्टी पटापट पूर्ण करता ही गोष्ट जबरदस्त चांगली आहे.या आणि थरारक कथेवर आहट चा 2 भागांचा एक एक एपिसोड बनू शकेल.

भिकाजी - हो सर, खूप धावाधाव झाली, पुढच्या कथेत नक्कीच त्यांचं नाव सांगेल. मनापासून धन्यवाद
नानबा - सर ढाचा कधी कधी सारखा असू शकतो, पण हि माझ्या (शंभर टक्के) कल्पनेतून निघालेली आहे. मनापासून धन्यवाद
mi_anu - मॅम मनापासून धन्यवाद
विचार - मनापासून धन्यवाद सर
सस्मित - मॅम मनापासून धन्यवाद
किल्ली - मनापासून धन्यवाद मॅम
नौटंकी -मनापासून धन्यवाद मॅम . . .