थ्रिल : २

Submitted by सोहनी सोहनी on 19 December, 2019 - 02:17

थ्रिल : २

रस्त्यावरून एक मोठा साप ह्याबाजूने त्याबाजूला जात होता. माझं झाडांकडे लक्ष असल्याने ते मला लांबून दिसलं नव्हतं. काहीच क्षणांच्या अंतरावर असताना तो मला दिसला आणि अर्जंट ब्रेक दाबल्यामुळे मी स्टेरिंग वर आदळता आदळता वाचलो.
नक्कीच चाक गेला असणार त्याच्यावरून, बिचारा मेला कि काय म्हणून मी घाईने गाडीतून उतरलो. देव करो मेला नसावा असं मनातल्यामनात बोलत मी गाडीपासून थोडा लांब राहून गाडीखाली वाकून मग गाडीच्या आसपास पाहिलं पण ते कुठेच नव्हतं.
ज्या दिशेने तो जात होतं तिकडे पाहिलं तिकडेही काहीच नव्हतं, बरं झालं वाचला मला मनापासून रिलॅक्स वाटलं.

मी पुन्हा गाडीत बसणार तोच डाव्या बाजूच्या झाडीतून किंचित हालचाली जाणवल्या. हळू हळू तो आवाज जवळ येतोय असं वाटायला लागलं. म्हणजे लांबून काहीतरी धावत येत आहे असं काहीतरी. जवळ जवळ येतानाचा आवाज खूप वाढला, एखादा जंगली प्राणी वैगेरे असला तर मेलोच ह्या अतीव भीतीने मी गाडीत बसायला एक पाय टाकणार तोच ती सुकलेली झाडी भेदून एक मुलगी धावत येऊन माझ्या गाडीवर धडकली, माझ्याकडे एकवार पाहून वाचावा मला असं आर्जवाने म्हणून घाबरून पुन्हा त्या झाडीकडे पाहत डाव्या बाजूच्या झाडीत पळत गेली.
मी फक्त वेड्या सारखा डावीकडून उजवीकडे पाहत बसलो. ती त्या झाडीतून आली कधी ह्या झाडीत गायब झाली कधी मला काही कळलंच नाही.
काय झालं हे माझ्या डोक्यात बसायच्या आत ती गायब झाली होती, काही क्षणांत माझ्या डोक्यात आलं कि ती मदत मागत होती, एका मुलीला मदतीची गरज होती म्हणून तिचा पाठलाग कोण करत आहे हा विचार मनात डोकावूही न देता मी विजेच्या वेगाने गाडी लॉक करून चावी खिशात टाकून ती गेली त्या दिशेने धावलो.
पाहतो तर तिथे एक पायवाट होती, म्हणजे ती इथूनच धावत गेली असणार म्हणून मी हि त्या पायवाटेवरून धावत सुटलो.
मला कुणीतरी आपल्या पुढे काही अंतरावरून सरळ धावत चाललंय असा स्पष्ट अंदाज येत होता.
मी त्याच दिशेने पळत होतो. विशेष बाब हि होती कि तो आवाज ठराविक अंतरावरून स्पष्ट येतंच होता जसं कुणीतरी मुद्दामून मला दिशा देत असावा. पण माझ्या बुद्धीला ते त्या वेळी कळलं नाही.

मी जोरात आवाज दिला " कुणी आहे का? पळू नका थांबा, मी तुमची मदत करायला आलो आहे" तरी ती धावत राहिली, आता हळू हळू मुसमुसल्याचाही आवाज येत होता, ती रडत रडत धावत असावी असा अंदाज धरून मी माझी गती वाढवली.

पायवाट संपून आता एक लाल मातीचा कच्चा रस्ता लागला, त्या रस्त्याच्या एका टोकावरून मला ती पाठमोरी पळताना दिसली, मी जोरात आवाज देत तिच्या मागे धावलो. तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.
तिच्या मागे मागे मी किती अंतर धावत आलो होतो माझं मलाच माहित नव्हतं.

कच्चा रस्ता संपून एक रुंद मोठा रस्ता लागला आणि मी खूप म्हणजे खूप दमल्या मुळे गुढग्यावर हात देऊन मान खाली टाकून माझे हपापलेले श्वास आवरायचा प्रयत्न करून लागलो. हृदय जोरजोरात धडकत होतं, मागे मानेत आतून वेळगिच चमक भरत होती.
पुन्हा तोच धावल्याचा आवाज, खडबडत ती पुढे धावत होती, आता मला जरा राग आला. केव्हा पासून बोंबलतोय मदतीला आलोय तरी मुर्खासारखी पुढे धावत चाललीये.
मी जोरात ओरडलो, हे बघा मी तुमच्या मदतीला इतका धावत आलोय, तुम्हाला काही इजा करायला आमच्या मागे आलो नाहीये, मदत हवी असेल तर धावू नका थांबा. माझ्याकडे गाडी आहे तुम्हाला घरी सुखरूप सोडीन."

सगळं शांत, शांत. . . जणू ती थांबली असावी.
मी पुन्हा म्हणालो " लपला असाल तर बाहेर या, घाबरू नका"

तरीही शांतता, त्या शांततेत मला भीती स्पर्श करत होती तोच ती बाजूच्या मोठया झाडामागून पुढे धावत होती, आता स्पष्ट दिसत होती.

पांढरी चुडीदार सलवार कमीज, धावल्यामुळे हवेत उडणारी निळ्या रंगाची ओढणी, मोकळे खांद्यापर्यंत केस, पायात चप्पल नाही, आणि अगदीच काहीच अंतरावर माझ्या पुढे रडत रडत धावत होती.
मी हि तिच्या मागे धावलो.
ती डाव्या बाजूला वळली आणि पुढे गेली. मी डाव्या बाजूला वळलो तर चारही बाजूला वेगवेगळ्या मोठ्या उंच झाडांनी वेढलेला ते बंगला समोर होता. सगळीकडे अंधार वाटावा इतकी घनदाट सावली पसरली होती.
आणि ती दार उघडून सरळ त्या बंगल्यात शिरली होती.

मीही क्षणाचा विलंब न करता सरळ आत घुसलो, झाडांच्या सावलीमुळे दिवसादेखील त्या बंगल्यात कमालीचा अंधार होता. खिडक्या उघड्या असल्यामुळे कदाचित जरा उजेड होता नाहीतर रात्रीच्या अंधारासारखा अंधार वाटला असता.
मी पुन्हा तिला आवाज दिला, पण काहीच प्रतिसाद आला नाही.

ह्यावेळेस मात्र माझ्या मानेवरून एक भीतीची ओघळ निघाली, त्या घामाच्या स्पर्शाने माझ्या अंगावर सरसरून काटा आला. इतका वेळ दबा धरून बसल्यासारखी भीती वसकन माझ्या अंगावर येऊन मनात तरंगत राहिली.
ती काही भुताटकी नसेल ना?? ह्या एका विचाराने माझे हात पाय कापू लागले. ह्या क्षणाला मला माझा जीव जास्त प्रिय वाटलं म्हणून तिचं जे आहे जे होईल ते होऊदेत आधी मला निघायला हवं इथून, मी विजेच्या वेगाने मुख्य दाराकडे धावलो आणि दारातून बाहेर पडणार तोच माझ्या तोंडावर जोरात दार बंद झालं.

एक आर्त किंचाळी पूर्ण बंगल्यात घुमली. आवाज आतल्या खोलीतून आला असावा. म्हणून धावत तिकडे गेलो, तर दुसरीकडूनच किंचाळी आली मी तिकडे धावलो, वेड्या सारखा एका खोलीतून दुसऱ्या खोलीत धावत होतो.
तिचं किंचाळी पुन्हा हॉल मधून आली मी हॉल मध्ये आलो तर एक एक करून उघड्या असलेल्या खिडक्या बंद होऊन सर्वत्र अंधार पसरला.
समोरच काही दिसणार नाही इतका अंधार. मी अक्षरशः कापत होतो.

तितक्यात कुणीतरी तोंडावर हात देऊन माझ्यावर हसतंय असा आवाज येऊ लागला, डावीकडून, नाही आता उजवीकडून, आणि मागून, नाही हे बघ समोरून मी वेड्या सारखा सगळ्या दिशांना फिरत होतो. दिसत काहीच नव्हतं पण आवाज एकदम स्पष्ट येत होता.

आधीच भित्रा त्यात हे अति मूर्खपणाचं धाडस केल्यामुळे मी त्या भीतीच्या क्षणांतदेखील स्वतःला लाख शिव्या दिला. मदतीसाठी आलो होतो हि तर काही वेगळी भानगड निघाली. मला विनाकारण मरायचं नव्हतं.
मी सैरभैर त्या अंधारात तिचा अंदाज घेत होतो. "कोण आहेस तू?? मी तुझं काही बिघडवलं नाहीये, मला जाऊदेत प्लिज" मी रडक्या स्वरांत विनंती करत राहिलो.

एक कर्णकर्कश हास्य कानातून थेट हृदयात घुसलं आणि मरण, आता मरण हि भावना घेऊन वर आलं. मी अतिशय घाबरलो होतो.

तितक्यात थोड्याच अंतरावरून मला दोन तीन माणसांचा वाचावा वाचावा असा क्षीण आवाज आला, कोणीतरी आपल्या सोबतिला आहे ह्या जाणिवेने जीवात जीव आला. मी उरलं सुरलं अवसान एकवटून त्या दिशेने धावलो.

इतक्या वेळेत माझे डोळे किंचित का होईना पण अंधाराला सरावले असावेत त्यामुळे त्या मोठया खोलीत मी त्या ओट्याला आदळता आदळता वाचलो. मी हाताने चपापलं गॅस असावी ती, हात धुळीने पूर्ण भरून निघाला, ते नक्कीच किचन असावं. मी इकडे तिकडे पाहतोय तोच पुन्हा तेच क्षीण आवाज आले आणि मी त्या दिशेने धावलो तसा जोरात त्या पायरीवर आपटलो.
तिथे पायऱ्या होत्या मला माहित नव्हतं त्यामुळे खूप जोरात पडलो, खूप लागलं पण ते पाहण्याची ती वेळ नव्हती.

मी हळू हळू पायऱ्या खाली उतरलो, पाच सहा पायऱ्या उतरलो तसा खाली किंचित उजेड जाणवला. खिडक्या बंद व्हायच्या आधी जितका उजेड होता तितकाच.
पूर्ण पायऱ्या उतरलो तर ती एक भली मोठी जागा होती, ते माजघर काय ते म्हणतात अगदी तसं. बंगल्यात माजघर होतं, मी चक्रावून गेलो. ती माणसं एकदाची भेटावी म्हणून सगळी कडे त्यांना शोधात होतो. इथे फारशी नव्हती. नुसती खडबडीत जमीन होती. कोंदट, चिकट चिकट. मला खूप घाण वाटलं.

थोडा पुढे गेलो तसा आयुष्यात पाहिला नसेल अनुभवला नसेल इतका घाणेरडा वास भपकन नाकात घुसला.
समोर एक मोठी खोली होती, अर्धवट दार उघडलेली.
आणि समोर जे पाहिलं त्याने मी फक्त भोवळ येऊन पडायचाचं राहिलो . . .

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults