थ्रिल
( एका प्रवासात आलेल्या अनुभूतीचे वर्णन, काही थोडं सत्य थोडी माझी कल्पना )
बरेच दिवस झाले कुठे भटकायला गेलो नव्हतो. तेच तेच चालू होतं किती दिवस, अरे तेच ते ऑफिस घर ऑफिस. "राम नाय रायला आयुष्यात" असं म्हणण्या इतपत रटाळ जात होते दिवस.
चार पाच महिने झाले माझ्या चांडाळ चौकडीने देखील सक्सेसफुल असे प्लॅन बनवलेच नाहीत, मी बनवला तर ह्याला सुट्टी नाही, त्याने बनवला तर त्याला सुट्टी नाही.
काल चेतनाचा फोन आला होता, म्हणत होती तिच्या मामाकडे चार पाच दिवस जाणार आहे ती. मामाच्या नवीन बंगल्याची पूजा आहे म्हणे, काकीला जायला नाही जमणार म्हणून जबरदस्ती हिला पाठवत आहे म्हणाली, ह्या जबरदस्तीमध्ये मला वेगळीच शंका आली पण मी तिला बोललो नाही. उगीच स्वतःचा उद्धार कसला करून घ्यायचा . . .
सर्वेश आणि प्रसादला विचारलं तर म्हणाले येतो आम्हीही, आता तू कसंही सुट्टी अरेंज कर हा . . आता हे धमकी दिल्यासारखं बोलायची खरंच काहीच गरज नव्हती कारण मी तर एका पायावर तयार होतो, त्यात तिच्या मामाचं गाव म्हटलं तर स्वर्ग . . .
ऑफिस मध्ये सुट्टी टाकली, माझा बॉस म्हणजे देव माणूस, कशाला नाही म्हणत नाही, पण ह्या वेळेस सुट्टी दिली पण सहाव्या दिवशी काहि करून ऑफिसला यायचं ह्या रिक्वेस्ट वर. ते मी काम करत असलेल्या प्रोजेक्टवर फायनल मिटिंग आहे आणि मी असायलाच हवा म्हणून. पण रिक्वेस्ट करायची गरज नव्हती मला हा जॉब प्यारा आहे येणारंच मी, मी हो हो म्हणून निघालो.
ओळख करून द्यायची राहिली. मी हमीर, सर्वेश, प्रसाद आणि चेतना अगदी डिप्लोमा पासून ते डिग्री ते आता पर्यंत एकदम जिवलग. आधी आम्ही तिघेच होतो पण चेतना तिच्या दिलखुलास, मोकळ्या आणि खोडकर स्वभावामुळे आमच्यात कधी फिट झाली कळलंच नाही.
ती तर मुलींच्यात नसायचीच. आम्ही चौघे सोबत असलो कि जग गेलं खड्ड्यात आम्ही आमच्याच दुनियेत तरंगत असायचो.
हा पण सगळ्यांचे स्वभाव अगदीच वेगळे पण मस्ती मात्र एकाच लेव्हलची कॉलेज पासून सगळे आम्हाला चांडाळ चौकडीचं म्हणतात.
चेतना म्हणाल तर बोलण्या वागण्यात एकदम कडक, तोंडावर शिव्या घालते काही झालं तर, बाकी आमच्या चौकडीची जान आहे ती, सर्वेश म्हणजे एक देवभोळा माणूस पण जाम गोड, सगळ्यांना समजून घेणारा, कसलेच नखरे नसणारा, आणि प्रसाद ह्याचे खाण्या घेण्याचे जाम नखरे, आईची सोडून कोणाची चपाती पोळी खाणार नाही, खायला चांगलं चुंगलंच हवं आणि माझ्या मागे हात धुवून लागलेला प्राणी. माझी खेचून त्याला कोण सुख मिळतं देव जाणे.
ते काय आहे जरा घाबरतो मी भुताखेतांच्या गोष्टींना मग हा नवीन नवीन काही बाही सांगून उडवत असतो माझी. मग काय फिदीफिदी सगळे हसत बसतात माझ्यावर.
आणि मी आई बाबांचा राजा बेटा वाला प्रकरण, बिघडलो नाही त्यामुळे पण किंचित आगाऊ आहे. बाकी स्वतःची काय तारिफ करू . . .
घर वाल्यांनाही आम्ही कसे आहोत ते माहित आहे, म्हणजे माझ्या घरी ते तिघे किती सोज्वळ वैगेरे आणि त्यांच्या घरी मी किती निरागस वैगेरे त्यामुळे आमचा प्लॅन बनला कि सहसा कुणी नाही म्हणत नाही.
चेतनाच्या मामाचं गाव . . . आ हा हा . . . नसती हिरवळ . . . मस्त छोटी छोटी घरं, हिरवी कुरणं, बैल म्हैशी, शेळ्या मेंढ्या, ते भलं मोठं जंगल, नदी, तलाव, आपुलकीने वागणारी माणसं आणि माझ्या आवडीची गावाकडची शुद्ध हवा. . .
त्यात मामा गावातले मोठे व्यक्ती, पाहुणचार ग्रँड असतो तिथला आणि मामीच्या हातचं गावरान जेवण माझ्या तोंडाला आताच पाणी सुटलं.
आम्ही जाताना चेतनाच्या वडिलांची गाडी घेऊन जाणार होतो, त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. फक्त उद्या तोंड उचलून चेतनाच्या घरी सकाळी सातला सरळ नाश्ताच करायला पोहोचायचं होतं.
आईच्या शंभर सूचना त्यातही पन्नास चेतनासाठीच्या. मुलगी आहे वैगेरे वैगेरे, आईला माहित नाही ती स्वतः वाघीण आहे तिला कशाला काय होतंय.
तर त्या शंभर सूचना ऐकून पोहोचलो चेतना कडे, ते दोघे आधीच काकूने बनवलेल्या इडल्यांवर हात साफ करत बसले होते. मस्त नाश्ता करून आम्ही निघालो.
आळीपाळीने गाडी चालवत जायचं असं ठरलं होतं, पहिला मी चालवणार होतो गाडी. . .
तसा रास्ता १२ ते १३ तासांचा होता.
आम्ही कॉलेजला असताना चेतनाच्या आई बाबांबरोबर आलो होतो आधी ह्या गावात तेव्हा पासून मला खूप आवडलं ते गाव. आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे गावी पोहोचायला शेवटच्या ३ तासात लागणारा हिरव्या घनदाट दाटीवाटीच्या झाडांचा रिकामा रास्ता.
ह्या असल्या धकाधकीच्या आयुष्यात हे असलं काही मिळणं माझ्यासाठी स्वर्ग. पण चेतनाच्या आईने त्या रस्त्यात मधेच गाडी थांबवायचं नाही असं निक्षून सांगितलं होतं. म्हणे ती हद्द चांगली नाही, जपून जायचं.
असल्या रस्त्यांवर लुटमारी वैगेरे होतं असेल म्हणून काकी बोलल्या असतील.
मस्ती मस्करी करत पोहोचलो मामाकडे. बाबा बाबा काय ते जेवण, किती तो मान पान. दोन दिवस वेड्यासारखे हुंदडलो. जंगलात फिरलो, तळ्यावर नद्यांवर भीजेस्तोवर खेळून आलो, मामींच्या हातचं जेवण, इतका मोठा बांगला असूनदेखील खाली मांडी घालून बसून जेवण मला भयंकर आवडतं. गेले दोन दिवस नुसता कल्ला केला होता आम्ही गावात.
रात्री मस्त बसलो होतो दमून तर हा प्रसाद पुन्हा चालू. म्हणजे त्या रस्त्यावर येताना त्याला एक पोरगी दिसली. पांढरी साडी पांढरं तोंड वैगेरे वैगेरे. ह्या दोघांनीही ह्याचा सूर धरला.
तो सांगतोही असा रंगवून ना कि मी घाबरतोच, मी जरा घाबरलोय पाहून लागले फिदीफिदी हसायला. दोघांना शिव्या घालून सरळ झोपलोच.
सकाळी उठलो तर सगळीकडे गावकऱ्यांची रेलचेल चालू होती. सजावट, साफसफाई, कुणी भाजी आणत होतं तर कुणी भाज्या कापत होतं, आज पूजा होती ना संध्याकाळी.
आणि एक हळूच बातमीही कळली कि पूजेत चेतनाला पाहायला कुणीतरी येणार होते मामाच्या ओळखीतले.
चेतनाला अक्षरशः रडायला येईपर्यंत चिडवलं आम्ही.
तिची खेचाखेची चालू होती तोच मला ऑफिस मधून कॉल आला. फोन झाल्यावर माझा पडलेला चेहरा पाहून सगळे गंभीर झाले. ते मीटिंग काही कारणाने उद्या ठेवली होती आणि मला जावंच लागणार होतं.
सगळ्यांनी मला आणि ऑफिस वाल्यांना भरभरून शिव्या दिल्या.
पूजा संध्याकाळी असल्याने चेतनाला थांबणं खूप महत्वाचं होतं तरीही ती सर्वेश प्रसाद माझ्यासोबत यायला निघालेले. इतर ठिकाणी असतो तर येत नसते तरी खेचून घेऊन आलो असतो पण इथे कसं सगळ्यांना राहावसं वाटत होतं, पुन्हा कधी येऊ देव जाणो म्हणून मी कोणालाच सोबत घेतलं नाही. आणि तसंही सगळ्यांची पूजा अटेंड करायची खूप इच्छा होती माझी देखील.
मी त्यांना कसंतरी समजावलं आणि चेतनासोबत थांबायला लावलं, मामा मामी देखील खूप विनंती करत होते पण मला लगेच निघावं लागलं.
मामांनी निघताना पंडितजींकडून पूजा झाल्यावर बांधायचा धागा देव्हार्यातून अभिमंत्रित करून दिला. एकटा चालला आहेस सांभाळून जा हे तुझं रक्षण करेल. भंडाऱ्याने माखलेला तो पिवळा धागा आणि एका छोट्या कागदात थोडासा भंडारा अशी पुडी मी खिशात ठेवली.
गावाकडची लोक किती देवभोळी आणि मायाळू असतात म्हणून मला इतकं आवडतं.
मी चेतनाची गाडी घेऊन निघालो ते लोक मामांची गाडी घेऊन येणार होते.
दुपारी एक वाजता मी तिथून गाडी घेऊन निघालो, मस्त गाणी ऐकत. थोड्याच वेळात छोटी छोटी गावं मागे टाकून मी त्या सुनसान रिकाम्या हिरव्या सावलीच्या रस्त्याला लागलो.
सगळी कडे मस्त मोठी मोठी बेटांची हिरवी झाडे. अशी रस्त्यावर वाकलेली, जणू मला त्यांच्या कवेत घ्यायला झुकलेली वाटत होती. मी मस्त पाहत पाहत चाललो होतो तोच समोर ते पाहून मी घाबरून कचकन गाडीचा ब्रेक दाबला . .. . .
क्रमशः
वाचतेय.छान सुरुवात. पुभाप्र.
वाचतेय.छान सुरुवात. पुभाप्र.
फक्त शुद्धलेखनाच्या काही चुका आहेत त्या दुरुस्त करा.
चान्गली सुरवात!
चान्गली सुरवात!
मस्त आहे, झटपट एकामागोमाग एक
मस्त आहे, झटपट एकामागोमाग एक कथा टाकत आहात, धन्यवाद.
आताच एक्साम संपलीये, सो जरा
आताच एक्साम संपलीये, सो जरा फ्री आहे डोकं इमॅजिनेशन साठी.
छान. पुढील भागाच्या
छान. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
खुप मस्त लिहिलंय
खुप मस्त लिहिलंय
)
फक्त ते काकी ऐवजी काकू कराल का ?
_____________
काकी = कावळीण (कावळ्याची सौ.