खत - नात्याचं. . .
आज सकाळी तिने असंच उठवायचं म्हणून मला उठवलं, नेहमी अगदी खेळकरपणे उठवणारी, हातात बॉटलचं झाकण भरून पाणी घेऊन उभी राहून मिश्कीलपणे माझ्याकडे हसत पाहणारी आज फक्त
"उठा सव्वा सहा झाले, जिमला उशीर होतोय" इतकंच काय ते बोलून निघून गेली.
आजच मला जाणवलं कि कित्येक दिवस ती मला असंच उठवत आहे. . .
वॉशरूमकडे गेलो तर नेहमी सारखं गरम पाणी काढून ठेवलं होतं. टूथब्रश, टूथपेस्ट, जिमचे कपडे, सगळं मला लागतं तसं अगदी व्यवस्थित जागेवर ठेवलं होतं.
ती किचन मध्ये घेवडा नीट तपासून मन लावून पण निमूटपणे कापत होती. मी मुद्दामच तिने माझ्याकडे पाहावं म्हणून पाणी काढलंय का विचारलं, मान वर न करता ती फक्त हो म्हणाली.
काही विचारलं तर हसून,तर कधि मुद्दाम मस्तीत वेडेवाकडे तोंड करून उत्तर देणारी ती गेले कित्येक दिवस मोजकचं बोलतेय आपल्याशी हे मला जाणवलंच नव्हतं इतके दिवस.
तिने माझ्याकडे पहावं म्हणून मी तिथेच उभा राहिलो, तिने मान वर करून पाहिलं आणि घेवड्याची भाजी नकोय का??? असं विचारलं.
मी तिच्या डोळ्यांत पाहत होतो आणि माझ्या डोळ्यात पाहून अचानक तिच्या डोळ्यांत पाणी जमा होऊ लागलं आणि टॉवेल आणायच्या निमित्ताने ती तिथून रूम मध्ये गेली. . .
माझ्या डोळ्यावर थोडीशी झोप होती ती तिचा चेहरा पाहून एका झट्क्यात उडाली, पेपरच्या दिवशी उठायला उशीर झाल्यावर झोप कशी एका क्षणातच उडते तसं झालं मला.
तिचे डोळे जरा सुजले होते त्यामुळे चेहरा हि थोडा वेगळाच दिसत होता, मी विचारात पडलो काय झालं असेल हिला.
डोळे सुजलेत म्हणजे रडली असणार, ती रडली कि तिचे डोळे खूप सुजतात. का आणि कधी रडली? मला कळलं कसं नाही?
अचानक काही आठवल्या सारखं मी आजची तारीख आठवायला लागलो आणि येताना मी पाहिलं होतं देव्हाऱ्यात दिवा लागला नव्हता.
मासिक पाली मुळे रडली असणार, ते तिला त्रास होतो दोन दिवस. पोट आणि पाय खूप दुखतात, डॉक्टर कडे जावं लागतं आणि काल रात्री मी झोपलो होतो त्यामुळे तिने मला उठवलं नसेल, मला वाईट वाटलं.
लगेच तिला डॉक्टर कडे घेऊन जातो असा विचार करून मी पटकन फ्रेश झालो.
मी बाहेर यायला ती भाजी बनवत होती, मी गॅस बंद केला आणि म्हणालो ते सगळं राहूदेत डॉक्टरकडे जाऊन येऊ चल आधी
तिने का? म्हणून प्रश्न केला, मी तिला बोललोही तुला त्रास होत असेल ना?
तिने दोनेक क्षण निर्जीव पणे माझ्याकडे पाहिलं आणि पेनकिलर घेतल्याचं थंडपणे सांगितलं.
अरे ते का घेतलं तू? हेल्थ साठी चांगलं नाही ना ते, डॉक्टर पण म्हणाले होते ना तुला ते नको घेत जाऊ म्हणून ? मी माझी अक्कल पाजळली. आपण गेलो असतो ना डॉक्टर कडे, चल जाऊयात आता.
गेले ४ ५ महिने मी तेच घेतेय, रूपक. ती बोलली आणि माझ्याच जोरात चपराक बसल्यासारखं मला जाणवलं.
तिने शांतपणे गॅस चालू केला आणि भाजी परतळून घेऊ लागली, मी सुन्नपणे निघालो तिथून आणि जिमला आलो.
मला नुसता तिचा चेहरा दिसत होता, आणि आठवत राहिलं आमचं बोलणं जेव्हा आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो. एकदा ती मला भेटायला आली तेव्हा तिचे असेच डोळे सुजले होते, आणि थोडी थकल्यासारखी दिसत होती. मी विचारलं तर थोडाही संकोच न करता तिने पिरियड्स विषयी सांगितलं, सहसा मुली नाही बोलत ह्या विषयी म्हणून मला थोडं आश्चर्य वाटलं, मग बोलता बोलता मी तिला बोललो होतो, आपलं लग्न झाल्यावर प्रत्येक वेळी मी तुझे पाय चेपून देत जाईन, कंबर मसाज करून देईल.
समाधानाने हसून म्हणाली होती कि तुम्ही जवळ असला कि फक्त डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत राहा तितकं पुरेसं असेल मला, त्रास होत असला तरी तुम्ही काळजी करता ह्या जाणिवेने त्रासाची तीव्रता नक्कीच कमी होईल . . .
लग्नानंतर ४ ५ महिने मी पाय वैगेरे मसाज करून द्यायचा प्रयत्न करायचो पण ती कधी करू देत नसायची, मग मी तिला थोपटून झोपवायचो, तिला माझ्याकडून फक्त मी तिची काळजी करावी हीच अपेक्षा असायची. . .
मला आता खूप बेकार फील होत होतं, ती म्हणाली गेले ५ महिने मी पेनकिलर खातेय, म्हणजे . . .आता मला पुढचा विचार करवेना . . .
मी अपराधीपणाच्या भावनेने घरी आलो तर ती कपडे सुकत घालत होती, माझा टिफिन भरून माझ्या जागेवर होता. शर्ट इस्त्री करून ठेवला होता, मी फ्रेश होऊन बाहेर आलो तर माझा नाश्ता गरम गरम वाफा देत माझी वाट पाहत होता. मी तिला शोधलं तर ती तिचा टिफिन भरत होती, घरातलं सगळं काम एकटी करून ती ऑफिसला जाते, आधी मी मदत करायचो पण हल्ली जमत असेल तरी किंवा नसेल तरी नाही करत, ती करेल असं हळूहळू गृहीत धरलं. मी जवळ जाऊन तिला सोबत नाश्ता करूयात असं बोललो तर म्हणाली भूक नाहीये, निघताना करेल आणि बाहेर आली.
माझा नाश्ता व्हायला तिने हॉल, किचन, आणि दोन्ही रूम झाडून कचरा काढून पोछा मारायला घेतला, मी पुन्हा बोलायचं प्रयत्न केला म्हणालो आज सुट्टी घे आराम कर घरी, तर म्हणाली ऑफस मध्ये AC रूम मध्ये बसूनही आरामच करते.
मला आज तो अबोला सहन नाही झाला जो ना जाणे कित्येक दिवस आमच्यात चालत आला होता आणि मी मनावर कधी घेतलंच नव्हतं, स्वतःचाच राग येऊन मी तडक ऑफिसला आलो. . .
तिने लग्नाआधी जेव्हा ऑफिस जॉईन केलं, तेव्हा तिला पर्सनल मोबाईल अलाऊड नव्हता, मग आम्ही दोघांनी एक एक मेल अकाउंट बनवला होता, त्यावरून आम्ही दोघे चॅट करायचो. जे फक्त आमच्या दोघांसाठी होता, मी रोज त्यावरूनच तिच्या सोबत बोलायचो, आमचं भांडण झालं कि मला समोर सॉरी बोलता येत नसायचं अजूनही नीट जमत नाही, मग मी मेल करून सॉरी बोलायचो आणि ती माफ पण करायची लगेच.
ना जाणे किती दिवस मी ते अकाउंट किती महिने उघडलंच नव्हतं पण ती अजूनही तेच अकाउंट वापरते. म्हटलं तिला सॉरी म्हणूयात म्हणून मी तिला मेल करायला माझं ते अकाउंट ओपन केलं तर, त्यात तिचे किती तरी महिन्यापासूनचे मेल तसेच पडले होते, ती नेहमीच मॉर्निंग मेसेज करायची. नवीन नवीन मी न विसरता तिला मेसेज करायचो, पण कामाच्या ओघात कि, ती माझ्यासोबत राहते म्हणून कि काय मी तिला कधी मेल करायचा बंद झालो मलाच आठवत नाही, पण तिचे रोजचे मेसेज इथे पडले होते, ते पाहून मला मेल्याहून मेल्या सारखं झालं.
मला तिचे शब्द आठवू लागले, ती नेहमी म्हणायची, रूपक ज्या गोष्टींच्यामागे आपण तहानभूक विसरून लागतो आणि ती गोष्ट मिळाली आणि त्यानंतर त्या गोष्टीचं महत्व जर आपण कमी केलं किंवा कमी झालं तर त्या गोष्टीला हि त्रास होतो, मग ती सजीव किंवा निर्जीव वस्तू का असेना.
आपलं लग्न झाल्यावर माझी आता घेतो तितकीच काळजी घे, नाहीतर मी मनातून तुटलेली सापडेना तुला.
मी आता घाबरलो होतो कारण गेले ५ ६ महिन्यांचा प्रवास मला आठवू लागला, हळूहळू मी मोबाईल मध्ये घुसलो, नेहमी ऑफिस वरून आलो कि तिच्यासोबत बोलायचो ते आता मोबाईल मध्ये असतो. कधी कधी तिची कामात मदत करायचो, आणि हल्ली मी चहाचा कप केव्हा उचलला होता तेही आठवत नाही. फिरायला हि गेलो नव्हतो तसं तिला नाही आवडत फिरायला, तिच्यासाठी गाणी, क्लासिकल म्युसिक पुरेशी.
तिची तब्येत, तिची काळजी घ्यायची देखील मी बंद केलं आहे का?? चाचारतच मी स्वतःला प्रश्न केला. ह्या ५ ६ महिन्यात ती आजारी होती कि नाही मला माहित नाही.
नेहमी ती माझ्या आवडीची सारी लावली कि मी तिची मनापासून तारीफ करायचो, ह्या दिवसांत तिने माझ्या आवडीची सारी लावलीच नसेल का?? कारण मी तिची तारीफ केलेलं मला आठवत नाही. .
तिच्या शेवटच्या म्हणजे कालच्याच मेल मध्ये तिने गुलझार ह्यांचे शब्द आपल्या शब्दात लिहले होते,
"त्या तक्रारी खोलवर रुतून जखमा करत राहतात मनाला,
ज्या व्यक्त होत नाहीत किंवा व्यक्त करता येत नाहीत . . ."
तिच्या अश्या कोरड्या वागण्याचा आता मला अर्थ लागला, आणि एक भीतीची लहर नकळत माझ्या मनातून डोक्यात गेली.
कारण ती आधी नेहमी मला म्हणायची कि
माझी इतकी काळजी नका करत जाऊ रूपक, मला सवय नाही, माझा वीकपॉइंट आहे हा, जर मला सवय पडली ना इतक्या काळजीची आणि अचानक ती सोडावी लागली किंवा कमी जरी झाली ना, तर मला खूप त्रास होईल, म्हणून अश्या सवयी नकोत मला.
मीच म्हणालो होतो तिला माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझी ह्यापेक्षाही जास्त काळजी घेईन नेहमी, फक्त तू माझ्या जवळ राहा माझ्या सोबत राहा . . .
ती तेव्हाही हुरळून न जाता स्पष्टपणे म्हणाली होती,
मला तितकंच प्रेम आणि काळजी द्या जे तुम्ही आयुष्यभर देऊ शकाल कारण मला सवय लागून जर ती गोष्ट कमी मिळाली कि मला सहन होत नाही. . .
मी स्वतःला शांत केलं, स्वतःला समजावलं अजून हि वेळ गेली नाहीये, मी सॉरी बोललो तर ती नीट वागेल, सगळं पाहिल्यासारखं करेन मी, असं ठरवून मी ऑफिस मधून तसाच निघालो.
तिला सॅंडल, शूज कलेक्ट करायचा छंद आहे, म्हणजे ती प्रत्येक महिन्याला एक विकत घेतेच, कपडे नवीन नसतील तरी चालतील तिला पण सॅंडल शूज लागतातच.
हल्ली २ कपाटं फक्त सॅंडलनेच भरले आहेत. नवीन आणली कि अगदी लहान मुलासारखी नाचतच मला दाखवायची पण ह्या महिन्यात मला नाही आठवत तिने नवीन आणली असेल कि नाही ते.
म्हणून मी एका शॉप मधून २ जोडी सॅंडल घेतले आणि घरी आलो.
मी तिच्या २ तास उशिरा घरी येतो आणि १ तास लवकर निघतो, तिला यायला ३ तास होते. मी तिची मदत म्हणून घरातलं सगळं आवरलं, फ्रेश झालो तिच्या माझ्या साठी सँडविच बनवायचं सामान रेडी करून ठेवलं आली कि गरम खाऊ असा विचार करून मी तिची वाट पाहत बसलो आणि विचार करत बसलो कि आता नाही चुकायचं, सगळं नीट करून घ्यायचं, तिला सॉरी बोलायचं वैगेरे, . . .
ती आली, मी हसून दार उघडलं, आश्चर्य तर सोडा ती जणू मला ओळखतचं नाही अशी अनोळखी हसली आणि काळजात चर्र्रर्र्र झालं माझ्या.
सगळं अवसान गळून पडलं, मीच चुकलोय मग मीच चूक सुधारेल म्हणून पुन्हा हिम्मतीने कामाला लागलो, ती फ्रेश होऊन आली, मला कॉफी दिली आणि रूम मध्ये गेली.
मी तिच्या मागे रूम मध्ये गेलो, मला पाहून ती काहीतरी शोधण्याचा नाटक करून पुन्हा बाहेर आली मी कॉफी घ्यायच्या निमित्ताने बाहेर आलो ती पुन्हा आत गेली, मी पुन्हा आत गेलो, ती बाहेर येणार तोच मी दारावर जाऊन उभा राहिलो.
ती माझ्याकडे पाहत होती पण काही बोलली नाही.
मी म्हटलं बस तिथे बोलायचं आहे मला, गप्प बसली, मी हि तिच्या जवळ खूप जवळ जाऊन बसलो, तिचा हात हातात घेऊन ती सँडल्स तिला दिले, तिने पाहिलेही नाहीत. मला अपेक्षित होतं, मी तिला बोलतं करण्यासाठी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो हि कुर्ती तुला खूप छान दिसते, नकळत तिची नजर तिच्या रोज संध्याकाळी आल्यावर लावायच्या साड्यांवर टिकली, मी हि तिकडे पाहिलं, नकळत माझ्याही डोळ्यात पाणी आलं कारण त्या सगळ्या साड्या माझ्या आवडीच्या होत्या, ज्या ती आधी कधीतरी नेसायची आणि खूप सुंदर दिसायची आणि मी खूप तारिफ करायचो तिची. रोज ह्या साड्या नेस असा हट्ट करायचो.
काही दिवस ती रोजच त्या साड्या लावत होती, का ते सांगायला नको, मी किती दिवस तिच्याकडे नीटसं लक्ष दिलंच नव्हतं.
मी तिचा हात हट्ट पकडून तिचा चेहरा माझ्या कडे वळवला आणि तिला सॉरी बोललो, ती उठून जात होती पण मी नाही जाऊ दिलं.
मला खूप जास्त गिल्टी फील झालं. मी तिला म्हणालो, चुकी झाली थोडे दिवस खूप दुर्लक्ष केलं ना मी तुझ्याकडे? पण आता नाही हा, मी तू सांगशील तसंच करेन, तुला आवडेल तेच वागेन, तुला काही हवंय का आता? सांग फक्त मी लगेच आणतो, ह्या वाक्यात मी जरा जास्तच अक्कल पाजळली.
तू फक्त बोल माझ्यासोबत, बोल ना तुला काय हवय??? असा अबोला नको ना.
एकांत . . . ती एकच शब्द ती मोठा श्वास सोडत म्हणाली.
मला अजून रडू कोसळलं, मला वाटलं होत वेळ गेली नाहीये पण वेळ कधीच निघून गेली होती.
तिने माझ्याकडे पाहिलं हि नाही आणि सरळ उठून गेली. . .
मी तिथेच विचार करत बसलो, ती बोलली होती जेव्हा आपल्या नात्यात तुम्हाला किंवा मला एकांत मागायची वेळ येईल तेव्हा समजून जा, गणित खूप वरती चुकलं आहे, आपण ती चूक कुरवाळत, अजून चुका करत खाली आलोय.
तिच्यासाठी एकांत म्हणजे तिला एकटीला सोडायचं, काही बोलायचं नाही, विचारायचं नाही, सॉरी तर चुकून पण बोलायचं नाही. तिला राग ओकायला आवडत नाही, जे काही असेल ते मनात साठवत राहते, स्वतःला त्याचा त्रास होतो हे माहित असूनही लहानपणा पासून ती तशीच आहे, पण कधी कोणाला त्रास देत नाही.
आता तिच्यासोबत बोलण्यात काही उपयोग नव्हता, मी तसाच बसून राहिलो, मला सगळं काल झाल्यासारखं आठवायला लागलं, ती मला क्लास मध्ये भेटली होती. माझी बहीण आणि ती एकाच क्लास मध्ये होत्या, मी बहिणीला आणायला जायचो, त्या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या. माझी पण ओळख झाली, हळू हळू आवडायला लागली, बोलायला लागलो. मी तिची खूप काळजी करायचो, ती नेहमी इतकी काळजी नका करत जाऊ मला सवय नाही म्हणायची पण मला ती खूप आवडायची. एक दिवस मी प्रपोज केलं, शांतपणे तिने नाही म्हटलं आई बाबांना आवडणार नाही असं म्हणाली.
तरीही मी मित्र म्हणून भेटत राहिलो, काही महिन्यांनी पुन्हा एकदा विचारलं ती हो बोलली. मी डिग्री पास झालो मला जॉब लागला, बहीण पण ग्रॅजुएट झाली. बहिणीच्या लग्नाचं पाहत होते, माझं पण करू असं म्हणाले आई बाबा, मी तिला घरी सांगायला सांगितलं, तिच्या घरून विरोध होत.
आमच्यापेक्षा खूप श्रीमंत होते तिच्या घरचे, कसलीच कमी नाही पैसेच पैसे, आई शाळेत मुख्याध्यापक वडील व्यावसायिक, एकुलती एक मुलगी, अर्थात मला हे लग्नाची मागणी घालायला गेलो तेव्हा कळलं.
अर्थात नकार दिला त्यांनी, मी तिला विचारलं काय करायचं, ती म्हणाली तुम्ही म्हणाल तसं.
बहिणीचं लग्न झालं माझ्या आणि आम्ही कोर्टात लग्न केलं, लग्नाआधी हि तिने माझ्याकडून एकचं मागितलं होतं, कि काही नाही दिलं तरी चालेल, जशी ठेवाल तशी राहील तुमच्यासोबत, जे मिळेल त्यात सुखी राहीन तुमच्यासोबत फक्त तुमच्यावर प्रेम करायचं कारण हिरावू नका.
सगळं सोडून, आई वडिलांच्या मनाविरुद्ध माझ्यासोबत लग्न करायचं कारण काय तर फक्त मी तिची तिच्या आई वडिलांपेक्षा जास्त काळजी करायचो, मी तिला ते देत होतो जे तिला अगदी लहानपणापासून आई वडिलांकडून पाहिजे होतं पण ते सोडून तिला सगळं मिळालं आणि जे मिळालं ते तिला कधीच नको होतं. तिने मला सगळं सांगितलं कशी पैसे कमावण्यात वडिलांच्या प्रेमापासून ती परकी राहली, त्यांचं प्रेम होतंच पण त्यांनी वेळ नाही दिला, आईहि शाळेत तिलाहि वेळ नाही देता आला, पहिल्यापासून आई बाबा मला जवळ घेऊन प्रेम करतील माझी काळजी करतील एवढंच ती अपेक्षा करायची, मोठी झाली पण ते स्वप्न पूर्ण नाही होऊ शकलं.
म्हणून तर ती माझ्यात गुंतली होती, मी तिची खूप काळजी करायचो, माझी सवय झाली होती तिला, मी काळजी करतो ह्या एका गुणामुळे ती माझ्यावर जीवापाड प्रेम करत होती आणि खरंच मी खूप प्रेम करतो तिच्यावर.
आणि ती बोलली तस वागलीही कधी कसला हट्ट नाही केला, ना कधी काही मागितलं, मी तिची नेहमीसारखी काळजी घ्यावी तिला जपावी त्याशिवाय तिला काही नको होत सुखी राहायला.
मी हि बोललो होतो नेहमीच तुझी काळजी घेईन, कधी एकटं वाटू देणार नाही, आणि आयुष्यभर फुलाप्रमाणे जपेल. . .
ती हसून म्हणाली होती, इतकं नको पण माझ्याकडे कधी दुर्लक्ष्य करू नका, आणि माझा निर्णय चुकीचा होता असं एकदाही मला जाणवू देऊ नका. . .
लग्नाचे २ वर्ष खूप छान गेले, काही तक्रार असेल तर ती बोलून दाखवायची, चुकी असेल तर मनापासून सॉरी बोलायची, मी रागावलो तर मानवायची.
ती माझ्यासाठी सगळं करायची अगदी सगळं. माझी तब्येत, ऑफिस, खाणं पिणं, नेहमीच सगळं आपुलकीने काळजीने प्रेमाने करायची आणि अजून हि करतेय. मीच कुठेतरी हरवलो, मित्रांमध्ये मोबाईल मध्ये गुंतलो, नकळत तिची काळजी करायचा विसरून गेलो. मला खूप वाईट वाटलं, कारण तिने कधीच माझ्याकडून काही हट्ट केलं नाही, काही मागितलं नाही, तिला फक्त पाहिजे होता एक मित्र जो तिची नेहमीची काळजी करेल माझ्याकडे दुर्लक्ष्य करणार नाही, तिला किती त्रास झाला असेल माझ्या अश्या वागण्याचा ह्या विचाराने मी पुन्हा गुढग्यात डोकं खुपसून रडू लागलो. . .
गणित मीच चुकवलं, मीच आमच्या नात्याला प्रेमाचं काळजीचं खत पाणी देऊ शकलो नाही, ते आता कोमेजले आहे पण मी ते मरू देणार नाही, पुन्हा टवटवीत करेल आमचं नातं, ह्या निश्चयाने मी उठलो.
बाहेर आलो आणि शेवय्यांच्या खिरीचा छान वास हॉल मध्ये येत होता. तिने जेवण वाढलं, मी तिला shinchan लावून दिला. ती फक्त जेवताना tv पाहायची पण हळूहळू मी तोही वेळ माझ्याच बातम्या लावून बसायचो. ती गप्प जेवत होती, मी एक मोठा श्वास घेतला आणि तिला घास भरवायला हात पुढे केला. तिने एकदा माझ्याकडे पाहिलं, डोळे काठोकाठ भरले, दोन थेम्ब ताटात ओघळले आणि ती पळत रूम मध्ये गेली मी हि गेलो. वाटलं नव्हतं ती मला रूम मध्ये घेईल पण मलाच बिलगून खूप रडली ती, खूप जास्त, मला खूप खूप वाईट वाटलं, मी हि खूप रडलो.
माझ्याकडे वेळ नसता आणि माझ्याकडून असं झालं असतं तर तिने मनावर घेतलं नसतं, समजूतदार आहे ती, पण वेळ असतानादेखील माझ्याकडून असं झालं हेच तिच्या मनावर नेहमी जखम करत राहील, आणि प्रत्येक वेळी केलीली अपेक्षा मोडल्यामुळे जखम दिवसेंदिवस वाढत गेली. मी असं करायला नको होतं, माझ्या वागण्याचा प्रचंड मनस्ताप झाला मला, तिची माफी मागायला हि माझ्याकडे तोंड नव्हतं.
जी मुलगी स्वतःच्या आई वडिलांना सोडून माझ्यासोबत आयुष्य काढायला आलीये केवळ एक अपेक्षा घेऊन कि हा माणूस मला जपेल माझी काळजी घेईल, माझ्याकडे लक्ष्य देईल, एवढी एक अपेक्षा हि मी पूर्ण करू शकलो नाही, ह्या विचाराने मला खूप रडायला आलं.
मी तिला प्रेमाने थोपवून झोपवलं.
ती उद्या उठणार होती ती नवीन सकाळ आणि तोच मी नव्याने अनुभवायला, मी माझ्याकडून झालेल्या चुका पुन्हा करणार नव्हतो केव्हाच, उद्याची सकाळ आमच्या नात्याला नवीन वळण देईल, तिला हवा असणारा मी नव्याने भेटेन, आणि नकळत मी तिच्या मनावर केलेल्या जखमा हळुवार भरायला लागतील तितके प्रयत्न मनापासून करेन, तिला कधी पुन्हा त्रास होईल असं वागणार नाही. . .
तसंही काय हवं असत नातं टिकवायला? प्रेम काळजी आणि विश्वास. पैसे काय येतात जातात पण माणसं गमावली कि परत मिळत नाहीत. मला तिला नाही गमवायचं.
मी पुन्हा तीचं मन जिंकेन, पुन्हा तिला माझ्या प्रेमात पाडेन. पुन्हा माझी खेळकर स्वरा परत जागवेन तिच्यात. . .
नवरा बायकोच नातं एक वेगळंच नातं आहे, ज्याची व्याख्या करणं खूप कठीण आहे. ते नातं टिकवणं एक कला आहे, खूप जणांना हे खूप कठीण वाटतं. लग्नानंतर बायकोला कटकट, भंकस, हिटलर, खडूस, वैगेरे वैगेरे नावे दिली जातात, काहींना तर बायको म्हणजे आपल्या मानगुटीवर बसून आपलं आयुष्य हराम करायला आलेली व्यक्तीच वाटते.
पण सगळ्याच स्त्रियांच्या बाबतीत तसं नाहीये, आपल्याप्रमाणे तीही एक माणूस आहे. हो, अपेक्षा स्वप्न आणि इच्छा घेऊन आपला हात पकडून तीच सगळं मागे सोडून आलेली एक व्यक्ती, आपल्यावर विश्वास ठेवून.
कोणत्याही बायकोला एक प्रेम करणारा आणि काळजी घेणारा नवरा हवा असतो नेहमीच, पैसे त्यानंतर, पण सर्वप्रथम कन्सर्न.
तिच्याकडे नेहमी लक्ष्य देणारा, तीच मन जपणारा, मन जाणणारा, समजून घेणारा माणूस हवा असतो आणि जर तसं होत नसेल किंवा तिच्या अपेक्षांचा भंग होत असेल तर मग ती अशी वागते रागीट, फुगलेली, वैतागलेली, हिटलर किंवा खडूस सारखी.
नवरा बायको ह्या नात्याला माझ्यालेखी काळजी प्रेम आणि विश्वास हे खत वेळोवेळी देत राहिलो कि ते नातं फुलतं, दरवळत राहतं. मग ते दोन्ही मन नेहमी आनंदी आणि सुखी राहतात . . .
(खूप आधी सहजचं लिहला होता हा लेख, आज जुन्या कॉम्पुटर मध्ये सापडला.
बघुयात आपल्या जमतंय का लिहायला ह्या विचाराने शेजारीच एकाच्या आयुष्यात घडलेला प्रसंग आपल्या शब्दांत मांडला होता. तेव्हा फक्त वाचक होते त्यामुळे वाक्य रचना आणि शब्द तितकेसे परफेक्ट नाही वाटणार)
खुप छान
खुप छान
धन्यवाद कामिनी मॅम. . .
धन्यवाद कामिनी मॅम. . .
खुपच सुंदर.
खुपच सुंदर.
खुप छान लिहिल असलं तरी
खुप छान लिहिल असलं तरी काहीतरी मिसिंग वाटतंय.. पुलेशु!
काळजाला भिडलं...
काळजाला भिडलं...
बस्स इतकंच मनापासून म्हणेन
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.