त्याचीच ती :४

Submitted by रिना वाढई on 17 December, 2019 - 07:08

आयशा खूप दिवसांनी बसचा प्रवास करत होती . आता ती बऱ्यापैकी सेटल झाली होती .
पावसाळ्याचे दिवस , खिडकीजवळची सीट आणि कानात हेडफोन टाकून आयशा आपल्या आवडीचे गाणे ऐकण्यात दंग होती . तेवढ्यात तिची नजर समोरच्या सीटवर बसलेल्या एका कपलवर पडते .
'कॉलेज कपल असावेत बहुतेक ,किती छान एकमेकांच्या हातात हात घालून बसले आहेत दोघे '.
अख्या जगाचा विसर पडून दोघेही जणू भावी आयुष्याचे स्वप्न रंगवीत असतील . त्या कपलला बघून आयशाच्या मनात विचार येऊन गेले .
आयशाची नजर त्या दोघांवरून हटली ते कानातले हेडफोन वाजायचे बंद झाल्यामुळेच .
काय झाले आता , हे गाणे का बंद झाले म्हणून ती मोबाइल पाहते तर काय , नेटवर्क गेलेला असतो . ती आपले हेडफोन काढून बॅग मध्ये ठेवते .
आता ती आपले लक्ष खिडकीवर केंद्रित करते . बाहेर पावसाची रिपरिप चालू असते . गार वारा आणि ओल्या मातीचा सुगंध ... आयशाला अर्जुनची आठवण होते .
अर्जुनचे विचार येताच नकळत दोन थेंब तिच्या गालावरती येतात.
------------------------------------------------------------------------------------------
अगं ए रडाबाई , हे कसले अश्रू म्हणायचे ...
अर्जुन , मला वाटलं नव्हतं रे , तू माझ्या प्रेमाला एवढ्या सहजासहजी स्वीकारशील म्हणून . पण बघ ना , आज तू माझ्या सोबत आहेस .
म्हणूनच हे अश्रू ... आपल्याला जेव्हा ओंजळभरून ख़ुशी मिळते ना , तर ती ओंजळही कमी पडते त्या आनंदाला साठवून ठेवायला ... आणि मग थोडासा आनंद अशा अश्रूंवाटे बाहेर पडतो .
अर्जुन , तुला माहित नसेल , पण... तुझं प्रेम म्हणजे जगातली सर्वात सुखद भेट आहे माझ्यासाठी .
पण एक सांग आयुष्यभर एवढाच प्रेम करू शकशील का रे माझ्यावर ?
आयशा आपल्या मनातल्या अबोल भावना आपल्या अर्जुनसमोर मांडत असते .
अर्जुन , बोल ना काय झालं ...
तुला माहित आहे आयशा तुझे बोल , तुझे शब्द मला कितीहि आवडत असले तरी , तरी मला तूझ्यासारखं व्यक्त नाही होता येत ग .
तुझ्यापासून माझे मन लपलेले नाही आयशा . मग माझ्या तोंडातून ते शब्द निघायलाच हवेत काय ?
फक्त प्रेमाच्या काही आणाभाका घेतल्या म्हणजेच प्रेम असते काय ग ?
हंहम्म पण तू म्हणत असशील तर तुला शब्द देतो मी , कि आजन्म मी तुझ्यावर असाच प्रेम करत राहणार . कधी तुला माझ्यापासून वेगळं समजणार नाही .
ती तिच्या अर्जुनच्या डोळ्यात आपले प्रेम व्यक्त होताना फक्त बघत असते ...
------------------------------------------------------------------------------------------------------
खिडकीतून एक वाऱ्याची झुळूक येते ,आणि आयशाच्या अंगावर शहारे येतात . ती अर्जुनच्या आठवणींमधून बाहेर येते . समोर फक्त तीन-चार स्टॉप मग आपला गाव .. आयशा मनातच खुश होते .
तरी गाव यायला अजून दोन घंटे असतातच .
ती आपला फोन घेऊन उगीच विचकत असते , कॉन्टॅक्ट लिस्ट मध्ये अर्जुनचा नंबर दिसतो , लगेच ती काहीतरी विचार करून मोबाइल बंद करते .
पण अजून काहीशा विचारांनी ती त्याचा नंबर बघते , त्याच्या नावावरून हलकेच आपले हात फिरवते .
त्याचा सेव्ह केलेला नंबर सुद्धा तो आताही आपल्या जवळच कुठेतरी आहे याचा भास करत असतो . त्याचा नंबर बघता बघता नकळत तिच्या बोटांनी हिरवी बटन दाबली जाते .
जस तिच्या लक्षात येते ती पटकन कॉल डिसकनेक्ट करते .
नेटवर्क आलेला असतो , ती पुन्हा आपले हेडफोन कानात टाकते आणि गाणे ऐकत डोळे मिटते .
तोच मोबाईलची रिंग वाजते , ती हेडफोन काढून मोबाइल बघते तर काय ... तो अर्जुनाचा कॉल असतो .
ती थोड्यावेळ विचारातच पडते कि त्याला माझ्या फोनची रिंग गेली होती ? पण मी तर लवकरच कट केला होता कॉल .
पण गेली असेल रिंग म्हणूनच अर्जुनने फोन केला ना ... आता काय करायचं , फोन उचलायचं कि नाही . नाही उचलला तर काय वाटेल त्याला , एकतर चुकून माझ्याकडूनच फोन लागला .
ती विचार करतच फोन उचलते .
हॅलो , समोरून अर्जुनाचा आवाज ऐकून तिच्या तोंडातून शब्दच निघत नाही काही वेळ .
स्वतःला सावरत ती बोलू लागते ,
अर्जुन , चुकीने कॉल लागला होता तुला . कळलंच नाही केव्हा फोन लागला तुला .
चुकीने का होईना पण फोन आलेला पाहून आनंद झाला मला .
अर्जुनाचा आवाज कातर झालेला असतो .
पण स्वतःला सावरत तो तिला विचारतो , कुठे आहेस , असा गोधळ ऐकू येत आहे मला म्हणून म्हटलं .
आयशा ,बसमधे आहे रे , म्हणून असा आवाज येत असेल तुला . गावाकडे येत आहे मी .

गावाकडे , हा शब्द ऐकून अर्जुन उतावळा होऊन अजून तिला विचारतो ,
आता कुठे आहेस मग ?

चंद्रपूर बसस्टॊप येईल थोड्या वेळात .
तू उतर चंद्रपूरच्या बसस्टॅन्डवर . मी येतो तिथे .
काही कामानिमित्याने मी इकडे आलो होतो .
अर्जुनच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकतो .
आयशा , अ रे , पण मी डायरेक्ट गावची तिकीट काढली आहे .
तिथे कशाला उतरू ?

मला भेटायचं आहे आयशा , आता नाही नको म्हणूस .
अर्जुन तिला उतरण्यासाठी सांगत असतो .
आयशाला पण कुठेतरी एक ख़ुशी होते कि , अर्जुन , एवढ्या दिवसांनी नाही एवढ्या वर्षांनी मला भेटणार . त्याला बघणार या विचारानेच ती सुखावते पण तरीही त्याला भेटणे आता तिला नकोसे वाटते .
का कुणास ठाऊक , पण एकदा भेटावंच आपल्या अर्जुनला अशी तीव्र इच्छा आतून होते आणि ती त्याला हो म्हणून फोन ठेवते .
थोड्या वेळातच चंद्रपूर येणार असते , पण तिच्या मनात विचारांचे वादळ उठू लागतात .
त्याला समोर कशी जाणार मी , काय उत्तर देणार त्याच्या प्रश्नार्थक नजरेला . माझ्या डोळ्यांत बघून तो सहज समजू शकेल का मला ?त्याच्या डोळ्यातून अश्रू येतील तर ... तर काय करणार मी ?
कस सावरणार त्याला ... त्याला कि मलाच ? तो समोर आल्यावर माझीही काही वेगळी अवस्था नसेलच ना ... त्याला सावरण्याचा विचार करती आहे मी , पण स्वतःला तरी सावरू शकेल का मी ?
जोरदार बसचा ब्रेक लागतो तशी ती भानावर येते . चंद्रपूर आलेलाच असतो .
ती आपली वर ठेवलेली बॅग घेऊन खाली उतरते .
ती एका बाकावर जाऊन अर्जुनची वाट बघत बसते . पण तो आलेला नाही हे पाहून ती समोर एका झाडाखाली जाऊन उभी राहते .
बसस्टॉपच्या त्या गोंगाटापासून ती लांब येणेच पसंत करते . आता थोडी शांतता वाटते तिला . तोच मागून आवाज येतो , आयशा ...
ती वळून पाहते तर तो अर्जुन असतो .
तिचा अर्जुन ... नाही आता तो तिचा अर्जुन कसा असणार ...
पण काही वेळ ते दोघेही निःशब्द असतात . एकमेकांना बघत उभे असतात फक्त . तो तिच्या बांधलेल्या केसांपासून तर पायात घातलेल्या जोडव्यापर्यंत बघत असतो . आणि त्याच्याही नकळत त्याची नजर तिच्या जोळव्यांवर खिळलेली असते ...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users