खडतर आयुष्य ! तीच-अंतिम भाग

Submitted by रिना वाढई on 16 December, 2019 - 00:44

ती झोपेचा प्रयत्न करू लागली पण काही केल्या झोप येईना .काही दिवसांआधी घडलेली घटना तिला आठवली , आणि मन अस्वस्थ झालं .
संदीप, तिच्या काकांचा मुलगा , लग्नाला एक वर्ष झाला होता त्याच्या आणि लवकरच त्याच्या ओंजळीत एक फुल पडणार होत ... पण काळाने आघात केला कि त्याने स्वतः चुकी केली होती ती ,समजण्यापलीकडे होत .
वाहिनीला नऊ महिने झाले तरी त्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेले नव्हते . एके दिवशी तिला सकाळपासून पोटात दुखत होत , त्याने तिला गावच्याच सरकारी दवाखान्यात नेलं. तिथल्या डॉक्टरनी तपासून तिला शहरी दवाखान्यात न्यायचा सल्ला दिला . तिथून तिला शहरात नेतपर्यंत भरपूर वेळ झाला . तिथे पोहचल्या बरोबर डॉक्टरांनी तिला तपासलं आणि एक सोनोग्राफी केली . त्यामध्ये असं दिसलं कि बाळाने पोटातच छी केली आहे . म्हणून तिची डिलिव्हरी लवकरात लवकर करावी लागणार आहे . पण संदीपने त्यावर अजून उत्तर देत म्हटलं कि , "डॉक्टर , अजून थोडा वेळ वाट बघा तिची नॉर्मल डिलिव्हरीच व्हायला हवी ". त्यावर डॉक्टर ने चिडून म्हटलं कि अजून वाट बघायचीचं आहे तुम्हाला . तिला इथे आणायला आधीच बराच उशीर केला तुम्ही लोकांनी अशे म्हणत डॉक्टर आपल्या कामाला लागले .
वाहिनीची डिलिव्हरी अगदी नॉर्मल झाली मात्र बाळ .... तो तर केव्हाच गुदमरून गेला होता . नऊ महिने पोटात वाढवून जेव्हा तिच्या हाती एक निर्जीव बाळ आलं तेव्हा तिने टाहो फोडला . पण आता काय फायदा होता तिच्या रडण्याचा . डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे , बाळ छी करून खूप वेळ झाला होता , यामध्ये तर आई-बाळ दोघांच्याही जीवाला धोका होता पण नशीब कि आई सुरक्षित होती .
मात्र त्या आईची काय अवस्था झाली असेल कि तिने आपल्या बाळाला आतच गुदमरू दिल होत . केवळ एका चुकीमुळे तीच बाळ या जगात नव्हतं .

ती त्या विचारांत वाहून गेली आणि नकळत तिच्या डोळ्यांमधून धारा वाहू लागले .
काय ग , अशी काय विचार करत आहेस तू . अजून झोपली नाही ?
आईच्या आवाजाने ती स्वतःला सावरली.
आई , माझं बाळ सुखरूप या जगात येईल ना ग , म्हणजे संदीपसोबत जे घडलं ते आठवून खूप भीती वाटते ग मनात .
आई - काहीही विचार नाही करायचं या अवस्थेमध्ये . काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि नसतात हि . पण जे आपण करू शकतो त्या सगळ्या गोष्टी करायच्या आपण . आणि काहीही झालं तरी उद्या आपण हॉस्पिटल मध्ये जाणार आहोत . तू काळजी करू नकोस . नाहीतर बाळावर परिणाम होईल बेटा . तू स्वस्थ म्हणजे बाळ स्वस्थ हे लक्षात ठेव .
सकाळपासून विचार करून ती हि आज जास्तच थकली होती , पण विचारांच्या गर्दीमुळे पापण्या काही केल्या लागत नव्हत्या . तरी आईसमोर तिने नुसतं हम्म म्हणून लाईट बंद केला , आणि बेडवर पडली .

दुसऱ्या दिवशी आईने सकाळीच कामे आटोपून तिला लवकर तयार होण्यास सांगितलं . तिच्या आईकडे बघून तिला वाटलं कि आपल्यासारखीच रात्र आईने काढलेली आहे (रात्रभर दोघीही झोपू शकल्या नाही . )
आई काही सांगत नसली तरी तिला आतून दुःख होत होते. पण ती आई होती , जर तिनेच हिम्मत खचवली तर कस चालणार होत म्हणून आई तिच्यासमोर अगदी प्रसन्न चेहरा दाखवत होती . ती रात्रभर झोपली नसल्याने , तिच्या शरीरात थोडा अशक्तपणा जाणवत होता .
बाबानी न बोलणेच पसंत केले होते आणि या दोघीनासुद्धा जाताना काही वाद घालायचा नसल्याने त्या "आम्ही हॉस्पिटलमध्ये जात आहोत सांगून निघाल्या . "
राजीव आधीच पोहचलेला होता . ती दिसताच त्याला जाणवलं कि तिची रात्रभर झोप झालेली नसेल आणि तिच्या मनात अजूनही चिंता असेलच .
तो तिच्या जवळ आला , तू आता काही चिंता करू नकोस .
मी आहे सगळं व्यवस्थित होईल . फक्त तू स्वस्थ राहा .
तिने मानेनेच होकार दिला . डॉक्टरांनी लगेच तिच्या तपासण्या चालू केल्या .
एक सोनोग्राफी झाली त्यात बाळ अगदी दणकट असून वजन साडे तीन किलो होता . तिची बीपी मात्र अति वाढलेली होती . दिवस भरलेले होते .
तिची अवस्था हि नाजूक आहे हे तिच्या दिसण्यावरून जाणवत होत . डॉक्टरांनी राजीवला आत बोलावलं .
डॉक्टर , राजीव हे बघा , बाळ अगदी नॉर्मल आहे मात्र तिची अवस्था जरा नाजूक दिसत आहे . ब्लडप्रेशर खूप वाढलेला आहे ,
अशामध्ये आपण तिच्या नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करू तर तिला झटके येण्याचे चान्सेस आहेत . बाळाचा वजनही जास्त आहे त्यामुळे हि एक रिस्कच होणार .
आणि तिचा बीपी कमी करण्यासाठी औषधी दिली आहे तरी ते काम नाही करत आहे .तिला काही टेन्शन वैगेरे आहे का , कारण तिच्या चिंतेमुळेच तिची बीपी कंट्रोल मध्ये येत नाही आहे .
बीपी वाढतानाच दिसत आहे त्यामुळे मी असा सल्ला देईल कि , लगेच तिचा आपण सिजर करू .
राजीव , डॉक्टर काहीही करा पण माझी बायको आणि बाळ दोघेही मला सुखरूप पाहिजे आहेत .
तिच्याशिवाय मी नाही जगू शकणार आणि बाळाशिवाय ती नाही . त्यामुळे तुम्हाला जे वाटते ते करा .
राजीव बाहेर येऊन तिला सांगतो कि तुला सिजर साठी तयार राहावं लागेल .
ती 'सिजर' हा शब्द ऐकून रडायलाच सुरुवात करते . कारण तिला नॉर्मल डिलिव्हरी हवी असते त्यासाठी तिने किती प्रयत्न केलेले असतात हे फक्त तिलाच माहित असते . सगळ्यांकडून ऐकत आलेली असते ती कि, घरचे काम करत राहील कि आपोआप डिलिव्हरी नॉर्मल होते .
त्यामुळे तिची तब्येत खराब असली तरी तिने घर कामाला बाई लावलेली नसते . झाडू - पोछा तर ती आवर्जून नऊ महिन्यांपर्यंत करते आणि आता तिला डॉक्टर म्हणतात कि सिजर करावं लागेल . ती राजीव ला समजावत असते कि , डॉक्टरांना सांग ना माझी नॉर्मल डिलिव्हरी करायला . ती छोट्या मुलीसारखी त्याला केविलवाणी तोंडाने समजावत असते पण ,
आत डॉक्टरांनी जे सांगितलं ते राजीवला माहित असते आणि त्यामुळे तो तिला आपल्याकडे दुसरा काही एक मार्ग नाही म्हणून सांगतो .
शेवटी नाईलाजाने ती तयार होते , काही वेळातच बाळाच्या रडण्याचा आवाज येतो . नर्स तिला बाळ दाखवतात आणि दोनच मिनिटात त्याला घेऊनही जातात . बाहेर ते बाळ राजीव ला देतात , राजीवला आनंद होतो आपल्या बाळाला पाहून . त्याला आता तिची चिंता वाटत असते कि ती कशी असेल , काही झालं तर नसेल ना तिला .
आणि तेवढ्यात तिला ऑपरेशन थेटर मधून दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करत असताना ती राजीवकडे बघून हलकीशी हसते . त्याला आता थोडं बरं वाटते कि ती बरी आहे .
काही तासानंतर तिला होश येते . सगळे जण खुशीत असतात पण बाबा .... तिला तिचे बाबा मात्र कुठे दिसत नाही .
आई बाबांना नाही कळवलं का ग .
सांगितलं , आले आहेत तुझे बाबा .
मला दिसत नाही आहे इथे .
ते बाहेर गेले आताच , येतील थोड्या वेळात .
काही वेळानी बाबा आत येतात , तिच्याकडे बघतात पण त्यांच्या डोळ्यात तो आनंद नाही दिसत तिला .
"शेवटी झालं ना तुमच्या मनासारखं , याचसाठी मी हॉस्पिटलमध्ये नाही म्हणत होतो , ऐकता कुठे तुम्ही . सीझर झालं आता सीझर ". जणू हे ते डोळ्यांतून सांगत होते तिला .
तिच्या मनात हे विचार येऊन बाबांशी काहीच बोलली नाही ती .
खरतर आता बाबाच येऊन बोलतील असं वाटलं होत तिला पण त्यांनी तर तिच्या बाळाला सुद्धा पकडलं नव्हतं . होशमध्ये आल्यावर तीच अंग खूप दुखत होत पण बाबा समोर आल्यावर जे दुःख झालं ते कितीतरी पटीने जास्त होत .

त्यावेळी तिला वाटत होत कि बाळ व्हायच्या आधीच जर आपण स्वतःच्या पायावर उभे असतो तर आपल्यावर कोणासमोर हात पसरायची वेळच आली नसती आणि एवढा मनस्ताप हि झाला नसता . शेवटी आपण आपल्या माणसांवर विश्वास ठेवला हेच चुकी झाली . जन्मदात्याने आपले हात झटकले तर नवऱ्यानेही चांगलाच पण पहिला आपला .
विचार करता करताच ती झोपी गेली . रात्रभर बाळाने चांगलाच त्रास दिला त्यामुळे सकाळी डोळे उघडायला जरा उशीर झाला होता .
पण डोळे उघडून पाहते तर काय ....
समोर फक्त बाबा, आणि ते तिच्या बाळाला आपल्या कवेत घेऊन त्याला खेळवत होते . रूममध्ये कोणीच नव्हते. आई , राजीव चहा प्यायला म्हणून बाहेर गेले होते हे बाबांनीच सांगितलं तिला .
किती दिवसानंतर तिला तिचे बाबा आधीसारखे दिसत होते .
बाळाला खेळवत , तिला त्रास होऊ नये म्हणून हळू आवाज करून त्याच्याशी खेळत होते . तिने बाबा म्हटलं , तस त्यांच्या डोळ्यांतून अश्रू धारा लागल्या . तिने बाबाना कधीच रडतांना पाहिलं नव्हतं पण आज चक्क त्यांच्या डोळ्यातून धारा निघत होत्या . तिने काही विचारायच्या आधीच त्यांनी तिला , माझ्यामुळेच हे सगळं झालं बेटा , मी फक्त माझ्या पैशांचा विचार केला होता . पण तुझ्या मनाचा विचार नाही आला मला . काल डॉक्टरांनी सांगितलं कि अजून थोडा उशीर झाला असता तर काय होऊ शकत होत . खरचं मी असा वागलो मलाच कळत नाही आहे , तुला काही झालं असत तर ..... समोरचे शब्द त्यांच्या तोंडातून उमटत नव्हते .
ती बाबाना पाहतच राहिली . तुम्हाला तुमची चूक कळली असेल तरी मला झालेला मनस्ताप कुणाला नाही कळू शकत बाबा . चुकी फक्त परिस्थितीची होती पण बळी मात्र माझे मन गेले .
एकदा तुटलेला धागा आपण बांधला तरी त्यामध्ये गाठी पडतात , आणि पहिलेसारखी मजबुती उरत नाही त्या धाग्यात . नात्यांचं हि तसच आहे बाबा ,तुम्ही कितीही पश्चताप केला तरी माझ्या मनात जे सल आहे ती आयुष्यभर न विसरण्यासारखीच आहे .
तिने बोलून काही दाखवलं नाही पण मनात मात्र ती हे सगळं बोलून गेली ..........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा पण शेवट अगदी चित्रपटाप्रमाणे गोड केलात त्यामुळे कृत्रिम वाटते. शेवट सोडला तर आतापर्यंतची सर्व कथा अगदी वास्तव आणि दमदार होती. छान पकड घेतली होती कथेने.

माफ करा पण शेवट अगदी चित्रपटाप्रमाणे गोड केलात त्यामुळे कृत्रिम वाटते. >>घरात एखाद बाळ आलं कि घरच वातावरण कसं प्रफुल्लित होऊन जात , आपण आजोबा झालो हि ख़ुशी तर काही निराळीच असेल ना , आणि डॉक्टरांनी तिच्या वडिलांना पटवून सांगितलं होत .... कधी कधी आपल्याला आपल्या घरच्यांच्या म्हणण्या पेक्षा बाहेरचे पटवून सांगितले कि पटते लवकर .
Cuty>> तुमच्या प्रतिसादाबल Thank you