मन हिंदोळ्यावर !!!

Submitted by Nandkishor More on 15 December, 2019 - 12:37

श्री प्रभाकर भोगले हे मराठीतील एक प्रसिद्ध लेखक आहेत. काही दिवसांपूर्वी एका WhatsApp group वर मला त्यांनी लिहिलेला एक लेख forwarded message म्हणून मिळाला. त्यांनी त्याचा शेवट मुद्दाम अशा पद्धतीने केला होता की प्रत्येक वाचक पुढचा विचार त्याला हवा तसा करु शकेल ...
या कथाबीजाचा विस्तार करण्याचा मी एक प्रयत्न केला आहे ... लेख थोडासा मोठा झाला आहे... पण तुम्हाला आवडेल अशी आशा ..

मूळ कथाबीज :
रात्रभर पाळी करून सकाळी साडे नऊ वाजता प्रकाश घरी आला. आल्या आल्या त्याने हिरव्या पानाची पुडी बायकोच्या - प्रतिभाच्या हातात दिली.
."हे काय?" तिने विचारलं.
"अगं, गजरा आणलाय तुझ्यासाठी." त्याने सांगितलं.
तिने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि नंतर बाहेर पाहिलं.
"बाहेर काय बघतेस?"
"सूर्य कुठून उगवला ते बघतेय."
"असं काय करतेस, सूर्य पूर्वेलाच उगवलाय."
"तुम्ही माझ्यासाठी गजरा आणलाय. मला वाटलं पश्चिमेला उगवलाय की काय?"
"कधी वाटलं बायक़ोला गजरा आणावासा तर आणू नये काय?" लाडात येत प्रकाश म्हणाला.
"आजपर्यंत कधी आणला नव्हता म्हणून आश्चर्य वाटलं. खरं खरं सांगा आज कसा काय आणावासा वाटला हो गजरा?"
"खरं सांगू का? एक गजरा विकणारी लहान मुलगी "घ्या घ्या "म्हणून मागेच लागली म्हणून मग घेतला."
"तरीच!"

***********************************************************************************

साडे दहाच्या सुमाराला प्रतिभाच्या धाकट्या बहिणीचा - उर्मिलाचा फोन आला. विचारलं,
"ताई कशी दिसतेय मी ?"
"काय वेडबीड लागल़ंय का तुला, उर्मि? फोनवर कसं दिसणार मला तू कशी दिसतेस ते?"
"म्हणजे? तू व्हाटसप पाहिलं नाहीस?"
"नाही."
"अगं, मी फोटो पाठवलाय माझा. काय आहे, आज आमच्या ऑफिसमध्ये पूजा आहे. मी साडी नेसून आलेय."
"असं, होय. बघते मी नंतर."
"बघ बघ. अग त्यात मी गजरे माळलेयत ना ते मला भावोजीनी घेऊन दिले सकाळी. मला ते स्टेशनबाहेर भेटले. मला म्हणाले,"उर्मे, एवढी साडी नेसलीयस तर गजरा नाही का माळायचा? आणखी छान दिसशील."
मग त्यांनी पन्नास रुपयांचे तीन गजरे घेतले.
मी म्हणाले," मला तीन तीन काय करायचेत, मी दोन माळते, एक ताईला घेऊन जा."

(पुढील कथानक कुणी तरी पूर्ण करावे.माझी हिंमत नाही. )

प्रभाकर भोगले

कथाविस्तार (नंदकिशोर मोरे ) :
"हो का ? छान, छान ! मी बघते हं तुझे फोटो. कामं करा जरा ऑफिसमध्ये !!" असं काहीतरी म्हणत प्रतिभाने कॉल डिस्कनेक्ट केला.
प्रकाश गजऱ्याबद्दल खोटं बोलला होता तर !! उर्मिलाला गजरे दिले ही गोष्ट तिच्यापासून लपवलं, हे तिला बिलकुल आवडलं नव्हतं. तिला राग आला. तिने प्रकाशला ताबडतोब याचा जाब विचारायचे ठरवले. केसात माळलेला गजरा खेचून काढून तिने डायनिंग टेबलवर फेकून दिला, तिरीमिरीमध्ये उठली आणि बेडरुममध्ये गेली. प्रकाश गाढ झोपला होता.
रात्रपाळी संपवून घरी आल्यावर लगेच झोपायचं, दुपारी १ - १:३० वाजता उठायचं, जेवल्यानंतर पुन्हा झोपायचं ते संध्याकाळी ५:३० - ६ वाजताच उठायचं, असा त्याचा नेहमीच परिपाठ.
प्रतिभाने राग आवरला. दुपारी जेवताना हा विषय नक्कीच काढायचा असा विचार करुन ती बाहेर किचनमध्ये आली.
११ वाजले होते. तिने FM चालू केला.
"नमस्कार, बहनॊ और भाईयों, मैं अन्नू कपूर आपका स्वागत करता हूँ, हमारे इस कार्यक्रम मे जिसका नाम है, "सुहाना सफर विथ अन्नू कपूर""
अतिशय नैसर्गिक आणि ओघवत्या शैलीमध्ये फिल्म-इंडस्ट्रीमधील किस्से आणि त्या अनुषंगाने गाणी, असं या कार्यक्रमाचं स्वरुप !! हा तिचा आवडता कार्यक्रम होता. ११ ते १ या वेळात FM वरील हा कार्यक्रम ऐकत स्वयंपाक करायचा, नंतर प्रकाशला झोपेतून उठवायचं आणि त्याच्याबरोबर दुपारचे जेवण, असा तिचा शिरस्ता.
FM ऐकता ऐकता, तिने WhatsApp वरचे messages चेक करायला सुरुवात केली. उर्मिलाने पाठवलेले सकाळचे फोटो बघितले. साडीमध्ये छानच दिसत होती. गजरा घातल्यामुळे तिचे सौंदर्य अजून खुलून दिसत होते. पुन्हा एकदा गजऱ्याची आठवण झाल्यामुळे ती वैतागली. उर्मिलाला गजरा का घेऊन दिला आणि ते माझ्यापासून का लपवले हे जाणून घेईपर्यंत ती स्वस्थ बसणार नव्हती.

तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजू लागली. सीमाचा, तिच्याकडे घरकाम करणाऱ्या बाईचा, फोन होता.
“आत्ता या वेळेला कशाला फोन करतेय ही ? आज घरकामाला दांडी मारायचा विचार दिसतोय..." असा विचार करतच तिने call accept चे बटन दाबले .....
"हॅलो.. " सीमा रडत होती...
"हॅलो, काय गं सीमा, काय झालं? का रडतेयस ?"
सीमा जवळच्याच एका अल्प-उत्पन्न-गटासाठीच्या गृह-संकुलामध्ये राहायची. गृह-कर्ज फेडण्यासाठी आणि संसाराला हातभार म्हणून, ७-८ ठिकाणी घरकाम करायची. नवरा प्लम्बिंगची छोटी छोटी कामे करायचा. सीमाने रडतच सांगितले की, तिचा नवरा दुसऱ्या एका बाईला घेऊन आला आहे आणि हिला घरातून बाहेर काढतो आहे. त्या तिघांची बरीचशी बाचाबाची आणि थोडीशी मारामारीसुद्धा झाली आहे. पोलीस आले आहेत. त्यामुळे ती आज घरकामासाठी येऊ शकत नाही.
प्रतिभा थोडीशी त्रासली. गजऱ्याचा विषय अजून डोक्यातून जात नव्हता, त्यात ही एक डोकेदुखी. आता घरातील सर्व कामे तिलाच करावी लागणार होती. परंतु सीमाबद्दल तिला वाईटसुद्धा वाटत होतं. या पुरुषमंडळींना आपल्या बायकोबद्दल काहीच कसं वाटत नाही. असं कसं दुसऱ्या बाईचा विचार करू शकतात ? अशी वेळ कुणावरच येऊ नये. आता सीमा काय करेल ? पोलीस तिला मदत करतील काय ? जर तिला खरंच घराबाहेर काढलं तर ती एकटी कशी आणि कुठे राहील ? किचनमध्ये कांदा बारीक cut करता करता डोक्यात वेगवेगळे विचार मेंदूचा भुगा करत होते.

मध्येच तिचे FM वर चाललेल्या अन्नू कपूरच्या प्रोग्रामकडे लक्ष गेले. अन्नू कपूर अमिताभ, जया, रेखा हा प्रसिद्ध त्रिकोण, ऋषी कपूरच्या लग्नात रेखाची "मांग में सिंदूर भरकर" एन्ट्री, जया बच्चन यांच्या डोळ्यात पाणी... असा किस्सा रंगवून सांगत होते. त्यानंतर त्यांनी गाणे लावले …. "मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा हैं |" आर्त आवाजात आशा भोसले गात होत्या आणि ती आर्तता प्रतिभाला जाऊन भिडली. हा चित्रपट बघताना ती जेवढी अस्वस्थ झाली होती, त्यापेक्षा कितीतरी जास्त अस्वस्थ तिला आज वाटू लागले.
आज स्वयंपाक बनवताना मन थाऱ्यावर नव्हतेच !! स्वयंपाक कसा झाला होता, कुणास ठाऊक !! किचनमधील इतर छोटी मोठी कामे आवरली. हॉलमधील वॉल-क्लॉकचा छोटा काटा १ वर आणि मोठा काटा ३ वर आला होता.

दीड वाजता ती बेडरूममध्ये गेली आणि प्रकाशला उठवायचा प्रयत्न करु लागली. परंतु तो उठायला तयारच नव्हता.
" अगं, मला झोपू दे अजून थोडा वेळ."
"अहो, जेवून मग पुन्हा झोपा ना."
"मला भूक नाहीये, गं. तू जेवून घे. मला झोपू दे, प्लिज. … आणि, हे बघ. माझा मित्र, प्रतीक, येणार आहे भेटायला सहा वाजता. तो आला की मला उठव. तुला आणि मला सह्या करायच्या आहेत काही कागदपत्रांवर."
"प्रतीक वकील आहेत ना ? कसली कागदपत्रे घेऊन येणार आहेत?"
"ते संध्याकाळी समजेलच की !! … आणि, त्यानंतर अजून २-३ गेस्ट्स येतील. चहापाणी, स्नॅक्सची तयारी ठेव."
"कोण गेस्ट्स ?"
"झोपू दे गं आता. संध्याकाळी बोलू." प्रकाशने विषय बंद केलाआणि कूस बदलून डोळे बंद केले.

प्रतिभा चिडली, चरफडत बेडरूमबाहेर आली. किचनमध्ये येऊन ताटामध्ये वाढून घेतलं पण आज जेवायची इच्छाच नव्हती. तिने ताट बाजूला केले आणि तशीच बसून राहिली.

तेवढ्यात डोअरबेल वाजली. दरवाजा उघडला. समोर मधू, सोसायटीतील प्रतिभाची प्रिय मैत्रीण. घरात येत, मधू म्हणाली, "अगं, मी जरा गडबडीत आहे. जास्त वेळ थांबणार नाही. ती माझी मैत्रीण आहे ना, गीता ... ती गं, जी IIT मधून पास-आऊट झालीये .. तिला तिच्या मित्राबरोबर लिव्ह-इनमध्ये राहायचे आहे. तिच्या आई-बाबांचे सुद्धा ती ऐकत नाहीये. त्यांनी मला भेटायला बोलावलं आहे. "
"काय झालं गं ?"
मग काय ... हॉलमधील सोफ्यावर ऐसपैस बसत, मधूने सगळी हकीकत सांगायला सुरवात केली. फक्त अर्धा तास लागला तिला, काय झालं ते थोडक्यात सांगायला.
"जाते गं !!" असं म्हणून मधू निघून गेली, पण प्रतिभाची उदासीनता वाढवूनच...

सीमा आणि गीता यांचा विचार करत, हातातील मोबाईल अस्वस्थपणे खेळवत ती किचनमध्ये आली. सहजच फेसबुक open केले. अर्थात उर्मिला फेसबुक फ्रेंड होतीच. तिने आजचे ऑफिसमधील पूजेचे ढीगभर फोटो टाकले होते, scroll down केले तर तिला आज सकाळचे फोटो दिसले, त्यामध्ये अचानकपणे तिला एक फोटो दिसला ... तो बघताच प्रतिभाचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. उर्मिला आणि प्रकाश या दोघांचा एकत्रित फोटो होता. स्टेशनजवळील एका हॉटेलमध्ये दोघे शेज़ारी शेजारी बसून नाश्ता करत होते. प्रकाशने लपवलेली अजून एक गोष्ट उघडकीला आली होती. प्रतिभाला भोवळ येऊ लागली. जवळच्या खुर्चीची पाठ पकडून ती मटकन खुर्चीवर बसली.

गेले काही दिवस प्रकाशचं वागणं थोडं संशयास्पद वाटत होतं. तो मोबाईलवर बराच वेळ कोणाशी तरी हळू आवाजात, बोलताना दिसायचा. परंतु, प्रतिभा जवळ आली, की कॉल डिस्कनेक्ट करायचा. कोणाचा कॉल होता, असं विचारलं तर काहीतरी उडवा उडवीची उत्तरे द्यायचा. असेल काहीतरी मित्रांबरोबर टाईमपासचं प्लानिंग, असं तिला वाटायचं, म्हणून तिने दुर्लक्ष केलं होतं.

फेसबुकवरचा त्या दोघांचा एकत्रित फोटो बघून, तिला मोठा धक्काच बसला होता. मनामध्ये अनेक भलते सलते विचार येऊ लागले. सकाळपासून घडलेल्या, ऐकलेल्या एक एक गोष्टी तिच्या मनातील शंका कुशंका वाढवू लागल्या. प्रकाश आणि उर्मिलाचे नाते नको त्या वळणावर तर गेले नाही ना ? फेसबुकवरचे फोटो म्हणजे त्याचाच पुरावा आहे का ? त्या दोघांनी लिव्ह इन मध्ये रहायचे ठरवले असेल का ? मला घरातून बाहेर काढतील का ?
एक मन म्हणत होते, हे खोटं आहे तर दुसरे मन म्हणत होते, की हे खरं आहे.
माझी उर्मी मला असा धोका देणार नाही. अल्लड आहे पण समजूतदार आहे. एक फोटो फेसबुकवर टाकला म्हणून काय झालं ? माझी लाडकी जिवाभावाची धाकटी बहीण आहे. लहानपणापासून कितीतरी गोष्टी आम्ही शेअर केल्या आहेत.

अरे, बापरे, म्हणजे आता माझा नवरा शेअर करायचा तर तिचा विचार आहे कि काय ??

आज संध्याकाळी वकिलाला बोलावले आहे, काही कागदपत्रांवर सह्या करण्यासाठी. नक्कीच ती घटस्फोटाची कागदपत्रे असणार. अजून २-३ गेस्ट्स येणार आहेत, म्हणजे त्यांना साक्षीदार म्हणून बोलावले असणार. नक्कीच माझ्या संसाराचा आज शेवटचा दिवस असणार आहे. उद्या आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस , परंतु त्या आधीच हे नाते संपणार ...

नाही, माझी बहीण असा माझा विश्वासघात करणार नाही. पण तिनं खरंच मला दगा दिला तर ?? किती हौसेने मी हे घर सजवले आहे. ते सोडावे लागणार. इथली प्रत्येक वस्तू माझी जिवलग आहे. इजाजत मधल्या अनुराधा पटेल सारखं मला "मेरा कुछ सामान, तुम्हारे पास पडा हैं |" म्हणत बसावे लागेल का ? या सोसायटीमध्ये दोन वर्षांत कितीतरी मैत्रिणी झाल्या आहेत. त्यांना मी कसे सांगणार की माझी बहीणच माझा संसार मोडतेय म्हणून ?? आई बाबांना काय वाटेल ?? नातेवाईक काय म्हणतील ???

वेगवेगळे विचार प्रतिभाच्या मनात फेर धरु लागले. उर्मिला आपल्या घरी येते तेव्हा नेमकी प्रकाशची नाईट शिफ्ट किंवा मॉर्निंग शिफ्ट चालू असते. त्यांची आफ्टरनून शिफ्ट असताना मात्र कधीच येत नाही. आली की मला काहीतरी खायला बनवण्यासाठी किचनमध्ये पाठवून ते दोघे गप्पा मारत बसतात. या सगळ्या गोष्टींचा तिला आता उलगडा होऊ लागला. आपल्या हे आधी का लक्षात नाही आले?
दुपारी न जेवल्यामुळं तिला अस्वस्थ वाटत होतं. डोळ्यातून सतत गंगा यमुना वहात होत्या. ती डोळे पुसायचा प्रयत्न सुद्धा करत नव्हती. डायनिंग टेबलवर डोकं ठेवलं होतं. त्याच परिस्थितीमध्ये तिला ग्लानी आली आणि तिथेच तिला झोप लागली.

अचानकपणे तिला जाग आली. वॉल-क्लॉक साडेपाचची वेळ दाखवत होते. डोकं प्रचंड दुखत होतं. ती उठली. येईल त्या परिस्थितीला सामोरे जायचा निर्धार करुनच ती उठली. मला इथून बाहेर पडावे लागले तरी निदान उर्मिलाला तरी चांगला साथीदार मिळतोय हेच समाधान. आपण काढू कसे तरी पुढचे दिवस, या दोन वर्षांतील आठवणींसोबत !!

बाथरुममध्ये जाऊन तोंडावर थंड पाण्याचे हबशे मारले. तिला थोडं फ्रेश वाटलं. पटापट तयार झाली. तोपर्यंत सहा वाजलेच. चहाचे आधण गॅसवर ठेवले. तेवढ्यात डोअरबेल वाजलीच. ती दरवाजा उघडायला गेली तर पाठोपाठ प्रकाशसुद्धा आला. तिला आश्चर्यच वाटलं. नेहमी याला झोपेतून उठवायला हिलाच प्रयत्न करावे लागायचे. आज स्वतःच वेळेवर उठला आहे. अपेक्षेप्रमाणे प्रतीक दरवाज्यामध्ये उभा होता. त्याला आत घेतले, दरवाजा बंद केला. प्रतिभा किचनमध्ये आली आणि दोघे सोफ्यावर बसले. प्रतिकने त्याच्या बॅगेतून काही कागद बाहेर काढले व प्रकाशकडे दिले. ती तो वाचू लागला. प्रतिभा अस्वस्थपणे दोघांकडे पाहात होती.

थोड्याच वेळात पुन्हा डोअरबेल वाजली. प्रकाशने दरवाजा उघडला. "ये गं, लवकर आलीस.." प्रतिभाने डोकावून पाहिले. प्रसन्न आणि हसतमुखाने उर्मिला आत येत होती. केसात तोच सकाळचा गजरा ... अजूनही फ्रेश दिसत होता तो .. तिने डायनिंग टेबलवर फेकून दिलेल्या तिच्या गजऱ्याकडे पहिले .. कोमेजला होता तो बिचारा..

"ताई ... " असं प्रचंड उत्साहात म्हणत, उर्मिला प्रतिभाला येऊन बिलगली.
"ऑफिसमधून डायरेक्ट इकडेच आलीस, उर्मे ? छान दिसतेयस तू साडीमध्ये !!!"
प्रतिभाने टेबलवर ठेवलेल्या मिठाई बॉक्स मधून एक काजू-कतलीचा तुकडा तिला भरावला. काजू कतली आवडायची तिला.
"WOW !! मस्तच आहे गं !!" असं म्हणत उर्मिला खुर्चीवर बसली. "अजून काय केलंयस गं खायला ?? भूक लागलीय मला… अगं, पण ताई, तुझा असा चेहरा उतरला का आहे ? तुला बरं नाही का ?” उर्मिलाचा धबधबा चालू झाला.
"मी ठीक आहे." खिन्न आवाजात प्रतिभा उत्तरली.
“तू बस इथे, मला सांग काय करायचं आहे ते. मी करते."
"हो, आता तुलाच तर सगळं करायचं आहे ..."
"करते की“ गॅसकडे जात “काय ठेवलंय गॅस शेगडीवर ?... अगं, चहा आटला बघ केवढा .. " असं म्हणत तिने गॅसचा बर्नर कमी केला.
"माझ्या आयुष्यातला रसच आटला आहे आज." अस्पष्ट आवाजात …
"काय म्हणालीस ?"
"काही नाही ... चहा आटला तर आटू दे .. तुमच्या तिघांसाठी पुरेसा आहे तो चहा .. तू कप भर, तोपर्यंत मी प्लेट्समध्ये भडंग, फरसाण आणि काजू कतली देते. प्रकाशला चहाबरोबर फरसाण आवडतो. "
तेवढ्यात प्रकाशने हाक मारली, " प्रतिभा, जरा बाहेर ये आणि जरा या कागदांवर दोन सह्या कर..."
"आले ... उर्मे, तू चहा आणि प्लेट्स घेऊन ये."

प्रतिभा यंत्रवत चालत बाहेर आली. प्रकाशने दाखवलेल्या ठिकाणी सह्या केल्या. तिचे डोळे पाण्याने भरले होते. आता कधीही तिचा बांध फुटणार होता. तेवढ्यात पुन्हा एकदा डोअरबेल वाजली. उर्मिला चहाचे कप आणि प्लेट्स घेऊन हॉलमध्ये आलीच होती. ते सर्व टीपॉयवर ठेवून तिने दरवाजा उघडला. बाहेर दोन मुली उभ्या होत्या.
"या, या !! तुमचीच वाट बघत आहोत आम्ही." उर्मिलाने त्यांना आत घेतले.
त्या दोघी हॉलमध्ये आल्या. त्यांच्या हातात २-३ बॅग्स होत्या. त्यांची आणि उर्मिलाची आधीपासूनच ओळख आहे तर ....
"आई - बाबा ठीक आहेत ना ?" उर्मिला ...
"हो !!!" त्यातल्या एका मुलीने उत्तर दिले.
उर्मिलाने त्यांना सोफ्यावर बसायला सांगितले आणि त्यांच्यासाठी चहा बनवण्यासाठी ती किचनमध्ये गेली. त्यांनी बॅग्स उघडायला सुरवात केली. नक्कीच या मुली उर्मिलाच्या बॅग्स घेऊन आल्या आहेत. आई - बाबांना काय सांगितले कुणास ठाऊक. प्रकाश आणि उर्मीने सगळं आधीपासूनच ठरवून हे सगळं केलंय तर !! म्हणजे संपलं सगळं आता !!
आता मात्र प्रतिभाला स्वतःला कंट्रोल करणे अशक्य झाले आणि एक जोरदार हुंदका तिच्या गळ्यातून बाहेर आला. तिच्या डोळ्यातील पाणी गालांवर ओघळले. सगळेच एकदम चकित झाले. कोणालाच असं काही होईल याची अपेक्षा नव्हती.

"प्रतिभा, अगं काय झालं ?" प्रकाशने तिला पकडलं आणि विचारलं ..
उर्मिला पळतच हॉलमध्ये आली आणि प्रतिभाला मिठीत घेत "ताई, का रडतेस ?". तिच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. ..
प्रतीकला काय करावे ते समजतच नव्हते. आणि त्या दोन मुली तर घाबरुन थरथरत उभ्या राहिल्या.
प्रतिभा प्रकाशला घट्ट पकडून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून, स्फुंदून स्फुंदून रडू लागली. तिच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते. हुंदके देत ती कसंतरी बोलू लागली, "प्रकाश .... प्लिज .... मला .... सोडू ... नका हो ... मला .... तुमच्या .... तुमच्याबरोबरच ... राहायचं ... आहे ... मला .... डायव्होर्स ... नका ..... देऊ ... "
"ए, वेडाबाई !! अगं, मी तुला सोडेन का कधी ? तुला असं का वाटतंय ? "
प्रकाशचा खांदा प्रतिभाच्या अश्रूंनी ओला झाला होता ...
"मग ... तुम्ही ... डायव्होर्स ... डायव्होर्स ... पेपर्स ... वर ... माझ्या ... माझ्या ..... सह्या ... का घेतल्या ?"
" डायव्होर्स पेपर्स, कुठले डायव्होर्स पेपर्स ? मी कधी तुझ्या सह्या घेतल्या ?"
"हे ...... काय ..... डायव्होर्स .... पेपर्स !!!" नुकत्याच सह्या केलेल्या कागदांकडे बोट दाखवत प्रतिभा उद्गारली ... अजूनही प्रकाशला घट्ट पकडून ठेवले होते तिने ... परंतु त्याच वेळी उर्मिलाला बाजूला ढकलायचा प्रयत्न करत होती.
"अगं, हे डायव्होर्स पेपर्स आहेत म्हणून तुला कोणी सांगितलं ? "
" मला माहित आहे ... हे ... डायव्होर्स पेपर्सच ...आहेत ... प्रतीक भाऊजी ... वकील...आहेत ना ... त्यांनी ... बनवलेत ना ... हे पेपर्स?"
"अगं, हे डायव्होर्स पेपर्स नाहीत. वाचून तर बघ, तू कशावर सह्या केल्यास ते !!"
"नाही,... हे ... डायव्होर्स पेपर्सच ... आहेत.." अजून हुंदके चालूच ...
"अगं, हे आपले दोघांचे जॉईंट इन्शुरन्स पेपर्स आहेत. आपली इन्शुरन्स पॉलिसी काढतोय आपण."
"मग,... वकील ... कशाला ?"
"अगं, प्रतीकचा भाऊ प्रवीण आहे ना ... तो इन्शुरन्स एजन्ट आहे. प्रतीकला मी बरेच दिवस भेटलो नव्हतो म्हणून प्रविणऐवजी मी त्याला कागदपत्रं घेऊन बोलावलं."
"हो, वहिनी, हे इन्शुरन्स पॉलिसीचेच पेपर्स आहेत." प्रतीकला कंठ फुटला...
"नाही, तुम्ही .... सगळे .... खोटं .... बोलताय .... तुम्हाला .... तुम्हाला .... या उर्मी .... उर्मीबरोबर ... राहायचं आहे.... "
प्रकाश आणि उर्मिलाचा आ वासला तो बंदच होईना ...
"या .. दोघी ... उर्मी ... उर्मीच्या ... मैत्रिणी .... आहेत ... त्या ... आमच्या ... घरुन ... उर्मीचे .... कपडे .... घेऊन ... घेऊन ... आल्या आहेत ... आई बाबांना ... काय सांगितलं ... कुणास ठाऊक ... या दोघींनी ... आणि ... उर्मी ... इथंच .... राहणार ... आहे ... तुमच्याबरोबर .. मला .. डायव्होर्स ... देऊन... मला .... मला ... माहितेय ... सगळं " अजूनही तिने प्रकाशचा दंड खूप घट्ट पकडला होता.

उर्मिलाच्या तथाकथित मैत्रिणी अजूनही एकमेकींना पकडून थरथरत उभ्या होत्या ...
"अगं ताई, काय बोलतेस तू ? मी आणि भावोजी ? शी ... तुला असं वाटलंच कसं ?" उर्मिला भानावर येऊन बोलली.
तिचा हात झिडकारुन "उर्मे, मी बघतेय गेल्या २-३ आठवड्यांपासून .. तू जरा जास्तच प्रकाशबरोबर वेळ घालवत आहेस. तुम्ही फोनवर सारखे बोलत असता ना ? आज सुद्धा सकाळी तुम्ही दोघांनी एकत्र नाश्ता केला. प्रकाशनी तुला गजरे घेऊन दिले." प्रतिभाने मनातलं सगळं बोलून टाकलं.

प्रकाश आणि उर्मिला दोघेही एकमेकांकडे बघतच राहिले. प्रतीक मटकन खालीच बसला.
"अरे, काय हे, प्रकाश ? हे धंदे चाललेत तुझे ? " प्रतीक.
"तू शांत बस रे जरा ... प्रतिभा, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे. " प्रकाश.
"हो, ताई, तू काहीतरी भयंकर विचार करत आहेस ….. अगं, आम्ही बोलत होतो, भेटत होतो, पण हे सगळं तुझ्यासाठीच ..."
"आता तू काहीतरी सारवासारव करु नको. तुम्हाला एकत्र राहायचे आहे तर रहा.. मी जाते निघून इथून.. तुम्ही रहा दोघे आरामात .. मी आई-बाबांबरोबर राहीन.. त्यांना सांगेन समजावून."

प्रकाशने डोक्याला हात लावला. हिच्या मनात अजून काय काय चाललं आहे माहित नाही.
"प्रतिभा, तू जरा शांत हो. जरा आम्ही काय सांगतोय ऐकून घे." प्रकाशने तिला जवळ घेत, खांद्यावर थोपटत बोलला. "उद्या आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे, तो एकदम हटके व्हावा म्हणून मी आणि उर्मी प्लॅनिंग करतोय. विश्वास ठेव."
"अजूनही खोटं बोलताय."
“अगं, उद्या सकाळी आपण म्हणजे, तू, मी, उर्मी आणि तुझे आई बाबा, आपण सर्व जण स्वामी नारायण मंदिरामध्ये पूजेसाठी जाणार आहोत. मग तुझ्या माहेरी जेवण, दुपारी नाटकाची तिकिटे काढली आहेत. आणि उद्या संध्याकाळी आपल्या दोघांसाठी candle-light dinner साठी टेबलसुद्धा बुक केलं आहे.”
“हो ताई, आम्ही दोघांनी तुझ्यासाठी पूर्ण दिवसभर वेगवेगळे surprises प्लॅन केले होते, पण तू सगळं ओम फस्स करुन टाकलंस.”
"तू आत्ताच ज्या सह्या केल्यास ते कागद चेक कर. ते खरंच इन्शुरन्सचे पेपर्स आहेत."
प्रकाशने कागद प्रतिभाच्या हातात दिले. सह्या करताना जे कागद बघितलेसुद्धा नव्हते ते आता ती पहिल्यांदाच बघत होती.
"आणि ताई, भावोजीना तुझ्यासाठी एक डायमंडचा सेट घ्यायचा होता. म्हणून आम्ही गेले दोन आठवडे वेगवेगळ्या ज्वेलरी-शॉपमध्ये जात होतो. तुझ्यासाठी surprises प्लॅन करण्यासाठी आम्ही सारखं भेटत होतो."
"डायमंडचा सेट ?? काहीही थापा मारतेस काय ?"
"हो, खरंच !!! मी माझ्या office मधल्या मैत्रिणींबरोबर online search सुद्धा करत होते ... त्यांना विचार हवं तर "
"हो, बऱ्याच मेहनतीनंतर आम्ही चार डायमंड-सेट्स shortlist केले. आज सकाळी उर्मी आणि मी त्या शोरुमच्या owner ला त्याच्या घरी जाऊन भेटलो आणि ते चारही सेट्स आपल्या घरी पाठवून देण्याची विनंती केली. जेणेकरुन तुला तुझ्या पसंतीचा डायमंड सेट select करता येईल. म्हणून तर मला सकाळी घरी यायला उशीर झाला. भूक लागली म्हणून आम्ही दोघांनी स्टेशनजवळच्या हॉटेलमध्ये नाश्ता केला. तिथे एक मुलगी दिसली गजरा विकताना. उर्मीला साडीवर चांगला दिसेल म्हणून तिला गजरा घेऊन दिला. पण हे सगळं मुद्दाम तुझ्यापासून लपवून ठेवलं होतं … उद्याची surprises हे surprises च ठेवण्यासाठी."
"हो ताई, या दोन बॅग्समध्ये माझे कपडे नाहीत, तर चार डायमंड सेट्स आहेत. या दोघी त्यांच्या शोरुमकडून आल्या आहेत. आणि हो, हिचे आई-बाबा मला एकदा त्यांच्या ज्वेलरी शॉप मध्ये भेटले होते. मी त्यांच्याबद्दल तिला विचारात होते."

"हो, मॅडम, खरंच आम्ही ज्वेलरीशॉप मधून आलो आहोत. आणि खरंतर आमच्या मालकांनी अजून चार- पाच सेट्स पाठवले आहेत तुमच्या selection साठी .... आम्ही प्लिज दाखवू का सगळे सेट्स ?? "

प्रतिभा हसली. आज दिवसभरात पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर हसू दिसले. उर्मिलाने तिचे डोळे पुसले आणि तिच्याशेजारी बसली. मग ते सर्वजण हसतखेळत डायमंड सेटच्या सिलेक्शनमध्ये गुंग झाले. परंतु अजूनही तिने प्रकाशचा दंड घट्ट पकडून ठेवला होता … कधीही न सोडण्यासाठी !!!

- नंदकिशोर मोरे

Group content visibility: 
Use group defaults

संशय जास्तच ताणला आहे असं वाटलं. मूळ कथाबीजात नवराबायकोत जो खेळीमेळीचा संवाद आहे त्या पार्श्वभूमीवर बायको एवढा टोकाला जाऊन संशय घेईल हे तेवढं पटत नाही. शिवाय अमिताभ-जया-रेखा, मेरा कुछ सामान, लिव्ह इन वगैरे लागोपाठ जरा जास्त झालं.

कैच्याकै! प्रतिभाएवढं स्वप्नरंजन करुन त्याचा स्वतःच बादरायण संबंध जोडुन सगळ्यांसमोर विषय वाढवणार नाही कुणी बायको.
नवर्‍यला निवांत झोपुन पण देणार नाही.
डायमंड नेकलेस! आता हे कांड केल्यावर दगडी धोंडे मिळणार वाटतं प्रतिभाला Lol