जाणीव . . .

Submitted by सोहनी सोहनी on 11 December, 2019 - 06:55

जाणीव . . .

इतनी अरज सून मोरे सैया . . .
राग बिलासखानी तोडी, बहुतेक नाही, हो बिलासखानी तोडीचं. . . मला ऐकून राग वैगेरे खूपदा व्यवस्थित कळतं. गातोही बऱ्यापैकी पण जास्त रडतो हल्ली, आपणच गायचं आणि आपणच रडायचं? श्या हे रुचलं नाही म्हणून गाणं जरा बाजूला ठेवले दोनेक वर्षे आणि फक्त ऐकतो, नुसतं ऐकत नाही प्रचंड ऐकतो, जगाला अगदी विसरून ऐकतो.

तिने मला सोडून घरच्यांच्यासाठी दुसऱ्या कोणाशी लग्नकेल्याच्या आधी म्हणजे खूप आधी, तेरा चौदाचा मी म्हणजे मन ह्या रसायनांचा नीटसा अर्थही कळत नसताना मारवा सोहनी अहिर भैरव ऐकून पापण्या ओलावणारा जीव आणि आता तर
दर्द ह्या रसायनाने ओतप्रोत वाहणारं एक मन, कचकन फुटलेलं, एक विखुरलेलं हृदय आणि ह्या सगळ्या भावना खऱ्या अर्थाने अंतरातून अनुभवण्याची समज असलेला मी, त्यात जीवघेणा प्रकार म्हणजे वीणाताईंना ऐकणं. . .
असल्या जीवाला एकांताशिवाय अजून कोण आवडणं कसं शक्य आहे ???

गाणं सोडलं तेव्हापासून रोज सकाळी साडे पाचला धावायला येतो ह्या जागेत. एक जुनाट माडीसारखं घर, गंजून तुटायला आलेलं फाटक आणि विस्तीर्ण जागा इतकाच हा परिसर पण साधारणतः निर्जन म्हणून मी इथे, माझ्यासारखे अजून एकदोन जीव ह्याच वेळेत येतात इकडे. तसं मनात आणलं तर योग व्यायाम मला भयंकर आवडतं पण कानात वीणा ताईंचे स्वर पडायला हवेत एवढी अपरिहार्य अट असते. त्यांच्या स्वरांच्या आधाराने अगदी कुठूनही पडायला तयार आणि कदाचित अशक्य असेल अश्या मनस्थितीतूनदेखील उठायला तयार असतो मी.

जर काम आणि गाणं ऐकण्या व्यतिरिक्त मनात काय येत असेल तर द्वेष तिरस्कार मत्सर, नको त्या आठवणी आणि तीव्रतेने मनात भोचकपणे टोचत राहते ती आणि तिने माझ्याशी माझ्या निखळ प्रेमाशी केलेली प्रतारणा.

कधीच नाही माफ करणार मी तिला, अगदीच शेवटच्या श्वासापर्यंत जितकं प्रेम केलं तिच्यावर त्यापेक्षा कितीतरी जास्त तिरस्कार करेन मी तिचा आणि गेल्या महिन्यासारखी जर पुन्हा कधी अचानक भेटली आणि माफी मागण्याचा निष्फळ प्रयत्न केला तर पुन्हा पुन्हा झिडकारून लावेन मी तिला . . .

श्या हे असं होतं माझं सतत मन गुंतून ठेवावंच लागतं. नेमका काल रात्री " आज सो बना बन आयो" पुरिया कल्याण चार पाच वेळा ऐकत ऐकत, त्यातील कोमल रिषभासारखा कधी शांत होऊन त्या रागाच्या अधीन झालो कळलंच नाही. उठलो तर पंधरा टक्के चार्जिंग आणि संपलीही अर्ध्यातच.

अर्थातच माझ्यामते वीणाताईंच्या आवाजाव्यतिरिक्त मला ती अनुभूती, माझ्या उफाळून येणाऱ्या वरच्या आवरणातील संतप्त आणि खूप आतील, आतील डोहातील हळव्या हुंदक्याभरल्या भावनांना थोपवण्याचा काम ह्या आयुष्यात तरी कुणी करू शकणार नाही तरीही आज अचानक पडणाऱ्या त्या तानपुऱ्याच्या आवाजाने थबकलोच जरा, सकाळी सकाळी बिलासखानी तोडी! ह्या जागेत? तेच इतनी अरज सुनो मोरी सैया ... हेदेखील वीणाताईंचीच बंदिश कि . . .

कुणा बाईमाणसाचाच आवाज, परिपक्व आहे, जाण दिसतेय सुरांची, थेट सूर लागत आहेत, मी ऐकू शकेन मला आवडू शकेल असं नक्कीच गाणं आहे. जावं का आत? हे फाटक चक्क उघडं आहे आज, कळलं कसं नाही मला? श्या, आपण आपल्या धुंदीत.
शास्त्रीय संगीत म्हणलं कि आपण विरघळतो, मग त्या गहिऱ्या डोहात जोपर्यंत स्वतःच्या मनाला शांती मिळत नाही तोपर्यंत पूर्णपणे गुडूप होतो.

दुर्दैवाने वीणाताईंना ऐकायला लागलो ते मुळी त्या ह्या जगात माझ्यासारखा असंख्य संगीतप्रेमींना अतृप्त ठेवून अनंतात विलीन झाल्या तेव्हापासून आयुष्यात एकदातरी त्यांना समोर गाताना ऐकायची माझी तीव्र इच्छा निर्माण होण्याच्या आधीच अपूर्णता आळवून गेली.पण तरीही त्यांच्या गळ्यातला एक एक सूर आणि मी तर म्हणेन पहिला स्वर लावण्यासाठी घेतलेला श्वासदेखील मला, माझ्या भावनांना तृप्ततेची किनार लावून जातो.

इथे कुणी राहतं हे कळतदेखील नाही आपल्याला ह्या इतक्या दिवसांत. कसं कळेल मी फक्त सकाळीच येतो इथे बाकी वेळेत कधीच वळलो नाही इकडे.
कोण असेल इथे? मझ्यासारखंच पोळलेलं मन घेऊन जगणारी व्यक्ती ? काहीही विचार करतो कधीतरी मी. असू शकेल ? कि फक्त गायचं म्हणून तो राग आळवला जातोय?

नाही वाटत तसं ? सच्चेपणा दिसतोय आवाजात. इतकं तर मी ठामपणे ओळखू शकतो.
जाऊ का आत??

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बिलासखी तोडी कि बिलासखानी तोडी ?? तानसेन च्या मुलाने बिलासखान ने वडिल गेल्याच्या दु:खात वडिलांचा आवडता तोडी हा प्रकार गायला सुरुवात केली आणि अतीव दु:ख झालेले असल्याने काही स्वत: चे नोटेशन त्यात अ‍ॅड केलेत, झालेला प्रकार इतका भारी होता की दस्तरखुद्द तानसेनाच्या शवाने सुद्धा एक हात हलवुन ह्या नवीन राग-प्रकाराला मान्यता दिली असे ऐकिवात आहे. (ख.खो.दे.जा.).

हो सर बिलासखानी तोडी पण मी वाचल्या प्रमाणे काही लोक त्या रागाला बिलासखी तोडी असेही म्हणतात.
म्हणजे मला हा राग अजून झाला नाहीये पण खूप वेळा ऐकला आहे.

मी बदल केला आहे तरीही सरांसोबत कन्फर्म करून घेईन नक्कीच , आणि थँक यु.
पुढच्या भागात चूक आढळली तर प्लिज आवर्जून सांगा . .

आताच थरारक संपलं,
आता जाणीव वर काम करणार आहे...
लवकरच नवीन पुढचा भाग पोस्ट करिन,
तुमच्या प्रतिक्रिया देत जा. बाकी पहिला भाग जमलाय का??

पहिला भाग जमलाय, पण थरारक लय भारी होतं !!! शेवट फार थोडक्यात केलात पण ठिकाय... आता ह्याचे येवु द्या पटापटा भाग Wink

... तानपुऱ्याच्या आवाजाने थबकलोच जरा, सकाळी सकाळी बिलासखानी तोडी? >> पण बिलासखानी तोडी तर सकाळचाच राग आहे ना?
बाकी चांगले वाटले वाचायला. अजून वाचतो आहे.