पानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा!!

Submitted by निमिष_सोनार on 8 December, 2019 - 10:03

माझे हे परीक्षण वाचण्याआधी महत्वाची सूचना:
मी पानिपत "चित्रपटाचे" हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे परीक्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी. ऐतिहासिक, पौराणिक, बायोपिक, फँटसी आणि सत्य घटनांवर आधारित, तसेच सत्य-असत्य मिश्रण (फॅक्ट-फिक्शन) असेलेले मराठी, हिंदी आणि इंग्रजी असे चित्रपट/सिरीयल मी जरूर बघतो (असोका, 300, टायटॅनिक, सिरीयाना, पद्मावत्त, फर्जंद, फत्तेशिकस्त, बाजीराव मस्तानी, पोरस, बाहुबली, अलेक्झांडर, सूर्यपुत्र कर्ण वगैरे) आणि महत्वाचा मराठी इतिहास पडद्यावर मांडणारा हा चित्रपट असल्याने अर्थातच हा चित्रपट सुद्धा मी रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी (७ डिसेंबर) बघितला. पण वेळेअभावी चित्रपट परीक्षण लिहायला एक दिवस उशीर झाला म्हणजे 8 डिसेंबर (रविवार). तोपर्यंत बऱ्याच वाचकांनी मला विचारणा केली की माझ्याकडून परीक्षण कधी येईल, शेवटी लिहायला घेतले. आणि हो, अजून पर्यंत मी विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचली नाही, पण वाचणार आहे! चित्रपट बघतांना पेशवे आणि त्यांच्या इतिहासाबद्दल थोडा तरी होमवर्क केलेला असला पाहिजे नाहीतर काही गोष्टी समजणार नाहीत!

आधी पानिपत चित्रपटाभोवती असलेले काही वादग्रस्त मुद्दे बघूया:
ट्रेलर रिलीज झाल्यापासून विविध विवादांत अडकलेला पानिपत चित्रपट अखेर 6 डिसेंबरला प्रदर्शित झाला. अर्जुन कपूरला सदाशिवराव पेशवे यांच्या भूमिकेसाठी निवडल्याबद्दल दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांचेवर टीका झाली, तसेच पानिपत कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांनी त्यांच्यावर कथा चोरीचा आरोप केला, पानिपत नेमका कोणत्या ऐतिहासिक कालखंडावर आधारित आहे हे माहिती नसतांना काहींनी तो पद्मावत आणि बाजीराव मस्तानीचा मिक्स चित्रपट आहे अशा प्रकारच्या टीका केल्या. तसेच कुठेतरी मी बातमीत वाचले की अहमदशाह अब्दाली भारतात आला तेव्हा तो फक्त 25 वर्षांचा होता आणि त्याच्या भूमिकेत संजय दत्त खूप थोराड वाटतो त्यामुळे या गोष्टीसाठी पात्रनिवड करणाऱ्यावर टीका झाली पण याबद्दलचे नेमके सत्य असत्य काय हे मला माहिती नाही.

पानिपतबद्दल इतरांनी केलेल्या परीक्षणाबद्दल थोडेसे सांगून परीक्षणाला सुरुवात करतो:
चित्रपट बघण्याआधी मी अनेक परीक्षण वाचले आणि युट्यूबवर बघितले. काही परीक्षण हे मुद्दाम आकस बुद्धीने विरोधासाठी विरोध म्हणून केलेले दिसले जसे की तीन तास खूप बोअर होतात, एकही लक्षात राहण्यासारखा डायलॉग नाही, गाणे आणि संगीत चांगले नाही असे बोलले जाऊ लागले पण मला चित्रपट पाहिल्यावर या तिन्ही गोष्टी खोट्या असल्याच्या आढळून आल्या. संगीत (गाणे आणि पार्श्वसंगीत) अतिशय छान आहे, चित्रपट मुळीच बोअर होत नाही (उलट मला वाटत होते की एवढ्यात चित्रपट कसा संपला?) आणि लक्षात राहण्यासारखे अनेक डायलॉग आहेत. चित्रपटगृहात हर हर महादेव, सदाशिवराव पेशवा की जय अशा घोषणा ऐकू येतात तसेच एकदा नव्हे तर अनेकदा प्रेक्षकांतून शिट्ट्या आणि टाळ्या येतात. एका गाण्यात सर्वजण शिवाजी महाराजांची आठवण तबकात त्यांची पगडी ठेऊन करतात तेव्हा चित्रपटगृह शिवाजी महाराज की ज्जय या घोषणांनी दुमदुमून जाते.

काही डायलॉग सांगतो:
गोपिकाबाई पार्वतीबाईला भर लग्नात टोमणा मारतात:
"बिल्ली भी इतनी फुर्ती से सीढी नही चढती!" म्हणजे पार्वती ही एका सामान्य वैद्यांची मुलगी असून तिने सदाशिव सारख्या पेशव्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले अशा (गैर)समाजातून केलेली ही टीका असते.

तसेच -
"जिस दिल्ली ने छत्रपती शिवाजी महाराज का अपमान किया था, आखिर वह दिल्ली मराठो ने जीत ली!"

दत्ताजी: "बचेंगे तो और भी लढेंगे!"

दिल्ली जिंकल्यानंतर जेव्हा दिल्लीच्या गादीवर बसण्यासाठी पार्वतीबाई सदाशिवराव यांना आग्रह करते तेव्हा ते म्हणतात:
"मै राजनीती के लिये नही, युद्ध के लिये बना हूं!"

आणि खालील काही डायलॉग:
मल्हारराव होळकर: "यहां सब है, मराठा, पंजाबी, मुसलमान वगैरा है, लेकीन हिंदुस्तानी कोई नहीं है!"
आणि
सदाशिवराव: "अपनी संख्या बढा नही सकते पर दुश्मन की संख्या तो कम कर सकते है!"

मराठ्यांचा जोश पाहून घाबरून अब्दाली सैन्य माघारी येते तेव्हा त्या सैन्याला स्वत: अब्दाली कापतो तेव्हा तो टिपिकल संजय दत्त टाईप डायलॉग मारतो:
"अगर भाग कर वापस आओगे तो एक एक का पीछा करके मै सबको मार दूंगा, वापस जाओ और लढो!"

आणखी एक:
अर्जुन कपूर: "युद्ध से किसीका भला नही हुवा!"
संजय दत्त: "सिर्फ ये बात समझने के लिये तुम पुणे से पानिपत तक आये!"

कलाकार आणि अभिनय:
अर्जुन कपूर अभिनयात बराच कमी पडत असला तरी एकूण चित्रपटात, त्यातील कलाकारात आणि कथेत तो सहज सामावून जातो. चित्रपटात ७० टक्के मराठी कलाकार आहेत. संजय दत्त ने भूमिका चांगली वठवली आहे. या चित्रपटात अभिनयाच्या बाबतील आश्चर्याचा सुखद धक्का जर कुणी दिला असेल तर तो म्हणजे कृती सेनॉन हिने! अपेक्षा नसतांना अभिनयाची तिने कमाल केली आहे. सहज सुंदर अभिनयाने तिने मने जिंकली आहेत. शेवटी सदाशिवराव युद्धात धारातीर्थी पडत असतात तेव्हा केवळ आणि केवळ तिच्या चेहऱ्यावरील बदलत जाणारे भाव आणि अश्रू हे बघून आपल्याला भावनिक वाटायला लागते. असाच दमदार अभिनय ठाकरे चित्रपटात जेव्हा तुरुंगातून बाळासाहेब ठाकरे मीनाताई (अमृता राव) यांना पत्र पाठवतात आणि ते पत्र वाचतांना अमृता राव ने चेहऱ्यावर बदलत जाणारे जे भाव दाखवलेत त्याची आठवण आल्यावाचून रहात नाही. मोहनीश बहल नानासाहेब पेशवे आणि अभिषेक निगम विश्वास राव यांच्या भूमिकेत अगदी शोभून दिसतात. रवींद्र महाजनी आणि गश्मीर महाजनी हे दोघेही (पिता पुत्र) यात आहेत. मिलिंद गुणाजी आहे पण खूप छोटी भूमिका आहे. झीनत अमान आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या भूमिका छान. मस्तानीचा मुलगा समशेर, तोफ प्रमुख गारदी आणि नजीब हे पण लक्षात राहतात. शुजा-उद-दौला पण त्याच्या घोगऱ्या आवाजामुळे लक्षात राहतो.

कथेतील बेट्रायल किवा विश्वासघाताबाद्द्ल:
चित्रपटाच्या शिर्षाकाबाबत सांगायचे झाले तर: पानिपतच्या पुढे एक लाईन आहे - "द ग्रेट बेट्रायल" म्हणजे "प्रचंड विश्वासघात" हे कथेत योग्य पद्धतीने मांडले आहे. मराठ्यांना पुण्याहून दिल्लीकडे अब्दालीच्या सेन्याशी लढायला जातांना रस्त्यात त्यांच्या मांडलिक राजांकडून सैन्य, आर्थिक आणि अन्नधान्य मदत मिळत जाते पण त्यापैकी तीन राजांकडून त्यांना धोका मिळतो. दोन वेळेस मराठा सैन्याला त्याचा सुगावा लागून जातो पण तिसऱ्यांदा ऐन युद्ध सुरु असतांना विश्वासघात होतो. तिन्ही विश्वासघातांची कारणे वेगवेगळी असतात. म्हणून प्रचंड मोठा विश्वासघात असेलेली कथा! तसेच या कथेत आणखी दिल्लीतील राजकारणाचा अंतर्गत विश्वासघात पण आहे आणि अब्दालीसोबत त्याच्यात देशात होत असलेला विश्वासघात पण दाखवलेला आहे. पानिपतची कथेची पार्श्वभूमी आणि घडामोडी खूप किचकट, गुंतागुंतीच्या असूनही कथा साधी सोपी आणि सरळ करून पडद्यावर आशुतोष गोवारीकर यांनी मांडली आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन! एकूण या सिनेमात चार ते पाच वेळा आश्चर्याचे धक्के देणारे प्रसंग आहेत!

कथेबद्दल अगदी थोडक्यात सांगतो:
चित्रपटाच्या सुरुवातीला सदाशिवराव आणि राघोबादादा हे दक्षिणेतील उरल्यासुरल्या निजामशाहीचा पाडाव करून येतात. नंतर पेशव्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे सदाशिवराव यांची निवड सेनापती ऐवजी धन मंत्री म्हणून होते. दिल्लीतील नजीब जंगच्या सांगण्यावरून एक लाख सैन्यासह अफगाणीस्तानहून येणाऱ्या अब्दालीच्या आक्रमणाची चाहूल जेव्हा मराठ्यांना लागते तेव्हा पुण्याहून फक्त चाळीस हजाराचे सैन्य घेऊन राघोबादादा यांना नानासाहेब जायला सांगतात तेव्हा राघोबादादा नाही म्हणतात, पण सदाशिवराव एवढ्या कमी सैन्यासह तयार होतात कारण उत्तरेतील मांडलिक राजे सैन्य-मदत देतीलच हा त्यांना विश्वास असतो. सोबत विश्वास राव तसेच पार्वतीबाई आणि इतर बायकापण जातात. इतर अनेक कुटुंब पण सोबत जातात. प्रवासादरम्यान अनेक राजांच्या भेटी घेऊन मदतीचे आश्वासन घेऊन झाल्यावर मराठा सैन्याचा आमना सामना अब्दाली आणि शुजा यांच्या एकत्रित सैन्याशी अनपेक्षितरित्या रोहिला येथे होतो पण मध्ये असते खळाळती यमुना नदी! प्रचंड पाण्याच्या प्रवाहामुळे सैन्यासह आणि लवाजम्यासह यमुना पार करणे अशक्य असल्याने त्यांच्या सैन्याला चकवून मराठा सैन्य नदीपात्राच्या कडेने दिल्लीकडे कूच करून एका घटनेमुळे अस्थिर झालेली दिल्ली जिंकतात आणि आणखी पुढे कुंजपुराकडे जाण्याआधीच अब्दाली सैन्य हत्तीवरून यमुना पार करून मागोमाग आलेलं असतं. तिथे पानिपतचं मैदान असतं आणि युद्ध सुरु होण्याआधी अब्दालीचा मुलगा तैमुर अफगाणीस्तानहून बातमी आणतो की तिथे अब्दालीच्या सिंहासन बळकावण्याच्या हालचाली सुरु आहेत म्हणून अब्दाली युद्ध न करता परत जायचे ठरवतो आणि सदाशिवराव यांचेशी तह करण्यासाठी काही अटी समोर ठेवतो. मग पुढे काय होते ते पडद्यावर बघा.

शेवटच्या अर्ध्या तासाच्या पानिपत युद्धाबद्दल थोडे सांगतो:
आशुतोषने स्पेशल इफेक्टचा भरपूर वापर करण्याचे टाळले आहे आणि त्यामुळे युद्ध प्रसंग अगदी जिवंत झालेत. स्लो मोशन प्रसंग खूप वेळ दाखवण्याचा मोह त्याने टाळला आहे, हे खूप चांगले झाले. 300 या हॉलिवूड युद्धपट मध्ये तसेच बाहुबली युद्धामध्ये खूप स्लो मोशन प्रसंग आहेत. युद्धातील अनेक बारकावे आशुतोषने दाखवलेत. युद्धनीती पण यात दाखवली गेली आहे. युद्ध प्रसंग खूप थरारक आहेत, अंगावर काटा येतो. युद्धात भाग न घेतलेली कुटुंबे आणि बायका पानिपतच्या किल्ल्यावर सुरक्षित असतात तेव्हा तिथे अब्दालीचे सैन्य हल्ला करते तेव्हा पार्वतीबाई सुद्धा लढते. एकूणच शेवटचा अर्धा तास थरारक आहे!

माझे रेटिंग:
चित्रपटाची लांबी जास्त आहे म्हणून कदाचित माझे परीक्षण पण लांबले असे वाटते. चांगले संगीत, किचकट विषय असूनही पडद्यावर सरळ सोप्या पद्धतीने मांडलेली कथा, 90 टक्के कलाकारांचा चांगला अभिनय, भव्य सेट, थरारक युद्धा प्रसंग यामुळे या चित्रपटाला मी पाच पैकी चार स्टार रेटिंग देतो. चित्रपट जरूर बघा!

(लेखन दिनांक: 8 डिसेंबर 2019, रविवार)
- निमिष सोनार, पुणे
sonar.nimish@gmail.com

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी भिक्कार आहे हा सिनेमा. ह्यापेक्षा बाजीराव-मस्तानी बरा होता.

राजस्थानातील जाट लोकांच्या प्रक्षोभामुळे तो सुरजमल जाट बद्दलचा प्रसंग कापला हे एक बरे झाले.

पानिपत युद्धाआधी भाऊसाहेब पेशव्यांबरोबर झालेल्या गैरसमजुतीतून सुरजमल जाट परत गेला होता. मात्र युद्धानंतर पराजीत मराठ्यांची सेवा करुन, युद्धात भाग न घेण्याचा अपराध त्यांने धुवुन काढला होता तरीही चित्रपटात त्याची प्रतिमा अंहकारी, पैश्यासाठी हापापलेला व गद्दार दाखवण्यामागे गोवारिकरचा हेतू काय होता हे कळले नाही.

खरे तर संजय दत्तचे कान कापलेले दाखवायला हवे होते.

कारण जेव्हा नादिर शहाने दिल्ली लुटली आणि तो लाल किल्ल्यात तळ ठोकून होता.. तेव्हा अजून विशीचाही नसलेला अब्दाली सुद्धा त्याच्याबरोबर आला होता, तो नादिर शहाचा एक साधा सेनापती होता.
एका सकाळी अब्दाली लाल किल्ल्याच्या एका गेटजवळ ऊभा असतांना... एक जण त्याला तुझे भविष्य सांगतो म्हणाला. त्याने अब्दालीला सांगितले तू पुढे बादशाह होशील. जेव्हा नादिर शहाला हे कळाले तेव्हा त्याने हे भविष्य ऐकलयाबद्दल अब्दालीचे कान कापले आणि त्याला म्हणाला जर तू बादशाह झालास तर तुझे तुटलेले कान तुला माझी आठवण करून देतील.

पुढे नादिरशहाचा खून झाला आणि अब्दाली बादशाह झाला. ह्या दिल्ली स्वारीच्या वेळीच नादिरने मुघलांचे मयूर तख्त आणि कोहिनूर नेलेले ज्याचा ऊल्लेख सिनेमात संजय दत्तच्या तोंडी आहे ' ये मयूर तख्त और कोहिनूर बडी मशक्कत से मिलता है छिनने से नही मिलता... नादिर शहाने छिनने की कोशिश कियी थी.

हारलेल्या युद्धाचा काय पिच्चर पायचा?
नवीन Submitted by रॉनी on 12 December, 2019 - 19:23
<<

मराठे युद्ध हरले असले, तरी अब्दालीला विजय सहज मिळाला नाही. प्रत्यक्ष युद्धामधे एकवेळ अशी होती की अब्दालीला देखील त्याचा कुंटूब कबिला मागे हटवायला लागला होता.

पनिपतच्या या युद्धानंतर अब्दालीने अनेक वेळा भारतावर स्वारी केली मात्र पानिपतच्या आसपास तो कधीच फिरकला नाही. युद्धानंतर नानासाहेब पेशव्यांना अब्दालीने पत्र लिहिले होते जे आजही उपलब्ध आहे ते वाचा, मग कळेल की अब्दालीने या युद्धाचा किती धसका घेतला होता.

पुण्याचे लोक जेव्हा हरतात तेव्हा त्यांच्या पराभवाचेसुध्दा कवतिक होते. उगाच नाही आम्ही 2 ते 4 दुकानं बंद ठेवत!

मला आवडला सिनेमा. बोर नाही झालं. अर्जुन कपुरकडुन अपेक्षा होत्या त्यापेक्षा बरंच चांगले काम केले त्याने.. आवडला यात, नाहीतर त्याचे सिनेमे आवर्जुन पहात नाही. संजय दत्तचे दिसणे चांगले जमले आहे. नायक नायिकेचे जी नाचगाणी होती ती पहिल्या अर्ध्या तासात उरकुन घेतली व नंतर गंभीरपणा कायम ठेवलाय सिनेमात ते चांगले केले. सदाशीव मरायच्या सीनमधे फारच रडायला आलं (अनपेक्षीत होते हे पण तिथवरचा प्रवास गोवारीकर साहेबांनी बर्‍यापैकी परिणामकारक दाखवलाय म्हणुन असेल). हा सिनेमा मास्टरपीस नाही, अत्युकृष्ट नाही पण तरी आवडला. खुप मोठी कथा, खुप पात्रे, गुंतागुंत हे थोड्या वेळात दाखवायचे आव्हान होते, ते बरेच जमले आहे. क्रीतीने शेवटी लढायच्या सीनमधे चांगले काम केले आहे.

आणि हो, सर्वात महत्वाचे.... असे सिनेमे व खरा इतिहास याची सांगड मी कधीच घालत नाही. सिनेमा बनवणार्‍यांनी स्वातंत्र्य घेतले आहे हे समजुनच पहाते म्हणजे त्रास होत नाही Happy व कपड्यातल्या उणीवा पण शोधत बसत नाही म्हणुन मजा घेता आली असल्या सिनेमाची. नायिकेचे काही दागिने मला खुपच आवडले. ते त्या काळातले असो नसो, फरक पडत नाही. आता तसेले जाऊन शोधणे आले की कुठे मिळतील? Happy

पानीपतच्या युद्धाच्या वेळी मराठी सैन्य चालले असता रस्त्यात त्यांना महात्मा गांधींची दांडीयात्रा लागली. सदाशिवभाऊंनी गांधीजींचे दर्शन घेतले. गांधीजी म्हणाले की युद्धाने कुणाचं भलं झालं नाही. मी अब्दालीविरोधात उपोषणाला बसू का ? पण सदाशिवभाऊ म्हणाले की नको नको. तुम्ही ब्रिटीशांविरूद्ध लढा.

प्रत्यक्ष रणभूमीवर जेव्हां समोर सैन्य पसरलेले दिसले तेव्हां सदाशिवभाऊ गोंधळले. तेव्हां रथ चालवणा-या कृष्णाने त्यांना गीता सांगितली. तेव्हढ्या वेळात अब्दाली चाणक्याच्या भेटीला निघून गेला होता. चाणक्याने त्याला कामाच्या टिपा दिल्या. सम्राट चंद्रगुप्तानेही मदत हवी तर घे असे म्हटले. पण अब्दालीचं बजेट वाढले तर गोवारीकर चिंतेत पडले असते म्हणून अब्दाली नको म्हणाला.

ऐतिहासिक सिनेमात असे स्वातंत्र्य चालू शकेल ना ?

ऐतिहासिक सिनेमात असे स्वातंत्र्य चालू शकेल ना ?

Submitted by पुरोगामी गाढव on 13 December, 2019 - 06:01
माझे चार आणे...
असे स्वातंत्र्य चालत असेल तर, मराठा सैनिक नोटाबंदी मुळे एटीएम च्या रांगेत पळाले असेही दाखवता येईल.

असे स्वातंत्र्य चालत असेल तर, मराठा सैनिक नोटाबंदी मुळे एटीएम च्या रांगेत पळाले असेही दाखवता येईल.

>>>
अब्दाली आणि मराठे महाराष्ट्राचा सरकार स्थापन होण्याची वाट बघत बसले आणि रसद संपली

एवढ्या लोकांनी चित्रपट बघतील ,मला कोणी सांगेल का शेवटी जो राजा होता आराधक सिंग त्याचा इतिहासात उल्लेख कुठे सापडेल

अर्जुन कपूर सदाशिवराव भाऊ, अजय देवगण तानाजी आणि सोनाली कुलकर्णी (jr) हिरकणी, हे माझ्या मते अत्यन्त गडलेलं कास्टिंग असल्यामुळे मी हे तिन्ही सिनेमा पहाणार नव्हते. संजय दत्त असल्यामुळे पानिपत तर मुळीच्च पहाणार नव्हते. पण परीक्षण आणि सुनिधीची पोस्ट वाचून या शनिवारी /रविवारी पाहीन.
परीक्षण लेखन छानच.

>>जानेवारीत रिलीज करायला हवा होता, पानिपत युद्ध 14 जानेवारीला झाले होते,<<
हो, त्यावेळेस उत्तरेत जबरदस्त पाऊस हि पडायचा. Wink

सिनेमा ठिकठाक आहे, गाणी डोक्यात जातात, व्हिएफएक्स सुमार आहे. वर कुणितरी लिहिल्या प्रमाणे हरलेल्या युद्धावर सिनेमे काडुन जखम उघडी करण्या ऐवजी दत्ताजी शिंद्यांच्या खुनाचा बदला पुढे महादजींनी कसा घेतला (नजीबची कबर खोदुन) यावर चांगला सिनेमा निघु शकेल.

या लढाईचा अब्दालीने कसा धसका घेतला वगैरे यात किती तथ्य आहे कुणास ठाउक. अब्दालीला स्वतःच्याच सिंहासनाची काळजी होती, ते सोडुन कोसो दूर लढाया करुन लूट करण्यात, परत कफल्लक झालेली दिल्ली लुटण्यात त्याला काहिहि इंटरेस्ट न्हवता. शिवाय, शिंद्यांनी परत एकदा उत्तरेत मराठ्यांचा वचक बसवलेला होता. तेंव्हा पानिपतच्या लढाईचा अब्दालीला धसका बसल्याने तो घाबरुन परत भारतात आला नाहि, असं म्हणणं हे आत्ताच्या लोकांनी आपलीच पाठ थोपटुन घेण्यासारखं आहे...

कविवर्य अब्दालीची कविता

By blood, we are immersed in love of you.
The youth lose their heads for your sake.
I come to you and my heart finds rest.
Away from you, grief clings to my heart like a snake.
I forget the throne of Delhi
when I remember the mountain tops of my beautiful Pakhtunkhwa.
If I must choose between the world and you,
I shall not hesitate to claim your barren deserts as my own.
ستا د عشق له مينی ډک شول ځيګرونه

Sta de ishq de weeno daq sho zegaronah

ستا په لاره کـــې بايلــــــــي ځلمي سرونه

Sta puh meena ke byley zalmey saronah

تاته راشمــــه زړګــــی زمــــا فـــارغ شي

Ta tuh reshema zergai ze mai farigh shey

بې له تا مــــې انديښنې د زړه مارونه

Bey ley ta mai andekhney de zlar maronah

که هــــر څه مې د دنيا ملکونه ډير شي

Ke har sa mi de dunia molkona der shi

زما به هير نه شي دا ستا ښکلي باغونه

ze ma ba heera na shi da sta shekeli baghona

I will not forget it your beautiful gardens

د ډيلـــي تخت هيرومه چې را ياد کړم

De Delhi takht hayrawoona chey rayad kum

زما د ښکلي پښتونخوا د غرو سرونه

Ze mah de khekely or shekele Pakhtunkhwa de ghru saronah.

https://en.m.wikipedia.org/wiki/Ahmad_Shah_Durrani

मीरा, आवडला नाही तर मला ठोकु नका Happy
रुचा, थँक्स... पण खोटे दागिने हवेत मला. खरे असतील तर प्रचंड किंमत असेल. खोटे घातले व कुठेतरी घरात लटकावले की झालं Happy

दत्ताजी शिंद्यांच्या खुनाचा बदला पुढे महादजींनी कसा घेतला (नजीबची कबर खोदुन) >> पानिपतानंतर महादजींनी ऊत्तरेत पराक्रम गाजवला त्याबद्दल दुमत नाही पण मेलेल्या माणसाची कबर खोदण्याला बदला घेणे म्हणतात आणि त्यावर सिनेमा बनवायचा? Uhoh

प्रेत कबरीतून बाहेर काढून रेप करा पण म्हणतात, आणि आपले भविष्यातील पंतप्रधान गप्प राहतात.
त्या मानाने हाडे उधळणे किती तरी सुसंस्कृत

मीरा, आवडला नाही तर मला ठोकु नका Happy। >>>> छे छे अजिबात नाही. अगदी नाही आवडला तर मी सुद्धा दागिने पहात बसेन Wink

मी विश्वास पाटलांची पानिपत अनेक वेळा वाचली आहे. तिच्यातल्या गुंतागुंतीपेक्षा सिनेमातला घटनाक्रम तपशीलात स्वातंत्र्य घेतले असले तरी बर्यापैकी सुगमपणे कळतो. मुलांना आवश्य दाखवावा. तसेच सगळेच कलावंत किमान सुसह्य तरी आहेत. त्यामुळे कोणीच डोक्यात जात नाही. संजय दत्ताचा गेट अप अप्रतिम आहे. मात्र त्याचे खरेच डबिंग करायला हवे होते. तो बोलू लागला कि एकदम देमार चित्रपटातला व्हिलन वाटू लागतो. मायबोलीवर चित्रपटावर लिहायचे म्हणजे त्याची खिल्ली उडवायची अशी समजूत आहे. मी अत्यंत प्री जुडीस मनाने पाहायला गेलो होतो पण अपेक्षित निराशा झाली नाही

>> पण मेलेल्या माणसाची कबर खोदण्याला बदला घेणे म्हणतात<<
हे केवळ तुमच्या पानिपत/ईतिहासाच्या अज्ञानामुळे लिहिलं गेलंय याची मला जाणीव आहे. महादजींनी नजीबच्या मुलाचा निर्घुंण पराभव करुन नजीबाबाद लुटलं. कबर खोदली हा त्याचाच एक भाग. नजीब त्यावेळेस जिवंत असता तर त्याचा शिरच्छेदच झाला असता हे वेगळं सांगायला नको. थोरल्या भावाच्या (सावत्र का असेना) खुनाची ठिणगी १०-१२ वर्षं जिवंत ठेउन त्या घटनेचा सूड घेणे यापेक्षा उत्तम कथाबीज (चलाउ नाणं) होऊ शकत नाहि. कबर खोदणं हे सिंबॉलिक आहे - इट पॅक्स मोर पंच जस्ट लाइक ए हॉर्सस हेड इन बेड (गॉडफादर - इफ यु हॅवंट सीन द मुवि)...

Lol
ईतिहास सिनेमा सारखा चटपटीत लिहून तुमच्यासारखे अप्रामाणिक लोक दंतकथा जन्माला घालतात.

जावा जाऊन कुंजपुरा मध्ये काय झाले ते वाचून या.
कबरी खोदत बदला घेतला लिहून तुमचा इगो सुखावत असेल तर लिहा बापडे.
पानिपता नंतर नजीब दहा वर्षे जगला की. बदलाच घ्यायचा असता तर बराच वेळ होता शिंदे आणि मराठ्यांकडे.

>>पानिपता नंतर नजीब दहा वर्षे जगला की. बदलाच घ्यायचा असता तर बराच वेळ होता शिंदे आणि मराठ्यांकडे.<<
धन्यवाद, तुमच्या पानिपत्/ईतिहासाच्या अज्ञाना बाबतीतला माझा मुद्दा ताबडतोब सिद्ध केल्याबद्दल... Proud

बर बुवा तुम्ही हुश्शार.
आता सांगा पाहू नजीब केव्हा मेला आणि तोवर बदला घेण्यासाठी आतुरलेले महादजी काय करीत होते

<<कुंजपुरा भाऊसाहेबांनी जिंकल्यानंतर दत्ताजी शिंद्यांचा ज्या कुत्बशहाने खून केला त्या कुत्बशहाला भाऊसाहेबांनी मारण्याचा हुकूम दिला आणि त्याचं मस्तक धडावेगळं करून ते मराठी फौजेत मिरवलं. वास्तविक मराठे एवढे क्रूर कधीही नव्हते. पण दत्ताजीबाबांची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली त्याचा बदल, त्याची दहशत नजीब वगैरे लोकांच्यात पसरावी म्हणून भाऊसाहेबांनी हा हुकूम दिला.>>

हे वरचं कौस्तुभ कस्तुरे यांच्या पानिपत परीक्षणात वाचलं होतं.

कस्तुरेंनी लिहिलेले बरोबर आहे.
कुंजपुर्‍यात नुसता कुतुब शहाच नाही तर सुलतान खान आणि अब्दुस समद खान जो नजीबचा भाऊ आणि पंजाबचा सुभेदार होता ते सुद्धा मराठ्यांच्या हाती लागले. दत्ताजींच्या तुकडीला आधी दगा करणारा अब्दुस समद खानच होता. हातात पडल्यावर मराठ्यांनी समद खानला मारलेच पण कुतूबशहाला तर फार हालहाल करून मारले.
पण कुंजपुर्‍यावर चढाई करण्याआधी कुतूबशहा आणि अब्दूस समद खान आपल्या हाती लागतील ह्याची कल्पना मराठ्यांना नव्हती. हा दसर्‍याचा दिवस होता आणि ह्याच चढाईत दत्ताजींचा आवडता हत्ती जव्हेरगंज (जो दत्ताजी पडले तेव्हा रोहिल्यांच्या हाती लागला होता) सुद्धा मराठ्यांना पर्यायाने शिंद्यांना परत मिळाला.

बुरारी घाटाच्या नजीबच्या रोहिला फौजेशी लढाईत दत्ताजी पडले तेव्हा जखमी होऊनही जनकोजी वाचले तसे खरं तर पानिपतच्या लढाईनंतरही ते वाचू शकले असते... पण पुन्हा नजीब आडवा आला.
जनकोजीचा मोर्चा थेट नजीबच्या मोर्चाला शह देण्यासाठी ऊभा होता. नजीबने जनकोजींच्या मोर्चावर अनेक रॉकेट्स दागली, मुद्दाम धू़ळ ऊडवून घोडदळ आणि सांडणीस्वारांना सुद्धा पायदळ करून मागे घेत नजीब खंदकाआड (हे खंदक खोदणे तीच युक्ती होती जी बाबरने लोदीला हरवितांना पानिपतच्या पहिल्या युद्धात वापरली होती) लपून बसला. रॉकेट्सच्या मार्‍यामुळे जनकोजीला नजीबवर थेट हल्ला करता येत नव्हता.
ईतक्यात विश्वासराव पडल्याने होळकर आणि शिंदेंच्या लहान सरदारांनी आणि सैनिकांनी मल्हाररावांच्या मागे मैदान सोडायला सुरूवात केली होती. सैनिक माघार घेत असल्याने जनकोजीचा मोर्चा कमकुवत होऊ लागला. शेवटी मध्यात असलेल्या भाऊंच्या मोर्चात अफघाण घुसलेले पाहून जनकोजी आणि तुकोजी भाऊंच्या मदतीला धावले. घमासान झाली आणि जनकोजी जखमी झाले व बहादूर की बरखुरदार खान नावाच्या सरदाराच्या हातात पडले. त्याने ज नकोजींना बंदी बनवून गुप्तपणे आपल्या छावणीत आणले आणि काही लाख रुपये मिळाले तर सोडायची तयारी दाखवली.
पण ही गोष्ट नजीबला कळली आणि त्याने हे अब्दालीला जाऊन सांगितले. जनकोजी आपल्या छावणीत जिवंत सापडले तर अब्दाली आपल्याला जिवंत सोडणार नाही असे वाटून खानाने आपल्या दिवाणाला जनकोजीला मारून त्यांचे प्रेत लपवून ठेवण्याचा हुकूम सोडला.
पुढे जनकोजींचे किंवा त्यांच्या शवाचे काय झाले कोणालाच कळाले नाही... हां त्यांचे तोतये मात्र भरपूर येत राहिले.

राज,
महादजी शिंद्यांनी अक्षरशः एक हाती ऊत्तरेकडे राजपूत, शीख, जाट, पूर्ण अंतर्वेदी आणि रोहिले, दक्खनकडे निजाम एवढ्या लोकांवर एकाच वेळी जिंकून घेत वचक बसवला होता. एकहाती आणि एकाच वेळी हे फार महत्वाचे आहे. दिल्लीच्या गादीवर पुन्हा मुघलांची कठपुतळी बसवली.
खाली अजून दख्खनमध्ये टिपूशी सुद्धा दोन हात करत होते. आणि हे सगळे करत असतांना त्यांनी दोन मोठ्या लढायात ईंग्रजांना (राघोबा दादांची कारस्थाने) अशी जबरदस्त मात दिली ईंग्रजांनी शिंद्यांशी अनकंडिशनल तह केला.
ब्रिटिश कर्नल कोण होता तेव्हा हेस्टिंग्ज की कॉर्नवॉलिस म्हणतो... की मनात आणलं असतं तर 'मी हिंदुस्थानचा बादशहा' असे म्हणणे महादजींसाठी केवळ एक फॉर्मॅलिटी ठरली असती. म्हणजे अफगाणिस्तानच्या बॉर्डरपासून खाली दखखन पर्यंत आणि पूर्वेचाही बराचा भाग शिंदेंच्या घोडीच्या टाचेखाली आलेला पाहून गोरा महादजींना 'द ग्रेट मराठा' म्हणतो.
अर्थात हे सगळे तुम्हाला माहित असेलच... मग असे असतांना ह्या राष्ट्रपुरूषाला बदल्याच्या भावनेने कबरी खोदणारा दाखवायचे हे बरोबर वाटते का? कबर खोदण्याचा प्रसंग घडला असेल नसेल पण असे सिनेमात दाखवतात का?
मराठे जर असेच असते तर संभाजींच्या आतोनात छळासाठीच्या बदला घेण्यासाठी त्यांनी औअरंगजेबाची कबर खोदली असती. आणि त्याची कबर खोदायला त्यांना कुठे दिल्लीला स्वारी करूनही जायचे नवह्ते... ती तर ईथेच नगरमध्ये आहे.

मला नेहमी वाटते जर का नानांनी महादजींवर त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांना ईंग्रजांच्या विरूद्ध टिपूशी हातमिळवणी करू दिली असती तर गोरा साहेब कदाचित तेव्हाच लुळा पांगळा झाला असता. श्रीरंगपट्टणमच्या लढाईत टिपू, मराठे आणि फ्रेंच खांद्याला खांदा लाऊन ब्रिटिशांना भिडले असते..असो.. असे काही व्हायचे नव्हते.
महादजींवर सिनेमा निघायला हवा हे खरे पण मुत्सद्दी, पराक्रमी म्हणून.. असे बदला वगैरे नको.

Pages