आठवणीतली ती "आका"

Submitted by सोहनी सोहनी on 7 December, 2019 - 07:04

आठवणीतली ती "आका"

"तो गणराज गणपती आधी मन घेई हाती" काय गाते हि राग चारुकेशी . . .
आजकाल 'सुरू'चे आलाप म्हणजे जीवघेणे प्रकारात मोडत चाललेत, तोंडावर नाही पण मनातल्या मनात दाद देऊन, अभिमानाने एक नजर टाकली तर कळलं ती आपल्याकडेच पाहतेय. व्यवस्थित आला ना ? हि नजर घेऊन . . .
माझ्या डोळ्यांत तिला हवा तो प्रतिसाद मिळाला असावा म्हणून ते समाधान तिच्या पुढच्या स्वरात जाणवलं . . .
सुरु हल्ली मला "तिच्या"सारखी भासतेय थोडीथोडी, कदाचित त्याचमुळे हे बहिणीचं नातं त्याच्या कितीचंतरी पुढे गेलंय.

नवीनच तयार झालेल्या गणेश मंदिरात पूजेला गेलो होतो भजनाच्या निमित्ताने, भजन झालं कि मग जे असेल ते मनसोक्त आणि मोकळेपणाने पाहायचं माझं आणि तिचं ठरलेलंच.
आधी छोटंस असणारं हे मंदिर अगदीच भव्य बनवलं गेलं होतं, खूप छान वाटलं, बाप्पांची तीच ओळखीची आणि जवळची मूर्ती पाहून समाधान वाटलं. सगळं हळूहळू पाहत एक भलीमोठी देणगीदारांची यादी पाहायला नको तरी थांबलोच.
वाचत वाचत दोघींची हि नजर एकाच नावावर थांबली, हिच्या चारुकेशी मधून अजून नीटशी बाहेर निघालीही नव्हतीच तोच दोन डोळ्यांच्या किनाऱ्यांवर त्या दोनेक क्षणांतच असंख्य आठवणींचे हळवे थर दाटीवाटी करू लागले.

त्या वादळाला वाहू देण्याची हि योग्य जागा नाही हे समजून ते वादळ आतल्याआत शमवण्यासाठी घेतलेला तो मोठा श्वास वरचा खाली होतोय ना होतोय तर मी डोळ्यांच्या एका कडेने सुरु कडे पाहिलं, ती माझ्याकडेच पाहत होती, मनात स्स्स करून गेली ती नजर . . .
तिला कळलंच होतं आता माझी काय अवस्था होणार ती, पण मी तिच्या नजरेला नजर न देता पुढे लावलेल्या एका फोटोवर स्थिरावून ठेवली त्या पुढे काही पहिल्याच आठवत नाहीये .
तिने हलकेच माझा हात दाबला, लालसर गुलाबिश्या छटांच्या त्या सागरातील वादळाचा ठाव घेतला असावा तिने.
मला वाचणं हिला आजकाल एकदम व्यवस्थित येतं, अगदी तिच्यासारखं.
"माणसाने इतकंही सोपं नसावं वाचायला" मला तिने एकदा सांगितलं होतं.

तिच्यात मला आई, बाप, बहीण, भाऊ, मैत्रीण सगळे दिसायचे पण ती मात्र मला अजूनतरी कोणामध्ये सापडली नाही.
देवपण काय एक एक व्यक्ती पाठवतो ना आयुष्यात? कि त्याच्या शिवाय जगून नक्की आपण काय करणार असं वाटून जातं.

आई आजोबा नीटसे आठवत नाहीत पण त्यांची कमीही कधी भासली नाही, त्यापेक्षा ती भासू दिली नाही तिने, वडिलांची मोठी बहीण, आका म्हणायचो आम्ही तिला.
सगळ्यांसाठी आजी आजोबा प्रिय असायचे माझ्यासाठी माझी आका जीव कि प्राण असायची.
तो एक घरातील सगळ्यात मोठ्या माणसाचा आधार असतो ना आपल्याला ? कि एक, मनात एक समाधान असतं माझ्यापेक्षा कुणी मोठं आहे जो काही झालं तरी आम्हाला अलगद उचलून घेईल, तो आधाराचा हात माझ्या वडिलांपासून ते आम्हा सगळ्या लहानांना तिच.

उभं अंगभर लुगडं नेसलेली, नव्या घडणीचे असंख्य दागिने असूनदेखील गळ्यातलं ते पारंपरिक मंगळसूत्र घातलेली, कानाच्या वर पालीत बुगड्या घातलेली, चेहऱ्यावर सदानकदा केवड्याच्या सुगंध सांडवणारं हास्य असलेली, डोळ्यांत जगाची काळजी सामावून घेणारी ती समोर दिसली कि मला ती देव्हाऱ्यातल्या समई सारखीच भासायची.

ती यायची असलीस कि घरची माणसंच काय पण घरातील झाडंपानं देखील आनंदून जायची. आली कि प्रत्येकाकडे फेरी, मोठ्यांची सुखदुःखे स्वतःच्या उदरात घेऊन, आम्हा छोट्यांकडे वळायची.
मग ती जादूची पिशवी उघडायची. कोणाचा आवडता चॉकोलेट, कोणाचा समोसा, कोणाला बिस्कीट तर मला गुलाबजामून ते हि आवर्जून आठवणीत प्रत्येक फेरीला आणायचीच.
मग जाताना कमीतकमी आठवडाभर पुरतील इतके खाऊचे पैसे. तरीही तिच्याखेरीज कोणाकडून काही अपेक्षा न ठेवायला काटेकोरपणे शिकवलं.
जाताना लावलेल्या झाडांना मायेने ओलावा देऊन जायची.

मला अजूनही लख्ख आठवत, मी सातवीला असताना, आई आणि मी दोघीही खूप आजारी पडलो आणि सरळ एक आठवडा मला दवाखान्यातच ठेवलं होतं तेव्हाची ती नव्यानेच मला भेटली,
"पोरीला इतका ताप झाला मला एक फोन करून कळवता नाही आलं तुला??" आईला उच्चरलेलं हे वाक्य त्यात तिच्या गळ्यातला गहिवर माझ्या बंद डोळ्यावर नकळत ओघळलेले तो ओल, माझ्या कपाळावर तिचा थरथरता हात माझ्या नकळत्या हळुवार मनावर तिचं नवं रूप कोरून गेलं.

मग जरा कळेल अश्या वयात आले तेव्हा तिच्यात एक मैत्रीण सापडली मला, माझ्या डोळ्यातलं अचूक ओळखायची ती सगळं, आधी आईनी बाबानी काही दिलं नाही कि बिनदिक्कत आकाला नाव सांगायचो आणि येत्या फेरीला ती वस्तू घेऊन आम्ही नाचायला सज्ज असायचो.
पण कळत्या वयात सगळे लाड पुरवून देखील गरज आणि हौस यात पुढे कशाला प्राधान्य द्यायचं हे मला तिनेच शिकवलं.

खूप पैसे कमावले त्यांनी, अगदी गरिबीतून वर उठली, नवर्याच्या खांद्याला खांदा लावून, डोक्यावर विटा घेऊन चढवण्यापासून ते कामगारांकडून प्रेमाने काम करवून घेण्यापर्यंत सगळं जिकारीनं केलं तिने, तेव्हा कुठे ते सुखाचे दिवस आणले मुलांसाठी, अतिशय कष्ट घेतले.
गरिबी पाहिल्यामुळेच काय पण कधीच कोणाला खाली हाताने घरातून परतवल नाही तिने, कुणीही कितीही पैस्याची मदत मागितली तर नवऱ्याने नाकारून देखील स्वतःकडचे द्यायची पण कधी कोणाला नाही म्हणाली नाही.

आणि माझ्या सोबत कसं कोण जाणे पण लहानपणापासून इतर भावंडांपेक्षा तीला मी जास्त जवळची असायची, सगळ्यांच्यात आवडती तसं.
मला भेटल्याशिवाय कधीच घरी परतायची नाही ती, आत्या असून मी तिच्या पाया पडले कि कडाडून बोटं वाजवायची कानाजवळ,
त्या बोटांच्या वाजण्याच्या लयीला कोणत्याच रागाची काय कसलीच उपमा नाही देऊ शकत मी, इतकं आतून काहीतरी वाटायचं त्या वेळेस तिच्या डोळ्यांत पाहून.

खरेतर आर्थिकदृष्ट्या खूप मदत केलीच तिने आम्हाला इतकी गरज नसताना देखील पण तिचा एक मानसिक आधार होता आम्हा सर्वांना, तिचं असणं खूप खूप खूप महत्वाचं होतं आमच्या सगळ्यांसाठी.
पण, देवालापण ना चांगलीच माणसं जास्त आवडतात, हिरावून नेली तिला त्याने आमच्या आयुष्यातून, अक्षरशः ओरबाडून घेऊन गेला तो निर्दयी पणे.

समई होऊन आमचं आयुष्य कायम प्रकाशमान करत राहिली आणि स्वताखालील अंधाराला त्या विशाल उदरात लपवून ठेवून बसली.
दोन दिवसाचा ताप आला फक्त, कधीच म्हणजे कधीच ती आजारी वैगेरे असल्याचा फोन आम्हाला येतं नसायचा,
पण त्या दिवशी आम्ही सगळे मामाच्या मुलीच्या हळदीला गेलो होतो, घरी निघतच होतो रात्री बाराच्या आसपास तर भाऊला फोन आला म्हणे आकाला ताप आलाय, दवाखान्यात दाखल केलीये, आई, बाबा आणि भाऊ तशेच रात्री भेटायला गेले, ते येईस्तोवर आमच्या जीवाची घालमेल, आले तेव्हा आई म्हणाली दोन दिवसात बरी होईल डॉक्टर म्हणाले.
आणि दुसऱ्या दिवशी तर ठीक आहे असं कळलं, त्यामुळे आम्ही निर्धास्त झालो. त्याच्या दुसऱ्या दिवशी माझी अखिल भारतीय गांधर्व विद्यालयात गायनाची परीक्षा होती.
तिला बरं आहे म्हणल्यावर नंतर भेटून येईल असं ठरवून आम्ही परीक्षेला गेलो, त्याच दरम्यान तिला अचानक माझी परीक्षा होती तिथेच वाशीमध्ये हलवलं, अचानक रक्तदाब खालावल्यामुळे, अचानक परिस्थिती बिघडली.
मी गायला बसायच्या आधी फोन करून विचारलं देखील तब्येतीविषयी तिच्या तर सगळं ठीक आहे असंच सांगितलं, परीक्षा खूप छान गेली, मला खूप छान वाटत होतं.
तबलावादक वाले माझे दादा मी माझ्या आत्याची मुलगी आणि सुरु आलोच आहोत तर जरा फिरून घेऊन वाशी शहर. खूप एन्जॉय केला आम्ही, आठवणीत राहील इतका.
आणि घरी जाताना अर्ध्या वाटेत फोन केला तेव्हा कळलं कि तिला वशीलाच आणलं आहे, पण ती ठीक आहे मी बोललेही आधी नाही का सांगायचं, मी आले असते.
माझ्या मनात त्या वेळेस काहीच म्हणजे काहीच शंका नव्हती कि काही तरी जास्त झालं असेल आणि अशी अचानक उठसुठ दवाखान्यातून का हलवलं तिला? काही म्हणजे काहीच प्रश्न मनात आले नाहीत.

आई आणि भाऊ तिला पाहून रात्री आले तेव्हा म्हणाले कि रक्तदाब कमी झाला म्हणून पुढे हलवायला लागलं, डॉक्टर म्हणालेत कि ती ठीक आहे आणि दुसऱ्या दिवशी ते तिला पाहायला दवाखान्यात आणि माझं तेच दुर्दैव म्हणायचे कि काय पण दुसऱ्या दिवशी मी चक्क कॉलेजला गेली.
अकरा साडे अकराच्या दरम्यान चुलत काकीचा फोन आला, घरी ये लगेच, आका गेली म्हणून . . .

चक्कर यायचीच काय ती बाकी होती ती हि मनातल्या त्या टोचणाऱ्या सलीमुळेच. काही पावलांच्या अंतरावर एकाच जागेत एकीकडे ती शेवटचे श्वास घेत होती आणि मी दुसरीकडे त्याच जागेत त्या क्षणांत मज्जा करत होती.

त्या पुढची भावना, ती मनातली कालवाकालव, तो मनस्ताप, तिच्या नुसत्या नावाने दोन वर्ष व्हायला आलेले असून देखील डोळ्यांना येणारे ओल, पूर्ण शरीरात जाणवणारा एक असाहाय्यपणा, शब्दांत मांडण्या पलीकडची आहे.

पण जे गमावलं आहे ना ते कधीच भरून निघणार नाही हे नक्कीच, आणि ती सल कदाचित आयुष्यभर ह्या मनावर ओढून राहीन.
शेवटचं इतकंच म्हणेन तिला " माफ करशील का ग मला ??"

- आज खूप आठवण येतेय तिची म्हणून थोडंस लिहलं.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults