गावाकडची मजा

Submitted by बिपिनसांगळे on 4 December, 2019 - 12:59

गावाकडची मजा
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मी गावाला चाललो होतो. एसटीमधून. डुलक्या घेत.
पण माझ्या मनाला त्या अर्धवट झोपेतही बरं वाटत नव्हतं . तुम्ही म्हणाल,गावाला जायचं म्हणजे मजाच की !
मी गावाला चाललो होतो, ते सहल म्हणून नाही. मजा म्हणून नाही. तर कायमचा !
मी पुण्यासारख्या शहरात राहत होतो . माझी शाळा , माझे शाळेतले मित्र, माझे वाड्यातले मित्र या सगळ्याला मी आता मुकणार होतो. अन गावाकडे ?... काय माहिती !
मी गावाला पहिल्यांदाच चाललो होतो. माझे अप्पा कधी आम्हाला गावाला घेऊन गेले नाहीत. अन ते कधी जाताना दिसले नाहीत .मला वाटतं त्यांची आजोबांशी कट्टी होती . मोठ्या माणसांचं आपल्याला काय कळत नाही ! अप्पांची कंपनी बंद पडली . मला फार काही माहिती नाही; पण आई - अप्पांच्या बोलण्यामुळे मला हे कळलं.म्हणून बहुतेक आम्ही गावाला चाललो होतो.
गावाला पोचलो. आजी – आजोबांनी मला जवळ घेतलं. कुरवाळलं .खूप लाड केला . बरं वाटलं. सुरवात तर चांगली झाली होती.
आजी नऊवारी साडीतली . कपाळावर लालभडक कुंकवाची आडवी रेघ मारलेली . म्हातारी -पण कडक . स्वभावाने अंगणातल्या गोड पेरूसारखी !
घर छोटं. साधंसंच. अगदी कमी वस्तू असलेलं . गरिबाचं. आमचं घर शेतामध्ये होतं. शेताच्या पलीकडे रस्ता. तो खाली उतरत गेलेला. गाव तिथे, खाली . खड्ड्यात असल्यासारखं .
गावाच्या मागे नदी . गाव छोटं. दोन-चार साधी दुकानं. म्हणजे खाऊची पंचाईतच होती . गावात देऊळ एक , शाळा एक आणि शाळेला नो मैदान !
मला तिथल्या शाळेत घातलं.
अन वर्गातली पोरं ? छे ! अगदीच गावरान पोरं ती. त्यांना मी भारी वाटत होतो. शहरामधून आल्यामुळे . पण ते मला त्यांच्यात घेईनात . मी 'नवीन ' होतो . त्यांच्यातला नव्हतो . त्यांचे खेळ वेगळे . पळापळी , लंगडी अन हो मारामारी सुद्धा . मारामारी हादेखील त्यांचा एक खेळ होता .
मला कंटाळा आला. मजाच येईना. करायचं काय, कळेचना … बोअर व्हायला लागलं. मग मी मैदानात पळायचो . त्यात मैदान छोटं . कधी पक्षी पहायचो . नाहीतर वर्गात टांगलेले रंगीबेरंगी तक्तेही पाहत बसायचो .
त्यात सगळी पोरं गावात राहणारी. माझ्या बाजूचं कोणीच नाही. मी एकटाच. असा लांब लांब. टेकाडावर रहाणारा . शाळेत जाता-येताही सोबत नसायची.
शाळेच्या मागे एक पेरूचं झाड होतं. पोरं पेरू तोडायला जायची. मग मीही जायचो. तिथला मालक ओरडायचा. पोरं लहान. बिचारी घाबरायची. एकदा दांडगट धन्याला फटकेही पडले .
मग मी त्यांना सांगितलं,’ माझ्या अंगणात पेरूची दोन-चार झाडं आहेत. अगदी आरामशीर वर चढता येतील अशी .तुम्ही या माझ्याकडे. कोण तुम्हाला ओरडणार नाही. हवे तेवढे पेरू खा.’
पेरू पण असा भारी ! गुलाबी रंगाचा. लांबुडक्या आकाराचा , कलमी. गोड अन चवदार.
झालं तर. जमलं ! पोरांशी माझी मैत्री झाली.
पण एक घोळ होताच. शाळा दुपारी असायची. मला वेळ कळायचीच नाही. घरात घड्याळसुद्धा नव्हतं आमच्या. एकच घड्याळ ,तेही अप्पांच्या हातात . अन अप्पा शेतात .
तसा रस्ता पाचच मिनिटांचा. घंटा वाजली की मी दप्तर उचलायचो. चालत शाळेत जायचो. रोजचा उशीर. वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा ठरलेली . पोरं हसायची . त्यातून धन्या जास्तच.
काय करावं , कळेना. डोकं चक्कर झालेलं . पण मी ‘तेच’ डोकं चालवलं. शाळेची घंटा वाजली की मी निघायचो . चालत नाही , तर पळत. उताराचा रस्ता. माझी दोन पायाची गाडी बुंगाट पळायची. दोन मिनिटात मी शाळेत .
मग उशीर वाचला. संध्याकाळी शाळा सुटली की जाम भूक लाग लेली असायची. मग पुन्हा पळत पळत घरी.
दिवाळीनंतर शाळेत खेळांच्या स्पर्धा सुरु झाल्या. मैदान छोटं . मग नदीकाठालाच स्पर्धा व्हायच्या.
मी पळण्याच्या शर्यतीत भाग घेतला. ती स्पर्धा कशी ? - तर आमच्या शाळेच्या मागे डोंगरावर एक मारुतीचं देऊळ होतं. थोडंसं उंचावर . तिथे जाऊन घंटा वाजवायची, की परत शाळेत . ही आमच्या सरांची आयडिया होती . पोरांचे वयानुसार गट पाडलेले होते .
थंडीचे दिवस होते . नदीवर छान पांढरट धुकं धरलेलं . अन कुठं धुकं पार करणारा ,एखादा पक्षी . एखादा पांढरा बगळा .
माझ्या गटाची बारी आली .
धन्या म्हणाला, ' तू ल्येका हितंबी उशीर करणार ! आधीच तू काडी पैलवान ! '
गुरुजींनी शिट्टी वाजवली . पोरं पळाली. आणि मी ? – मित्रांनो,मी सगळ्यात पुढे होतो. देवळापाशी पोचलो . शेंदरी रंगात माखलेल्या मारुतीरायाच्या पाया पडलो . त्याच्या हातातल्या उंचावलेल्या गदेकडे पाहिलं. कपाळी शेंदूर लावला . टण्णकन घंटा वाजवली . आणि परत फिरलो .
मी जिंकलो. पहिला आलो.
धन्या मागेच राहिला . दमला . काडी भिरभिरली अन धन्याची चांगली जिरली.
गुरुजींनी जवळ घेतलं. कौतुक केलं . ते म्हणाले ,' पोराहो , ह्ये पायलं का - शहरातून येऊनबी त्यानी तुमाला हरवलंय !’
लै भारी वाटलं. मी जिंकलो. कारण ? - तुम्हाला माहिती आहेच की - माझं रोजचं शाळेमध्ये पळत पळत जाणं -येणं .
आजीने त्या दिवशी माझी छान नजर काढली . वर खाऊला पैसे दिले . अप्पांनी कौतुक केलं ते वेगळं .
आता मी गावात रुळलोय .मला शाळा आवडते .नवीन मित्र आवडतात. गावात राहण्याची वेगळीच मजा असते. आता वाटतं , शहरात राहून ती मजा मला कधीच कळली नसती .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वीरू

याचा पुढचा भाग ? ....
सुखद आश्चर्य !

असा विचार तर मीहि केला नव्हता .

अवघड आहे . मी गावातलं जीवन जवळून पाहिलेला माणूस नाही .
शहरी माणूस आहे . मन झेपावेल तेवढं , जमेल तसं लिहितो