दुसऱ्या लग्नाची गोष्ट

Submitted by बिपिनसांगळे on 3 December, 2019 - 11:40

दुसऱ्या लग्नाची गोष्ट
----------------------------------------------------------------------------------------------------------------
सकाळची वेळ होती . थंडीचे दिवस . गावातल्या मुख्य चौकात, वडाच्या पाराच्या पलीकडे वैष्णवी वडापाव सेंटर होतं. त्याच्या पुढे टेबल खुर्च्या मांडलेल्या. तिथेच शंकरराव बसलेले होते. उन्हात बसायला छान वाटत होतं . बरोबर आणखी चार-पाच जण . सारेच वयस्कर. सगळ्यांचे कपडे पांढरे, टोपी पांढरी आणि डोक्यावरचे केसही पांढरेच . गावातली मंडळी . चार पावसाळे जास्त पाहिलेली . शंकरराव अजून हट्टेकट्टे होते . धारदार नाकाचे . अन पांढऱ्या भरघोस मिशा असलेले .
शंकररावांना गावात मान होता. मोठं घर होतं.पोरं कर्तृत्ववान होती.
तेवढ्यात दुधाचा टेम्पो घेऊन शिरप्या आला. तो पुणे शहरात दूध पोचवून परत आला होता.
तो एका खुर्चीवर बसला.
“ ए , दाद्या, च्या घेरे स्पेशल ,” त्याने ऑर्डर दिली व या मंडळींकडे वळून म्हणाला,”आक्रीत !”
“ काय झालं रे?” शंकररावांनी गळ्यातला हिरवा मफलर सारखा करत विचारलं.
“ पुण्यात महादेवकाका भेटले होते . बरोबर एक त्यांच्याच वयाची बाई .मी मनाशी नवल करत होतो. कोण आसल ही बया ? तर काकाच म्हणाले , " ही माझी बायको -सुनंदा !”
“ काय ? डोकं जाग्यावर हाय का तुझं येड्या ?” शंकरराव म्हणाले.
“ अहो काका खरं , काळू आईची शपथ !”
त्यावर एकच गलका झाला .
“ म्हंजी महाद्याने पुन्ना लगीन केलं तर ! पर आपल्याला सांगितलं नाय !” शंकरराव म्हणाले.
“ अन ?- सांगणार कसं ? हे काय पयलं लगीन हाय होय ? आपल्याला आवताण पाठवायला ! अन गावात त्वांड दाखवायला जागा राहिली असती का त्या शहाण्याला?” दुसरा एक जण म्हणाला . मग त्याने नाकात तपकीर कोंबली अन तो सटासट शिंकत सुटला .
शंकरराव थोड्यावेळाने उठून बाजूला गेले. जरी आता संपर्क खूप कमी असला तरी , महादेव त्यांचा बालपणीचा खास मित्र . त्यांच्याकडे साधा मोबाईल होता. त्यांनी महादेवाला फोन लावला.
“ कारं, ऐकलं ते खरं हाय का ?”
“ शंकऱ्या, खरं आहे, “ पलीकडून महादेवराव म्हणाले.
“ कसं काय रे गड्या, हा कार्यक्रम ?”
“ अरे , रिटायर झालो. ही गेली . त्यात मुलगा वेगळा राहतो. घरात मी एकटाच. करायचं काय ? वेळ जात नाही . सोबत कोणी नाही. दुखलं - खुपलं बघायला कोणी नाही . मग एका मित्राने मला हे सुचवलं . असे बरेचजण आहेत रे पुण्यात . “
“ हे नवलच म्हणायचं की !
बराय गड्या तुझं ! “ शंकरराव म्हणाले.
“शंकऱ्या ज्याचे भोग त्याला माहिती “, महादेवकाका म्हणाले.
“हं , तेबी खरंय म्हणा , अन मग बाकी गम्मत ?” शंकररावांनी डोळा मिचकावत विचारलं .
***
बाकीचे लोक गेले तसे शंकरराव एकटेच चालत निघाले.नेहमीचा सरळ रस्ता सोडून नदीच्या काठाने. विचारात हरवून.
कसं केलं असेल महाद्याने दुसरं लग्न ? कसा राहत असेल तो आता ? ... बायकोशी प्रेमाने वागत असेल ? की आताही तिच्याशी अनबन होत असेल ? घरात अन दोघंच ! च्यायला ! - मजा असेल साल्याची ! आपलं तर नवीन लग्न झालं तेवाबी आपल्याला असं एकांत कधी मिळाला नाही. त्यात पोरंबी झाली पटापटा.
त्यांनाही वाटलं. आपणही लग्न करावं. दुसरं लग्न ! त्यांच्या डोळ्यांपुढे बायकोचा ,वत्सलेचा चेहरा आला. तिला जाऊनही दोन वर्षं झाली होती. काय चूक- काय बरोबर हे त्यांना ठरवता येईना. त्यांची व्दिधा मन:स्थिती झाली होती.
***
रात्री जेवायला सगळे बसले होते.
शंकरराव , मोठा मुलगा , धाकटा मुलगा, तीन नातवंडे . दोन्ही सुना वाढत होत्या.
मोठ्या मुलाने रामने विषय काढला, ” अप्पा, ऐकलं ते खरंय का ?”
“हा खरंय .”
“ बया ! या वयात लग्न ? म्हातारचळ लागला का काय ?” मोठी सून म्हणाली.
लहान पोरं बावचळून बघायला लागली .
“ जये, मग ते पुन्यांदा हनिमूनला गेले असत्यान का ?” दुसरी सून म्हणाली. ती जाडुली जरा आगाऊच होती.
दोघी फिदीफिदी हसायला लागल्या. रामने त्यांना दापलं .
“ मग ? हसू नको का ?” मोठी म्हणाली .
त्यावर राम म्हणाला,” हं ! ही हसण्यासारखीच गोष्ट हाय. काकांनी असं नव्हतं करायला पाहिजे . उतारवयात कुठं बाशिंग बांधलं काकांनी कोना ठावं ?
***
मुलं आणि सुना सगळंच काम पाहत असल्याने शंकररावांना भरपूर वेळ असायचा. रिकामं मन… ते आता सतत दुसऱ्या लग्नाचा विचार करू लागले होते.
तो विचार केला की त्यांच्या डोळ्यांपुढे मालन यायची.अन त्यांना अपराधीही वाटायचं. लग्नाचा, मालनचा विचार मनात आला म्हणून .
मालन -गोरीगोमटी . वयाने शंकररावांपेक्षा बरीच कमी. विधवा असली तरी तरतरीत . तिच्या नवऱ्याचं आणि शंकररावांचं वाकडं होतं . ती एकटीच होती. तिला मुलबाळही नव्हतं .
त्यांचं मन सतत तिचा विचार करू लागलं . पण अजून ते कोणाला ही गोष्ट बोलले नव्हते.
***
भर दुपारची वेळ . शंकरराव पाराखाली बसले होते.
लोक जमलेले होते. तावातावाने चर्चा चालू होती.
शिरप्या गावातल्या संगीला घेऊन पळून गेला होता. त्याने आळंदीला जाऊन लग्न केलं होतं. संगीचा पेताड बाप म्हणाला ,” गावात येऊ तर दे XXX. जीवच घेतो दोघांचा.”
त्यावर गावकऱ्यांची उलट सुलट चर्चा ...
***
जेवण झालं. शंकरराव लवंडले. त्यांचा डोळा लागला .
त्यांना स्वप्न पडलं-
ते मालनच्या घरी गेले.
“ का वं ? आज इकडं कुटं ? मालनने विचारलं .
“ एक इचारू का ?”
“ काय ते ?”
“ माज्याशी लगीन करशील का ?”
“ काय याड-बीड लागलंय का ?”
“ जरा इचार कर … तू एकटीच, मीही तसा एकटाच . बायको गेली. पोरंबाळं त्यांच्या व्यापात .
“ नाई. नाय जमायचं . काईतरीच काय बया ! “ मालन ठामपणे म्हणाली.
ते निघाले. पण त्यांच्या डोक्यात तिचाच विचार होता.
दोन दिवसांनी परत ते तिच्या घरी गेले. त्यांनी तिला विचारलं . तिने विचार केला होता. तिचं मन बदललं होतं.
“ चालन मला . मी करिन लगीन… पर ह्ये सारं जमायचं कसं ? ....” ती काळजीने म्हणाली.
“ ते मी बगतो . तू नको काळजी करू.”
घरी पडवीत बसलेले असताना त्यांनी विषय काढला.
राम म्हणाला,” अप्पा, ह्ये काय लावलंय ? गावात त्वांड दाखवायला जागा नाय राहणार ! “
धाकटा म्हणाला ,” त्यांचं अन आपलं जन्माचं वाकडं ! अन त्या बाईला तुम्ही घरी आणणार होय ? - जमायचं नाय म्हंजी नाय !”
थोरली म्हणाली ,” तुम्हाला काय कमी केलय आम्ही हो ? की बायकोची गरज पडायला लागली ? ”
आगाव धाकटी म्हणाली ,” अन एक सासुरवास काडला ,आता पुन्हा नवा सासुरवास होय आमाला ?”
शंकरराव विचारात पडले . त्यांना यावर कसा मार्ग काढावा , कळेना .
शेवटी- शंकररावांनी काही एक विचार केला. त्यांच्या डोळ्यांसमोर समोर शिरप्या आला.
बास ठरलं तर ! -
त्यांनी मालनला पळवून नेलं. आळंदीला . तिथे जाऊन त्यांनी मालन शी रीतसर लग्न लावलं . दोघे संध्याकाळपर्यंत गावात आले . गावात वडापची जीप थांबली . ते उतरले .आणि समोर गावकरी मंडळी उभी… मालनचा दांडगट दीर हातात काठी घेऊन उभा होता . बरोबर त्याची भावकीतली मंडळी
“ मारा साल्यांना ! “ तो ओरडला . गावकरी पुढे सरसावले . त्यांचा एकूण अवतार पाहून
शंकरराव आणि मालन दोघे घाबरले …
स्वप्न मोडलं. शंकरराव एकदम दचकून जागे झाले.
***
चहा पिऊन ते घरातून बाहेर पडले. संध्याकाळ झाली होती.
ते उगा पाराकडे चालू लागले . त्यांच्या डोक्यात ते आळंदीच्या लग्नाचं बसलं होतं . पण तरीही त्यांचे विचार तळ्यात- मळ्यातच होत होते . त्यांना माहित होतं, हे एवढं सोपं नाही .
श्रीपाद मास्तर देवळात चालला होता. कीर्तनाला.
“ नमस्कार काका , चला कीर्तनाला . तुम्ही देवळात येता, पण कीर्तनाला काही येत नाही.”
शंकरराव काही बोलले नाहीत. ते मास्तरांबरोबर चालू लागले. त्यांच्या पायात जाडजूड कोल्हापुरी वहाण होती. तपकिरी रंगाची,चांगली करकर वाजणारी .
चपलेचा एक खिळा थोडा बाहेर येऊन त्यांच्या पायाला टोचत होता. जणू , त्यांचा दुसऱ्या लग्नाचा विचार त्यांच्या मनाला टोचत होता . ते तसेच पाय ओढत चालले होते .
मास्तरही पन्नाशीला आलेला. एकदम नेक माणूस. शहरात शिकून , नोकरी करून पुन्हा गावी परतलेला . गावच्या मातीच्या ओढीने. तो एक प्रगतिशील शेतकरी होता .आणि गावातल्या पोरांना तो विनामूल्य शिकवायचा , त्यांचा क्लास घ्यायचा . त्यांच्या अडी- अडचणी सोडवायचा . गावात त्याच्या शब्दाला, विचारांना मान होता.
“ मास्तर, एक विचारू का ? महादेवचं कळलं का ?” शंकररावांनी विचारलं
“ हं. आलं कानावर . ठीक आहे.”
“ ठीक ?...कसं काय हो मास्तर ?”
“ अहो , ते शहरी जीवन . त्यांचं आयुष्य वेगळं . सध्या शहरात एकत्र कुटुंबपद्धती नाही . महादेवकाका आता गाव सोडून शहरातच गेले. त्यांची गावाशी नाळ तुटली. ते व्यवस्थित सेटल झाले. नोकरी केली. पण आता ते निवृत्त आहेत. काकू गेल्या. त्यात मुलगा वेगळा राहतो. काय करणार बिचारे. एकटा माणूस. त्यांनी योग्यच केलं.”
“ योग्य ? कसं काय ? मग गावातही असं होऊ शकतं का ?”
“ नाही . गावात हे होऊ शकत नाही. समाज ते मान्य करणार नाही. आणि गावात काय हो ? म्हणलं तर करायला बरीच कामं असतात . छोटी –मोठी, शेतीची .वेळ घालवायला माणसं असतात आजूबाजूला . अडीअडचणीला धावून येतात.
शहरात माणसं एकटी पडलेली असतात हो. एखादा एकटा माणूस घरात मरून जरी पडला तरी शेजारच्यांना चार चार दिवस पत्ता लागत नाही ! … “
यावर शंकररावांनी डोळेच विस्फारले.
“आणि आता बाकी काय बोलायचं ? उतारवयात जवळ जायचाही काही प्रश्न नाही.” मास्तर बोलत होता.
देऊळ जवळ आलं होतं.
“ हे काय ! देऊळ आलंच. बघा ना आपण इथे देवळात मस्त भजनं म्हणतो. छान वेळ जातो. मोकळी हवा, निसर्ग आणि देवाचा सहवास. आपल्याला आणखी काय हवं ? गांधीजींनी सांगितलं होतं - खेड्याकडे चला. हे सगळं पाहिल्यावर वाटतं, त्याचीच आज गरज आहे . जग जवळ आलंय पण माणूस? - माणूस एकमेकांपासून लांब चाललाय !
शंकररावांचा चेहरा आता उजळला. त्यांनी देवळाबाहेर चप्पल काढली. तिथे पडलेला एक दगड त्यांनी उचलला अन तो वर आलेला खिळा चांगला ठोकला .
ते देवळात शिरले. विठोबा रखुमाईच्या ते मनोभावे पाया पडले
त्या दिवशी त्यांनी सगळ्यांच्या बरोबर सुरात सूर मिसळला. भजनं म्हणली आणि जोशात टाळही वाजवले.
ते भक्तिरसात न्हाऊन निघाले. आणि त्यांचे विचार त्या तंद्रीत कुठे लोप पावले.
मास्तराने शेवटचं भजन घेतलं - ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ति असो द्यावें समाधान ॥
भजन संपलं . मंडळी पांगली . शंकरराव रात्रीच्या अंधारात बाहेर पडले .
गार वारं सुटलं होतं . कुठे पोरांनी शेकोटी पेटवली होती. वाळक्या फांद्यांचा त्यामध्ये चटचट जळण्याचा आवाज येत होता . आजूबाजूच्या घरांतून कालवणाचे वास सुटले होते . त्यांनाही भूक लागली होती . घरची मंडळी जेवण्यासाठी वाट पाहत असतील , त्यांच्या मनात आलं . मग ते प्रसन्न मनाने हसले . गळ्यातला मफलर त्यांनी सारखा केला . घराच्या दिशेने ते भराभर पाय उचलू लागले.
आता चप्पलचा तो खिळा टोचत नव्हता की मनातला खुटखुटणारा तो विचार. .
---------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

कथा छान आहे . पण खरोखरच गावात खेड्यात पुरुषाच्या दुसऱ्या लग्नाला समाजाचा प्रखर विरोध असतो का यावर जाणकारांनी प्रकाश टाकलेला आवडेल .

सुरेख मांडणी Happy

खेड्यात कर्त्या पुरुषाला बराच मान असतो. त्याने काही वेडेवाकडे वागलेले चालत नाही. आणि म्हातारपणी कशाला पाहीजे लग्न? हा विचार प्रखर असतो. लोक काय म्हणतील? भावकी, घरातली लहान मुलं कशी बघतील? ही भीती असते.

छान कथा. आवडली. पण तरीही केलं असतं लग्न तर काय मेलं बिघडलं असतं कोणाचं असंही वाटलं. सांसारिक जबाबदाऱ्यातून मुक्त झाल्यावर केला थोडासा स्वत:चा विचार तर कुठे चूकले. पण हे खेडे गावात प्रॅक्टिकल नसावं. म्हणून शेवट पटतो.

कथा छान आहे . पण खरोखरच गावात खेड्यात पुरुषाच्या दुसऱ्या लग्नाला समाजाचा प्रखर विरोध असतो का यावर जाणकारांनी प्रकाश टाकलेला आवडेल . << नक्कीच असतो ... मुलं लग्नाची किंवा लग्न झालेली असली तर मुलांचा ..घरातल्या बाकी व्यक्तींचा कडाडून विरोध असतोच आणि गावातील मंडळी किंवा नातेवाईक हि बोलायला सोडत नाही . आता या वयात शोभत का ..सून/जावई आणायचं वय आहे बायको काय आणतात ..असलं काही . जवळच्या लोकांमध्ये पाहिलंय बायकांपेक्षा पुरुषांना ज्यास्त एकटेपणा जाणवतो / त्यांचे ज्यास्त हाल होतात.
दुसरं लग्न करायला का एवढा टॅबू आहे नो आयडिया .. शेवटी प्रत्येकाला companion ची गरज असते मग तुम्ही तरुण असा कि सिनियर सिटीझन .. हेमावम Happy

फक्त गावात नाही तर शहरातही विरोध असतो आणि प्रमुख कारण इस्टेट हे असते.(बाकी कारणे अशीच दिली जातात).
हे ओळखीच्या व्यक्तीबरोबर पाहिले. US मध्ये मुलानी वडिलाना विरोध केला (for properties inheritance)

कथा आवडली. पण त्यांनी मनाप्रमाणे दुसरं लग्न करायलाच हवे होते. हे म्हणजे मन मारुन जगणे झाले.

सामो

आपण नेहमी , आवर्जून प्रतिक्रिया देता अन विचारी प्रतिक्रिया देता
आभारी आहे

... आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या टप्पयावर , असे ना तसे ,मन मारून जगत असतो !

गावाकडे, विधवा बायकांनी शक्यतो पांढरी साडी नेसावी, टिकली लावू नये, मंगळसूत्र घालू नये असेही दंडक असतात, शहरांत तसे नाही मानत.
कथा छान आहे, आवडली.

... आपण प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या टप्पयावर , असे ना तसे ,मन मारून जगत असतो ! >>>>> खरंय. Bitter truth of life.

गावाकडे, विधवा बायकांनी शक्यतो पांढरी साडी नेसावी, टिकली लावू नये, मंगळसूत्र घालू नये असेही दंडक असतात, शहरांत तसे नाही मानत. >>

पांढरी साडी फक्त चित्रपटात दाखवतात. गावाकडे सुद्धा विधवा स्त्रिया सर्व रंगांच्या साड्या नेसतात, हिरव्या सोडून. आणि अगदी मंगळसूत्र आणि जोडवी नाही पण काळपट लाल (मरून) टिकली सर्रास लावतात.

माझ्या लहानपणीचा किस्सा आहे.(हा गमतीदार म्हणावा का खरंच कळत नाही.) माझे बालपण खेड्यात गेले.मी पाचवीसहावीत असताना आम्हाला शाळेत एक मराठीच्या बाई होत्या. त्या विधवा होत्या. सधन घरातील होत्या.त्याकाळी खेड्यातील बायका सर्रास कपाळाला छोटेसे का असेना पण कुंकूच लावीत.(मेणाचे कुंकूही असे कुणाचे).टिकली फार थोड्या बायका(तरूण किंवा नोकरी करणार्या वगैरे) लावीत.शाळेतील इतर सर्व बाई लाल टिकली लावत. मराठीच्या बाई मात्र रोज कडक ईस्त्रीची वेगवेगळ्या रंगाची साडी अन त्यावर मॅचिंग रंगाची वेगवेगळ्या डिझाइनची टिकली लावत. त्यांच्याकडे इतर मॅडमच काय पण मुली देखील असूयेने पाहत! आज आठवले की हसू येते त्याबरोबर बाईंच्या धीटपणाचे कौतुकही वाटते.

शहरात सामाजिक बंधने त्या मानाने सैल असतात. पण खेड्यातील समाज हा जास्त घट्ट असतो, त्यातून तेथे बहुधा एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे एखादा माणूस (किंवा बाई) दुसरे लग्न करण्याचा विचार सहजासहजी करू शकत नाहीत. अर्धवट वयात( ४५-५०) जोडीदार गेला तर दुसरे लग्न मुलांना कितपत पसंत पडेल या विचाराने बरेच जण दुसऱ्या लग्नाचा विचार करू शकत नाहीत.

त्यातून स्त्रियांनी तर असा विचार करणे हे महापाप मानले जाते. बहुधा त्या आर्थिक दृष्ट्या (आणि मानसिक दृष्ट्या) स्वतंत्रही नसतात. त्यामुळे त्यांना हा मार्ग जवळ जवळ बंदच आहे.

मग उरलेले आयुष्य स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक गरजा दाबून ठेवून मुलांच्यात किंवा देवपूजेत रमून घालवणे हाच उपाय शिल्लक राहतो.

Pages