112 INDIA APP : तातडीच्या मदतीसाठी फोन व अँप

Submitted by साधना on 2 December, 2019 - 04:01

हैद्राबादची घटना ताजी असताना, काल व्हाट्सअप्पवर एक विडिओ आला. 112 India अँपची माहिती त्यात होती. काल शोधाशोध करत असताना मुंबई पोलिसांचे प्रतिसाद नावाचे अँप दिसले होते पण तिथे रजिस्ट्रेशन होत नव्हते. इथे बघूया काय अनुभव येतोय म्हणत अँप लगेच डाउनलोड केले. नाव, जन्मतारीख, फोन नंबर मागितल्यावर फोनवर ओटीपी आला. अँपने नेहमीसारखी माझे कॉन्टॅक्ट वाचण्याची, लोकेशन पाहण्याची, फोन वापरण्याची परवानगी मागितली. सहसा अँपला ही माहिती देणे मी टाळते व अँप काढून टाकते. पण ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे अप्पला अशक्य असल्याने परवानगी दिली. पुढच्या स्क्रीनवर अँप माझे लोकेशन दाखवू लागले. पोलीस, आग, मेडिकल व इतर अशी चार बटन्स दिसायला लागली.

प्ले स्टोरवर अँप

...

डाऊनलोड केल्यावर असे दिसते:

...

टेस्ट करायचे म्हणून मी पोलीस हे बटन दाबले. माझ्या फोनवरून 112 नंबरला मिसकॉल गेला. त्यानंतर अँपवर लगेच I am safe हे बटन दिसायला लागले. मी सेफच होते म्हणून ते बटन लगेच प्रेस केले. आता प्रकरण संपले असेल असे वाटले. पण नाही. क्षणार्धात माझा फोन वाजायला लागला. मुंबईतील लँडलाईनवरून मला फोन आला. 'मॅडम, तुम्ही 112 वरून पोलीस मदत मागितली. तुम्हाला मदत हवीय का?' आश्चर्याचा सुखद धक्का तर बसलेलाच, पण त्यातून सावरून मी आभार मानून फोन बंद केला.

112 INDIA अँप बद्दल गुगळुन बघितले तेव्हा कळले की भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये 112 हा नंबर कुठल्याही प्रकारच्या इमेरजन्सीमध्ये वापरण्यासाठी खुला केलेला आहे. आजपावेतो 20 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना कार्यान्वित झालेली आहे, इतर राज्येही येतील.

पोलीस (१००), आग (१०१), आरोग्य (१०८) आणि स्त्री सुरक्षा (१०९०) हे चार नंबर ११२ नंबराखाली आणलेले आहेत. सध्या सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहेत त्यामुळे अँड्रॉइड व आयफोनसाठी अँप विकसित केलेले आहे. अँपवर ४ पॅनिक बटन्स दिलेली आहेत - पोलीस, आग, मेडिकल व इतर. आपल्या गरजेप्रमाणे बटन दाबले तर योग्य ती मदत मिळू शकते. फेब्रुवारीत मदत मिळण्याची वेळ 10 ते 12 मिनिटे इतकी होती. ती सहा महिन्यात ६ ते ८ मिनिटे इतकी कमी करण्याची योजना होती जी आतापावेतो अमलात आणली गेली असेल.

आपली क्षमता व इच्छा असल्यास आपण स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंद करू शकतो. आपल्या भागात कुणी मदतीची याचना केल्यास ती आपल्यापर्यंतही पोचून आपण तिथे धाव घेऊन मदत करू शकतो.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत ते 112 थेट डायल करून मदत मागू शकतात. The Emergency Response Support System (ERSS) च्या वेबसाईटवर थेट लॉगिन करूनही मदत मागता येते. प्रत्येक राज्याचे इमेरजन्सी रिस्पॉन्स सेंटर त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक फोन, इमेल व अँपमार्फत आलेल्या पॅनिक कॉलचा पाठपुरावा करते.

ही योजना केंद्र सरकारने निर्भया फंडमार्फत सुरू केलेली आहे.

कुठलीही वाईट घटना घडली की आपल्याला खूप वाटते की आपण काही मदत करू शकलो असतो. ही चिडचिड व हतबलता सोशल मीडियावर व्यक्त होते. जर ह्या अँपवर आपण स्वयंसेवक म्हणून रजिस्टर केले तर आपल्या चिडचिडीला दिशा मिळेल, कुणा बिचाऱ्या व्यक्तीला मदत मिळेल.

इतके चांगले अँप असूनही सरकारी पातळीवरून त्याचा प्रचार केलेला दिसत नाही. हैद्राबादच्या घटनेत तिथल्या एका मंत्र्याने 'बहिणीला फोन करण्याऐवजी १०० नंबरवर फोन करायला हवा होता' अशी प्रतिक्रिया दिल्यावर त्याच्यावर टीकेची झोड उठली. पण कदाचित मदत मिळू शकली असती, प्रसंग टाळता आला असता. असो. घडून गेल्यावर बोलण्यात काही अर्थ नाही.

अशी मदत मिळण्याची संधी उपलब्ध असेल तर आपण ती घ्यावी. यात नुसती पोलीस मदतच नाही तर आग व आरोग्यही समाविष्ट आहे. कित्येकदा घरात फक्त वृद्ध व्यक्ती असतात. कुणा एकाच्या बाबतीत मेडिकल इमेरजन्सी उद्भवली तर दुसऱ्याला काय करावे सुचत नाही, हाक मारून बोलावण्याच्या अंतरावर कुणी नसते, मुले बाळे लाम्ब दूरदेशी असतात. अशा वेळी हे अँप वापरून तात्काळ मदत मिळवता येईल. अमेरिकेतील ९११ सारखा याचा वापर व उपयोग व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे.

अँपचा वापर करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. आपण सगळ्यांनी हे नक्की करावे असे मला वाटते.

वेबसाईट : https://ners.in/

ट्रॅकिंगचे काम कसे चालते याची माहिती देणारा विडिओ:

https://youtu.be/b0dOfFZXBMQ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माहितीपूर्ण लेख !
--
तुमच्या नावासहित हा लेख WhatsApp वर ढकलला आहे.

हा लेख चांगलच व्हायरल झाला आहे व्हॉट्सअप वर.
धाग्याचा उद्देश सफल झाला.
याचा लोकांकडून पूर्ण जबाबदारपणे वापर व्हावा आणि पोलीस / वैद्यकीय चमू यांचे कडून तत्पर सेवा मिळावी ही सदिच्छा.

आजच व्हॉट्सॅप वर आला हा तुमचा लेख पण नाव नव्हतं>>>

नो प्रॉब्लेम. लोकांना माहिती मिळुदे कुठूनही आणि द
उपयोग करायची दुर्दैवाने वेळ आलीच तर मदत मिळुदे हीच प्रार्थना!!

आमच्या ऑफिस चे महिलांसाठी असेच एक अँप आहे, त्यात पॅनिक बटण दाबले की तुमच्या बॉस ला , घरचा जो इमर्जन्सी कॉन्टॅक्ट दिलाय त्यांना अन तुमच्या gps लोकेशनच्या जवळच्या पोलीस स्टेशन ला कॉल जातो. सगळ्यांना हे अँप डाउनलोड करायला अन प्रवासात gps ऑन ठेवायला सांगितले आहे. अर्थात कितीजण असे करत असतील माहीत नाही, पण अँप उपयुक्त आहे

Abuse झाला हे मान्य, पण मग कुठली सिस्टिम चालू आहे हे ओळखायचे कसे?? हैद्राबाद च्या घटनेनंतर अशा शेकडो पौष्टी फिरत आहेत, त्यातल्या बऱ्याचशा खोट्या किंवा जुन्या पण आता चालू नसलेल्या आहेत, त्यामुळे टेस्ट करणे पण गरजेचे वाटते, आता अपल्यापैकीच एकाने कन्फर्म केल्यामुळे बाकीच्यांनी करायची गरज नाही

साधना, माहितीबद्दल धन्यवाद

सध्या ही पोष्ट मला whatsapp वरून आली त्यात ही लिंक मिळाली. त्यामुळे माहितीची खातरजमा करता आली

ही खूप उपयुक्त पोष्ट आहे

माझ्या ऑफिसनेही स्वतःची सिस्टीम विकसित केलेली आहे. आमचे कॉर्पोरेट खूप मोठे असल्यामुळे त्यांची स्वतःची स्वतंत्र सुरक्षा यंत्रणा आधी होतीच, त्यात त्यांनी हे नवे फिचर ऍड केले.. मी आमचा नंबर घरातील सगळ्यांना दिलेला आहे. या नंबरमुळे आजवर किती जणांना मदत झालेली आहे हे दरवर्षी कंपनी जाहीर करते. बहुतेक 5-6 वर्षे झालीत ही व्यवस्था करून.

मोठ्या कॉर्पोरेट्सनी पुढे येऊन अशा यंत्रणा उभारायला हव्यात असे मला वाटते. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटीत हाही प्रकल्प घ्यायला हवा.

हे अँप डाऊनलोड केले असेल तर तिथल्या आपल्या प्रोफाइल मध्ये गेल्यावर 'ऍड कॉन्टॅक्ट' असा एक ऑप्शन येतो. तिथे आपल्या जवळच्या लोकांचे फोन नंबर नमूद करून ठेवले तर जेव्हा आपण पोलीस किंवा इतर कुठलेही पॅनिक बटन दाबतो तेव्हा या लोकांनाही एसएमएस जातो. ज्यांनी वोलेंटीयर म्हणून नोंद केलेली आहे त्यांनाही त्यांच्या भागातील लोकांचे एसएमएस जातात. हे एसएमएस लोकेशनसकट जातात. म्हणजेच संकटात असताना एकाच बटनात बऱ्याच लोकांना तुम्ही SOS पाठवता. त्यापैकी कुणीतरी नक्कीच मदतीला येऊ शकतो.

चांगली सोय आहे ही. अनेकांना मेसेज गेल्याने मदत नक्की मिळेल.
ही माहिती सुद्धा व्हाट्सएपवर टाकतो.

धन्यवाद साधना ताई. अॅप डाउनलोड केले. मैत्रिणिंना वाॅटसप फाॅरवर्ड पण केला लेख (तुमच्या नावासहीत).

प्रत्येक मोबाईलमधे sos ची सुविधा असते. पावर बटन तिन वेळा दाबल्यावर तुम्ही फिड केलेल्या नंबरवर तुमचे लोकेशन व मदत हवी आहे असा मेसेज जातो. मेडीकल इमरजन्सी, अपघात, इतर प्रसंगात उपयोगी आहे हे फिचर.

या मेसेजमधे लोकेशन सोबत तुमच्या वयापासून तुम्हाला असलेल्या ॲलर्जीपर्यंत, ब्लड ग्रुप वगैरे सर्व माहितीही पाठवली जाते. जेणेकरून मेडीकल हेल्प सहज मिळते.

आता वाचला लेख. न वाचताच मी धागा काढला होता. पण प्रत्येक मुलीकडे हे अॅप असावं. शाळांमध्ये देखील माहिती दिली जावी. लाखोंमध्ये अत्याचार करणारे एखाद दुसरेच असतात. पण त्यांची गाठ कुठे कशी पडेल हे सांगता येणार नाही. सावधानता हवीच. अॅस्थर अनुह्य्या अशीच बळी पडली होती.

Pages