मध्य प्रदेश प्रवास वर्णन

Submitted by मधुवन्ती on 2 December, 2019 - 02:19

maheshwar 1.JPG

मध्य प्रदेश ची सफ़र ठरली माझ्या मावस बहीणीच्या लग्नानिमित्त आणि त्याशिवाय थोडे भटकता देखील येइल असा विचार केला,
आमचा प्रवास इंदोर हुन सुरु आणि तिथुन संपणार असला तरी प्रत्यक्ष इंदोर मधे वेळ मिळणार नव्हता, इंदोर ला उतरुन आमच्या गाडीवान करपराम बरोबर उज्जैन ला प्रयाण केलं,मधेच टपरी वरचा अम्रुततुल्य चहा घेउन निघालो,चकचकीत फ़ोर लेन रस्ते आणि कमालीची स्वच्छता! मध्य प्रदेशची ही प्रतिमा मनात शेवटपर्यंत तशीच राहीली.आमचा ड्रायवर पण अवली प्राणी होता त्यामुळे त्याच्याबरोबर गप्पा मारत मारत उज्जैन ला कधी आलो हे कळले देखील नाही,महांकालेश्वर मंदीराच्या अगदी जवळच माधव सेवा न्यास समितीचे उतरण्याची व्यवस्था असलेले छान गेस्ट हाउस आहे,आम्हाला काही तासांसाठी रुम हवी असल्याने ती लगेच मिळाली पण इथे जास्त मुक्काम करायचा असल्यास आगाउ (म्हणजे आधीपासुन हा! पुण्यासारखे आगाउ नाही!) बुकिंग करणे जास्त बरे.
महांकालेश्वर मंदीरात फ़ोटोग्राफ़ी करण्यास बंदी असल्यामुळे काही घेउन जाण्याचा प्रश्न नव्हता,

महांकालेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि विशेष महत्वाचे कारण हे स्वयंभु आहे असे मानले जाते,
महांकालेश्वर मंदिर इतकं जुनं आहे की या मंदीराचे दाखले महाभारत आणि कवी कालीदासाच्या मेघदुतामधे सुद्धा उज्जैन नगरीची प्रशंसा करताना सापडले आहेत.

इथली भस्मारती खुप प्रसिद्ध आहे,असं म्हणतात की ही भस्म आरती बघणं एक अलौकिक अनुभव असतो परंतु आम्ही इतक्या लवकर तिथे पोहोचणारच नसल्याने ती आरती बघणं शक्य नव्हतं
महांकालेश्वर मंदीराच्या प्रांगणातच अजुनही काही शिव मंदीरं दिसतात,बाहेर पडताना व्रुद्ध महांकाल मंदीर दिसलं,महांकालेश्वरच्या नवीन मंदीरापेक्षा ही आजुबाजुची आणि व्रुद्ध महांकाल मंदीरं जास्त छान वाटली,
उज्जैन मधेच असलेल्या कालभैरव मंदीर परीसरात पोहोचलो आणि प्रसाद विकणारी दुकानं असतात तशी तिथे देशी दारु ची आणि विदेशी देखील दारुची दुकानं होती,दर्शनाला जाताना भाविक चपटी बाटली घेउन जाताना दिसले,प्रसाद पुजार्याकडे दिला की ती बाटली उघडुन एका ताटलीत थोडी ओतुन ती कालभैरवाच्या तोंडाशी टेकवली जाते आणि त्यातील ’प्रसाद’ कालभैरव ग्रहण करतात,उरलेला ’प्रसाद’ अर्थातच भाविकाच्या वाटेला!

ujjain 1.JPG

महादजी शिंदेंनी अर्पित केलेली पगडी घालुन शेंदुर फ़ासलेला हा कालभैरव उज्जैनी नगरीची ग्रामदेवता आहे.देवाला चढवलेली ’सुरा’ खरच कुठे जाते हे अजुन रहस्यच आहे पण ह्या मंदीराची भेट खुपच इंटरेस्टिंग होती खरी, जाता जाता एक भाविक म्हणाला, " गुरुजी आप ने प्रशाद वापस नही दिया," त्यावर गुरुजीं नी विचारलं "क्या था?" त्यावर त्याचं उत्तर होतं ब्लैक लेबल!
Unfortunately, आम्ही वाहण्यासाठी ’प्रसाद’ घेतला नव्हता!

ह्या अनोख्या मंदीराचं दर्शन घेउन आम्ही ओमकारेश्वराच्या वाटेने निघालो, आता पोटात कावळे कोकलायला लागले होते,परत एकदा इंदोर पार करुन ’बडवाह’ जवळ नर्मदा नदी पार करुन तिथल्या गोपाल वे मधे छानपैकी पोटोबा करुन पुढे निघालो,
नर्मदा मैयाची अशी काही रुपं आधीही बघितली होती,भेडाघाट ला खळाळणारी,भरुच ला शांत निवांत वाहणारी नर्मदा, गंगे एवढीच पवित्र नदी पुढचे दोन दिवस नर्मदाच विविध रुपात भेटत राहीली.
त्याक्षणीच नर्मदा परिक्रमा करण्याचं ठरवुन टाकलं.
ओमकारेश्वर ला परत एकदा एक झुलता पुल पार करुन ओमकारेश्वर मंदीरात पोहोचलो,हे मंदीर खरचच दुर्गम भागात वसलं आहे,कदाचित हा झुलता पुल नसताना नदी होडीने पार करुन मंदीरापर्यंत चढत जाण्याचाच पर्याय असला पाहीजे.एका डोंगराच्या कडेवर बसलेलं हे मंदीर सुद्धा बारा ज्योतिर्लिंगातील एक, मंदीर बंद होत आलं होतं त्यामुळे पटपट आत शिरलो

मी आत्त्ता पर्यंत बघितलेल्या ज्योतिर्लिंगांमधे हे वेगळंच होतं समोरुन अक्षरश: काचेने बंद केलेलं हे शिवलिंग पाण्याने कव्हर्ड होतं आणि भाविक बादल्या बादल्या आणुन ओतत होते....अभिषेक.... मंदिरात येताना गावगुंड जसे एखाद्या मुलीची घेड काढतात तसे तीन भगवे वस्त्रधारी बडवे,एका मोटरसायकल वर तीन जण समोरुन आले आणि....४०० रुपया देना,अभिषेक करवाते है! असं जवळपास धमकावल्यासारखंच बोलले होते अर्थातच त्यांना ठाम नकार मिळाला होता पण हा अजब अनुभव होता....
ओमकारेश्वराचं मंदीर प्राचीन आणि मुलत: सुरेख असावं पण त्याच्या आजुबाजुला बांधकाम लोकांच्या सोईसाठी म्हणुन जे काही केलं आहे त्याने मात्र त्याची रया गेली....मुळात शंकराची मंदीरं गावाबाहेर आणि शांत ठिकाणी काहीशी inaccessible असत,तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कष्ट पडल्याखेरीज पर्याय नसायचा,किंबहुना तसाच उद्देश असावा पण आताच्या जमान्यात आपण देवांनाही थेट accessible करुन टाकलं.
ओमकारेश्वर वरुन पलीकडे आल्यावर जवळच दिसतं मामलेश्वर मंदीर,इथे अनेक छोटी आणि ्दगडी सुरेख कोरीवकाम असलेली शिव मंदीरं आहेत, ही आता पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहेत,ही मंदीरं देखील अहिल्यादेवींच्या काळात बांधण्यात आली होती.

ह्याचं खरं नाव अमरेश्वर कदाचित नावाचा कालांतराने अपभ्रंश होउन हे नाव झालं असावं,बर्याच जणांच्या मते हेच खरं ज्योतिर्लिंग
अर्थात रुढार्थाने ओमकारेश्वर हे ज्योतिर्लिंग असल्यामुळे इथे अभिषेक करा म्हणुन पंडीतांचा त्रास नव्हता,
गर्दी नसल्यामुळे दर्शनही पटकन झालं.....
काही काळ तिथे घालवुन आम्ही निघालो आजच्या आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी....माहेश्वर!

माहेश्वर नर्मदा तीरावर वसलेलं एक टुमदार गाव जे माळवा प्रांताचं राजधानीचं स्थान होतं, याचं प्राचीन नाव ’माहिश्मती’ या गावाला एक वेगळं वलय प्राप्त झालंय ते इथल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या इथल्या वास्तव्यामुळे,
१८ व्या शताब्दी मधे होळकर राजघराण्याच्या स्नुषा अहिल्याबाईंनी येथे राज्य केले,
अहमदनगर जवळील ’चोंडी’ येथे जन्मलेल्या अहिल्याबाई विवाह पश्चात इंदोर जवळील माहेश्वर येथे आल्या, महाराज खंडेराव होळकर यांचा कुंभेर च्या लढाईत म्रुत्यु झाल्यानंतर त्यांच्या सासर्यांच्या मल्हारराव होळकरांच्या मार्गदर्शना खाली त्यांनी राजकारण समाजकारण याचे धडे घेतले आणि स्वतंत्रपणे राज्यकारभार पाहिला,अहिल्यादेवी शिवाच्या मोठ्या भक्त त्यामुळे त्यांनी जागोजागी शंकराची मंदीरं बांधली

माहेश्वर हातमाग कापडासाठी ५ व्या शतकापासुनच प्रसिद्ध आहे इथल्या माहेश्वरी साड्या तर सुप्रसिद्ध आहेतच...
संध्याकाळपर्यंत माहेश्वर च्या नर्मदा रिट्रीट मधे पोहोचलो,नर्मदा नदीकिनार्यावरच हे एम पी टुरिजम चे होटेल आहे, नर्मदा आरती पहायला जाण्याचा बेत होता,जवळ्पास विचारणा केली पण आरती बद्दल फ़ारशी कोणाला माहीती नव्हती त्यामुळे आम्ही देखील थोडे साशंकच होतो पण जाउन बघुया तर म्हणुन होळकर किल्ल्यातुन घाटावर पोहोचलो,अंधारात देखील वैभवशाली किल्ल्याच्या खुणा कळत होत्या, साधारण सात वाजण्याच्या सुमारास तिथे पोहोचलो, पण आरतीचा कुठेच मागमुस नव्हता,रुशिकेश ची गंगा आरती बनारसची आरती बघुन आरती बद्दलचा द्रुष्टीकोन जरा बदललाच होता.

थोडी शोधाशोध केल्यावर नर्मदा आरती रोज ८ वाजता होते असं कळलं,घाटावरच एक गुरुजी आरतीची तयारी करताना दिसले,८ वाजता आजुबाजुला जी थोडीफ़ार १२-१५ लोक होते त्यांच्यासकट आरतीला सुरुवात झाली,नर्मदेच्या सोज्वळ रुपाला शोभणारी कसलाही तामझाम नसलेली पण शांत आणि सुंदर आरती,पलीकडच्या तीरावरुन तरंगत येणारे हजारो दिवे आणि नर्मदे हर! असा गजर ह्रुदयावर कोरला गेला.
नर्मदेमधे आम्ही पण दिवे सोडले आणि घाटावरुन चालत जाता जाता पायर्यांवरुन ओम नम: शिवाssssय असा आवाज आसमंतात गुंजला आमचा महांकालेश्वराच्या दर्शनाने सुरु झालेला दिवस ह्या गर्जनेने संपला होता....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण इथे जास्त मुक्काम करायचा असल्यास आगाउ (म्हणजे आधीपासुन हा! पुण्यासारखे आगाउ नाही!) बुकिंग करणे जास्त बरे.>> उगीच पुण्याला नावे ठेवणे पटले नाही. बाकी वर्णन छान आहे.

सुंदर प्रवासवर्णन. यामुळे मी लहान असताना आम्ही केलेला उज्जैन आणि ओमकारेश्वर प्रवास आठवला. त्यावेळेस एम पी परिवाहनाच्या बसमधून सर्व प्रवास केला होता त्यामुळे खुप हाल झाले होते. परत रस्ते पण एकदम खराब होते. अशावेळेस इंदोर बस स्थानकात आपली एस टी दिसल्याने खुप बरे वाटले होते. पण आता परिस्थिती सुधारली दिसतेय. पण ओमकारेश्वरला इतकी गर्दी आणि पंडे लागले नव्हते. हे काही तरी नविन दिसते आहे.

मस्तच.

शाळेत असताना मावशीकडे गेलेलो नागद्याला, तिथून उज्जैनला गेलो होतो, महाकांळेश्वर बघितलेलं. आता मावशी इंदोरला रहाते पण मी गेले नाहीये अजून. ओंकारेश्वरला नव्हतं जाणं झालं तेव्हा.

उज्जैन तेव्हा फार नव्हतं भावलं, जरा बकाल वाटलेलं. नागद्याचा मावशी रहात होती तो बिर्लाग्राम भाग सुरेख असल्याने जास्त जाणवलं असावं तेव्हा उज्जैनबाबत.

मागच्या महिन्यात होतो महांकाळेश्वरला भस्मारती वगैरे मार्केटिंग असावं . सकाळी जाऊ नका. चार वाजल्यानंतर जाणे उत्तम.

ओंकारेश्वर : देउळ उंचावर आहे. पूलाजवळच्या पार्किंगला कोणते वाहन आहे ते वरूनच दिसते. लगेच पंडे हजर होतात. आम्ही गेलो सकाळी साडेसातला चालत. कोणीही नव्हते. पंडे अमच्यासारख्यांना ओळखून असतात. आम्ही भाविक न दिसतो पर्यटक वाटतो. ढुंकूनही पाहात नाहीत.
अभिषेक : शंकर नर्मदा नदीच्या एवढ्या जवळ राहतो तर तो दोनचार वेळा अंघोळ करून येणार नाही का? आपण कशाला अभिषेक करवायचा?