जग सारे सुंदर व्हावे ?

Submitted by बिपिनसांगळे on 28 November, 2019 - 03:53

जग सारे सुंदर व्हावे ?
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आज शाळेचा पहिला दिवस होता. अंजली खुशीत होती. तिला मुलं आवडायची. ती एसटीमध्ये बसली होती. बसायला जागा मिळाली तसे तिने डोळे मिटले. तिच्या डोळ्यांपुढे निधीचा चेहरा होता. निधी, तिची मुलगी. नुकताच पहिला वाढदिवस झालेली. नाजूक अन गुटगुटीत.
एसटी थांबली. ती शाळेत निघाली. स्टॅन्डपासून शाळा पंधरा- वीस मिनिटांच्या अंतरावर होती . ढग यायला लागलेले. पण पाऊस नव्हता.
छोटीशी शाळा. पुढे पटांगण असलेली .छान होती. आज फुललेली. अवती भोवती रंगीबेरंगी पताका लावलेल्या होत्या.
शाळेत आज पहिला दिवस म्हणून कार्यक्रम होता. स्थानिक पुढारी प्रमुख पाहुणे होते. त्यांचं भाषण , त्यांचं स्वागत , मुलांची गाणी आणि त्यांना खाऊ. असा छोटेखानी कार्यक्रम होता.
गाव छोटं. पुढारी आले . त्यांचं ढोल - ताशे वाजवून स्वागत करण्यात आलं. मग मुलांनी स्वागतगीत म्हणलं, अंजलीच्या मार्गदर्शनाखाली. पुढारीसाहेबांचं लक्ष राहून राहून तिच्याकडे जात होतं. ती होतीच तशी आकर्षक अन स्मार्ट. क्रीम कलरची चापून चोपून नेसलेली साडी . पदर अंगाभोवती गुंडाळून घेतलेला असला तरी लक्ष वेधून घेणारी . अगदी तरुण अन सुंदर चेहऱ्याची .
खादीच्या कडक पांढऱ्या कपड्यातले पुढारी साहेब आडवेतिडवे अन उंचेपुरे होते. नजर बेरकी. अन गळ्यात ,हातात सोनसाखळ्या , पाहणाऱ्याला दबायला लावणाऱ्या .
पुढारीसाहेबांचं भाषण झालं. कार्यक्रम संपला.

***

वर्ग सुरु झाले. अंजलीला चौथीचा वर्ग आला होता. काही मुलं तिला माहिती होतीच; पण काही मुलं - मुली तिच्यासाठी नवीन होती.
ती म्हणाली,”आपण आज एक नवीन प्रार्थना म्हणू या . चालेल ? “
मुलं खुश झाली . हो म्हणाली.
ती तिच्या गोड आवाजात प्रार्थना म्हणू लागली. तिच्यामागे मुलं.
माणसाने माणसाला जाणावे
प्रेम द्यावे प्रेम घ्यावे
जग सारे सुंदर व्हावे

***

दुसऱ्या दिवशी वर्गात अंजलीने विचारलं,” कालची प्रार्थना कोण म्हणेल ?”
सारी मुलं ओरडली “ आम्ही !”
“ अंहं ! तसं नाही, पुढे येऊन .”
सगळी मुलं गप्प झाली. पुढे कोणालाच यायचं नव्हतं. सगळे एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले.अंजली परत म्हणाली ,” अरे , घाबरू नका. बोला कोण येतंय पुढे ?”
त्यावर श्रेया उठली. सावळीशी पण चुणचणीत मुलगी. तिचा आवाज गोड होता, चांगला होता. ती प्रार्थना म्हणू लागली . मुलं तिच्यामागे. तिने ती प्रार्थना एका दिवसात पाठ केली होती .

***

वर्ग सुरु व्हायचा होता . मुलं वर्गात जमलेली. एका मुलीने श्रेयाचं दप्तर फेकलं.
“ का फेकलंस माजं दप्तर ? “ श्रेया म्हणाली.
“माकडे ! बाईंची लय लाडकी गं तू .”
“ मंजी ? म्हणून जळतीय व्हय तू ? आगं , तूबी तशी वाग. बाई तुलाबी माया करतील . आपण प्रार्थना म्हणतो ना - प्रेम द्यावे प्रेम घ्यावे , मग ? ते कशासाठी ? “
“ हो गं बाई ! बाई तुलाच प्रेम देतात अन तूच प्रेम घेते ! “ ती पोरगी म्हणाली .
तिच्या वाक्यावर श्रेयावर जळणाऱ्या इतर मुली फिदीफिदी हसल्या .
अंजली वर्गात आली तशी मुलं चिडीचूप झाली. आपण येण्या आधी मुलांचं काय चाललं होतं , ते तिला कळलं नाही . पण आता श्रेया आता तिची लाडकी विद्यार्थिनी झाली होती खरी . छान मुलगी होती . गोड , हुशार , समजूतदार .

***

रात्र झालेली . श्रेया आईला म्हणाली , “आये , मला जिलबी पाहिजे खायाला . “
त्यावर तिची आई ओरडली . पण बा म्हणाला , “श्रेया ,तुला खाऊ पायजे ना , पण मी नाय आणणार , तू जा अन घेऊन ये . मी लै दमलोय गं बाई . “
बापाची लाडकी लेक होती ती . बाने दिलेले पैसे घेऊन ती निघाली . वाटेत लाईटचा एकुलता एक खांब होता अन त्याचा अंधुक प्रकाश .
वाटेत तिला एक गाडी आडवी आली . पुढाऱ्याचं पोरगं अन त्याचे मस्तवाल मित्र लांबच्या एका ढाब्यावर दारू पिऊन परतत होते . त्यांच्या अंगात गुर्मी , पोटात दारू अन डोक्यात सैतान होता !...
पुढाऱ्याचं पोरगं आडदांड अन फालतू रुबाब झाडणारं होतं.सगळं आपल्याच बापाची प्रॉपर्टी मानणारं .
त्याला श्रेया दिसली अन त्याची नियत खराब झाली !...
तो म्हणाला , " ए . उचला रे हिला ."
त्यांनी छोट्या श्रेयाला उचललं अन ते आडबाजूला गेले .
पुढचं सगळं त्या पोरीच्या कळण्याच्या पलीकडचं होतं , सहन करण्याच्या पलीकडचं होतं.
पोर घरी आली नाही म्हणून तिची माय शोधायला निघाली तेव्हा ती सापडली . आडबाजूला एका खड्ड्यात. थोड्याशा पावसाने ओलसर झालेल्या मातीत .

***

अंजली एसटीत होती. तिच्या डोळ्यांपुढे निधीचा गोड चेहरा होता, तर कानात तिचे आज ऐकलेले पहिले बोल. पहिले बोबडे बोल ! आणि त्यावर आनंदचे कौतुकाचे बोल - गोड गोड आईची गोड गोड पोरगी ! … नंतर त्याने पोरीचा एक गोड पा घेतला होता अन तिच्या आईचासुद्धा . ती स्वतःशीच हसली .
अर्ध्या तासाचा प्रवास. एसटी थांबली. ती शाळेत पोचली . आज शाळेत काहीच गडबड दिसत नव्हती . सारा मुक्याचा कारभार.तिला काही कळेना.
आज वर्गात श्रेया दिसत नव्हती.
मग दुसऱ्या बाईंनी सांगितलं , “ श्रेयावर काल बलात्कार झालाय, गँगरेप ! ... “
शाळेत आज तीच चर्चा चालू होती , पण कुजबुजत .
अंजली हादरलीच, तिला कसंतरी वाटू लागलं , कसंतरी होऊ लागलं , तिला शाळेत थांबवेना. तिचं आज शिकवण्यात लक्षच लागेना.
ती दुपारी जेवायच्या सुट्टीत श्रेयाच्या घरी निघाली. ती तिच्या गावातल्या त्या साध्याशा घरापाशी पोचली.
“ श्रेया, “ तिने हाक मारली.
ओ आली नाही. शेवटी तीच आत गेली .
आत भिंतीला टेकून तिचा बाप बसला होता. गावातला एक साधा मजूर , काळसर, दाढीचे खुंट वाढलेला . मूळचा दीनवाणा चेहरा अजूनच दीनवाणा झालेला.
एका बाजूला तिची एकदम सडपातळ आई आणि आईला चिकटलेली , जमिनीवर वेडीवाकडी झोपलेली श्रेया. तिने नजर उचलून बाईंकडे पाहिलं. परत नजर खाली करून आईला चिकटून ती खाली पडून राहिली.
रात्रीपासून त्या तिघांच्या पोटात अन्नाचा एक कण गेलेला नसावा ...
कोणीच काही बोलेना. श्रेयाला पाहून अंजलीला रडूच आलं . मग तिची आई एकदम मोठ्याने हुंदका देत म्हणाली,” नशीब फुटलं गं माय माझं , माज्या पोरीला नासवलं मेल्यानी !”
“मग तुम्ही पोलिसांकडे गेलात का नाही ?”
त्यावर पुन्हा शांतता .
“ अहो कंप्लेंट द्या , कारवाई होईल.”
त्यावर बापाने हात जोडले, “ अब्रू गेली , जाऊ द्या, पर आता जीवबी जाईल.”
अंजलीच्या लक्षात आलं. ती उठली. तिने श्रेयाच्या पाठीवर हात ठेवला. तर ती हात घट्ट धरून हमसाहमशी रडायला लागली. तिच्या केसांच्या झिंझ्या झाल्या होत्या.गालावर माराचे वळ होते.... तिच्या डोळ्यांतला चुणचुणीतपणा विझला होता.
अंजली शाळेत परत फिरली. पण तिला राहवेना. ती बाकी शिक्षकांशी , बाईंशी बोलली.
“ श्रेयाचे आई-वडील तक्रार करणार नाहीत. गरीब आहेत बिचारे. पण हा अन्याय आहे. आपण तक्रार करू.”
त्यावर सगळ्यांनी तो विचार सोडून द्यायला सांगितलं . त्याच्या मागचा अर्थ तिला लक्षात आला.
ती एका बाईंना म्हणाली ,” इथं दाद लागणार नसेल तर मी पुढे जाईन , या प्रकरणाला वाचा फोडीन .आनंद एका समाजसेवी संस्थेचा कार्यकर्ता आहेच . “
बातमी ज्यांच्यापर्यंत जायची होती त्यांच्यापर्यंत गेली होती.
***

संध्याकाळी ती घरी निघाली. ती अस्वस्थ होती.
अचानक एक स्कॉर्पिओ थांबली अन चार धटिंगण उतरले. गळ्यात, हातात सोनसाखळ्या घातलेले. त्यांच्या तोंडाला घपाघप वासही येत होता. त्यांनी तिला बळजबरीने गाडीत कोंबले. गाडी सुसाट निघाली. साहेबांच्या फार्म हाऊसच्या दिशेने . गावापासून लांब , एकांतात. फार्म हाऊस मोठं होतं . आतल्या काळ्या गोष्टी लपवणारं- पांढऱ्या रंगाचं .
तिला साहेबांच्या बेडरूममध्ये नेऊन बेडला बांधण्यात आलं. हा ता -पायांसहित . तिचं तोंड आधीच बांधलेलं होतं. तोंडात रुमालाचा बोळा कोंबलेला.
त्या खोलीची सगळी दारं - खिडक्या बंद असल्यानं ती पुरती घामाघूम झाली अन भीतीनेही .
बेडरूम मोठी होती.सुंदर रंगवलेली ,सजवलेली, मखमली पडदे असलेली. एका कोपऱ्यात एक फुलदाणी होती. त्यामध्ये खरी फुलं होती. पण आता कोमेजलेली. एका कोपऱ्यात एका रोमन योध्द्याचा पुतळा होता.
ते सगळे धटिंगण गेले . अंजली पडून राहिली . पुढे काय वाढून ठेवलंय याचा विचार करत.
गाडी गेल्याचा आवाज आला. सारं शांत झालं . अंजली कानोसा घेत होती .पुन्हा एक गाडी येण्याचा आवाज आला.
साहेब आले होते .
“ काय गं भवाने, कंप्लेंट करते ? हां ? तेबी आमच्या विरुद्ध ?...... पोरगं येडं आहे. कुठं हात घालायचा तेबी कळत नाही. आमच्याकडून शिकायला पाहिजे !” साहेब गुरकावले .
साहेब जवळ आले. त्यांच्या तोंडाचा भपकारा येत होता. दारू अन परफ्यूमचा वास मिसळून एक वेगळाच वास येत होता त्यांच्या अंगाला .
त्यांनी तिच्या कपड्यांना हात घातला.
ती क्षणभर बधिर झाली . साहेबांनी तिच्या तोंडाजवळ तोंड नेलं आणि - त्यांचं डोकं फिरलं.
तिचं तोंड बांधलेलं होतं . त्यांनी तिचं तोंड सोडलं . तोंडातला रुमालाचा बोळा काढला.
अंजली ओरडली , “ नको - नको . मला सोडा . “
“ नको ? - हिथं आम्ही करू तेच खरं . कोण बेणं आम्हाला आडवं येतंय ? हिथं आमची सत्ता अन आमची मर्जी ! “
मग उत्तेजित होऊन त्यांनी तिचे हात-पायही सोडले.
त्यासरशी अंजलीने त्यांना मागे ढकललं. साहेब मजबूत होते , एरवी तिला ते जमलं नसतं. पण प्यायलेल्या साहेबांचा तोल गेला व ते धाडदिशी खाली पडले. तरी ते उठले व उभ्या असलेल्या तिच्या अंगावर आले . तिला एक कचकचीत शिवी घालत . आता त्यांचा चेहरा भेसूर दिसत होता , त्यांचा पशु झाला होता . बरं -वाईट न कळणार एक पशु !
ती एका कोपऱ्यात सरकली. तिच्या धक्क्याने तो योध्द्याचा पुतळा खाली पडला आणि त्याच्या हातातला भालाही-- खणखणत !
तिने झटक्यात तो भाला उचलला व तिरमिरीत, त्वेषाने साहेबांच्या छातीत खुपसला. साहेब पुन्हा खाली पडले. छातीवर हात धरून . पाय झाडत…विचित्रसे विव्हळत.
त्यासरशी तिच्या तोंडातून किंचाळी बाहेर पडली .
पण नंतर ती भानावर आली व बाहेर पडली.
बाहेर अंगणात फॉर्च्यूनर गाडी उभी होती . ड्रायव्हर जागेवर बसला होता. त्याने बाहेर येणाऱ्या अंजलीला पाहिलं. तिच्याकडे पाहत तो गप्प बसून राहिला. त्याला साहेबांचे असले धंदे अजिबात आवडत नसत. तो त्यांचा मनोमन तिरस्कार करत असे.
रात्रीच्या अंधारात अंजली पळाली. फार्म हाऊस वर तो सोडता कोणी नव्हतं , त्याने तिला पळू दिलं . नंतर तो काहीतरी कारण सांगणारच होता , तिला न धरता आल्याचं . मग तो आत गेला.
साहेब मेले होते !
त्याला ते दृश्य पाहून मात्र धक्का बसला आणि बरंही वाटलं.

***

पुढे अंजलीला पोलिसांनी पकडलं. कोर्टात केस उभी राहिली.
अंजली बोलत होती -
“ जजसाहेब, मी एक शिक्षिका आहे. आम्ही मुलांना चांगलं शिकवायचं तर आज माझ्याच हातून खुनासारखा गुन्हा घडलाय. पण तो का घडला , हे कोणी जाणून घेईल ?...
श्रेया माझी विद्यार्थिनी. तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला. त्याची तक्रार केली गेली नाही . कारण ? - न्याय मिळणार नाही म्हणून ! . अब्रू गेली पण तक्रार केली तर जीवसुद्धा जाईल म्हणून ! ती तक्रार करण्याचा मी विचार केला म्ह्णून मलाही त्याच प्रसंगाला सामोरं जावं लागलं. आम्ही मुलांना काय शिकवणार ? अन्याय सहन करत राहा म्हणून ?
मलाही मुलगी आहे. एकदम छोटीशी , जिला आज मी दुरावले आहे , या सगळ्या प्रकरणामुळे. माझ्यातल्या आईला आज अशी भीती वाटते की तीही पुढे या असल्या गलिच्छ वातावरणात वाढणार आहे . अन मग तिच्या वरही असा प्रसंग येऊ शकतो ... मग मुलींना जन्मच द्यायचा नाही की काय ?
आपल्या देशात स्त्री सन्मानाची परंपरा आहे. पण मग बलात्काराची परंपरा का संपत नाही ? का होतात बलात्कार ? की आम्ही शिक्षक मुलांना शिकवण्यात कमी पडतोय ? की मुलांच्या आया ? समाजाने त्याचा विचार करण्याची वेळ आलीये .
मुलींची भ्रूणहत्या रोखण्यासाठी आपण प्रयत्न करतो , कशासाठी ? - त्या जन्माला येऊन ,पुढे जाऊन लांडग्यांची शिकार होण्यासाठी ?... मी तो भाला कुठल्या एक नराधमाच्या नाही; तर समाजाच्या दुटप्पीपणाच्या छातीत खुपसलाय असं मला वाटतं !
आम्ही शाळेत मुलांना प्रार्थना शिकवतो - जग सारे सुंदर व्हावे ! - पण - हे शब्द फक्त प्रार्थनेतच उरणार असं वाटायला लागतं . खरंच - कधी होणार हे जग सुंदर ?...
अंजली बोलत होती ...
***
केस चालू आहे . तिचा निकाल लागेपर्यंत अजून बरेच बलात्कार होत राहतील अन पुढेही ...
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अशा कितीतरी केसेस चालू आहेत. पुढे काय ? हा एक अनुत्तरीय प्रश्न आहे.... ज्याचे उत्तर कोणाकडेच नाही.
अशा प्रसंगी पण पालक शांत का राहतात तेच समजत नाही...मुली पेक्षा याना घरच्या इज्जतीची जास्त पडलेली असते.

- शब्दाला शब्दाने आणि काठीला काठीने प्रहार हेच उत्तर असले पाहीजे .
- विषय आवडला.

Cuty+११
कथा वाचताना डोळ्यांच्या कडा कधी पाणावल्या कळाल नाही..

कथा चांगली लिहिली आहे... समाजाची काळी बाजू दाखवली आहे..ह्यातून बाहेर पडण्याचा छोटा प्रयत्न म्हणजे सगळ्यांनी आपल्या घरातील मुलांना लहानपणापासूनच स्त्रियांचा आदर करणे शिकवणे...त्या एक त्यांच्यासारखाच माणूस आहेत वस्तू नाही हे शिकवणे आणि मुलींना धाडसी बनवणे

थोडे अवांतर आहे पण तरीही राहवत नाही म्हणून,,,
सगळ्यांनी आपल्या घरातील मुलांना लहानपणापासूनच स्त्रियांचा आदर करणे शिकवणे>>>>हे कधी होणार काय माहीत?कालच एका बाईचं बहुतेक तिच्या आईसोबत फोनवर बोलणे चालू होते ते ऐकले ,ते असे की,"मी तर बंटी ला नेहमी सांगते ,तुला बहीण नाही न मग ममा ला तूच हेल्प केली पाहिजेस"........म्हणजे, काय?उद्या बंटी ला बहीण झाली तर त्याने घरकामात मदत नाही करायची का??? Angry
जोपर्यंत बायका स्वतः हे स्वीकारत नाहीत की घरकाम शिकणे हे मुलगा मुलगी दोघांच्या स्वावलंबी शिक्षण साठी तितकेच आवश्यक आहे तोपर्यन्त समाजात सुधारणा होऊ शकेल का???

आता बायकानीच का स्वीकारावे असं विचारू पण नये कोणी,कारण नवरा काम करायला तयार असताना,,बरं दिसत का ते मी असताना तुम्ही केर/भांडी/कपडे etc etc काम करणं,/ठेवा ठेवा मी जिवंत आहे अजून,/लाज आहे मला हो /लोकं शेण घालतील माझ्या तोंडात ब्ला ब्ला ब्ला.....अशी खूप वाक्य मी अजूनही आजूबाजूला ऐकली आहेत

कथा लिहून झाली .
अन नंतर दोन दुर्दैवी बातम्या आल्या .
एक-हैद्राबाद केस - अतिशय वाईट अन क्रूर
दोन- आजच्या मटा मधली बातमी . पिंपरी , पुणे इथे दर दिवसाआड बलात्कार होतो .
पुढे .....
?????????????/

khupch vidarakpane mandlay.
ajun ase kiti rape honaret ky mahit?
sarkarane saral fashichi shiksha dyayal havi.

कथा चांगली असेल असे प्रतिक्रियांवरून कळते. पण शीर्षक असे काय दिले असे अर्धवट??? जग सारे काय? निरर्थक शीर्षकाचे लेख वाचायला होत नाही. कृपया शीर्षक ठीक करा.

चांगली शैली आहे लेखनाची....खरच सुन्न व्हायला होत अशा बातम्या ऐकून....मुली सुरक्षित नाहीत या देशात हेच खर आहे.

परिचित
आभारी आहे
शीर्षक बदलले आहे

कथा लिहिताना खूप संयम ठेवून लिहिली आहे
लेखन स्वातंत्र्य आहे म्हणून वाटेल ते लिहिता नाही येणार
पण
आतून हलायला होतं
यानंतर ही किती घटना घडल्या ! ...