'छत्रपती शिवाजी महाराज' असे पूर्ण नाव घेणे ही जबरदस्ती आहे का?

Submitted by हरचंद पालव on 28 November, 2019 - 02:37

सर्वप्रथम हे मान्यच करायला पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यांचे चरित्र अतुलनीय आहे. इतिहासात एक द्रष्टा राजा, कुशल राज्यकर्ता, सेनापती, संघटक, शककर्ता, प्रजाहितदक्ष; इतकेच काय - सिंहासनाधीश्वर, प्रौढप्रतापपुरंधर, राजाधिराज - अशी कितीतरी विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील. त्यांच्या विषयी लिहिताना रामदासस्वामीं पासून ते आजपर्यंत कित्येक इतिहासकार, कादंबरीकर, नाटककार, चित्रपटकथालेखक यांची लेखणी थकली तरी त्यांचे संपूर्ण वर्णन लिहायला ती अपुरीच पडेल इतके उत्तुंग व्यक्तिमत्त्व! त्यामुळे महाराजांबद्दल आदर आहे हे सांगायला लागायची किंवा त्यासाठी कुठला पुरावा देण्याची गरज निदान मराठी माणसास नसावी.

आता हे सर्व असताना नुकत्याच काही घडामोडींमुळे त्यांच्या नावाचे संबोधन चर्चेत आले आहे. अमिताभ बच्चन काम करत असलेल्या कौन बनेगा करोडपती कर्यक्रमात एकीकडे 'मुघल-सम्राट औरंगजेब' असा उल्लेख असताना त्याच खाली केवळ 'शिवाजी' हा उल्लेख करणं हे अपमानास्पद वाटते हे खरेच! त्याबद्दल त्यांचा निषेध. परंतु हे लक्षात घ्यायला हवे की इथे अपमान हा संबोधनाच्या तुलनेतून निर्माण झाला आहे. इतर ठिकाणी स्टँड-अलोन उल्लेख असेल तर 'शिवाजी' म्हणणं तुम्हाला चुकीचं वाटतं का? असेल तर पुढे काही प्रश्न निर्माण होतातः

१. भोंडल्यामध्ये 'शिवाजी अमुचा राजा..' ह्या गीतात बदल करावेत का? इथे गाणारे महाराजांना प्रेमाने 'शिवाजी' म्हणतात, त्या प्रेमाचे काय? प्रेमापेक्षा आदर कायम मोठाच असतो का? ते ठरवणे व्यक्तिसापेक्ष असायला हवे ना?
२. लहानपणी 'शिवाजी म्हणतो' हा खेळ खेळायचो, त्यात महाराजांचा उल्लेख एकेरी असला तरी कधी अनादर वाटला नाही, किंबहुना तसे कधी डोक्यातही आले नाही. त्याचे काय?
३. शिवाजी महाराजांचा आदर सर्वांनी ठेवावा - ही जबरदस्ती आहे का? एखाद्याला नसेल वाटत, तर आपण तो आदर त्या/तिच्यावर लादावा का?
४. वरचे उत्तर होय असेल तर मग एखादा म्हणेल की त्याच्या मते चंद्रगुप्त मौर्य सर्वश्रेष्ठ आहे. मग चंद्रगुप्ताचा 'सम्राट चंद्रगुप्त मौर्य महाराज' किंवा अशोकाचा उल्लेख 'सम्राट अशोक महाराज' आणि अशोकचक्राचे नाव 'सम्राट अशोक महाराज चक्र' असे करावे - ही सक्ती केली तर चालेल का? झाशीची राणी - असा एकेरी उल्लेख तरी मग का करायचा? झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई - असे संपूर्ण नाव घ्या.
५. अनेक इतिहासकार इतिहास लिहिताना प्रत्येक व्यक्तिबद्दल केवळ एक ऐतिहासिक व्यक्ति म्हणून भावनिक न होतासुद्धा लिहू शकतात. त्यामुळे सरदेसाई काय, किंवा गोविंद पानसरे काय - त्यांनी 'शिवाजी कोण होता' - असे एकेरी उल्लेख केले असले तरी फक्त त्या संबोधनावर न जाता त्यांनी उलट त्यांच्याबद्दल काय मोठे संशोधन समोर आणले आहे - ते योगदान जास्त महत्त्वाचे नाही काय?
६. मला आठवते की लहानपणी एका इतिहासप्रेमी (परंतु कर्माने केवळ गुंडगिरी करणार्‍या) माणसाने दटावले होते की 'महाराज आपल्या सर्वांच्या कित्येक पिढ्यांसाठी आदरस्थानी आहेत. त्यांना नुसते शिवाजी काय म्हणता? घरी वडिलांना पण अरे-तुरे करता का?' आता आम्ही कुणी अरे-तुरे करत नव्हतो हे खरे; पण आज-कालची मुले वडिलांना अरे-तुरे खरोखरच करतात, पण त्यामुळे कुठेही आदर कमी झाला आहे असे वाटत नाही. फक्त 'अहो जाहो' म्हटल्याने आदर दाखवला जातो आणि 'अरे-तुरे' केल्याने आदर राहत नाही - हे सरसकटीकरण नाही काय?

तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

माझ्या मते सार्वजनिक जागेचे अथवा वास्तूचे नामकरण करायचे असल्यास ते सोपे आणि सुटसुटीतच असावे. नावाआधीच्या पदव्या, बिरुदावली त्यात नसावी. उदा.मुंबईत दर दीड मिनिटाला एक रेलगाडी येते जाते. त्या दीड मिनिटात गाडीसंबंधी उद्घोषणा तीन भाषातून करायची असते. "प्लॅटफॉर्म क्रमांक तीन की लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जानेवाली जलद गाडी है. यह गाडी कल्याण, ठाणे, घाटकोपर, कुरला, दादर इन स्थानकों पर रुकेगी. बाकी स्थानकों पर नही रुकेगी." हे खूप भराभर उच्चारावे लागते. लोकांचा गोंधळ उडतो. तसेच रेल्वे, बस इत्यादींवर लांबलचक पाटयांसाठी पुरेशी जागा नसते. मग महारानी ल.चौक अशी कसरत करावी लागते. कारण महारानी वगळलं तर अनादर होणार. त्यापेक्षा लक्ष्मीबाई वगळलेलं बरं.
या वास्तूंच्या प्रवेशभागात एक शिला बसवून त्यावर बिरुदावलीसह नामोल्लेख करता येईल.

माझ्या मते सार्वजनिक जागेचे अथवा वास्तूचे नामकरण करायचे असल्यास ते सोपे आणि सुटसुटीतच असावे. नावाआधीच्या पदव्या, बिरुदावली त्यात नसावी. उदा.मुंबईत दर दीड मिनिटाला एक रेलगाडी येते जाते. त्या दीड मिनिटात गाडी संबंधी उद्घोषणा तीन भाषातून करायची असते. "प्लॅटफॉर्म क्रमांक तीन की लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली जलद गाडी है. यह गाडी कल्याण ठाणे घाटकोपर, कुरला, दादर इन स्थानकोंपर रुकेगी. बाकी स्थानकोंपर नही रुकेगी." हे खूप भराभर उच्चारावे लागते. लोकांचा गोंधळ उडतो. तसेच रेल्वे, बस इत्यादींवर लांबलचक पाटयांसाठी पुरेशी जागा नसते. मग महारानी ल.चौक अशी कसरत करावी लागते. कारण महारानी वगळलं तर अनादर होणार. त्यापेक्षा लक्ष्मीबाई वगळलेलं बरं.
या वास्तूंच्या प्रवेशभागात एक शिला बसवून त्यावर बिरुदावलीसह नामोल्लेख करता येईल.>>>>>> हीरा तुमच्या अख्ख्या पोस्टला अनुमोदन.

https://www.youtube.com/watch?v=3MHrRu4soUA ----> एक वाक्य फक्त ऐका यातलंं! फार काही नको...

"हिं आणि दू ही दोन अक्षरे आज अस्तित्वात आहेत ती फक्त शिवाजी महराजांमुळेच!!"

पण 'छत्रपती शिवाजी महाराज' या नावाचं राजकारण करून....स्वत:लाच छत्रपति मानून दादागिरी करणार्‍यांची संख्या आज जास्त झालीय हे दुर्दैव!! आणि रामदासांना शिवाजी महाराजांचे गुरू म्हणून नव्हे तर... रामदास स्वामींच समूळ अस्तित्वच नाकारणार्‍या काही प्रजाती घड्याळ रावांच्या अतिशय हीन पातळीवरच्या राजकारणातून जन्माला आल्या... गांधीवधानंतर पुन्हा जन्माला आल्या...

हे या राष्ट्राच दुर्दैव!!
@रावी यांच्या मताशी 70 टक्के सहमत "शिवाजी महाराज" यात उलट जास्त प्रेम आहे...आणि "राजं!" या शब्दात तर त्याहून जास्त प्रेम आहे!
आपलंं राजं !!

इथे न आलेला एक मुद्दा मी मांडायचा प्रयत्न करतोय आणि त्या द्रृष्टीने यावर विचार व्हावा असे वाटते.
जेव्हा कधीही मी परक्या समाजातील किंवा राष्ट्रातील कर्तबगार व्यक्तिंबद्दल त्या समाजातील लोकांसमोर किंवा इंटरनेट वर बोलतो अथवा लिहीतो तेव्हा त्यांच्या नावांची , त्यांना दिलेल्या उपाध्यांची माझ्याकडून मोडतोड होणार नाही हे कटाक्षाने पहातो. आणि मला वाटते हा नियम प्रत्येकाने पाळायला हवा.आपल्या मनात असलेला आदर कपाळावर लिहीलेला नसतो ना ,तेव्हा उगीच कुणाला अर्थाचा अनर्थ करायला आणि गैरसमज व्हायला वाव का द्या?

आणखी काही बोलावेसे वाटते, आपल्या वडिलांना आपण कदाचित खासगीत एकेरी बोलू, पण मित्राच्या वडिलांना मित्रासमोर आणि सर्वांसमक्ष नावाने संबोधनं टाळायला हवं...भले कितीही प्रेम उतू चालले असले तरीही...आणि हो आपल्या वडिलांचा ही उल्लेख किमान सर्वांसमोर तरी आदरानेच करायला हवा.

आणि हो आपल्या वडिलांचा ही उल्लेख किमान सर्वांसमोर तरी आदरानेच करायला हवा.
>>>>

एकेरी उल्लेखातही आदर असू शकतो

अहो जाहो उल्लेखाला आपल्या व्याकरणात आदरार्थी उल्लेख म्हणतात त्यामुळे घोळ झालाय सगळा. लोकांना त्यातच आदर दिसू लागलाय. आणि एकेरी उल्लेखात आदराचा अभाव जाणवू लागलाय.

आणि हो, मी माझ्या वडिलांना वीसबावीस वर्षांचा घोडा होईपर्यंत एकेरीच हाक मारायचो. मग का माहीत नाही अहो जाहो सुरू केले. जे उगाच केले असे आज जाणवतेय.
असो, हे वडिलांचे उदाहरण दिले म्हणून म्हणालो.

शिवाजी महाराजांच्या वादात मला पडायचे नाहीये खरे तर. कारण तो वाद त्यांचा राजकारणासाठी वापर करायला उगाचच लोकांना स्पेशली युवा वर्गाला चिथवून अस्मिता जाग्या करायच्या प्रकारातला आहे. त्या जाग्या झाल्या की मग यालाच निवडणूकीचा एक मुद्दा बनवायचा. म्हणजे ईतर मूळ जनकल्याणाचे मुद्दे राहिले बाजूला.

अरे आपल्या बापाचा आपण आदर केला पाहिजे आणि तो कसा केला पाहिजे हे आता दुसरा कोणी आपल्याला सांगत असेल तर त्याचा हेतू तिथेच ओळखावा आणि त्याला आपले काम करायला सांगावे. आणि आपण लहानपणापासून महाराजांचा ज्या वेळी ज्या परीस्थितीत जसा एकेरी दुहेरी शिवाजी, शिवबा, महाराज, छत्रपती वगैरे उल्लेख करत आलो आहोत तसे करत राहावे.

आपल्या वडिलांना आपण 'माझा बाप' असं बोललं तर अनादर ना ही होणार कदाचित पण दुसर्या कुणाच्या वडीलांना 'तुझा बाप' असं बोलणं नक्कीच आदराचा अभाव दाखवून देतो...इथे बोलणारी ती मुलगी हिंदी भाषिक होती याकडे माझ्या तुलनेचा स्पष्ट रोख आहे...

शिवाजी महाराज हे काही मराठी भाषिकांपर्यंतच मर्यादित नाहित, त्यामुळे हिंदी भाषिक देखिल त्यांना 'माझा बाप' म्हणूच शकतात की!

जरी तसे ते नसले तरी 'महाराष्ट्रीयन' अस्मितेत जेवढे योगदान महाराजांचे आहे, तेवढे देशातील इतर कोणत्याही प्रांतिक अस्मितेत नक्किच नाही...माझ्या कमेंट मधे 'आपला बाप' आणि 'दुसर्याचा बाप' उपमा त्याच अर्थाने वापरल्या आहेत.

आता ह्या बाबतीत प्रांतिक अस्मिता वगैरे गोष्टी फार विचित्र आहेत. कारण शिवाजी महाराजांना आपणच प्रांतिक अस्मितेत बंदिस्त करत आहोत. उलट सर्वांनाच त्यांचा अभिमान वाटायला हवा. महापुरुषांचा पराभव हा धडा याबद्दलच होता. जर सर्वांनाच अभिमान वाटत असेल, तर सर्वांनाच त्यांचा उल्लेख तसा करता यावा. हिंदिबद्दल बोलाल तर ते लोक नावाच्या पुढे 'जी' लावून आदर दर्शवतात. शिवाजी महाराजांच्या नावातच 'जी' आहे.

तुमचाच न्याय लावायचा झाला तर मग आपण पण अनेक हिंदिभाषिक नेत्यांच्या/राजांच्या नावापुढे 'जी' न लावता एकेरी उल्लेख करतोच की! भगतसिंग जेवढा पंजाब्यांचा आहे, तेवढाच माझाही आहे. तिथे प्रांतिक अस्मिता कुठे आली? चाणक्याचा उल्लेख मी एकेरी करतो, चहंद्रगुप्त मौर्याचा करतो. त्यांचं कार्य तर केवढं उत्तुंग आहे! सम्राट अशोकाचे शीलालेख तर भारतीय राज्यघटना आणि राष्ट्रचिन्हांसाठी महत्त्वाचे ठरले आहेत. ह्या सर्व लोकांचा उल्लेख साधारणपणे एकेरीच केला जातो. त्यात उगाच माझा बाप - तुमचा बाप करण्यात काय हशील आहे?

बरोबर. या नियमाप्रमाणे राणा प्रताप, सम्राट अशोक, चंद्रगुप्त मौर्य , झाशीची राणी, राणी चेनम्मा इत्यादिंचेही आदरार्थी उल्लेख करायला हवेत.

वर टिळक्,म.गांधी,हेडगेवार्,देवरस वगैरेंचे उल्लेख आले आहेत आणि त्यांचा नेहेमी आदरार्थी उल्लेख होतो असे निरिक्षण आहे आणि त्यात तथ्यही आहे. ह्यात कर्मवीर भाऊराव पाटील आणि शाहु महाराजांना ही समाविष्ट करता येईल. त्याचे एक कारण हे असावे कि ह्या सर्व मंडळींचा कर्तुत्वाचा काळ हा ते प्रौढावस्थेत गेल्यानंतरचा असावा. म्हणजे अगदी तरूण टिळकांचे चित्र माझ्या पाहण्यात आले नाही. म.गांधीचे जे काही फोटोज आह्त त्यात बहुसंख्येने त्यांना महात्मा ही उपाधी दिल्यानंतरचे असावे. हाच प्रकार हेडगेवार व कर्मवीर भाऊराव पाटील वगैरेंबाबत म्हणता येईल. त्यामुळे त्यांचे आदरार्थी उल्लेख हे प्रतिक्षिप्त क्रियेप्रमाणे त्यांची ती प्रौढावस्था लक्षात आल्यामुळे आपोआपच होत असावेत. पण शिवरायांचा अपवाद आहे. (शिवराय हा उल्लेख सुवर्णमध्य मानावा का?). उदा. सोळा वर्षाचा नुकतेच मिसरुड फुट्त असलेला रायरेश्वरावर रक्ताचा अभिषेक करणारा पोरसवदा तरूण ..आता इथे सोळा वर्षाचे नुकतेच मिसरुड फुटत असलेले छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख विचित्र वाटेल.
तिच गोष्ट अफजल्याचे पोट फाडणारा शिवाजी...इथे उल्लेख अगदी संकटांना शिंगावर घेऊन भिरकाऊन लावणारा तरणाबांड युवक ह्या अर्थाने एकेरी शिवाजीच योग्य वाटतो...
औरंग्याचा कैदेतुन निसटलेले शिवराय.... इथे उल्लेख काळजीयुक्त भावनेने आहे ..
व मग छत्रपती शिवाजी महाराज.... रयतेचा जाणता राजा...

मिशीवाले, तुमचं निरीक्षण बरोबर आहे, पण विश्लेषण नाही. तुम्ही दिलेली कसोटी फक्त काहीच व्यक्तिंना लागू पडते. परंतु इतरांना नाही. उदा. संत ज्ञानेश्वर म्हटल्यावर त्यांचं तरूण/लहानपणीचं रूपच डोळ्यासमोर येतं. त्यांचा उल्लेख अहो-जाहो असा होतो. सम्राट अकबर म्हटल्यावर प्रौढ व्यक्ति डोळ्यासमोर येते, पण अकबराचा उल्लेख एकेरी होतो. अशोक, चंद्रगुप्त, चाणक्य - इत्यादी उल्लेख वर आलेच आहेत. तेव्हा 'कर्तृत्वाचा काळ प्रौढावस्थेतला असणे' ही एकेरी उल्लेख न करण्यासाठी 'नॉट नेसेसरी अ‍ॅण्ड नॉट इव्हन सफिशियन्ट कन्डिशन' ठरते. ह्या आधारावर ती कसोटी अमान्य आहे असे म्हणता येईल.

प्रांतिक अस्मिता आणि त्याच्याशी निगडित व्यक्ति ही संकल्पना कितीही विचित्र वाटत असली तरी वेळोवेळी तिचे अस्तित्व ती जाणवून देतेच. आदर्श जगाच्या संकल्पनेत त्यांना स्थान नसेलही परंतु व्यवहारी जगात त्यांचा प्रभाव पुर्णपणे नाकारुन कारणमिमांसा करणे म्हणजे मांजरासारखे डोळे मिटून दुध पिणेच होईल.

PS: या धाग्यावरील शेवटचा प्रतिसाद, जय महाराष्ट्र..

प्रांतिक अस्मिता आणि त्याच्याशी निगडित व्यक्ति ही संकल्पना कितीही विचित्र वाटत असली तरी वेळोवेळी तिचे अस्तित्व ती जाणवून देतेच. >> बरोबर आहे, पण म्हणून तिचे समर्थन योग्य ठरत नाही. आदर्श जगाच्या संकल्पनेत चोरी, दरोडेखोरी, भ्रष्टाचार यांना स्थान नाही, पण त्यांचा आजच्या जगावर प्रभाव आहे - हे नाकरता येत नाही. पण केवळ 'अस्तित्वात आहेत' म्हणून त्या गोष्टी जश्या समर्थनीय ठरू शकत नाहीत, तश्या चूक गोष्टी ह्या चूकच आहेत. विचितर असल्या तरी, अस्तित्वात असल्या तरी.

ज्ञानेश्वरांचा ग्यानबा हा उल्लेख एकेरी असतो. माउली हा उल्लेख स्त्रीलिंगी असतो, तर संत ज्ञानोबा महाराज हा उल्लेख "ते" या आदरार्थी वाटणार्‍या शब्दाने असतो. तुम्ही तो साहित्याच्या कुठल्या प्रवाहात वापरत आहात यावर अवलंबून आहे. प्रसिद्ध साहित्यिका ..... या प्रसिद्ध साहित्यिक श्री अमुक तमुक यांच्या मुलग्या आहेत. मुलगी एकेरी कस म्हणायच ना! पुलंच्या सखाराम गटणे मधे तो उल्लेख आहे

प्रकाश, तुमचं बरोबर आहे. माझं उदाहरण फक्त हे दर्शवण्यासाठी होतं की व्यक्तीचं कर्तृत्व कुठल्या वयातील आहे, ह्यावर काही एकेरी / आदरार्थी उल्लेख अवलंबून नाही, जो दावा वरती करण्यात आला होता.

बरोबर आहे, पण म्हणून तिचे समर्थन योग्य ठरत नाही. आदर्श जगाच्या संकल्पनेत चोरी, दरोडेखोरी, भ्रष्टाचार यांना स्थान नाही, पण त्यांचा आजच्या जगावर प्रभाव आहे - हे नाकरता येत नाही. पण केवळ 'अस्तित्वात आहेत' म्हणून त्या गोष्टी जश्या समर्थनीय ठरू शकत नाहीत, तश्या चूक गोष्टी ह्या चूकच आहेत. विचितर असल्या तरी, अस्तित्वात असल्या तरी.
Submitted by हरचंद पालव on 20 July, 2020 - 18:08

>>

+७८६

मला तर शिवबा म्हणायला फार आवडते अगदी विठोबा म्हणाल्या सारखे वाटते ... एकदम जवळचे आणि प्रिय

शिवबा, शिवा, शिवराय, राजे, महाराज, राजं, छत्रपती संदर्भानुसार वापरायला काहिच हरकत नाहि. पण हल्ली ब्रिगेड कृपेने, ब्रिगेडला शह देण्याच्या हेतूने कोणिहि उठतो आणि महाराजांचा उल्लेख जाणुनबुजुन एकेरी करतो. त्या उप्पर "मी नाहि त्यातला..." चा बुरखा पांघरतो, तेंव्हा अतिशय चीड येते. वर सम्राट चंद्रगुप्त, सम्राट अशोक यांचा उल्लेख आलेला आहे. अरे, महाराज कुठल्या काळांत जन्माला आले, त्यांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याने प्रतिकुल परिस्थितीत संपुर्ण भारताचा ईतिहास, नकाशा कसा बदलला, हे सांगण्याची वेळ यावी. आणि वर महाराजांचा एकेरी उल्लेख टाळावा, हे सांगावं लागणं हिच महाराष्ट्राची शोकांतिका आहे...

काहींना चंद्रगुप्त, अशोक ह्यांचा इतिहास माहीत नसावा. त्यात काही गैर नाही. प्रत्येकाला शिवाजी महाराजच सर्वश्रेष्ठ वाटावेत असे काही नाही. ज्याला जी व्यक्ती श्रेष्ठ वाटेल ती त्याने तशी मानावी. एकाला श्रेष्ठ म्हटल्याने दुसऱ्याचे महत्त्व नगण्य होत नाही. मला ह्या सर्वच व्यक्तींबद्दल आदर आहे. प्रश्न फक्त ठराविक व्यक्तींना आपण आदरार्थी उल्लेखतो आणि इतरांना एकेरी - ह्याबद्दल आहे. तो पर्सनल चॉईस आहे.

महात्मा गांधी रस्त्याचे एम जी रोड होते. लोकमान्य टिळक टर्मिनस चे एल टी टी होते. बाबासाहेब आंबेडकर मार्गचे आंबेडकर रोड होते. लोक सोयीचा उच्चार करतात . अलीकडच्या जी पी एस यंत्रणेचे नावाचे उच्चार ऐकून डोके गरगरते. स्थानिक उच्चारात माहिती दिली जावी अशी एक चळवळ उभारायाला हवी आपण. हवे तर पर्याय ठेवावा कोणते उच्चार हवेत असा. स्थानिक की आंतरराष्ट्रीय.

स्थानिक उच्चारात माहिती दिली जावी अशी एक चळवळ उभारायाला हवी आपण. हवे तर पर्याय ठेवावा कोणते उच्चार हवेत असा. स्थानिक की आंतरराष्ट्रीय.

Submitted by हीरा on 8 November, 2020 - 17:04

लवकरच गुगल मॅप्सच्या सेवेकरिता अमिताभ बच्चन यांचा आवाज ऐकविण्यात येणार आहे. तेव्हा या त्रुटी दूर होतील अशी आशा आहे.

अमिताभ यांनी मराठी उच्चारांवर कष्ट घेतले आणि खरोखरीच्या जाणकार लोकांचा सल्ला घेतला तरच होऊ शकेल. त्यांच्या इंग्रजी आणि हिंदी उच्चारांबाबत प्रश्न नाही पण मराठी भाषा आणि उच्चार त्यांना माहीत असतील असे वाटत नाही. टिळक हा शब्द ते कदाचित तिलक असा उच्चारतील, जिजामाता बद्दल जिज्यामाता (जास्त तला ज), पाषाण रोड, फुटका बुरुज, न. चि. केळकर रोड, हसबनीस बखळ, वडगाव शेरी, वडगाव धायरी, पिंपळे सौदागर, काळाचौकी, मिरा रोड,(ते नक्की मीरा रोड म्हणणार) मालाड, चिंचपोकळी, भायखळा , पौड फाटा, औंध (ऑ) वगैरे शब्दांचे काय होईल कोण जाणे.आपण जेथे ऑ म्हणतो तेथे हिंदी भाषक अऊ म्हणतात आणि उलट गौर चा उच्चार हिंदीत गॉर होतो.
म्हणजे मराठीचे शुद्धीकरण अर्थात हिंदीकरण होणार.

इथे मराठी माणसेच हिंजवडीचा उच्चार हिंजेवाडी असा करतात तिथे इतरांची काय कथा?

वानगीदाखल अजूनही काही -

पूना
नासिक
बम्बै / बॉम्बे
सतारा
धुलिया
जलगांव
एहमदनगर

हे उच्चार मराठी व्यक्तिंच्या (प्रामुख्याने महिलांच्या) तोंडून ऐकले आहेत.

शिवाय हिंदीमध्ये अकारांत शब्दांचे पूर्ण उच्चार होत नाहीत. उपांत्य अकार सुद्धा पूर्ण उच्चारला जात नाही. उदा. मंग्ला कग्ना वगैरे. स्क्रिप्ट रोमन मध्ये असेल तर वानखेडे चे वांखेडे होणार.
असो.

ज्ञ चा उच्चार कसा करायचा? द् + न् + य की ग्य? भारतात भाषांची विविधता असल्याने आपण मराठी माणसेही इतर राज्यातील शहरांचे उच्चार चूकीचे करत असणार जसे की बिहारातील लोक पटना म्हणतात त्याला आपण पाटणा म्हणतो. पंजाबी जलंदर म्हणतात आपण जालंधर म्हणतो.

बाकी धाग्याच्या शीर्षकातील

'छत्रपती शिवाजी महाराज' असे पूर्ण नाव घेणे ही जबरदस्ती आहे का?

या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल आणि नकारार्थी उत्तर देणार्‍यांसोबत हिंसा घडत असेल तर

फ्रान्समधील शिक्षकाच्या हत्येचा निषेध करता येणार नाही.

Pages