एकतर्फी . . .

Submitted by सोहनी सोहनी on 26 November, 2019 - 06:12

एकतर्फी . . .

दिवसभर बरसणारा हा धुंद पाऊस ओसरल्यावर हि अशी मनाला रुंजी घालणारी सांज लाभते. . .
जोपर्यंत नजर जाईल तिथवर हि गर्द हिरवळ, आणि त्यापुढे हा अथांग समुद्र, हि अंगाला मुद्दामहून डिवचणारी हवा,
हातात जायफळ घातलेली स्ट्रॉंग कॉफ़ी आणि तुझ्या आठवणी अजून काय हवंय, हा सरणापर्यंत सोबत देणारा एकांत एन्जॉय करायला. . .

ह्या अस्वस्थ सांजसमयी तुझा स्वर भाल चुंबुनी गेला,
निशब्द, स्तब्ध बैरागी बनुनी मी चढविला तुझ्या स्मरणांचा शेला...

हल्ली असलंच काही सुचतं गं, तूला आवडत नाही ना तू लक्ष नको देउ फक्त कधीतरी ऐकत जा माझं आणि मला देखील, आणि येत जा ग भेटायला कधीतरी,
तुला त्रास होतो? रोज रोज नको पण कधीतरी एखादवेळी . . .
अशी बाजूला नुसती उभी राहिलीस तरीही चालेल, पण मला फक्त तुझं अस्तित्व अनुभवू दे, तुझ्या श्वासांची लय पुन्हा ऐकूदेत. . .

तुझे अजूनही खूप नखरे आहेत हा, पण तुझ्या आठवणी अगदीच तुझ्या विरुद्ध आहेत, प्रामाणिक आहेत त्या,
प्रत्येक श्वासा सोबत खणखणत असतात ह्या अंतरंगात . . .तसंही त्यांच्याशिवाय उरलंय तरी काय ह्या मनात ??

पण कधी कधी हि आठवणींची सुरेल खणखण धगधगीत परिवर्तित होते आगीच्या लपेट्यांसारखी, मग त्रास होतो त्यांना मनात ठेवल्याचा, वाटतं स्वतःच्या हातानेच त्यांना खेचून, ओरबाडून काढावं, रिकामं रिक्त मोकळं करावं हे मन पण डोळ्यांतून टिपूस गाळण्या व्यतिरिक्त काही राहील नाही माझ्या हातात आताशा .

डोळ्यांतून ओघळून जाऊ नयेत म्हणून तुझ्या आठवणींना मनात कोंडून बसलोय,
स्वतःच्याच हाताने मनात निखारे लोटून आसवांनी ते विझवत बसलोय . . . .

एक सांगू कधी कधी टाळावं लागतं मला माझ्याच मनाला, दूर ठेवतो, कामात मुद्दाम गुंतवून ठेवतो,स्वतःचा स्वतःच्या मनाशी संवाद टाळतोच मी कारण
मनाशी संवाद आला कि तुझ्या आठवणी आल्या आणि तुझ्या आठवणी आल्या कि पापण्या ओलावल्या. .
हे ठरलेलं समीकरण आहे,

एकांतात वाईट असोत, गोड़ असोत, सुखद असोत किंवा दुखत असोत ह्या आठवणींना मी व्यवस्थित सांभाळतो,
पण ह्या कधीही येतात गं, मिटिंग मध्ये, मित्रांमध्ये, कोणत्या सणावाराला, गर्दीत, एकटेपणाची जाणीव करून देतात, सगळं सुख पायाशी असताना देखील तुझ्या नसण्याची उणीव भासवून खिजवत बसतात. . .

थोडे दिवस आधीच मित्रांसोबत फिरायला गेलो होतो, ठरवूनच निघालो होतो, खूप एन्जॉय करेन, एकदाही तुझ्या आठवणींचा स्पर्श ह्या मनाला होऊ देणार नाही, निग्रहाने पार केलं मी सगळं, त्यांना दूर ठेऊन एन्जॉय पण केलं, त्या दिवशी जिंकलोच होतो गं मी पण . . .
चुकून फेकून द्यायची राहून गेलेली तू दिलेल्या गाण्यांची सीडी मित्राने प्ले केली,जणू दबा धरून बसलेल्या आठवणी एकामागे एक झिरपत राहिल्या त्या मनात,

तुला विसरताना नकळत पुन्हा तुझ्यात वेड्यागत अडकत असतो
तुझ्या आठवणींसोबत लढतालढता प्रत्येक क्षणी त्यांच्या पुढे झुकत असतो . . .

तुझ्याविषयी मनात राग नाही काहीच, का असावं ? तुझी काय चूक त्यात, एकतर्फी प्रेम तर मी केलं होत तुझ्यावर तू थोडीच केलं होतं,
मी हे एकतर्फी प्रेम स्वीकारलं आहे आता आयुष्यभरासाठी,
तुझे कधी कधी होणारे भास तुझ्या अस्त्वित्वाची जाणीव करून देतात ते पुरेसं आहे माझ्यासाठी, पण माझ्या ह्या चुकी व्यतिरिक्त एक प्रश्न आहे, उत्तर देशील का ???

माझं प्रेम एकतर्फी होतं पण आपली मैत्रीही एकतर्फी होती का???

- जिवलग मैत्रीस
ह्या भरल्या नभांसारखे हे रिक्त अंतरंग अवचित भरून येते
एक अधीर, अनामिक अशी हुरहूर ह्या मनाला लपेटून राहते

आठवांचे काहूर मग हळुवार मनाच्या पटलावर स्वार होते
येताना सोबतीला तीच जुनी तळमळ नव्याने जाणिवेत भरते

जाणीवा सर्व आताशा शिथिल तरीही तुझी उणीव मनाला काचते
मनाच्या अथांग वावरातून रिक्ततेचे स्मरणई वारे सर्वांग व्यापते

स्मरणांच्या बाहेरील दुनियेत हे मन खुळ्यागत तुझे अस्तिव्त शोधते
तुझे कधीच न दिसणे अन मनाचे काकुळतीस येणे ठरलेलेच असते...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults