बेस कॅम्प डायरी भाग 4

Submitted by मधुवन्ती on 26 November, 2019 - 02:43

maayboli 9.JPG

२ ऑक्टोबर २०१४
---------------------

आजआमचा विश्रांतीचा (acclimatization) दिवस होता. सकाळी जवळच असलेल्या View Point ला गेलो. इथून एव्हरेस्ट,लोत्से,अमा-दाब्लम आदी शिखरं दिसली. हे आमचं‘एव्हरेस्ट’चं पहिलं दर्शन होतं.‘सागरमाथा’ या नेपाळी नावाने आणि ‘जोमोलुन्ग्मा’ यातिबेटी नावाने ओळखल्या जाणाऱ्या या सर्वोच्च पर्वताने कित्येक जणांना भुरळघातली आणि अजूनही घालत आहे. मनोमन त्याला हात जोडले गेले. ‘ज्याचसाठी केला अट्टाहास’ असं ते वैभवसमोर उभं होतं. ‘एव्हरेस्ट’बद्दल ऐकलेल्या, बघितलेल्याकित्येक सुरस कथा आणि चित्रपट,क्षणभर डोळ्यांसमोर तरळून गेले! यानंतरदेखीलकित्येक वेळा चालताना ‘एव्हरेस्ट’ दिसत राहिले. ‘अमादाब्लम’ला सर्वांत सुंदर पर्वत का म्हणतात, ते कळलं. एक बर्फाच्छादित नसलेले शिखरही दिसत होते. त्याचे नाव‘खुंबिला’.या पर्वतामुळेच कदाचित या भागाला‘खुंबू’ म्हणत असावेत. या ‘खुंबिला’ला नेपाळमधे पवित्र मानतात त्यामुळे त्यावरचढाई करायलाही मनाई आहे.
maayboli 6.JPG

इथंचएक संग्रहालय आहे. ते बघून हॉटेलवर परतलो. दुपारी बाजारात चक्कर मारतहोतो. नामचे हे एका दरीमधे वरून खालपर्यंत पसरलेलं मोठं गाव आहे. इथेबँका, एटीएम मशिन्स, पोस्ट ऑफिस अशा सोयीदेखील आहेत.जवळच्याच एका पबमधे‘एव्हरेस्ट’वर एक फिल्म दाखवणार होते, म्हणून मग तिथे पोहोचलो. ‘एव्हरेस्ट’ नावाच्याया फिल्ममधे तेनसिंगचा मुलगा झामलिंगच्या एव्हरेस्ट आरोहणाबद्दलचे चित्रणआहे. ‘एव्हरेस्ट’वर चढाईची स्वप्ने असलेल्या आणि नसलेल्यांनीही पाहावी अशी हीफ़िल्म!
थोडावेळ थोडी टंगळमंगळ करून रूमवर परतलो. उद्या पुढच्या ठिकाणी निघावे लागणार होते.

maayboli 11.JPG

३ ऑक्टोबर २०१४
----------------------
आज ७ वाजता चालायला सुरुवात केली. काल ज्या view point ला गेलो होतो, त्याच्या दुसऱ्या बाजूने डोंगरावर चढत निघालो थोड्याच वेळात आमचा रस्ता नेहमीच्या बेस कॅम्पच्या route पेक्षा वेगळा झाला आणि छातीवर येणाऱ्या चढाबरोबर आम्ही वर वर चढत निघालो. बराच वेळाने ’फोर्चे थांगा’ या ठिकाणी जेवणासाठी थांबलो. ’शेर्पा स्ट्यू’ नावाचा एक नवीन पदार्थ चाखून बघितला. एखाद्या सूपमधे खूपशा भाज्या, नूडल्स व भात घालून केलेला हा पदार्थ. पुढचे बरेच दिवस हेच आमचं जेवण होतं.जेवणानंतर परत खाली वर, खाली वर अशा कित्येक डोंगररांगा ओलांडत शेवटी ‘डोले’ या ठिकाणी पोहोचलो.डोलेची समुद्रसपाटीपासून उंची आहे ३६४० मीटर. पोहोचे पोहोचेपर्यंत थोडा पाऊस सुरू झाला होता. त्यामुळे डायनिंग रूममधे बसून राहण्याशिवाय काहीच करता येणार नव्हतं. जेवणं उरकून लवकरच झोपायला गेलो.
रात्री जवळपास एकच्या सुमारास प्रचंड डोकेदुखीनं जाग आली आणि पाठोपाठ उलट्या... काही क्षण Accute Mountain Sickness ची भीती वाटली.AMS ची लक्षणे काही वेळेस खूप कमी वेळात जाणवू लागतात आणी काही तासांत व्यक्ती मरणसुद्धा पावते, असं ऐकून होते. बऱ्याच केसेस ऐकून होते. त्यातून मीनाझला हे सांगितल्यावर ती अजूनच घाबरली आणि ती अजूनच काहीबाही गोष्टी सांगू लागली...त्या सगळ्यांकडं दुर्लक्ष केलं आणि अशी खात्री होती, की हा त्रास पित्ताचाच होता, तरीसुद्धा लवकर झोप लागेना. मृत्यूची भीती वाटणं काय असतं आणि त्या अनुषंगानं काय काय विचार मनात येऊ शकतात हे त्या रात्री अनुभवलं...मग बऱ्याच उशिरा केव्हातरी डोळा लागला असावा.

४ ऑक्टोबर २०१४
---------------------

उठल्याबरोबर थोडी डोकेदुखी जाणवत होतीच. तरीही पुढच्या ठिकाणाकडे, ‘माछेर्मो’कडे निघालो.आज चालणं फारसं नव्हतं. बरीचशी सरळ वाटच होती. त्यामुळे लवकरच पोहोचलो. माछेर्मो या ठिकाणी IPPG (International Porters Protection Group) ने चालू केलेले पोर्टर शेल्टर आणि रेस्क्यू पोस्ट आहे.रोज दुपारी तीन वाजता इथे Altitude Talk आयोजित केला जातो. अल्टिट्यूड सिकनेस आणी त्याची लक्षणे, त्याबद्दल घ्यायची काळजी याबद्दल सर्व ट्रेकर्सना माहिती दिली जाते United Kingdom मधील काही डॉक्टर्स इथे स्वखर्चाने येउन काम करतात. इथे तब्येतीच्या काही तक्रारी असल्यास त्याबद्दल check up सुद्धा केले जाते.कालचा त्रास आठवून मीदेखील चेकअप करून घेण्याचं ठरवलं. माझी शंका खरी होती. त्रास पित्ताचाच होता.
check up करून लॉजवर परतेपर्यंत white out होऊ लागले होते. उद्याचा ठरलेला rest day रद्द करून गोक्योला जायचं ठरवलं. त्यामुळे नेहमीप्रमाणे ‘शेर्पा स्ट्यू’ खाऊन दिवस संपवला.

maayboli 15.JPG

५ ऑक्टोबर २०१४
-----------------------
थोडासा चढ आणि सरळ वाटेनं चालत निघालो. थोड्याच वेळात पहिला लेक आणि दुसरा लेक दिसले. निळंशार पाणी आणि त्यासमोर बर्फाच्छादित शिखरं बघून खूप छान वाटत होतं. हा भाग ‘रामसर’ साइट म्हणून जैवसृष्टीसाठी महत्त्वाचा मानला गेला आहे. दूधकोसी नदीचा संगम असलेले हे तलाव जगातील सर्वोच्च तलावांपैकी आहेत.त्याशिवाय हिंदु आणि बौद्ध श्रद्धेप्रमाणे हे तलाव म्हणजे नागदेवतेचे निवासस्थान आहे. असे हे दोन लेक - गोजुंबा लेक आणि ताउजुंग लेक - पार करून लवकरच गोक्यो लेकला पोहोचलो. इथेच गोक्यो गाव वसलेलं आहे. याच लेकला ‘दूध पोखरी’ असेही म्हणतात. ते कदाचित तिथून होणाऱ्या दूध-कोसी नदीच्या उगमामुळेही असेल. आमचं लॉज लेकच्या समोरच होतं. त्यामुळे डायनिंग रूममधे बसल्या बसल्या आम्ही लेक आणि समोरच्या शिखरांकडे बघत बसलो. उद्या गोक्यो री इथं निघायचं होतं

maayboli 13.JPGmaayboli 12.JPGmaayboli16.JPG

६ ऑक्टोबर २०१४
----------------------
सकाळी ४:३० वाजता उठून गोक्यो री या ठिकाणी जायला निघालो. बाहेर अंधार होता आणि आकाश ताऱ्यांनी भरलेलं होतं. शहरात असं आकाश बघायला मिळणं दुरापास्तच; त्यामुळे डोळे भरून बघून घेतलं. headlamp असल्यामुळे त्या प्रकाशात हळूहळू समोरचा डोंगर चढू लागलो. वर पोहोचल्यावर एव्हरेस्ट,चो-ओयु,ल्होत्से अशा बऱ्याचशा ‘८ थाउजंडर्स’चा सुरेख नजारा दिसतो.’गोक्यो री’ची समुद्रसपाटीपासून उंची आहे ५३६० मीटर. थोडा उजेड होऊ लागला होता आणि आता गोक्यो लेक, त्यासमोरची पर्वत शिखरं आणि ग्लेशियर्स सुरेख दिसत होती.पण आज मला चालायला खूप वेळ लागत होता. खाली येऊन उरलेला वेळ लेकजवळ बसून थोडी फोटोग्राफी करण्यात घालविला. आमच्या ठरलेल्या route ने न जाता मी रस्ता थोडा बदलायचं ठरवलं होतं. त्यानुसार दोन दिवस मी एकटी असणार होते आणि लोबुचे या ठिकाणी आम्ही परत भेटणार होतो. रस्ता बदलण्याचं माझं कारण होतं माझं हळू चालणं. चोला पास ओलांडण्यासाठी जवळ जवळ ८-९ तास खूप तीव्र चढ चढावा लागणार होता. जितका उशीर होईल तितका इथे rock fall,crevases चा धोका वाढत जातो. त्यामुळे मी रस्ता बदलण्याचा निर्णय घेतला. अर्थातच मन द्विधा होत होतं. वाटेत काही त्रास तर होणार नाही? ठरल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी मी काही कारणाने लोबुचे या आमच्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाही, तर निरोप देण्याचंकसलंच साधन नव्हतं. मग सगळंच कठीण होऊन बसलं असतं; पण तरीही मी माझ्या निर्णयाशी ठाम राहिले. याआधीसुद्धा कित्येक ट्रेकमधे २२-२५ किलोमीटर चालले होते. मग हे तर काहीच नाही! उद्या मला दोन campsites ओलांडून ’फोर्चे’ या ठिकाणी पोहोचायचं होतं.

क्रमशः

आधीचा भाग वाचा https://www.maayboli.com/node/72458

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ आऊटडोअर्स एक पोर्टर घेतला होता पण तो उशीरा, जेव्हा मी वाट बदलली तेव्हा,त्याचा उल्लेख पुढे येइलच.तो सामान घेउन पुढे निघुन जायचा.

अगोदरच्या भागांच्या लिंक दिल्या तर सलग वाचता येईल. पहिल्या भागाच्या शेवटी दुसऱ्या भागाची, दुसऱ्या भागाच्या शेवटी तिसऱ्या भागाची या प्रमाणे.

मस्त झालाय हा भाग. बेस कॅम्प वाचतानाच एव्हरेस्ट बद्दल असणार असे वाटले होते. आता पर्यंत बेस कँम्प्ला जायचे आणि एव्हरेस्ट सर करायचे असे ऐकले होते पण बेस कॅम्प पर्यंतचा ट्रेक असतो आणि तो इतका सुंदर आहे हे भारी वाटतेय.

खूप छान. सुंदर वर्णन आणि फोटो आहेत. अतिशय उत्सुकतेने वाचतोय.
काही शंका:
१. थेट हा ट्रेक करायचे ठरवले की पूर्वतयारी म्हणून या आधी हिमालयात काही ट्रेक केलेत?
२. जर ग्रुप ट्रेकिंग असेल तर एखाद्याला असा रस्ता मध्येच बदलता येतो का? वाटेत काही अडचण आली तर काय करणार अश्यावेळी?
३. बॅकपॅकमध्ये साधारण किती किलो वजन घेऊन चालावे लागायचे? रोज साधारणपणे किती अंतर?

@ उपाशी बोका thanks!

१. थेट हा ट्रेक करायचे ठरवले की पूर्वतयारी म्हणून या आधी हिमालयात काही ट्रेक केलेत? - हो याआधी बरेच ट्रेक हिमालयात केले आहेत.एकदम पहिलाच ट्रेक एव्हरेस्ट बेस करणं सवय नसणाऱ्या ला खूपच महाग पडू शकत.
२. जर ग्रुप ट्रेकिंग असेल तर एखाद्याला असा रस्ता मध्येच बदलता येतो का? वाटेत काही अडचण आली तर काय करणार अश्यावेळी? - ग्रुप मध्ये लीडर चां निर्णय अंतिम असतो,कोणाची तब्येत ठीक नसेल तर त्याला दुसऱ्या सपोर्ट स्टाफ बरोबर परत पाठवल जातं. ह्या वेळी आम्ही दोघीच होतो स्वतः च्या जवाबदारी वर.
३. बॅकपॅकमध्ये साधारण किती किलो वजन घेऊन चालावे लागायचे? रोज साधारणपणे किती अंतर? - bagpack मध्ये साधारण 10 ते 12 किलो होतात.तुम्ही तुमचं सामान उचलायला पोर्टर करू शकता.आणि छोटी sack घेऊन चालू शकता.रोज अंदाजे 8 ते 10 किलोमीटर... पण पर्वतातले हे किलोमीटर जास्त vaatu शकतात.

मस्तच लिहिलंयस नेक्स्ट भाग लवकर येउदे आणि पुढच्या ट्रेकचे प्लॅन्स एकत्र करूयात! २ वर्षांपूर्वी बेस कॅम्प ट्रेक बुक करून कॅन्सल करावा लागला होता काही कारणाने! इतकी हळहळले होते! परत करूया आता बेस कॅम्प!