कठीण कठीण कठीण किती

Submitted by कुमार१ on 25 November, 2019 - 02:05

यकृताची कठीणता ( Liver Cirrhosis)

यकृत हे आपल्या उदरात उजव्या बाजूस श्वासपटलाच्या खाली वसलेले एक महत्वाचे इंद्रिय आहे. शरीरातील इंद्रियांपैकी ते सर्वात मोठे असून ते प्रौढ व्यक्तीत सुमारे दीड किलो वजनाचे असते. ते अन्नपचनात महत्वाची मदत करते. यकृतातून तयार होणारा पित्तरस हा मेदांचे पचनास आवश्यक असतो. शरीरातील एकंदरीत चयापचयात यकृत एखाद्या गृहमंत्र्याप्रमाणे महत्वाची भूमिका बजावते. शरीरात बाहेरून शिरणाऱ्या आणि चयापचयात निर्माण होणाऱ्या अनेक विषांचा ते नायनाट करते. त्याची एकूण कार्ये ५००च्या घरात आहेत ! म्हणूनच ते जगण्यासाठी अत्यावश्यक आहे. शरीरात मोक्याचे ठिकाणी वसलेले आणि अनेकविध कार्ये करणारे हे इंद्रिय विविध रोगांनाही बऱ्यापैकी बळी पडते.

लिवर.jpg

यकृताचे प्रमुख आजार हे साधारणपणे खालील प्रकारचे असतात:

१. विषाणूंचा संसर्ग
२. मद्यपानादींमुळे होणारी कठीणता
३. औषधांचे दुष्परिणाम
४. पित्तनलिकांचे आजार

या लेखात आपण यकृत-कठीणतेचा विचार करूया.
यकृताच्या काही आजारांत त्याच्या संपूर्ण अंतर्गत रचनेत बिघाड होतो. त्यातून त्याच्या निरोगी पेशी नष्ट होतात. आता त्यांची जागा तंतुमय (fibrous) पेशी घेतात आणि त्यामुळेच हे इंद्रिय कठीण बनते. यकृतास एखादी इजा झाल्यापासून अशी दुरवस्था होण्यास कित्येक वर्षे लागू शकतात. मात्र एकदा का अशी स्थिती झाली की ती सहसा पूर्ववत होत नाही.

कारणमीमांसा

या आजाराची प्रमुख कारणे अशी आहेत;
१. बेसुमार मद्यपान
२. हिपटायटीस C/ B चा संसर्ग
३. यकृतातील अतिरिक्त मेदसाठे : असे साठे होण्याचा धोका लठ्ठपणा, मधुमेह आणि काही मेदविकारांत वाढतो.
४. औषधांचे दुष्परिणाम : यात काही कर्करोगविरोधी, रक्तदाबनियंत्रक आणि हृदयविकारविरोधी औषधे येतात.

आता काही मुद्दे विस्ताराने पाहू.
१. बेसुमार मद्यपान : हा मुद्दा सर्वात कुतूहलाचा आणि बहुचर्चित आहे. तो व्यवस्थित समजून घेऊ. कुठल्याही मद्यातील महत्वाचा रासायनिक घटक म्हणजे Ethanol. प्रथम ते रक्तात शोषले जाते आणि मग शरीरात सर्व पेशींत पोचते. त्याचा चयापचय सगळीकडेच होतो पण मुख्यतः तो यकृतात होतो. त्यासाठी विविध एन्झाइम्सच्या यंत्रणा कार्यरत होतात. त्यांच्या क्रियांमुळे Ethanol पासून प्रथम Acetaldehyde तयार होते. त्यापुढील क्रियांनी अखेर पाणी आणि कार्बनडायऑक्साईड तयार होऊन हा चयापचय संपतो. अगदी माफक मद्यपान केल्यास Ethanolचा सहज निचरा होऊन जातो. जसजसे मद्यपानाचे प्रमाण वाढत जाते तशा या यंत्रणा अधिकाधिक कार्य करतात. या वाढलेल्या चयापचया दरम्यान Acetaldehyde अधिकाधिक प्रमाणात पेशींत जमू लागते आणि त्यामुळे पेशींना इजा होते. तसेच चयापचयातील बिघाडाने यकृतात मेदपदार्थ मोठ्या प्रमाणात साठू लागतात. मद्यपान जेव्हा बेसुमार होते आणि अनेक वर्षे चालू राहते तेव्हा या गोष्टींमुळे यकृताला मोठी इजा होते. सुरवातीस यकृतदाह (Hepatitis) होतो. हळूहळू त्याचे रुपांतर यकृत-कठीणतेत होउ लागते. जर का या परिवर्तनाच्या स्थितीत संबंधिताने मद्यपान थांबवले तर यकृतदाह काही महिन्यांत बऱ्याच अंशी बरा होतो. पण, याउलट जर बेसुमार मद्यपान चालूच राहिले तर मात्र कायमची यकृत-कठीणता होते.

मद्यपान हे समाजातील सर्व स्तरांत केले जाते. माफक, मध्यम आणि बेसुमार अशी त्याची प्रमाणे असतात. दीर्घकाळ खूप मद्यपान करणाऱ्या सर्वांनाच गंभीर यकृतदाह होत नाही. त्यामुळे “नक्की किती पिणे सुरक्षित?” हा मद्यपींच्या दृष्टीने कळीचा प्रश्न असतो. यासंदर्भात जगभरात अनेक अभ्यास झालेले आहेत. विविध वंशांतील लोकांत मद्याची घातकता कमीअधिक असू शकते. तसेच स्त्री व पुरुषांतील त्याची संवेदनशीलता बऱ्याच फरकाची आहे. इथेनॉलचे दररोजचे प्रमाण आणि घातकता याबाबत सर्वसाधारण असे म्हणता येईल:

पुरुषांत ६० ग्रॅम आणि स्त्रियांत २० ग्रॅम प्रतिदिन असे सेवन १० वर्षांहून अधिक काळ केल्यास यकृत-कठीणतेचा धोका बराच असतो.

मद्याची घातकता नक्की का आणि काही ठराविक लोकांनाच का होते हाही एक महत्वाचा प्रश्न आहे. यावर खूप संशोधन झालेले असले तरी त्याचे सर्वसंमत असे उत्तर अद्याप मिळालेले नाही. यासंदर्भात एखाद्या व्यक्तीतील खालील घटकांचा वाटा असू शकतो:
• लिंग आणि जनुकीय घटक
• पर्यावरण
• आहार

• चयापचयातील भेद
• विषाणू संसर्ग, आणि
• प्रतिकारशक्ती

मद्य-घातकता आणि लिंगभेद

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांत ही घातकता अधिक आहे. याची २ संभाव्य कारणे आहेत:
१. स्त्रियांच्या जठरात एका विशिष्ट एन्झाइमचे प्रमाण कमी असते. त्यामुळे या पहिल्या ‘प्रवेशद्वारातून’ मद्याचे पुढे सरकणे (clearance) कमी गतीने होते.
२. स्त्री-हॉर्मोन्स ethanol चा चयापचय मंदावतात.
आहार
नित्य मद्यपान करणाऱ्या व्यक्तींनी पुरेसा समतोल आहार घेणे महत्वाचे आहे. जर आहारात दीर्घकाळ प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि काही मेदाम्लांचा तुटवडा राहिला तर यकृतास इजा होण्याची शक्यता वाढते.

विषाणू संसर्ग
दीर्घ मद्यपानाच्या जोडीला अशा व्यक्तीस जर hepatitis C चा संसर्ग झाला असेल तर यकृत-कठीणता होण्याचा धोका बराच वाढतो. मद्य आणि हा विषाणू यांचा संयोग त्या व्यक्तीसाठी अधिकच घातक ठरतो.

२. विषाणूंचा संसर्ग : दोन महत्वाचे विषाणू असे आहेत:

अ) हिपटायटीस C विषाणू
हा घातक विषाणू शरीरात खालील प्रकारे शिरू शकतो:
• इंजेक्शनद्वारा व्यसनी पदार्थ (ड्रग्ज) घेणे
• समलिंगी संबंधाचे पुरुष
• अंगावर सुईने गोंदण्याची प्रक्रिया
• असुरक्षित acupuncture आणि तत्सम प्रक्रिया

ब) हिपटायटीस B विषाणू
B आणि C चे काही संसर्ग मार्ग समान आहेत. याचे काही अजून मार्ग असे आहेत:
• स्त्री-पुरुषांतील असुरक्षित संबंध, अनेक जोडीदारांशी संबंध
• बाळंत होतानाची प्रक्रिया
• दूषित रक्त आणि अवयव प्रत्यारोपण
या दोन्हीही विषाणूंच्या आजारात यकृतदाह होऊन तो दीर्घकालीन होतो.

यकृतातील अतिरिक्त मेदसाठे
:
निरोगी यकृताच्या पेशींत मेदाचे प्रमाण अल्प असते. पण काही चयापचय-बिघाडाच्या आजारांत .( उदा. आटोक्यात नसलेला मधुमेह)
ते प्रमाणाबाहेर वाढते. अशा मेदाने गच्च भरलेल्या पेशी फुटू शकतात आणि त्यामुळे दाह होतो. हळूहळू त्याची वाटचाल कठीणतेकडे होते.

आजाराची वाटचाल
आता एक मुद्दा ध्यानात घ्यावा. शरीरातील बरीच महत्वाची प्रथिने यकृतात तयार होतात. त्यामुळे या आजारात त्या प्रथिनांचे उत्पादन खूप कमी होते. यापैकी दोन महत्वाची प्रथिने ही आहेत:
१. अल्बुमिन : हे आपल्या रक्तात संचार करत असते आणि त्यातल्या पाण्याचे प्रमाण नियंत्रित करते.
२. रक्त गोठण्यासाठीची प्रथिने : जेव्हा आपल्याला जखम होऊन रक्तस्त्राव होतो तेव्हा ही प्रथिने रक्त गोठवून रक्तस्त्राव थांबवतात.

या दीर्घकालीन आजारात प्रथिनांचे घटलेले उत्पादन, चयापचयातील बिघाड अशांमुळे शरीरात व्यापक बिघाड सुरु होतात. रक्तात सोडियमचे प्रमाण वाढते, पाण्याचे उत्सर्जन कमी होते आणि रक्तात ते प्रमाणाबाहेर वाढते. त्यातून आजाराची गुंतागुंत होते. आजाराच्या तीव्रतेनुसार पुढील घटना घडू शकतात:

१. जलोदर : आपल्या पोटातील सर्व इंद्रियांच्या बाजूने एक उदरवेष्टण (peritoneum) असते. त्याच्या दोन थरांमध्ये जेव्हा खूप पाणी जमा होते त्याला जलोदर असे म्हणतात. काही रुग्णांत या साठलेल्या द्रवात जंतूसंसर्ग होतो. जलोदर मोठ्या प्रमाणात झाल्यास रुग्णास हर्नियाची व्याधी होऊ शकते.

ascites.png

२. मूत्रपिंडावर परिणाम : यकृताचे ढासळते कार्य, जलोदर आणि रक्तवाहिन्यांच्या कार्यात बिघाड झाल्याने आता त्याचा परिणाम मूत्रपिंडावर होतो. आता उत्सर्जन प्रक्रिया अजून मंदावते.

३. मेंदूकार्यातील बिघाड : हा परिणाम गंभीर असतो. त्याची पूर्वपिठिका समजून घेऊ.
आपल्या शरीरात चयापचयातून अनेक घातक रसायने तयार होतात. प्रथिनांपासून तयर होणारा अमोनिया हे त्यातले एक ठळक उदाहरण. निरोगी यकृतात या अमोनियाचे रुपांतर युरिआत केले जाते. त्यामुळे रक्तात अमोनियाचे प्रमाण अत्यल्प राहते. दीर्घकालीन यकृत आजारात ही महत्वाची प्रक्रिया खूप मंदावते. त्यामुळे रक्तात अमोनियादि बऱ्याच रसायनांचे प्रमाण खूप वाढते. मग ही रसायने रक्तातून मेंदूत सहज पोचतात. तिथे ती चेतातन्तूंच्या कार्यात अडथळे निर्माण करतात. सोप्या शदांत सांगायचे तर ती मेंदूतील ‘सिग्नल’ यंत्रणा पार बिघडवून टाकतात. परिणामी रुग्णाची बौद्धिक आणि आकलनक्षमता कमी होते. तो असंबद्ध बोलू लागतो. नंतर झापड आणि गुंगी येते. बिघाड तीव्र झाल्यास रुग्ण बेशुद्ध होतो.

४. रक्तवाहिन्यांवरील
परिणाम : यकृतातील अंतर्गत बिघाडामुळे पचनसंस्थेशी संबंधित रक्तवाहिन्यांतील (portal) दाब वाढतो. त्यातून बऱ्याच रक्तवाहिन्या फुगतात. अन्ननलीकेच्या, हिरड्यांतील तसेच नाकातील वाहिन्या ही काही उदाहरणे. कालांतराने त्या वाहिन्या फुटून रक्तस्त्राव होऊ शकतो.

५. हॉर्मोन्सचे बिघाड : चयापचयातील बिघाडाने लैंगिक हॉर्मोन्सचे असंतुलन होते. पुरुषांतील हॉर्मोनचे वाढत्या प्रमाणात स्त्री-हॉर्मोनमध्ये रुपांतर होते. त्यामुळे अशा पुरुषात स्तनवृद्धी, नपुसकत्व ही लक्षणे दिसू शकतात.

६.अन्य परिणाम : काही रुग्णांना कावीळ होते. याव्यतिरिक्त त्वचेखाली लाल पुटकुळ्या किंवा चट्टे, त्वचा खाजणे, स्नायूंची झीज, वजन कमी होणे, रक्तन्यूनता इत्यादी लक्षणे दिसू शकतात.

palmar-erythema.jpg

७. दीर्घकालीन धोके: हा आजार दीर्घकाळ राहिल्यास काही रुग्णांना यकृताचा कर्करोग होऊ शकतो. तर अन्य काहींत जठरातील व्रण (ulcer), मधुमेह आणि पित्तखडे हे आजार उद्भवू शकतात.

प्रयोगशाळा चाचण्या :

या आजारात यकृताची कार्ये एकामागून एक ढासळत जातात. त्यांचे मूल्यमापन रुग्णाच्या काही रक्तचाचण्यांवरून करता येते. त्यातील काही प्रमुख चाचण्या अशा आहेत:

१. बिलीरुबीन पातळी : ही बराच काळ नॉर्मल असते पण आजार जास्ती वाढला की तिच्यात वाढ होते. ( बिलीरुबीनवरील स्वतंत्र लेख इथे आहे :https://www.maayboli.com/node/64764)

२. विशिष्ट एन्झाइम्स ( AST, ALT) ची पातळी काही प्रमाणात वाढते.

३. अल्बुमिनची पातळी बरीच कमी होते.
४. रक्त गोठण्याशी संबंधित चाचण्या (PT, PTT) : या आजारात संबंधित प्रथिनांचे प्रमाण बरेच कमी होते. त्यामुळे या चाचण्यांत बिघाड दिसून येतो.

अतिविशिष्ट चाचण्या : प्रत्येक रुग्णाचे मूल्यमापन करून गरज भासल्यास त्या करता येतात. त्यापैकी एक महत्वाची म्हणजे यकृताची ‘बायोप्सी’ ही होय. यात सुईद्वारा यकृताचा छोटासा तुकडा काढून त्याची सूक्ष्मदर्शकाखाली तपासणी होते. त्यात पेशींची सखोल माहिती मिळते.

उपचारांची रूपरेषा
यकृत-कठीणता ही दीर्घकालीन अवस्था आहे. तिची कारणे अनेक आहेत. यकृताचा विशिष्ट आजार झाला असता योग्य ते उपचार वेळेत घेतल्यास या अवस्थेचा प्रतिबंध करता येतो. मद्यपिंनी मद्य वर्ज्य करणे, विषाणू संसर्गात त्याविरोधी औषधे घेणे इत्यादी उपचार करावेत. मात्र एकदा का कठीणता झाली की संबंधित उपचारांचा विशेष उपयोग होत नाही.
आता आजारातून कुठली गुंतागुंत निर्माण होते, त्या दिशेने उपचार करावे लागतात. तसेच रुग्णाच्या लक्षणांनुसार संबंधित उपचार करतात. अशा सर्व प्रकारच्या उपचारांबद्दल लिहिणे हे या लेखाच्या आवाक्याबाहेर आहे आणि त्याची गरजही नाही.
(या लेखाची व्याप्ती फक्त आधुनिक वैद्यकातील उपचारांपुरती मर्यादित आहे. तथापि वाचकांनी त्यांना अन्य पद्धतीचे अनुभव असल्यास प्रतिसादांत जरूर लिहावेत).

आहार आणि आहारपूरके
या रुग्णांची भूक खूप मंदावलेली असते आणि अन्नपचनही नीट होत नसते. त्यांना दिवसातून अनेक वेळा थोडेथोडे अन्न देतात. त्यातून मिळणारे एकूण उष्मांक, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण हे काळजीपूर्वक पहिले जाते. बऱ्याच रुग्णांत जस्ताची (zinc) कमतरता होते. त्यांना जस्ताच्या गोळ्या देतात. ज्या रुग्णांना प्रत्यक्ष आहार मानवत नाही त्यांना पौष्टिक कृत्रिम पावडरी देतात.

अशा प्रकारे विविध उपचार चालू असताना रुग्णांची नियमित तपासणी आणि चाचण्या केल्या जातात. त्यांच्या निष्कर्षानुसार रुग्णाचे गुणांकन (score) केले जाते. त्यानुसार त्याच्या भवितव्याचा अंदाज करतात. काही रुग्णांत यकृताच्या काही पेशी चांगल्या असतात आणि त्यांपासून निरोगी पेशींची निर्मिती होत राहते. असे रुग्ण रोगलक्षणांपासून मुक्त राहतात. मात्र काही रुग्णांत परिस्थिती बिघडत जाते. त्यांना सतत कावीळ असते आणि त्यांच्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो. याला आजाराची भरपाईरहित (decompensated) अवस्था म्हणतात. अशांना आता औषधांचा उपयोग होत नाही. त्यांचा यकृत प्रत्यारोपणासाठी विचार केला जातो.

यकृत प्रत्यारोपण
जेव्हा रुग्ण वरील उपचारांना दाद देत नाही आणि त्याचे यकृतकार्य खूप खालावू लागते तेव्हा याचा विचार केला जातो. अर्थात त्यासाठी रुग्णाची हृदय व फुफ्फुसकार्ये व्यवस्थित आहेत ना, हे पहिले जाते. या उपचारासाठी दात्याची निवड २ प्रकारे होऊ शकते:
१. जिवंत निरोगी व्यक्ती : तिच्या शरीरातून यकृताचा काही भाग शस्त्रक्रियेने काढला जातो. हा पर्याय तसा उत्तम आहे पण यात काही कटकटीही होऊ शकतात. दात्यावर शस्त्रक्रिया करताना काही गंभीर गुंतागुंती होण्याची शक्यता असते. असे काही दाते नंतर मृत्यू पावले आहेत.
२. मृत्यूच्या उंबरठ्यावरील व्यक्ती : ही व्यक्ती अशी असावी लागते- तिच्या हृदयाचे स्पंदन थांबलेले आहे पण अद्याप ती ‘मेंदूमृत’ या व्याखेत बसणारी नाही.

अवयवदान या विषयाला अनेक पैलू आहेत. रुग्णाच्या दृष्टीने तो सर्वोत्तम उपाय असतो. पण, दात्यांची पुरेशी उपलब्धता, सुयोग्य जुळणी, दाता व रुग्ण या दोघांना असलेले शस्त्रक्रियेचे धोके हे सर्व वाटते तितके सोपे नसते. प्रचंड तणावाखाली ही जोखमीची कामे करावी लागतात. त्यादृष्टीने अन्य काही पर्यायांचा विचार वैद्यकविश्वात होत आहे. सध्या हे विषय प्रायोगिक अवस्थेत आहेत. त्याचा हा आढावा :

निव्वळ पेशी प्रत्यारोपण : यात निरोगी व्यक्तीतील यकृताच्या फक्त पेशी प्रयोगशाळेत अतिथंड तापमानात साठवून ठेवतात. योग्य रुग्णाची निवड झाल्यावर अशा कोट्यावधी पेशी रुग्णाच्या प्लिहेत (spleen) सोडल्या जातात. कालांतराने ती प्लिहा यकृताचे काम करू लागते !

• जैवतंत्रज्ञानाने जैविक-कृत्रिम यकृत तयार करणे.

• प्राण्यांच्या यकृताचे मानवात प्रत्यारोपण : यासाठी डुक्कर हा प्राणी सुयोग्य आहे. त्याचे यकृत आपल्यात सामावून घेण्याची शक्यता बरीच आहे.

समारोप
आपल्या पोटातील यकृत चयापचय आणि इतर अनेक कामांत महत्वाची मध्यवर्ती भूमिका निभावते. त्याचे काही आजार दीर्घकालीन होतात आणि त्यातून कठीणतेची अवस्था येते. तिच्या तीव्रतेनुसार तिचे परिणाम मेंदूसह अन्य महत्वाच्या इंद्रियांवर होतात. एका मर्यादेपर्यंत यकृत त्याचे कार्य याही परिस्थितीत काही प्रमाणात निभावते. पण ती मर्यादा संपल्यास ते पूर्णपणे निकामी होते. तेव्हा प्रत्यारोपण हाच उपाय उरतो. समाजात या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. हे सर्व पाहता कठीणतेच्या अवस्थेला अटकाव करणे हाच सर्वोत्तम उपाय ठरतो. म्हणून यकृताच्या आजारांत हयगय न करता तज्ञांकडून वेळीच उपचार करून घेतले पाहिजेत.
**********************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निलाक्षी, धन्यवाद.

"पित्ताचा" त्रास >>>>

एकूणच ‘पित्त’ या शब्दाबाबत समाजात गोंधळ आहे आता काही खुलासा:
१. आपल्या जठरात तीव्र HCl हे आम्ल असते. त्याच्या अधिक्याने बऱ्याचदा उलट्या होतात. याला Hyperacidity असे म्हणावे.

२. पचनाच्या काही तीव्र आजारांत पित्ताशयातील Bile (पित्तरस) उलट्या प्रवाही जठरात येते आणि उलटीत बाहेर पडते. याला म्हणायचे Bilious vomiting .

..... तुम्हाला कोणते ‘पित्त’ अभिप्रेत आहे ते सांगितल्यास बरे होईल.

नेहमीप्रमाणे महितीपूर्ण लेख.
> पुरुषांत ६० ग्रॅम आणि स्त्रियांत २० ग्रॅम प्रतिदिन असे सेवन १० वर्षांहून अधिक काळ केल्यास यकृत-कठीणतेचा धोका बराच असतो. > हे फारच कमी आहे की!
खूप वर्षांपूर्वी दूरदर्शनवर सकाळी एक कार्यक्रम यायचा सुबह-सवेरे म्हणून. त्यात एकदा एक डॉक्टरीन आलेली. तिने सांगितलं होतं की ६०मिली व्हिस्की दिवसाला पिली तर ओके असतं; रादर ते रिलॅक्स करणारं होऊ शकतं. यावरून तेव्हा बराच गदारोळ झालेला.

ॲमी,
यावरून तेव्हा बराच गदारोळ झालेला >>>

खरंय. नव्या संशोधनानुसार अल्प मद्यपान देखील अपायकारकच आहे.
थोडक्यात:
अल्प सेवन >>> कमी अपाय
आणि
खूप सेवन >>> जास्ती अपाय !

तुम्हाला कोणते ‘पित्त’ अभिप्रेत आहे ते सांगितल्यास बरे होईल. >>
मला Hyperacidity विषयी विचारायचे आहे.

दुसर्‍या प्रकाराविषयी माहित नाही आजिबातच.

निलाक्षी,
Hyperacidity आणि यकृताच्या सुजेचा संबंध नाही. यात जठर आणि लहान आतड्याच्या सुरवातीच्या भागास इजा होते.
माझ्या अनुभवानुसार हा त्रास पावसाळ्यात जास्त होतो

धन्यवाद डॉक्टर!

मला हायपर अ‍ॅसिडीटीचा त्रास आहे खूप आणी तो उन्हाळ्यात तसेच ऑक्टोबरमधेही खूप होतो.

यकृताला सूज असल्याचेही एकदा सांगितलेले पण कशामुळे कळाले नव्हते तेंव्हा म्हणून शंका विचारली

Pages