कालचक्र : २

Submitted by सोहनी सोहनी on 25 November, 2019 - 00:36

कालचक्र : २

त्या आत मध्ये गेल्या, तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला, मी पटकन आदना कडे वळलो, हा काय प्रकार आहे?? अश्या कश्या आहेत त्या?? मळवट काय?? कुंकवाने माखलेले हात काय?? काय काय आहे नक्की हे???

मी न थांबता प्रश्नांची सरबत्ती लावली, मी हादरलोच होतो, प्रथमच असं काही आयुष्यात पाहिलं होत, तेही इतक्या जवळून,
आणि त्यांची नजर, काय करतात नक्की त्या?? मी पुढचा प्रश्न विचारत होतोच तर त्या पुन्हा आल्या,

मी पुन्हा हादरलो, कारण आता त्या एकदम शांत आणि वेगळ्याच दिसत होत्या,
कापली मळवटाच्या ऐवजी साधंसं कुंकू, पदर नीट केला होता, एकंदरीत स्वतःला सावरून आलेल्या दिसत होत्या त्या,
मला काही कळत नव्हतं, काहीही असो माझी त्यांच्या नजरेला नजर द्यायची मुळीच हिम्मत होत नव्हती,
त्यांनी पाणी दिलं, मी मूक नकार दिला . . .

इतका वेळ मी घाबरून उभाच होतो, त्यांनी मला बसायला सांगितलं, तरीही माझी बसायची हिम्मत होत नव्हती,
आदनाने बळेबळेच मला सोफ्यावर बसवलं,

मी काही बोलत नव्हतो म्हणून कदाचित त्यांनीच बोलायला सुरुवात केली,

" मला माहित नव्हतं तुम्ही येणार आहेत ते, मी माझी साधना करत होते, तुमच्या अचानक येण्याने माझ्या साधनेत खंड पडणार होता म्हणून मी स्वतः होती तशीच बाहेर आले,
घाबरण्याचं काही कारण नाही, हवंतर आदनाला विचारा"

तेव्हा कुठे मी त्यांच्याकडे पाहिलं, एकदम साधी मानवी नजर, प्रेमळ वैगेरे मुळीच नाही पण भीती वाटणार नाही इतकी साधी,
मग मला हळू हळू आठवायला लागलं मी इथे का आलो होतो, आणि मला काय करायचं होतं . .
मी एकवार आदनाकडे पाहिलं, तीही भेदरलीच होती,

"मला का भेटायचं होतं तुम्हाला??" त्यांनी विचारलं

मला हे सगळं एकदाच संपवून टाकायचं होतं, आता बोललो नाही तर पुन्हा यावं लागणार, पुन्हा ते सगळं दडपण पुन्हा ती वेगळीच भावना मला अनुभवायची नव्हती त्यामुळे मी त्यांना आढेवेढे न घेता सगळं सांगितलं, ( मनातून इतका घाबरलो होतो मी माझेच कापणारे शब्द मला कळत नव्हते)
मी म्हणालो, कि आई, मला आदना खूप आवडते, माझं खरं प्रेम आहे तिच्यावर आणि मला लग्न करायचं आहे तिच्याशी,
तीच हि खूप प्रेम आहे आणि तिचीही हीच इच्छा आहे,
फक्त तुमच्या परवानगी हवीये. . .

मला वाटलं होतं त्या मला एकतर हाकलवून लावतील किंवा कमीत कमी दम देऊन आदनाचा विचार सोडायला तरी लावतील पण तसं काहीच झालं नव्हतं,
उलट मी त्यांच्या डोळ्यांत वेगळीच चमक पहिली, त्यांच्या चेहऱ्यावर आपसूकच हास्य पसरत होतं,
पण ते हास्य काहीतरी विचित्र होतं काहीतरी असाध्य साध्य होणाच्या आधीचं हास्य,
मला त्या हास्याचा आनंद व्हायला हवा होता पण माझ्याही नकळत मी थरारलो, अंगावर सरसरून काटा आला,
मी एक क्षण फक्त एक क्षण आदनाकडे पाहिलं आणि परत त्यांच्या कडे पाहिलं, त्या पुन्हा नॉर्मल होत्या,
ह्या वेळेस त्यांच्या चेहऱ्यावर साधं हास्य होतं, जसं तुझ्या माझ्या चेहऱ्यावर असत तसंच,

"माझी काहीच हरकत नाही, मला हे लग्न मान्य आहे"
त्या काही क्षण विचार करून म्हणाल्या, मी अवाक झालो होतो, आदना सुद्धा, कारण होकाराची अपेक्षा तर मी त्यांना पाहिल्यावरच सोडून दिली होती,
आल्यापासून जे काही दडपण जाणवत होतं ते अचानक निवळल्यासारखं झालं, जणू काही वातावरणात अचानक परिवर्तन होतं आहे,
जे काही सावट मला जाणवत होतं ते जणू निघून गेलं असं काहीतरी झालं होतं,
मला अचानक हुरूप आला, तणाव दूर झाला होता,
त्यांनी माझी वरचेवर चौकशी केली, काय करतो, कुठे राहतो, आणि घरी कोण कोण असत वैगेरे वैगेरे . . .
मी एकटाच राहतो आणि मी मुद्दामून तुझ्या आजोबांचं त्यांना सांगितलं नाही,
मला कुणीच नाही असं जेव्हा मी त्यांना सांगितलं तेव्हा, एक क्षण फक्त एक क्षण पुन्हा तेच विचित्र हास्य मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसले,
काय होतं ते मला काही कळलं नव्हतं तेव्हा, आणि कळलं तेव्हा खूप उशीर झाला होता. . .

मी तयारीला लागतो, पुढच्या महिन्यात आपण एका चांगल्या मुहूर्तावर मंदिरात लग्न करूयात, चालेल??
मी त्यांना आनंदाने विचारलं,
पण तो आनंद काहीच क्षण टिकला, कारण त्या जे म्हणाल्या ते ऐकून मी आणि आदना एकेमकांकडे चक्रावून पाहत होतो, दोघांचेहि चेहरे फुललेल्या फुलासारखे होते ते क्षणात कोमेजून गेले,

त्या म्हणाल्या

"हो, मला चालेल, तुम्ही म्हणाल तसं पण . . . माझी एक अट आहे"

ती अट ऐकून मला फक्त भोवळ यायची बाकी होती, अंगातलं अवसान तर केव्हाच गेलं होतं, ती अट त्या खेळाची पहिली आणि मुख्य पायरी होती . .

( कसा झालाय हा भाग?? )

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

छान झालाय हा भाग. Happy
थोडे मोठे भाग असतील तर बरे होईल.
पुढील भागात काय होईल ह्याची उत्सुकता आहे

मला कथेच्या फ्लो विषयी सांगत चला प्लिज, माझी दुसरीच भयकथा आहे हि, पहिली लिहताना मीच घाबरले होते त्यामुळे, तिला टिपिकल structure देऊन सोडून दिली,
तसं म्हणायला हि पहिलीच आहे,
मी पूर्ण करणारच आहे, फक्त कुठे अतिशोयोक्ती झाली किंवा बोरिंग होते किंवा अति लंबतेय किंवा जास्त फास्ट होतेय, ह्या पैकी काही वाटलं तर कृपया करून सांगा मला. . .

किल्ली मॅम, मानिम्याव मॅम थँक यु. . . पुढील भाग मोठा लिहीन नक्कीच . . .

अजीबात नाही. कथा ओघवती आहे, पण तुम्हाला टेन्शन आल्याने तुम्ही वेळ लावताय. भाग थोडे मोठेच टाका. अगदी बीनधास्त लिहा, छान लिहीताय.

रश्मी मॅम धन्यवाद, हो टेन्शन आलंय,
मायबोली सारख्या व्यासपीठावर काही पोस्ट करायचं म्हणजे टेन्शन आहेच. . .
लहान आहे म्हणून सांभाळून घ्या असं म्हणायची देखील हिम्मत होतं नाहीये,
तरीही पूर्ण प्रयत्न करेन . . .