युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४५

Submitted by मी मधुरा on 20 November, 2019 - 07:49

अर्जुनने लांबूनच एकदा वरती फिरणाऱ्या मत्स्याकडे नजर टाकली आणि पाण्याच्या पात्राजवळ आला. धनुष्य-बाण घेऊन गुडघ्यावर बसला. प्रतिबिंबाला न्याहाळू लागला. त्याने प्रत्यंचेवर बाण ताणला. मत्स्यावर.... मत्स्याच्या डोळ्यांवर त्याने चित्त एकाग्र केले; आणि आता त्याला मत्स्याचा डोळा सोडून बाकी काहीही दिसत नव्हते!
त्या वर फिरणाऱ्या खोट्या मत्स्याला खोटं अंधत्व बहाल करत अर्जुनाच्या हातून सुटलेल्या बाणाने पण पुर्ण करत नयनभेद अचूकपणे पार पाडला होता.
"म्हणजे? अनुज? लाक्षागृहातून अर्जुन खरचं वाचला?" बलरामाने अर्जुनाकडे पाहात विचारले.
"मी कधी तुमच्याशी असत्य बोलतो का दाऊ?"
"नाही रे, पण मग जर ते सत्य असेल तर हे ही सत्य होते की दुर्योधनाने....?"
कृष्णाने पुन्हा मान होकारार्थी हलवली.
"माझा विश्वासच बसत नाही, अनुज. माझा विश्वासच बसत नाही!" बलराम अस्वस्थपणे म्हणाला.
सारे सभागृह जयजयकाराने दणाणून निघाले.
'ब्राह्मणपुत्राचा विजय असो.... विजय असो!'
द्रौपदीने मनोमन गोविंदचे आभार मानले.
द्रुपद मात्र अजूनही 'आ' वासून बघत होता. 'अर्जुन सोडून हा लक्षभेद कोण करू शकतं? म्हणजे.... हाच? पण मग लाक्षागृहाचा किस्सा खरा की खोटा?' त्याने श्वेत वस्त्रातल्या अर्जुनाला निरखून पाहिले. पांडवांनी वेषांतर अगदी चपखलपणे केलं होतं खरं. पण एक गोष्ट लपवणे अशक्य होते..... ते म्हणजे चेहऱ्यावरचे दैवी तेज! द्रुपदाच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य पसरले.
अर्जुन हात जोडून अभिवादन करत द्रौपदी समोर उभा राहिला. जवळून तिच्या केसांना माळलेल्या फुलांचा सुवास त्याला जाणवला. तिच्या नयनांमध्ये जादू होती. तो अडकून राहिला क्षणभर!
________
"आता अर्जुनचे कौशल्य पाहिल्यानंतर जर आपल्या पाचही जणांना एकत्र पाहिलं तर सगळ्यांना आपला परिचय झाल्याशिवाय राहणार नाही. भीम, तू अर्जुन आणि राजकुमारीला सुरक्षितपणे सोबत घेऊन ये. आम्ही निघतो."
"जशी आज्ञा, भ्राताश्री."
"काळजी घे त्यांची. वातावरण नीट दिसत नाही इथले."
इतके बोलून युधिष्ठिराने नकुल-सहदेव सोबत तिथून पाय काढता घेतला.
________
तिच्या काळसर त्वचेवर लकाकणाऱ्या दागिन्यांमुळे तिचं रुप अजूनच खूलून दिसत होतं. वरून बघता तळाचा थांगच लागू नये असा जलाशय रात्रीच्या वेळी जसा गहिऱ्या रंगाचा भासेल, तसे तिचे नेत्र. जलाशयाच्या तरंगांवर चंद्रकोर उमटावी तसे तिच्या डोळ्यांत अर्जुनचे प्रतिबिंब उमटले होते. द्रौपदीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता.
ती पुढे होऊन त्याला वरमाला घालणार तेव्हढ्यात भानावर येत दुर्योधन ओरडला.... "पांचालनरेश! हा आम्हा सर्वांचा अपमान आहे. क्षत्रियांना निमंत्रण देऊन तुम्ही कन्या ब्राह्मणाला वरू देऊ शकत नाही."
"हो राजन. हा आम्हा क्षत्रियांचा अपमान आहे." दुसरा एक सहभागी झालेल्या राजाने दुर्योधनाची 'री' ओढली.
मग काय! विना विलंब बाकी सगळे सहभागी राजेही त्यात सामिल झाले.
द्रौपदीच्या चेहऱ्यावर चिंता आणि भय पसरले. पांचाल नरेश मात्र त्या ब्राह्मण वेषातील अर्जुनाकडे पाहण्यात गर्क होता.
"हे यज्ञसेनी, मी जर लक्षभेद करून तुमचे मन जिंकले असेल, तर मला वरमाला घालावीत."
अर्जुनने बाकीच्यांकडे दुर्लक्ष करून सरळ द्रौपदीलाच संबोधले तसे तिने स्मित करून त्याच्या गळात वरमाला घातली आणि दुर्योधना सकट सगळ्या सहभागी राजांनी शस्त्रे उचलली. अर्जुनाने द्रौपदीला स्वतःच्या मागे सरकवले आणि धनुष्यावर पकड मजबूत केली.
कर्णाने अर्जुनवर बाण चालवायला धनुष्य उचलले आणि त्याच्या हातात असतानाच वेगाने आलेल्या बाणाने त्याचे धनुष्यच मोडून ठेवले. कर्ण चक्रावल्यासारखा बघत राहिला. धनुष्याच्या बरोबर मधे छेद गेला होता.
'कर्णाचे धनुष्य मोडले? या कर्णाचे? तेही या वेगाने?'
"कोण आहेस तू?" कर्णाने मोडके धनुष्य न्याहाळत अर्जुनाकडे नजर टाकली.
"धनुर्धाऱ्याची ओळख त्याचे बाण असतात, अंगराज!"
'कर्णाचे धनुष्य मोडू शकणारे केवळ चारच! द्रोणाचार्य, परशुराम, भीष्माचार्य आणि अर्जुन! पण मग हा कोण? याला कसे जमले?'
कर्णाने धनुष्याचे अवशेष हातातून सोडून दिले आणि अर्जुनाकडे बघत उभा राहिला.
दुर्योधन आणि बाकीचे राजे अर्जुनावर धावून गेले. मग भीमने सरळ सभागृहातला मधलाच एक खांब तोडून हातात घेतला. अर्जुन-द्रौपदी आणि त्यांच्यावर धावून येणारे राजे यांच्यात साक्षात भिंत बनून उभा राहिला तसे सगळे क्षणभर जागीच गोठून उभे राहिले.
पण दुर्योधनने पुन्हा पाय उचलला. बाकीचेही पुढे पुढे येऊ लागले. भीमने हातातला खांब सरळ त्यांच्यावर भिरकावून दिला. आरडाओरडा करत सगळे त्या खांबाखाली अडकून पडले. भलामोठा खांब तीव्र वेगाने अंगावर पडल्याने अंग चपटे झाल्यासारखे झाले होते. कसाबसा तो खांब उचलून बाजूला करण्याचा प्रयत्न सारे मिळून करू लागले. पण खांबाचे वजन काही त्यांना पेलवेना. शेवटी डोळ्यांसमोरून दोन्ही ब्राह्मण द्रौपदी सह तिथून निघून जाताना पाहत राहण्याशिवाय त्यांच्या कडे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक राहिलेला नव्हता.
सभागृहात एकाच चेहऱ्यावर आनंद पसरला होता.... द्रुपद! त्याच्या प्रतिशोधाची तयारी आता पुर्ण झाली होती.
___________
सोन्या माणकांचे अलंकार सांभाळत द्रौपदी वनराईतून चालत होती. गार वारा तिचा पदर उडवत होता. द्रौपदी आता सतत आपल्या सोबत असणार या विचारानेच अर्जुन आनंदला होता. नदीकाठावरून चालताना द्रौपदी थांबली. तिच्या अनुषंगाने भीम आणि अर्जुनही थांबले.
"द्रौपदी?"
"संध्या झाली आहे, आर्य."
"हो. पण अजून प्रकाश आहे. अंधारण्या आधीच आपण कुटीत पोचू."
"तसे नाही.... म्हणजे संध्यासमयीचे अर्घ्यदान करायचे असेल म्हणून...."
भीमाने हसून अर्जुनकडे पाहिले.
"हो. पण....." अर्जुन गडबडला आणि भीमाकडे पाहत त्याने दोन्ही भुवया मधोमध उचावल्या.

"आज महत्त्वाचा दिवस आहे ना म्हणून आज नाही केले. उद्या करूया." शब्द जुळवत भीमाने अर्जुनकडे बघत बघत उत्तर बनवले.
द्रौपदीला जरा आश्चर्यच वाटले. ब्राह्मण दिवसांतून दोनदा अर्घ्यदान करतातच, असे तिला ऐकून माहिती होते.
पण तिने शांतपणे चालायला सुरवात केली.
___________
रात्रीच्या जेवणाची तयारी करत कुंती पाठमोरी बसलेली होती.
"मातोश्री, आम्ही बघा काय भिक्षा आणली आहे ते!"
"काय रे अर्जुन? काय भिक्षा आणली आहेस?"
"तुम्ही येऊन बघा ना मातोश्री."
'ही मुलं अति उत्साही आहेत. आता मी एवढी कामात व्यस्त आहे आणि हे मात्र....' कुंतीने जागेवरूनच अर्जुनाला आज्ञा दिली, "अर्जुन, जी भिक्षा आणली आहेस ती पाच भावांमध्ये वाटून घ्या."
......आणि सगळे आवाज बंद झाले. एक वेगळीच अस्वस्थ शांतता कुटीत पसरली.
कुंतीने शिजलेला भात चुलीवरून उतरवून घेतला. चुलीची आग विझवली आणि कपाळावरचा घाम पुसत तिने दाराकडे नजर फिरवली.

समोर पांडव विस्कळीत झालेल्या भावना चेहऱ्यावर घेऊन उभे !
कडेला उभी होती एक सावळी पण सुंदर अशी अलंकारांनी मढलेली कन्या.
"अरे अर्जुन, ही कन्या कोण आहे?"
"जिला तुम्ही वाटून घेण्याचा आदेश दिलात माते!" अर्जुनचा आवाज थरथरत होता.
"काय बोलतो आहेस अरे तू? हिला वाटून घ्यायचा आदेश का देईन मी? मी तर भिक्षा..... अर्जुन? तू हिला भिक्षा म्हणालास? "

"त्या राजकुमारी द्रौपदी आहेत. अर्जुनने स्वयंवरात भाग घेतला होता, माताश्री. तो विजयी झाला..... आणि...." भीमला पुढे बोलताच येईना.
"आणि अर्जुनने गंमत म्हणून तिला 'भिक्षा' संबोधले? हेच संस्कार केलेत मी तुमच्यावर, अर्जुन?" कुंती संतापली होती, "युधिष्ठिर, आता तूच सांग. स्त्री ही भिक्षा आहे?"
"नाही मातोश्री. कदापि नाही." युधिष्ठिर उत्तरला, "पण द्रौपदी एक नववधू आहे आणि स्वयंवरात करतात ते 'कन्यादान'चं तर अर्जुनला मिळालं आहे. मातोश्री, दानालाच भिक्षादेखील म्हणतात. म्हणून जर अर्जुन द्रौपदीला भिक्षा म्हणला असेल, तर ते मीअयोग्य म्हणू शकत नाही."
कुंतीने स्वतःचा राग शांत करत द्रौपदीकडे बघितले. हातात मडक्याच्या छोट्या पात्रात तिने पाणी भरून आणले. द्रौपदीच्या पायावर ओतून तिचं स्वागत करणार तोवर युधिष्ठिरचा आवाज कुंतीच्या कानी पडला.
"कोणाची पत्नी म्हणून द्रौपदीचे स्वागत करणार आहात मातोश्री?"
"म्हणजे? काय म्हणायचे आहे तुला?"
"मातोश्री, द्रौपदीची विभागणी करायची आज्ञा तुम्ही दिली होतीत, हे न बदलता येणारे सत्य आहे."
"पण मी नकळतपणे आज्ञा दिली होती, युधिष्ठिर."
"हो, माताश्री. परंतु तुम्ही दिलेल्या आज्ञेमुळे आमच्या मनाच्या पावित्र्यावर आता वेगळ्या विचारांचे शिंतोडे पडले आहेत. नात्याकडे बघण्याची दृष्टीही बदलली आहे, हे नाकारू शकत नाही मी, माताश्री."
"हे काय बोलतो आहेस तू युधिष्ठिर?"
"मातोश्री, अर्जुन जिला 'भिक्षा' म्हणाला ती द्रौपदी होती हे तुम्हाला माहिती नसले, तरी आम्हाला माहिती होते. आणि त्यामुळे तुम्ही दिलेली आज्ञाही तिलाच लागू होणार, असे गृहीत धरले होते आम्ही."
"नक्की काय म्हणायचे आहे तुम्हाला, भ्राताश्री?" भीमच्या कपाळाला आठ्या पाडल्या होत्या.
"भीम, मातेची आज्ञा पाळणे आपल्याला आणि आता आपल्या परिवाराची सदस्य असल्याकारणाने द्रौपदीलाही क्रमप्राप्त आहे."
"मग आधी दिलेली आज्ञा विसरून जा, अशी आज्ञा मीच तुम्हाला दिली तर? तर कोणती आज्ञा पाळशिल, युधिष्ठिर?"
"दुसरी आज्ञा, माते."
कुंतीने नि:श्वास टाकला. काही बोलणार तोवर युधिष्ठिरचे शब्द तिच्या कानात शिलारस ओतावा तसे पडले....
"परंतु, मग मला संन्यास घ्यावा लागेल." शांत चेहऱ्याने युधिष्ठिर म्हणाला आणि त्याने सर्वांच्या मनात घोंगावतं वादळ निर्माण करून सोडलं.
"का युधिष्ठिर? कशाकरता?" कुंतीने चढ्या आवाजात विचारले.
"माताश्री, तुम्ही वाटून घ्यायचा आदेश दिलात....."
"हो. हो, दिला मी आदेश. पुढे? पुढे काय?" रागाने तिने विचारले.
"शांत व्हा, माताश्री. संतापून सत्य बदलत नाही. द्रौपदी तुमची आज्ञा विसरून जाईल कदाचित. कदाचित आम्हीही विसरून जाऊ. पण मनात नात्याचा झालेला गुंता आमचं आयुष्य कठीण बनवून ठेवेल. तो गुंता मनात राहिल. तेही अगदी आजन्म."
"कसला गुंता? कसली दृष्टी? कसले विचार, युधिष्ठिर? काय बोलतो आहेस तू?"
"मातोश्री, अगदी स्पष्ट सत्य आहे हे. 'तुम्ही वाटून घे.' म्हणालात, तेव्हा 'द्रौपदीला आमच्यात वाटून घेणे.' हा एकच अर्थबोध होत होता. आता बंधूपत्नी म्हणून तिच्याकडे पाहू तेव्हा आमच्या नजरेत तोच शुद्ध भाव असेल, याची काय खात्री? मला या दडपणाखाली कुटीत एकत्र राहता येणार नाही."
"म्हणजे...."
"आमचे नाते मलिन झाले आहे, माताश्री. आता तुमच्या पहिल्या आज्ञेनुसार द्रौपदीला आम्हा सर्वांशी विवाह करावा लागेल; जे द्रौपदीवर लादणे अन्यायकारक आहे. त्यापेक्षा तुम्ही दुसरी आज्ञा द्या, माताश्री. पहिली आज्ञा विसरून मी संन्यास घेईन."
"तुम्ही एकटे नाही, भ्राताश्री. आम्ही सुद्धा संन्यास घेऊ." सहदेव म्हणाला आणि नकुलनेही होकारार्थी मान हलवली तसा कुंतीच्या मनात कल्लोळ माजला.
अर्जुनला क्षणभर काही कळेनासे झाले होते. भीम कडेला गुडघ्यांवर हात ठेवून बसला होता आणि द्रौपदी भांबावल्यासारखी तशीच उभी होती.
'सासरी पाऊल टाकल्यावर आपलं स्वागत होईल, नवीन माणसे भेटतील, कौतुक करतील' अश्या नववधुच्या स्वप्नांवर अक्षरश: पाणी फिरलं होतं.
अर्जुनच्या मनातही कोलाहल माजला होता.
'कुठून दुर्बुद्धी झाली आणि गंमत करायला गेलो.' असं त्याला झालं होतं.
'काय गरज होती द्रौपदीला भिक्षा म्हणायची? सरळ सरळ 'मी विवाह करून आलो आहे' असं म्हणायला हवे होते. आता काय करायचे?'
काही क्षण शांततेत गेले.
द्रौपदी कुटीच्या ओसरीवर उभी होती. कोणीतरी कुटीच्या बाहेरच्या आवारात असल्याचे तिला जाणवले. तोवर अर्जुन तिच्या जवळ गेला.
"द्रौपदी!"
"आर्य?"
"आता काय करायचं?"
"मला माहित नाही, आर्य. पण तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून बघालं का? कदाचित त्यांना वाटणारे दडपण निघून जाईल."
"ते व्यर्थ आहे द्रौपदी. एकदा निर्णय घेतला की तो बदलंत नाहीत ते."
"मग त्यांना संन्यास घेऊ द्यायचा आर्य?"
"नाही द्रौपदी, नाही. असा विचारही सहन होत नाही मला. ते जर संन्यास घेणार असतील तर मी ही त्यांच्या सोबत जाईन."
द्रौपदी रडवेली झाली. "मग माझं काय होणार आर्य?"
काही वेळ विचार करून अर्जुन म्हणाला, "यावर एक उपाय आहे, द्रौपदी. जेणेकरून भ्राताश्री सुद्धा संन्यास घेणार नाहीत आणि आम्हीही."
"कोणता आर्य?"
"तू पांचाल नगरीला परत जा."
"आर्य?"
"जर भिक्षाच नसेल तर तिला वाटून घ्यायचा प्रश्नच येणार नाही."
"काय बोलता आहात आर्य?"
"जे सहज शक्य आहे तेच बोलतो आहे, द्रौपदी. आपला सहवास केवळ काही घटकांचा आहे. विसरणे सोप्पे जाईल. तसही कुटीत राहण्याऐवजी राजमहाल तुझ्याकरता जास्त सोयीस्कर ठरेल."
भावनिक होत अर्जुन म्हणाला आणि अर्जुन तिला दूर लोटू पाहतो आहे असं जाणवून द्रौपदी चिडली. तिला काय बोलावे कळेना.
'बंधूने संन्यास घेतला तर चालणार नाहीये, पण पत्नी सोडून गेली तर चालणारेय? हे काय आहे, आर्य? विसरणे सोप्पे जाईल असं म्हणूच कसं शकता तुम्ही? विवाह केलाय मी तुमच्याशी. आर्य, तुमच्या गळ्यात ही वरमाला घातली आहे ना, ती तुम्हाला सोडून महालात परतायला नाही घातली मी.' मनात उमटलेले बोलून दाखवले तर अर्जुन दुखावला जाईल, पण मार्ग काहीच निघणार नाही, हे तिला जाणवलं होतं.
तिने अर्जुनकडे पाहिले.
"तुम्ही मला वाचवलं आहेत आर्य! तुम्ही नसतात तर, ना पितामहाराजांचा मान राहिला असता, ना माझा जीव.
मी आपलं नातं वाचवायला काहीही करू शकते, आर्य.... आणि तुमच्यासाठीही." इतकं बोलून ती कुटीत गेली. सगळे पुतळ्यासारखे जागच्या जागीच थांबले होते. अर्जुनही तिच्या मागे आत आला.
'आता बहुदा इथून निघून जाणार हे सांगायला तू पुन्हा आत आली आहेस; पण मी तरी काय करणार! माझ्याकडे दुसरा काहीच मार्ग नाही, द्रौपदी.' तो अस्वस्थ मनाने उभा राहिला.
"मला मान्य आहे."
द्रौपदी म्हणाली तसा भीम दचकून उठून उभा राहिला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य पसरले होते.
"काय म्हणालीस द्रौपदी?" कुंतीने विचारले.
"हेच माताश्री, की मला तुमची आज्ञा मान्य आहे. या पाचही जणांशी विवाह करायला तयार आहे मी."
अर्जुनाच्या हृदयाचा ठोकाच चुकला. "काय? काय बोलतो आहेस, द्रौपदी?"
"तेच आर्य, जे तुम्ही ऐकलंत."
"पण समाज काय म्हणेल?"
"समाज तर पतिव्रता देवी सितालाही बोल लावतो, आर्य! आणि ज्या अग्नित प्रवेश करून तिने तिचे पावित्र्य सिद्ध केले ना, तीच अग्निदेवता माझी जन्मदात्री आहे. याहून दुसरे काय हवे सिद्ध करायला की माझे आयुष्य खडतरच असणार?"
"पण द्रौपदी...."
"सीता रामासोबत वनवासासही जाऊ शकते, आर्य. पण त्याला सोडून तिच्या पित्या घरी-जनक राजाकडे जात नाही."
"पश्चात्ताप होईल असा कोणताही निर्णय घेऊ नकोस द्रौपदी...."
"सीताहरण झाल्यावरही रामचंद्रांची साथ न सोडल्याचा पश्चात्ताप सितेला झाला नव्हता, आर्य."
सगळे तिच्याकडे बघत उभे राहिले. 'आ' वासून. निरुत्तर. स्तब्ध.
_______________
"धृष्टद्युम्न? असा अस्वस्थ का आहेस?"
"द्वारकाधिश, द्रौपदी.... ते पाचजण..... त्यांनी तिला भाग पाडलंय केशव. पाचही जणांशी लग्न करायला भाग पाडलंय. पिताश्रींना सांगितले तर त्यांच्या चेहऱ्यावर जराही राग नव्हता. उलटं हसले. म्हणाले, 'आशिर्वाद फळाला येतोच.' मला समजत नाहीये काय करावं! ते ब्राह्मण असं कसं करू शकतात, केशव?"
"नाहीच करू शकत, धृष्टद्युम्न; आणि त्यातही कोणी वेदपाठ करणारा ब्राह्मण तर कदापि नाही करू शकत."
"....."
"पण हाचं प्रश्न त्यातल्या एकाने लक्षभेद केला तेव्हा नाही पडला तुला?" कृष्णाने चेहऱ्यावर लोभस स्मित कायम ठेवून विचारलं.
"म्हणजे काय केशव?"
"वेदपाठ करणाऱ्या स्नातक ब्राह्मणांना क्षत्रिय स्वयंवरात पाहिले आहेस कधी?"
"नाही." धृष्टद्युम्न विचारात पडला, "केशव, मग कोण होते ते?"
"धृष्टद्युम्न, जिथे भल्या भल्या योद्ध्यांनी हार मानली, असा लक्षभेद कोण करू शकतो?"
"कोण?"
"....." कृष्ण हलकंच हसला.
"द्रोणाचार्यांचा सर्वोत्तम शिष्य..... अर्जुन?"
कृष्णाने होकारार्थी मान हलवली.
"मग लाक्षागृह? ते वाचले त्यातून?"
कृष्ण गालात हसला आणि त्याने शेल्याचे टोक धरून शेला हाताभोवती गुंडाळला.
"तुझी भगिनी सुरक्षित हातांमध्ये आहे, धृष्टद्युम्न. चिंता करू नकोस."
"पण तरीही केशव.... पांचालच्या राजकन्येचा विवाह पाच पुरुषांची?"
'प्रत्येक प्रतिशोधाची किंमत मोजावी लागते, राजकुमार.' कृष्णाने डोळे मिटले. बहुदा केशवलाही नियतीने निरुत्तर केले असावे, म्हणून धृष्टद्युम्नने फक्त नमस्कार केला आणि कक्ष सोडला.
_______________

©मधुरा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप सुंदर लेखन.
पुढील भागाच्या लेखनासाठी शुभेच्छा .

छान...द्रौपदीचा गृहप्रवेशाबद्दल फारस माहीत नव्हतं...फक्त आज्ञा म्हणून पाळली इतकचं माहीत होतं....आज सविस्तर वाचायला मिळाले...

That was so rude, Chraps. There was a consent factor which you are not taking in consideration.

लग्न तिच्यावर लादले गेले नव्हते आणि ना तिच्यावर बळजबरी केली गेली होती. तिच्याकडे तीन पर्याय उपलब्ध होते.
१. अर्जुन म्हणाला तसे सगळं सोडून पुन्हा पांचालनगरीला ती परतू शकली असती.
२. या विवाहाला नकार देऊन सगळ्यांना संन्यास घ्यायला भाग पाडले असते.

पण वरील दोन्ही परिस्थितीत ती अर्जुनला गमावणार होती, जे तिला अमान्य होत.
म्हणून तिने तिसरा पर्याय निवडला.
जो तिचा..... सर्वस्वी तिचा निर्णय होता.

द्रौपदी आणि कन्सेंट

हे दोन शब्द म्हणताहेत,

आम्ही पुन्हा येऊ
आम्ही पुन्हा येऊ
आम्ही पुन्हा येऊ