जिप्सी

Submitted by कांचनगंगा on 20 November, 2019 - 01:59

जिप्सी

आम्ही असतो जिप्सी
घोळदार रंगीत झग्यात, चमकदार मण्यांच्या माळांत,
तनामनावर खुशीचा साज मिरवणाऱ्या जिप्सी
झग्याच्या प्रत्येक रंगीत तुकडयाचा धागा
कुठेतरी जुळलेला असतो
माळेच्या एकेक मण्यातून आम्ही आयुष्य ओवत असतो
हे माझं, ते माझं, काहीच नसतं कायमचं
जिप्सींनी कधीच कुठंच नसतं गुंतायचं
नवी जागा, नवे रिवाज, जीवनाची नवी वळणं
स्विकारत अलिप्त
नियती नेईल तिथे, पुढेच जायचं असतं
जिप्सींनी कधीच कुठेच गुंतायचं नसतं
गुंतलं कधी, तर चिंध्या येतात हातात घोळदार झग्यासाठी
आपलं म्हणायला कुठलंच घर नसतं जिप्सींसाठी
पायाखालची जमीन आपली नसते,
परतीची वाट आपली नसते,
असतं ते फक्त कनातीचं छप्पर, आणि त्यावरचं
सर्वांना कवेत घेणारं अनंत आकाश
इंद्रधनुषी पेहरावात तालात थिरकताना,
झग्यावरच्या काचेरी आरशात स्वत:ला शोधताना,
पापण्याआड हलकेच एक बोचरी कळ दडवताना,
आम्ही जिप्सींच्या मनांत रुजतं, ते फक्त
अनादि,अमर्याद क्षमाशील आकाश,
फक्त अनादि, अमर्याद, क्षमाशील
आकाश............!

कांचन

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults