निनावी ...

Submitted by सोहनी सोहनी on 20 November, 2019 - 01:56

निनावी ...

एक नाव नसलेल्या नात्याची ओळख ...
अगदीच जन्माला आल्यापासून आपण नात्यांशी जोडले जातो, आई बाबा भाऊ बहीण काका आजी नवरा बायको मावशी अश्या अगणित नात्यांची गुंफण आपल्या भोवती असते, सगळ्या नात्यात एक जिव्हाळा असतो, प्रत्येक नात्याला नाव असत, एक ठोस अशी ओळख असते हो ठोस ओळख आणि मुख्य म्हणजे हि नाती समाजमान्य असतात. . .

ह्या इतर सगळ्या नात्यांव्यतिरिक्त आयुष्यात अशी एक व्यक्ती येते जिच्या सोबत आपलं मनाचं नातं जुळत, नकळत अगदी आपल्याही...
अजूनही काहीशी नाती आहेत जी निनावी असतात, मनाने जोडलेली नाती, अंतराशी जुडलेली नाती, निनावी ..
ज्या नात्यांना त्या दोन मनाव्यतिरिक्त अस्तित्व नसत आणि त्या नात्याचा खरा अर्थदेखील त्या दोन मनांव्यतिरिक्त कोणालाच कळत नसत..
ह्या नात्याला वयाचं, रंगाचं, रूपाचं, पैश्याच कसलच घेणंदेणं नसत, अर्थ असतो तो फक्त मनाचा.

जुळवली जाते ते पत्रिका, पडताळले जातात ते गुण, हेच पाहतो ना आपण लग्न जुळवताना??
पण मन जोडायला पत्रिका आणि गुण पाहावे लागतात का??? विचार जुळवायला हे करावं लागत का?

अंतराच, मनाचं नातं जुळवावं लागत नाही ते आपोआप जुळत, मन जुळली विचार जुळले कि एक नवीन नात्याचा पर्व सुरु होतो,
एक कधीही न पुसता येणारी ओळख, न संपणारी ओढ, हवीहवीशी वाटणारी संगत, अनामिक हुरहूर,
हळूहळू सगळ्या नात्यांपेक्षा हे नातं जास्त जवळच आणि आपलंस वाटू लागत,
आपोआपच त्या नात्याला तितकं महत्व प्राप्त होत कारण त्या नात्यात आपलं मन स्वतःच समाधान मिळवत असत.

ती व्यक्ती अशी असते जी आपल्याला आपल्यापेक्षा जास्त ओळखते, जिच्यावर आपण अगदीच डोळे बंद करून विश्वास ठेवतो, जी आपल्या मनातलं शब्दांविना समजू शकते, ती मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेम भावनेच्या अलीकडे असते . . .

त्या निनावी नात्यात प्रेम असतंच पण ते प्रेम वेगळं आणि पवित्र असत, प्रत्येक नात्यातल्या प्रेमाला एकाच मापात तोलायचं नसत,
कारण प्रत्येक नात्यातल्या प्रेमाचं वेगळं आणि स्वतंत्र असं अस्तित्व असत.
पण सगळी कडे अश्या दोन व्यक्तींच्या नात्याला एकाच दृष्टिकोनाने पाहिलं जातं...

लग्नाच्या आधी जर असं नातं असेल तर समाजात त्याला प्रेम प्रकरण, अफैर, लफडं ह्याच नजरेनं पाहिलं जातं,
आणि लग्नानंतर अनैतिक संबंध हे लेबल लावलं जातं, समाजाकडून आणि कधीकधी आपल्याच जोडीदाराकडून सुद्धा. . .
कारण ते हि समाजाचाच भाग.

कधी कधी आपल्या स्वतःच कडून ह्या नात्यात गफलत होऊन जाते, आपण हि त्या नात्याला एक नाव एक ओळख देण्याचा अट्टाहास करून घेतो आणि
आपल्याच हाताने आपण त्या व्यक्तीला गमावून बसतो, अगदीच कायमचं...कारण असं करताना आपण ते नातं तोडलेलं असत.

लोकं काय म्हणतील ह्या प्रश्नामुळे जास्त प्रमाणात ह्या नात्यांना तोडलं जातं,

(तुझ्या बायकोला आपण असं इतका वेळ बोललेलं जमणार नाही, तुमच्यात माझ्यामुळे गैरसमज नकोत, आपण नको बोलूयात ह्यापुढे .)

किंवा,
(नको आता, अगं तू मुलगी आहेस, आणि तुझ्या नवऱ्याला आपल्या नात्याचा खरा अर्थ समजेलच असं नाही, त्यामुळे आपण नकोच भेटायला, माझ्या मुळे तुझ्या संसाराला ग्रहण नको,) किंवा

(तुला प्रत्येक वेळी तीच का लागते, बायको असतानादेखील तिची आठवण यावी, असं काय नातं आहे तुमचं?? मैत्रीच्या नावाखाली असले धंधे करता...)

किंवा
(माझ्या बायकोने एका दुसऱ्या पुरुषासोबत इतकं बोललेलं मला चालणार नाही आणि भेटलेलं तर मी मुळीच खपवून घेणार नाही, आणि जमत नसेलच तर मला सोडून जा तुझ्या यारा सोबत राहा)

अश्या अनेक प्रश्नांमुळे ह्या नात्याला मनातच पुरलं जातं,

ह्या नात्यात काळजी असते, जिव्हाळा असतो, विश्वास असतो आणि ह्या नात्याच्या ठराविक मर्यादा देखील असतातच...
ह्या मर्यादा त्या दोन मनांकडून कधीच ओलांडल्या जातं नाहीत
परंतु इतरांच्या दृष्टीने हे नातं ह्या मर्यादा तुटल्यापासूनच सुरु होतात.

हे नातं नवऱ्याचं बायको सोबत आणि बायकोच नवर्यासोबतही असू शकत, आणि ज्यांचं असत ते माझ्यालेखी सर्वसुखी,
पण तसं लाखातून एक जोडपं मिळेल, कारण नवरा बायको म्हटलं कि कितीही ठरवलं तरीही काळजी विश्वास आणि प्रेमासह जुडतात त्या अपेक्षा.
अपेक्षांमुळेच नवरा बायको ह्या नात्याच्या पुढे ते नातं स्वतःच अस्तित्व स्थापन करू शकत नाही,
मुळात हे नातं निर्माण होण्याचं कारण मनाची घुसमट, एकदा का जबाबदारीचं ओझं वाटायला लागलं कि आपोआपच मनाची घुसमट होते,
काय हवं असत साध्या माणसाला?? एक जागा हक्काची जिथे तो त्याच मन व्यक्त करू शकेल, मनातील सगळ्या भावना समजून घेणारी, समजावून सांगणारी व्यक्ती हवी असते, आणि घरात अशी व्यक्ती असली कि त्याच्यावर कितीही ताण असला तरीही तो हसत सगळं पार करतो,
पण त्याच मनच समाधानी नसेल तर मग तो अशी जागा अशी व्यक्ती शोधायला लागतो, केवळ मनाच्या समाधानासाठी. . .

ह्या नात्यात एक निस्वार्थ भाव असतो, आपली व्यक्ती सदैवं सुखात राहो, आनंदी राहो, ह्यासाठी एकमेकांची झटपट चालू असते.

पण समाजाच्या भीतीने जेव्हा हे नातं तुटत तेव्हा उरत एक रिक्त अतृप्त मन, ती व्यक्ती दूर गेली कि सतत मनाला रुखरुख लागते,
नेहमीच त्या व्यक्तीचे विचार आठवण मनात येत राहतात,
आठवण आली कि मनात उदासीनता भरून राहते आणि तिचीच काळजी वाटून राहते,
कधी कधी मनात असे काहूर उठतात कि जीव रडकुंडीला येतो कारण ह्या नात्याची नाळ मनाने आणि मनाशीच जोडलेली असते.

परंतु ती व्यक्ती कितीही दूर गेली तरी हे नातं मनात मरत नाही, मनाच्या कोपऱ्यात आठवणी आणि ती व्यक्ती हळुवार साठवलेली असते ..
जिथे मन जुळले तिथे अंतर काय आणि दुरावा काय, जस स्वप्न पाहायला व्हिसा लागत नाही, तसेच मनाचं आहे. . .

हे मनाचं हळुवार नातं शेवटच्या श्वासापर्यंत मनात जिवंत असत ...

नात्याला ह्या काही नाव नाही
तरी आठवणींचं भलं मोठं गाव आहे,
तू माझी आणि मी तुझा कोण
हे आपल्या मनांना ठाव आहे . . .

शेवटी इतकंच सांगेन कि,
हे नातं अनैतिक नसत, जिथे मर्यादेची आणि जबाबदारीच भान असत तिथे सगळं नैतिक असत,
अनैतिक असते ती नजर आणि दृष्टिकोन...

ह्या नात्याचा अर्थ त्याच व्यक्तींना कळेल ज्यांच्या आयुष्यात अशी व्यक्ती होती किंवा आहे. . .

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

का हो?? काही चुकीचं वाटतेय का ?? म्हणजे मी पाहिलं आहे असं, लग्नानंतर अश्या जवळच्या माणसांना दूर करावंच लागत, कारण चुकीचं नाव देतात, मग उगीच समोरच्याची बदनामी नको म्हणून मग बेस्ट फ्रेंड असले तरी दुरावा आणावा लागतो,
माझ्याच ग्रुप मध्ये ७ ८ जणांची लग्ने झालीत सो अशी सिच्युएशन च ऐकलं मी, सो लिहण्याचा प्रयत्न केला,
चुकीचं वाटत असेल तर प्लीज सांगा मी माझ्या विचारांत सुधारणा करेन. . .