माणुसकी जपणारी माणसं...

Submitted by मुकूल on 18 November, 2019 - 04:36

शेवटचा स्टॉप असल्याने प्रत्येकाचीच बसमधून उतरण्याची घाई चाललेली.माझ्या पुढेच उभे असलेले अंध काका सुद्धा तितक्याच सहजतेने बसमधून उतरले.काकांना 'कुठे जायचंय' हे विचारणार इतक्यात ,'नाना पेठेत जाणार का?'काकांनीच एका रिक्षावाल्याला विचारले.त्याने मान हलवून नकार दिला नि काका मात्र उत्तराच्या प्रतीक्षेत थांबले.एक रिक्षा थांबवून मी Driver ला त्या काकांना नाना पेठेत सोडण्याची विनंती केली अन काकांना रिक्षात बसवून मी थोड्या अंतरावर उभे राहिले.तितक्यात शेजारील चहा टपरीवाला आला.काकांशी काहीतरी बोलला आणि त्यांच्याकडून ५०० रुपये घेऊन निघाला.रिक्षावाला पण जरा विचित्रच वाटाय लागला मला.हे सगळे मिळून काकांना फसवतायेत कि काय?माझ्यातला (अति)जबाबदार नागरिक जागा झाला.५०० रुपये घेऊन गेलेला माणूसही कुठे दिसेना.'एखाद्याच्या असहायतेचा गैरफायदा घेतायेत काय..बघतेच आता' असा मनाशी बोलून तावातावाने रिक्ष्याकडे जाऊ लागताच इतका वेळ माझी अस्वस्थता न्याहाळणारा एक इसम जोरात बोलला,
" अरे मॅडमजी,tension मत लो..सब पहेचानते है उन्हे इधर"
माझं मलाच हसू आलं पण संशयाचं भूत काही जाईना..शेवटी रिक्षात निवांत बसलेल्या काकांना जाऊन विचारलंच..
'काका,तुम्ही मघाशी पैसे का दिले कोणालातरी?"
"बेटा,गेली 2 वर्ष मी याच रस्त्याने दररोज ये-जा करतो.इथले दररोजचे प्रवासी,चहावाले,टपरीवाले,काही रिक्षावाले मला अगदी आपुलकीने मदत करतात..माझा प्रवास सोप्पा बनवतात"
'"हे घ्या काका तुमचे सुट्टे ५०० रुपये,आज उशीर झाला वाटतं" मघाशी पैसे घेऊन गेलेला माणूस काकांना पैसे देत बोलला.
मी मात्र स्तब्ध..निशब्द..
आपण नक्की संवेदनशीलता हरवलोय कि कुप्रवृत्तीचेच भांडवल करणाऱ्या जगात माणुसकीचा ओलावा जपणारी माणसं शोधण्याची दृष्टीच गमावून बसलोय..'आजच जग वाईट आहे बाबा' म्हणताना;एखाद्याचं जगणं सुकर बनवणारी..जातीचं,धर्माचं लेबल न लावता माणुसकीचं सुंदर नाती जपणारी अशी लोक अस्तित्वात आहेत हेच विसरून जातो ना आपण..
माणसातलं 'माणूसपण' जपणाऱ्या अशा असंख्य माणसांना मनापासून सलाम..!!

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हृदयस्पर्शी...
<<<आपण नक्की संवेदनशीलता हरवलोय कि कुप्रवृत्तीचेच भांडवल करणाऱ्या जगात माणुसकीचा ओलावा जपणारी माणसं शोधण्याची दृष्टीच गमावून बसलोय..'>>>
अगदी खरं...

नौटंकी +११
छान लिहिताय. पुलेशु!

खरंच, पहिले मनात negative विचारच येतात.. आणि असं काही पाहिलं की मग स्वतः चा राग ही येतो आणि सुखद धक्का पण बसतो