‘ सुंभ जळला तरी .........’

Submitted by jayshree deshku... on 16 November, 2019 - 14:04

‘ सुंभ जळला तरी .........’
रात्रभर धुवाधार पाऊस पडत होता. सकाळी पेपरवाला पेपर टाकून गेला तोही थोडा ओलसरच वाटत होता. मस्त गरम गरम चहाचा घोट घेत पेपर मधल्या बातम्या वाचत होते. पहिल्या पानावरच्या ठळक बातम्या वाचून झाल्यावर दुसरे पान उलटले, महाजन वाडा पावसामुळे जमीनदोस्त झाला होता. आणि वाड्यात राहणारे नव्वद वर्षाचे वामनराव महाजन काका पण मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची बातमी वाचली. मन सुन्न झाले. पुढचा पेपर न वाचता तसाच ठेवून दिला. मन भूतकाळात शिरले.
महाजन वाड्याशी तसा माझा काहीच संबंध नाही. पण माझी बालमैत्रीण लता त्या वाड्यात रहात होती. बालवर्गा पासून ते दहावीपर्यंत एकत्र शिकलो, एकत्र वाढलो. रोजचेच एकमेकींच्या घरी जाणे येणे होते. त्यामुळे महाजन वाड्यातली सगळी बिऱ्हाडे, वाड्याचे मालक दोन महाजन भाऊ नरसिंह आणि वामन महाजन हेही माहित होते. वाड्यात कुणाच्या घराचे दरवाजे कधीच बंद नसायचे. कुणीही कुणाच्या घरात सहज डोकवत असायचे. त्यात कुणाला काही वावगे वाटत नसे. वरच्या मजल्यावर महाजन दोघे भाऊ त्यांच्या कुटुंबासमवेत सुखात नांदत होते. तर तळमजल्यावर चार बिऱ्हाड गुण्यागोविंदाने नांदत होती. त्यातील एक बिऱ्हाड माझ्या मैत्रिणीचे होते. वाड्यातले सगळे बिऱ्हाडकरू आणि मालक समवयस्क होते त्यामुळे सगळ्यांची मुलेही वर्षा दोन वर्षाच्या अंतरातली समवयस्क. सगळे मिळून एकत्र खेळायला लागले की नुसता कल्ला व्हायचा. शाळा चालू असताना सर्वजण आपल्या शाळेच्या, अभ्यासाच्या व्यवधानात असायचे. पण सुट्टी लागली की मजा असायची. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर खुपच मजा यायची. आमच्या वाड्यात इनमिन एक बिऱ्हाड तेही वयस्कर आजी आणि त्यांचा लग्न न झालेला मुलगा रहात होते. त्यामुळे बहुतेक वेळी मी खेळायला लताकडे जायची आणि अभ्यासाला लता माझ्याकडे यायची असे ठरून गेले होते.उन्हाळ्याच्या सुट्टीत महाजन वाड्यात मुलींना हाताशी घेऊन उन्हाळी कामे सुरु व्हायची . पापड, पापड्या, कुरडया, शेवया, सांडगे असे चालू असे. लताची आई ह्या सर्व गोष्टी करायची. त्यामुळे लाताकडे लता बरोबर कुरडयाचा चिक, उडीद पापडाच्या लाट्या, सांडग्याच पीठ खायला मिळायचं. मी पण त्यांच्याकडे लता बरोबर घवले, शेवया करायला शिकले. दुपारी थोडावेळ ही उन्हाळी काम आणि थोडावेळ खेळण व्हायचं. आम्ही आपले पत्ते, सागर गोटे, सापशिडी खेळायचो. महाजनांच्या मुला-मुलींकडे भारी खेळ असायचे म्हणजे भारी पत्त्याचा kat, karam होता. तोही कधीतरी खेळायला मिळायचा. जर त्या मुलांना त्यांच्या बरोबर कुणी खेळायला नसले तर! तसेही त्यांच्या बरोबर खेळायला नकोच वाटायचे. कारण ती हरली तरी त्यांना रडीचा डाव द्यावा लागायचा. महाजनांची मुले मुली तशी अभ्यासात बेताचीच होती. काठावर पास होऊन पुढच्या वर्गात जायची. लताच्या बहिणी आणि लता हुशार होती. तरी वाड्यात महाजनांच्या मुलांचा वरचष्मा असे कारण ती मालकांची मुले होती ना! लताचा भाऊ थोडा खोडसाळ होता. तो धाकट्या वामनरावांच्या मुलांशी भांडायचा. की लगेच मोठे मालक नरसिंहराव पुतण्याची कड घेऊन लताच्या भावाला दम देऊन मोकळे व्हायचे. कारण त्यावेळी वामनराव नोकरीच्या निमित्ताने बायकोबरोबर गुजरातमध्ये कुठेतरी रहात होते, तर त्यांची मूल नरसिंहरावांकडे शिकायला होती. त्यामुळे नरसिंहराव मोठ्या जबाबदारीने आणि प्रेमाने भावाच्या मुलांचा सांभाळ करायचे. त्यांच्या पत्नी निशा काकू पण पुतण्यांचे लाड करायच्या त्यांच्यावर लक्ष ठेवायच्या. सगळे कसे गोडीगुलाबित चालले होते. पण नंतर वामनरावांची बदली झाली. तेही वाड्यात रहावयास आले.त्यानंतर सगळे बिघडत गेले. वामनरावांच्या आणि नरसिंहरावांच्या पत्नीचे एकमेकीशी पटेनासे झाले. वामनरावांच्या पत्नी वनिता काकू वाड्यात रहावयास आल्या तरी घरात जबाबदारीने कुठलीच कामे करत नव्हत्या. इतके दिवस सारे स्वत:च्या मुलांचे आणि पुतण्यांचे जबाबदारीने पाहणाऱ्या निशा काकूंना आणि नरसिंहरावांना ही गोष्ट रुचली नाही आणि हळू हळू कुरबुरीला सुरुवात झाली .त्यातून भांडणाला तोंड फुटत गेलं. नंतर शेती आणि वाड्याच्या वाटणीची बोलणी सुरु झाली. नरसिंहरावांच्या दोन्ही मुलींची नुकतीच लग्न होऊन गेली होती, मुलाच कॉलेज शिक्षण चालू होत. त्याचं थोडफार कर्जही नरसिंहराव फेडत होते.अशात धाकट्या भावाने त्याच्यावर केलेल्या उपकाराची जाण ठेवावी व आपल्याला आपली अडचण समजून मदत करावी अशी नरसिंहरावांची अपेक्षा होती. पण झाले उलटेच वामनरावांनी नरसिंहरावांना काहीही जाणीव न देता कोर्टात त्यांच्याविरुध्द केस दाखल केली. जेव्हा कोर्टाची नोटीस हातात पडली तेव्हाच नरसिंहरावांना ही गोष्ट कळली. त्यांना मोठाच धक्का बसला. त्याचवेळी वाड्यातल्या एका बिऱ्हाडकरुने जागा खाली केली होती. ती संधी साधून निशा काकूंनी आपलं वेगळ बिऱ्हाड त्या जागेत थाटल. मग वरच्या मजल्यावरची सगळी जागा वामनरावांनी वापरायला सुरुवात केली तर खालची सगळी जागा नरसिंहरावांकडे आली. त्यामुळे साहजिकच भाडेकरूंचे घरभाडे नरसिंहरावांनी घ्यायला सुरुवात केली. आधीपासूनच निशा काकुंचे सर्व भाडेकरूंशी सलोख्याचे संबंध होते त्यात अजून जवळीक निर्माण झाली. कोर्ट केस चालूच होती.दोघा भावांमधली दरी वाढत चालली होती. त्याबरोबरच आई-वडिलांचं भांडण त्यांच्या मुलांनी आपलं समजून त्याचा वारसा पुढे घेऊन जायला सुरुवात केली होती. वामनरावांची आणि नरसिंहरावांची मुलही एकमेकांशी शत्रुसारखी वागत होती. निशाकाकुंना खूप गप्पा मारायला आवडायच्या पण बोलायला घरात कुणी राहील नव्हत. दीर जाऊ दुरावले होते, दोन्ही मुली लग्न होऊन सासरी नांदत होत्या. मुलाचे शिक्षण संपून तो नोकरीसाठी बेंगलोरला निघून गेला. अडीअडचणीला भाडेकरूंशिवाय त्यांना कुणी जवळ राहील नव्हत. त्यामुळे भाडेकरूंशी आढ्यतेने वागणाऱ्या निशाकाकू आता खुपच मवाळ झाल्या होत्या आणि सर्वाशी सलगीने वागत होत्या.भाडेकरूंच्या मुलामुलींसाठी स्थळे बघण्याचे काम पण करत होत्या.त्यांनी एक दोन लग्ने जमवली सुद्धा. दरम्यानच्या काळात आमचं कॉलेज शिक्षण संपल. लताच्या बहिणींची आणि भावाचे लग्न झाले. माझे आणि लाताचेही लग्न झाले. सगळ्या वाड्यातल्या मुलामुलींचे लग्न होऊन आता सणवार बाळंतपण चालू झाली होती. वाड्यातल्या भाडेकरूंकडल्या प्रत्येक कार्यक्रमाला नरसिंहराव आणि वामनरावांच्या कुटुंबाला बोलावल जायचं पण कार्यक्रमाला एकत्र असूनही दोन्ही कुटुंब त्रयस्था सारखी एकमेकांपासून दूर रहायची. वाड्यात सगळ्यात शेवटी वामनरावांच्या मुलांची लग्न झाली. वामनरावांनी मोठ्या धुमधडाक्यात, थाटात मुलांची लग्न केली पण आपल्या सख्या भावाच्या कुटुंबाला वगळले होते. निशा काकूंनी पुतण्यांच बरच काही केल होत त्यामुळे त्यांच्या बायका पहाव्या सुनांच कौतुक कराव असं त्यांना वाटत होत पण नरसिंहरावांच्या करारी स्वभावापुढे निशा काकुंच काही एक चालल नाही. सुना उंबरठा ओलांडून वाड्यात आल्या पण निशाकाकू सुनमुख पाहू शकल्या नाही. त्यावेळी नरसिंहराव आणि निशाकाकू घरात दार बंद करून बसून राहिले होते. मोठ्या पुतण्याच्या बायकोला निशाकाकू जिना चढ-उतर करताना चोरून पाहण्याचा प्रयत्न करत होत्या. पण नरसिंहरावांनी ते हेरलं आणि निशाकाकुंशी कडाक्याच भांडण केल. एक दिवस निशाकाकू रुसून लताच्या घरी येऊन राहिल्या होत्या, पण पुन्हा त्यांनी नरसिंहरावांची माफी मागितलीच.
शेवटी कोर्टाचा निकाल मोठ्या भावाच्या म्हणजे नरसिंहरावांच्या बाजूने लागला. शेताच्या आणि वाड्याच्या कायदेशीर वाटण्या झाल्या. खालचा मजला नरसिंहरावांकडे गेला आणि वरचा मजला वामनरावांना मिळाला. दोघे भाऊ नोकरीत असताना चालू झालेली केस दोघ सेवानिवृत्त झाल्यावर तब्बल चार वर्षांनी संपली. त्यानंतर वर्षभरातच नरसिंहराव हार्टफेल्युअरने गेले. त्यावेळी निशाकाकू घरात एकट्याच होत्या. लताच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलाला आणि जावयांना फोन करून बोलावण्याचे काम केले. ते येईपर्यंत लागणारी सर्व मदत निशाकाकुंना केली, त्यांना धीर दिला. वाड्यात लोक जमायला सुरुवात झाली, नरसिंहराव गेल्याची वामनरावांकडे कुणकुण लागली की लगेच त्यांनी सर्वांना ऐकू येईल इतक्या जोरात धाडकन घराचा दरवाजा बंद करून घेतला. सर्वाना वाटलं होत आता तरी वामनराव सर्व वैर विसरून भावाच्या अंत्यविधीला हजर होतील, भावजयचे सांत्वन करतील पण सगळ्यांचे अंदाज साफ चुकले. वामनराव अंत्यविधीत सहभागी तर झालेच नाही पण त्यांनी सुतकही पाळले नाही. दुसरे दिवशी घरात देवपुजा करून घंटा वाजवून मोठ्यांदा आरती म्हणत होते. लताचे वडील म्हणाले सुद्धा, “ह्या माणसाला जनाची नाही पण मनाची सुद्धा लाज नाही. परमेश्वराच्या छडीचा आवाज ह्याला अजून माहित नाही.” ह्यावर लताच्या आई म्हणाल्या सुद्धा “अहो ह्या माणसांना परमेश्वराने अद्दल घडवली तरी ती त्यांना त्यांच्या अहंम पुढे त्याचे काहीच वाटत नाही. पडलं तरी नाक वर अशी ह्यांची वृत्ती असते.”
लता माहेरी आली होती तेव्हा मीपण तिच्याबरोबरच निशाकाकुंना भेटायला गेले होते. नरसिंहराव गेल्यानंतर मुलाने त्यांना बेंगलोरला दोन महिने नेले होते. पण त्यांना करमेना त्या परत इकडे आल्या. पेन्शनचे काम करून घ्यायचे होते. भाडे व्यवहार पहायचे होते . पण डोळ्यात पाणी आणून लताला म्हणाल्या, “तुम्ही सगळे लोक एवढ्या लांबून भेटायला येता, पण बघ ना, सख्ख्या दिराला आणि पुतण्याला वाड्यातल्या वाड्यात तोंड दाखवाव , विचारपूस करावी असं वाटत नाही, अशावेळी शत्रू सुद्धा व्यवहार पाळतो ना ग ! ह्या वनिताला वामनराव कितीतरी वेळा पाठीत बुक्के मारायचे, थोबाडीत मारायचे, का तर स्वयंपाक करता येत नाही, काम धड करता येत नाहीत. त्यावेळी मीच कित्येकदा मधी पडून भांडण सोडवली आणि वनीताची बाजू घेतलेली होती. पुतण्यांना अंगा खांद्यावर खेळवलं सगळ विसरतात का लोक? सोयर-सुतक पण मानत नाहीत ?” त्यावर लता निशाकाकुंना समजुतीच्या स्वरात म्हणाली, “जाऊदे काकू नका विचार करू, एखाद्याला स्वत: पलीकडच जग दिसत नाही. असं समजून सोडून द्या.”
नरसिंहरावांना जाऊन तीन-चार महिने झाले असतील नसतील तोच वानिताकाकू घश्याच्या दुखण्याने आजारी पडल्या. सगळ्या टेस्ट झाल्या आणि त्यातून घश्याचा कन्सर झाल्याचे निष्पन्न झाले. सगळ्यात बड्या हॉस्पिटल मध्ये नेऊन मुलांनी आईची ट्रीटमेंट केली पण काही उपयोग झाला नाही .सहा महिन्यात वनिता काकू गेल्या.वनिता काकू जाण्याआधी चार दिवस क्रिटीकल कंडीशन मध्ये होत्या, तेव्हा निशाकाकुंनी पुतण्याकडे चौकशी केली,आणि भेटण्याची इच्छा प्रकट केली तर मोठा पुतण्या म्हणाला, “ तू आमच्या आईला भेटायला आलीस तर आमच्या आईला मुक्ती मिळणार नाही तेव्हा तू येण्याची काही गरज नाही.” असं ऐकून निशाकाकुंना वाईट वाटले. हे कळल्यावर निशाकाकुंची मुलेच त्यांच्यावर खूप चिडली. वनिताकाकू गेल्याचे कळल्यावर निशाकाकुंची गावातली लेक लगेचच आली आणि आईला ताबडतोब आपल्याकडे घेऊन गेली. तिनेही मग हट्टाने निशाकाकुंना वानिताकाकुचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही. त्यावेळी वाड्यातून निशाकाकुंचा पाय बाहेर पडत नव्हता पण लेकीने बळेच त्यांना कारमध्ये कोंबले आणि घेऊन गेली.
वनिता काकू एप्रिलमध्ये गेल्या, त्यानंतरच्या जुलैला खूप पाऊस झाला. वाड्याच्या भिंतीना मोठ्या मोठ्या भेगा गेल्या. गच्चीच्या कुंबीची दोन ठिकाणी पडझड झाली. घराच्या वास्यातून माती पडायला लागली होती. जोती वाकली होती. कार्पोरेशनने महाजन वाडा धोकादायक म्हणून जाहीर केले. भाडेकरूंना जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या.लताच्या घरच्या लोकांनी आणि इतर दोन्ही भाडेकरूंनी जागा सोडली. निशाकाकुंचा मुलगा निशाकाकुंचे काही न ऐकता त्यांना बेंगलोरला घेऊन गेला. जाण्याआधी त्याने माघार घेऊन आपल्या चुलत भावांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काही दाद दिली नाही तेव्हा त्याने आपल्या कब्जात असलेला वाड्याचा खालचा भाग बिल्डरला विकला आणि वाड्याचा कायमचा निरोप घेतला.
वामनरावांचा धाकटा मुलगा तर नोकरीच्या ठिकाणी बदली झाल्यामुळे मुंबईला शिफ्ट झाला होता. मोठा मुलगा आणि सून वामनरावांच्या जवळ रहात होती. तो मुलगाही वडिलांच्या आज्ञेत होता. वडील म्हणाले, “ काही होत नाही अजून,नको कुठे शिफ्ट व्हायला. आपला वडिलार्जित वाडा आहे. तसा भक्कम आहे. अगदी पडल्यावर बघू काय करायचे ते. नशिबात मृत्यू लिहिला असेल तर तो कसाही येऊ शकतो.” मुलगा हो म्हणाला. पण सुनेने नवऱ्याकडे टुमण लावल, ‘मला नाही इथे राहायचं , बाबांना समजावून सांगा, आता त्यांचही वय झाल म्हणाव हट्टीपणा सोडा, भावाच्या मुलांशीही वैर सोडा म्हणाव आता त्याचं वय ८९ वर्षे आहे. अजूनही स्वत:च खर करतात. आणि तुम्ही त्यांच्या हो ला हो करता. आपली मुल लहान आहेत वाडा पडला तर आपलच नुकसान आहे. मुलांना काही झाल तर मी तुम्हाला माफ नाही करणार.” वामनरावांचा मुलगा बायकोच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होता. शेवटी एक दिवस मुलांना घेऊन ती घराबाहेर पडली. दुसऱ्या जागी भाड्याने flat घेऊन राहू लागली. मग मुलगाही नाईलाजास्तव गेला. वामनरावांना आग्रह करूनही ते ऐकत नव्हते. सुनेने एका गड्याबरोबर वामनरावांना डबा पोहचता करायला सुरुवात केली. जादा पैसे घेऊन घराची साफसफाई करायला बायका यायच्या पण जीव मुठीत घेऊन काम करायच्या आणि लगेच चालत्या व्हायच्या . शेवटी प्रत्येकाला जीवाचे भय असतेच ना! असा कोणी सहजासहजी जीवावर उदार थोडाच होत असतो? संपूर्ण वाड्यात वामनराव एकटे भुतासारखे रहात होते. आसपासचे लोक कुजबुज करत रहायचे. म्हातारा मरणा नंतरही नागोबा होऊन किंवा भूत होऊन वाड्यात फिरत रहाणार आहे. साध्या तरी काय भूत म्हणूनच तर एकटा रहातो. एकेकाळी मुलाबाळांनी गजबजलेला, हास्य विनोदात रमलेला वाडा आता सुनसान झाला होता. फक्त त्याच्याशी निगडीत आठवणी प्रत्येकाच्या मनात घर करून राहिल्या होत्या. वाडा धोकादायक म्हणून जाहीर करूनही एक वर्ष होऊन गेलं होत. वाडा पडझड सोसत ताटकळत उभा होता. त्यानंतरचा दुसरा पावसाळा सुरु झाला. वामनरावांच्या दोन्ही मुलांनी त्यांना पुन्हा एकदा विनंती केली. पण वामनराव तिथून हालले नाही.
आज वाड्याच्या कोसळण्याची आणि त्याबरोबर वामनरावांच्या कोसळण्याची, त्यांच्या अंताची बातमी वाचून मी खरच सुन्न झाले. मला आमच्या आईची म्हणच आठवली काही माणसे अशी आपल्या हट्टाला, मताला चिटकून असतात,तेव्हा म्हणाव वाटत, ‘ सुंभ जळला तरी पीळ जळला नाही.’

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

हम्म. असतात अशी माणसं.
वामनरावांचीदेखील काही बाजू असेल. शेती, घरभाडे सगळेच स्वतःकडे ठेऊन मग त्यांची मुलं सांभाळली असतील नरसिंह आणि निशाने.

> आधीपासूनच निशा काकुंचे सर्व भाडेकरूंशी सलोख्याचे संबंध होते त्यात अजून जवळीक निर्माण झाली.

त्यामुळे भाडेकरूंशी आढ्यतेने वागणाऱ्या निशाकाकू आता खुपच मवाळ झाल्या होत्या आणि सर्वाशी सलगीने वागत होत्या. >
ही दोन वाक्यं गोंधळात पाडणारी आहेत.

गोष्टीत दोन गोष्टी आहेत. भाऊबंदकी आणि घर न सोडणारे वामनराव. घर न सोडणारे वामनराव खूप छान माहीत आहेत. फक्त तुम्ही लिहिलीत तेवढीच गोष्ट नाही. अर्थात, तुम्हांला मैत्रिणीच्या घरी जात-येता अजून जास्त कळण्याचे मार्ग नाहीत. भाऊबंदकी बद्दल पण जर भावाभावांना एकमेकांशी सलोख्याचे संबंध ठेवायचे असतील तर इतर कोणतीही परिस्थिती/व्यक्ती संबंध बिघडवू शकत नाही.

ही दोन वाक्यं गोंधळात पाडणारी आहेत.---- +१

आपली कथाकथन शैली छानच आहे त्यामुळे एकदा गोष्ट वाचायला घेतली की पूर्ण वाचलीच जाते. गोष्ट वाचायला मजा येते.

आमी, राजसी प्रतिसादाबद्दल धन्यवाद. अमी चूक दुरुस्त करते ह. जेव्हा दोन भावात केस उभी झाली, त्यानंतरच निशाकाकू बदलल्या. भाडेकरूंनाधरून राहू लागल्या.

तुम्ही छानच लिहिता. पण ही कथा, कथा न वाटता बरीचशी वार्तांकन (narration) टाईप झाली आहे.

अवांतर
'सुंभ जळला तरी पीळ नाही गेला' असे आहे मला वाटते.
दोरखंड जळला तरी उरलेल्या राखेत त्यातल्या धाग्यांचा पीळ स्पष्ट दिसतो. पीळ हा दोरखंडाचा गुणधर्म आहे, तो दोरखंडासारखा कसा जळेल?
जसे एखादा सावकार सावकारी लयाला गेल्याने कफल्लक झाला पण त्याचा सावकारी ताठा गेला नाही. सावकार कफल्लक होतो त्याचा ताठा नाही, ताठा उरतो किंवा नुरतो.