मेड इन हेवन

Submitted by A M I T on 15 November, 2019 - 14:35

ही कुठल्याही दिवाळी अंकात प्रकाशित न झालेली आधुनिक काळातील काल्पनिक पुराणकथा आहे.
***

मोबाईलच्या गजरानं अॅडमला जाग आली. इव्ह अजून सणसणीत निजली होती. हनिमूनसाठी लोणावळ्याला गेलेल्या तिच्या मैत्रिणीचे फेसबुकवरचे फोटो लाईक करताकरता ती पार थकून गेली होती. तिच्यासाठी पाणी तापवण्याचं व चहा टाकण्याचं काम अॅडमकडे असे. तोही न कुरकुरता ती कामे करीत असे.

एकदा या कामात अॅडमनं कुचराई केली, तेव्हा रुष्ट झालेल्या इव्हनं न्याहरीला त्याच्या ब्रेडला बटरच लावला नाही. अॅडमला सणसणीत दुःख झालं. कोरडा ब्रेड गिळताना त्याचा कंठ अक्षरशः भरून येत होता. कितीतरी वेळ ब्रेड घशातून पोटात ढकलण्याची त्याची 'मैदा'नी जंग सुरु होती. बटरशिवाय ब्रेड म्हणजे हेअरशिवाय हेड अशी त्याची धारणा होती.

स्नानादी आटोपून अॅडम इव्हला जागे करण्यासाठी गेला.
'फ्रिहे फाहा, रॅट्रीचा सॅम्याय सॅरूनि' हा ऑपेरा आज तो तिला गाऊन दाखवणार होता. परंतु इव्हचे अस्ताव्यस्त केस व चेहऱ्यावरील पुसलेली रंगरंगोटी पाहून त्याने अचानक येशूचाळीसा पुटपुटायला सुरुवात केली. तो क्षणभर 'हि इव्ह आहे की इव्हिल?' या पेचात पडला. तरीही धाडस करून त्याने ऑपेरा गायला सुरुवात केली. काळी पाचच्या पट्टीतल्या ऑपेराच्या कर्कश ताना ऐकून इव्हची झोपमोड झाली. ती आपल्या शिरा ताणून त्याच्यावर सणसणीत खेकसली. विषय ताणत असल्याचं पाहून पायताण घालून तो परसदारी आला व सफरचंदाच्या झाडाखाली बसला.
आज ब्रेडवर पुन्हा एकदा कोरडा दुष्काळ कोसळणार होता. गेला आठवडाभर त्याच्याकडून काही ना काही क्षुल्लक चुका होत होत्या, परिणामी त्याला बटरवर पाणी सोडावं लागत होतं. या चुकांना 'खीळ' कशी बसेल, या विचाराने तो अस्वस्थ झाला होता.
परसातल्या सफरचंदाच्या झाडावरचं सफरचंद खाण्याचं एकदा त्याच्या मनातही आलं होतं, परंतु बटरसाठी आपली बेटरहाफ गमावण्याची त्याची तयारी नव्हती.

बुगॅम्बोऋषींनी शापच तसा दिला होता.

तो प्रसंग आताही त्याला जसाच्या तसा आठवत होता.
त्यादिवशी तो व इव्ह परसातल्या सफरचंदाच्या झाडावर बसून इंटरनेटवर सर्फिंग वगैरे करीत होते. इव्हने सातशे सत्तेचाळीस शॉपिंग साईटस् वरून सात लाख एक्काहत्तर हजार आठशे नव्व्याण्णव कपडे पाहून एक पिंक कलरचा नेलकटर व त्यावर फ्री असलेली काजळाची डबी ऑर्डर केली. तर अॅडमनेही गेम ऑफ अंथ्रोन्स (अंथरूणचा अपभ्रंश) या जगप्रसिद्ध ढुंगणस्पेशल सिरीजचे आठ सिजन डाउनलोड करून घेतले. त्या झाडावर पलीकडच्या बुगॅम्बोऋषींच्या आश्रमातला वाय-फाय पकडत होता. दोन युजर आपल्या आश्रमातील वाय-फाय चोरून बेसुमार वापरताहेत हे लक्षात येताच बुगॅम्बोऋषींच्या शिष्यांनी ट्रेस करून त्या दोघांचा शोध घेतला. शीघ्रकोपी म्हणून प्रख्यात असलेले बुगॅम्बोऋषी क्रोधीत झाले व त्यांनी त्या दोघांना एक सणसणीत विचित्र शाप दिला, 'तुमच्यापैकी कुणीही एकाने या झाडावरील सफरचंद खाल्ला तर दुसऱ्याच्या आयुष्याचा सफर चंद क्षणांचा उरेल.'
समोर सफरचंदाचं झाड दिसल्यामुळे त्यांना चटकन दुसरं काही सुचलं नाही.
ऋषींची शापवाणी ऐकून उभयतांच्या पायाखालची जमीन सरकली.
"महर्षी, क्षणाक्षणानं आमचं आयुष्य पोखरणाऱ्या तुमच्या शापरूपी व्हायरसवर एखादा अँटीव्हायरस नाही का?" इव्हने जयश्री गडकरसारखा सणसणीत अभिनय करत विचारले.
"अँटीव्हायरस?"
"अहो म्हणजे उ:शाप! अहिल्येला मिळालेला ना तसा!"
शाप 'शिळा' व्हायच्या आतच त्यावर उ:शाप मागण्याची इव्हची कल्पना अॅडमला एकदम आवडली, तर बुगॅम्बोऋषींनी आपल्या प्रकरणात अहिल्येसारखा 'अॅपले'पणा दाखवावा अशी इव्हची इच्छा होती.
"तसं तर मी कुणाला उ:शाप देत नाही, परंतु तुम्ही दोघं डेटासाठी गांजलेले दिसताय, म्हणून मी तुम्हाला उ:शाप देतोय. ज्या दिवशी कुणी तिऱ्हाइत व्यक्ती स्व-इच्छेने या झाडावरील फळ खाईल, त्यादिवशी तुमची या शापातून मुक्तता होईल. परंतु हे फळ खाणाऱ्या तिऱ्हाइत व्यक्तीचा मृत्यू मात्र अटळ आहे. फळ खाल्यानंतर दुसऱ्याच सेकंदाला तिथल्या तिथे त्या व्यक्तीचा ज्यूस बनून ती व्यक्ती मातीत मिसळून जाईल." असं म्हणून बुगॅम्बोऋषींनी आपल्या असिस्टंट कम महिलाशिष्याला त्या दोघांना कंफर्मेशन मेल पाठवायला सांगितला.

तेव्हापासून इव्हने कित्येकवेळा अॅडमला सफरचंद खाण्याची धमकी दिलेली होती.

आपण अशी कोणती गोष्ट केली म्हणजे इव्ह आनंदी होईल! याचा विचार तो करू लागला. इतक्यात एक सफरचंद त्याच्या डोक्यावर पडलं आणि अचानक त्याला एक 'न्यूतन' कल्पना सुचली.
आपण आपल्या घरी कामासाठी मेड ठेवली तर...
त्यामुळे आपल्याला घरची कामंही करावी लागणार नाहीत आणि इव्हलाही सोबत होईल.

अॅडमने खिशातून मोबाईल काढला व 'बाई छान्स' अॅपवर मेडसाठी रिक्वेस्ट टाकली.
*

त्याचवेळी स्वर्गात...

इंद्रदेवाने आळसावून सणसणीत जांभई दिली.
गंधर्वांच्या आळवून निरस झालेल्या घिशापिट्या धुनी ऐकून व अप्सरांचे तेच तेच नृत्यांक (डान्स नंबर्स) पाहून त्यांना सणसणीत कंटाळा आला होता.
गेला बाजार आपलं सिंहासन बळकावण्यासाठी कुठलाही छोटा-मोठा राक्षस न आल्यामुळे ब्रम्हा, विष्णू, महेशाकडे जाऊन स्नेहभोजन केल्याला आता युगं लोटली होती. कैलास पर्वतावर यत्र-तत्र-सर्वत्र बर्फ असल्यामुळे हल्ली पार्वतीमाता भगवान शंकरांना कालाखट्टा बनवून देतात, ही बातमी सांगताना नारदमुनींच्या मुखातून सणसणीत लाळ टपकत होती तसेच, नारदमुनींची जीभही काळी-तांबडी झाल्याचं इंद्रदेवांच्या नजरेतून सुटले नाही. हा खाद्यप्रकार आपल्याला चाखायला मिळणार नाही, म्हणून इंद्रदेवाचं मन 'खट्टू' झालं होतं.

दरबाराचं कामकाज सुरु असताना त्यांनी 'करमणुकीसाठी काहीतरी नवा प्रकार शोधून काढा' असं फर्मान जारी केलं. यावेळीही नारदमुनी त्यांच्या मदतीला धावून आले.
ते म्हणाले, "हे प्रभू, भूतलावर अॅडम व इव्ह यांचा प्रपंच मोठा रोचक आहे. त्यात आपण रुची दाखवलीत तर आपली प्रचंड करमणूक होईल."
"अस्सं! त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल मुनिवर?" सगळंच आयतं प्राप्त करून घेण्याची सवय असलेल्या इंद्रदेवांनी प्रश्न केला.
"अॅडम सध्या एका मेडच्या शोधात आहे. आपण आपल्या इथल्या कुणा एका अप्सरेला त्यांच्या घरी मेड म्हणून पाठवून देऊ. पती-पत्नींमध्ये तिसरा व्यक्ती गेल्यावर काय काय गमती होतील याची फक्त कल्पना करा प्रभू !."
"हम्म! कल्पना तर मोठी मजेशीर आहे." असं म्हणून इंद्रदेवांनी मेनकेची या कामी निवड केली. ते नेहमीच मेनकेला झुकतं माप द्यायचे. ती त्यांच्या मर्जीतील आहे, अशी कुजबुजही उपस्थित देवतांमध्ये सुरु झाली.

विश्वामित्राचं तपोभंग यशस्वी केल्याबद्दल तिची निवड झाली होती की, स्वर्गातील 'अमरत्व आमराई'तील आंबा चोरून खाल्याबद्दल शिक्षा म्हणून तिची निवड झाली होती! यावरून रंभा-उर्वशीत पैज लागली. पैजेत हरलेल्या व्यक्तीने जिंकलेल्या व्यक्तीच्या डोईतून किमान शंभर उवा काढायच्या, अशी ती पैज होती.

मेनकेचा कायापालट करून तिला मेडचं रूप दिलं गेलं. पाच तासांच्या 'होमवर्क'नंतर ही 'मेड इन हेवन' भूतलावर अवतरण्यास सिद्ध झाली.
*

दारावरची बेल वाजली.
इव्ह केक बनवत होती. अॅडमनं दार उघडलं. दारात मेडच्या वेशातली मेनका उभी होती. इतकी सुंदर स्त्री त्याने उभ्या जन्मात पाहिली नव्हती.
"आपण?"
"मी कांताबाई." खरंतर मेनकेला हे नाव बदलून हवं होतं. परंतु पर्यायी नाव शांताबाई होतं, त्यामुळे त्या दोन्ही नावात फारसा फरक नसल्याने तिने कांताबाई नावाला पसंती दिली.
"म्हणजे तुम्ही बाई छान्समधून आलात?"
"हो" मेनकेला अॅडम-इव्हच्या घरात प्रवेश घेण्याची सणसणीत घाई झाली होती.
"कोणे?" केक अवनमध्ये ठेवून इव्ह बाहेर आली.
"सरप्राssssssईज! आपकी खिदमद में हाजीर है, बाई छान्स सर्टिफाईड, हंड्रेड परसेन्ट ट्रस्टेड, 'बाई थूक ऑर बाई कुक' युनिव्हर्सिटी मेरीट होल्डर, मिस कांताबाई ! इव्ह, आजपासून.. नव्हे आतापासून तू काहीही करायचं नाहीएस. अगदी ब्रेडला बटरदेखील लावायचा नाही. फक्त त्या सोफ्यावर बसून कँडीक्रश खेळायचंस, टिकटॉकवरचे वाह्यात व्हिडीओ पाहायचेस.. बस्स!!" ब्रेड-बटरचा उल्लेख अॅडमने मुद्दामच केला.
कांताबाईची स्तुती ऐकून इव्हच्या मनात आनंदाच्या सणसणीत उकळ्या फुटू लागल्या. लागलीच तिने कांताबाईला केकचा तुकडा भरवून तिचं तोंड गोड केलं व एकेक करत घरातील सगळी कामं पद्धतशीर समजावून सांगितली.

मार्केटमधून बार्गेनिंग करून ताज्या भाज्या आणणं, त्या निवडून, साफ करून, निरनिराळ्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवणं, वाण्याकडून तडा न गेलेली अखंड गुळगुळीत अंडी आणणं, भांड्यांचा खटारा घासून ती नीट पुसून ठेवणं, कपड्यांचे ढीग स्वच्छ धुवून त्यांना दोरीवर चिमटे लावून वाळत घालणं व कपडे कडकडीत वाळल्यानंतर चिमटे काढून (म्हणजे 'तसे' चिमटे काढून नव्हे!) नीट मोजून दुसऱ्या खेपेला सापडतील अशा जागी ठेवणे, तसेच कपड्यांना इस्त्री करून नीट घड्या घालून कपाटात ठेवणं, गच्चीवर घातलेल्या वाळवणाचं चिमणी-कावळे-कबुतरे व स्वतःपासून रक्षण करणं, चक्कीवर दळण टाकणं व आपली पिशवी वा डबा बरोबर ओळखून तो आठवणीने घरी घेऊन येणे, संध्याकाळी बॅटने नर व मादी असा भेदभाव न करता सरसकट सर्व मच्छर मारणे, जुनी वर्तमानपत्रं रद्दीवाल्याला देणं व रद्दीच्या पैशातून टॉमीसाठी पारले बिस्किट आणणं, ह्यांव करणं नि त्यांव करणं, अशी सतराशे साठ पॉईंट पंचावन्न कामं करून कांताबाई उर्फ मेनका सणसणीत मेटाकुटीला आली.

आपल्या जागी रंभा किंवा उर्वशीला पाठवावं, अशी विनंती तिने नारदांकरवी इंद्रदेवांना केली होती. परंतु त्यांनी तिला 'दिवाळी आता तोंडावर आलीये, त्यामुळे बोनस घे आणि मगच काम सोड,' असा मोलाचा सल्ला दिला.
*

हनिमूनहून परतलेली डायना इव्हला चिक्की देण्यासाठी तिच्या घरी गेली.
हनिमूनचा रोमांचक अनुभव व त्यावरील चावट गप्पा आपापसात शेअर करून झाल्यावर अचानक इव्हचे डोळे पाणावले व तोंडात रुमाल कोंबून ती सणसणीत हमसू लागली. तोंडात रुमाल कोंबल्यामुळे इव्हला चिक्की खाता येत नाहीसं पाहून डायनानं 'चिक्कीत्सक'पणे इव्हला विचारले, "काय गं, काय झालं?"
"माझ्या संसाराला ग्रहण लागलंय."
"म्हणजे? काय झालं नक्की."
"माझा संशय आहे, अॅडम आणि कांताबाईमध्ये काहीतरी सुरु आहे."
"काय?"
"तेच जे नको असायला हवं होतं"
"यू मीन टू से विवाहबाह्यसंबध !"
इव्हने मान डोलावली.
"जीजस! इथून तिथून सगळे पुरुष सारखेच. इव्हन अॅडम"
इव्हन अॅडम या शब्दांत इव्ह अन अॅडम या दोघांचीही नावं योगायोगाने आल्याचं लक्षात डायनानं सणसणीत जीभ चावली.
"त्याने तिला एफबीवर अकाउंटसुद्धा उघडून दिलंय."
"तुला कसं माहीत?"
"अॅडमची फ्रेंडलिस्ट बघ. कळेल तुला."
डायनाने तात्काळ एफबी चेक केलं.
"ओह माय गॉड! इज इट एंजेल प्रिया!"
इव्हने मान डोलावली.
"प्रोफाईल फोटो बघ कसला भारी आहे!"
"अॅडमनेच कॅप्चर केलाय. त्या दिवशी कामाला दांडी मारली होती तुझ्या त्या एंजेल प्रियाने"
एंजेल प्रिया हे शब्द उच्चारताना इव्हने आपले दात इतक्या जोरात आपटले कि त्यातून एक सणसणीत ठिणगी बाहेर पडलेली डायनाने पाहिली.
"तू तिला काढून का टाकत नाहीयेस कामावरून!"
"मला संशय आहे फक्त"
"आपण त्यांना रंगेहाथ पकडू या."
"ते आणि कसं?"
"माझ्याकडे एक प्लान आहे."
डायनाने इव्हला पद्धतशीर प्लान समजावून सांगितला व त्या पुन्हा गप्पांमध्ये रंगून गेल्या. गप्पांची गाडी पुन्हा डायनाच्या हनिमूनच्या फलाटाला केव्हा लागली, त्यांनाच कळलं नाही.
*

आपल्या दूरच्या नातेवाईकाचं लग्न असल्याचं कारण सांगून इव्ह दोन दिवसांसाठी घराबाहेर पडली आणि डायनाच्या घरी डेरा टाकला. हा त्यांच्या प्लानचाच भाग होता. आता त्या रात्र व्हायची वाट पाहू लागल्या.

मध्यरात्र झाली तशी डायनाच्या घरातून इव्ह व डायना तिच्या कारने इव्हच्या घरी जाण्यासाठी निघाल्या. कारचा आवाज येऊ नये म्हणून त्यांनी आधीच्या गल्लीत आपली कार पार्क केली. चोर पावलांनी त्या दाराजवळ पोचल्या. दार किलकिलं असल्याचं पाहून त्यांना थोडं नवल वाटलं. त्यांनी हळूच दार लोटलं व त्या आत शिरल्या. एरवी कांताबाई हॉलमध्ये सोफ्यावर झोपायची पण आता ती तिथं नव्हती. इव्हच्या मनातली शंकेची पाल सणसणीत बाळसं धरू लागली होती.
...आणि अचानक त्यांना बेडरूममधून अॅडम व कांताबाईच्या खिदळण्याचा आवाज आला.
त्या बेडरूमकडे वळल्या. बेडरूमचं दार सताड उघडं होतं. कांताबाई अॅडमच्या कुशीत विसावली होती व अॅडम तिच्या कपाळाचे पटापटा मुके घेत होता. इव्हला हे पाहवेना. अॅडम अचानक असा 'आदमखोर' होईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तिने रुमाल तोंडात कोंबला व आसवे गाळत कारकडे धाव घेतली. मागोमाग डायनाही आली होतीच. डायनाने तिला आपल्या प्लानची आठवण करून दिली, परंतु तिथं पुन्हा जायला इव्हचं मन तयार होईना. डायनाच त्यांचं पितळ उघडं पाडायला जाणार होती, पण तिला तिच्या ताज्या नवऱ्याचा मेसेज आला. त्या मेसेजमधला मजकूर इव्हला कळाला नाही, पण डायनाला घरी जायची घाई झाली त्यावरून ती जे काही समजायचं ते समजली.
डायना कार सणसणीत पळवू लागली.

इकडे अॅडमचं रुप धारण केलेले इंद्रदेव आपल्या मूळ रुपात परतले. इव्हच्या मनात जेव्हा शंकेची पाल चुकचुकायला लागली होती तेव्हाच त्या पालीचा डायनासोर करण्याचा विचार त्यांनी केला होता. त्यासाठी त्यांनी स्वतः या नाट्यात अॅडमची भूमिका करण्याचं ठरवलं व त्यांना त्याची मौजही वाटली.
भूतलावरील प्रत्येक घरात असंच भरपूर नाट्य भरलेलं असेल तर मग काय करमणूकच करमणूक!

सुक्या खजराची बरणी व प्रवासात तोंडात टाकायला मूठभर खारे शेंगदाणे घेऊन त्यांनी मेनकेचा निरोप घेतला व ते तिथून अंतर्धान पावले.
*

ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी इव्ह जेव्हा आपल्या घरी परतली तेव्हा अॅडम घरी एकटाच होता. तोही आज सकाळीच घरी परतला होता. इव्ह घरी नसल्यामुळे अॅडमही तसा कंटाळला होता. त्यानेही दोन दिवस कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लान आखला व कांताबाईला काही सूचना करून तो तसा गेलाही होता.
इव्हने कांताबाईची चौकशी केली असता ती ब्रेड-बटर आणायला मार्केटमध्ये गेल्याचं तिला कळलं.
इकडून तिकडून इव्हने 'त्या' रात्रीचा विषय काढला. दोघांमध्ये सणसणीत जुंपली. अॅडम तिला तो तेव्हा तिथं हजर नसल्याचं पटवून देऊ पाहत होता, पण इव्ह त्यांचं एक ऐकायला तयार नव्हती.
"माझ्यावर एक उपकार करशील! त्या झाडावरचं सफरचंद खा. म्हणजे मीही मोकळी आणि तुही मोकळा. प्लिज माझं एवढंच शेवटचं ऐक. प्लिज."
"मी तर म्हणतो, तूच खायला हवायस सफरचंद. इथे जिवंत राहून प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण कोण देत बसतंय. जा, खा त्यातला सफरचंद एकदाचा. संपून जाऊ दे सगळं."
"अॅडम, प्लिज सफरचंद खा. हे बघ तुला माझी शपथ आहे."
"अरे वा! हि चांगली पद्धत आहे सफरचंद खायला घालण्याची. तुलाही माझी शपथ आहे, प्लिज सफरचंद खा. प्लिज."

इव्ह आणि अॅडमचं एकमेकांना सफरचंद खाण्यासाठीचं आवाहन सुरु असतानाच मेनका मार्केटमधून परतली व तिने हे सगळं चोरून ऐकलं.
'विचित्रच आहे ! हि दोघं एकमेकांना एकसारखी सफरचंद खाण्याची विनंती का करताहेत! एवढं काय खास आहे त्या फळांत!'

सफरचंद नक्की कुणी खायचा? यावर इव्ह व अॅडममध्ये निर्णय होईना. दोघांपैकी कुणीही सफरचंद खाण्याचं पाप करायला तयार होईना. वाद संपण्याची कुठलीही चिन्हं दिसत नसताना अचानक परसदाराकडून एक सणसणीत किंकाळी ऐकू आली. दोघेही परसदाराकडे धावले.

ब्रेड-बटरची पिशवी जवळच पडलेली दिसत होती पण कांताबाई मात्र कुठेच दिसेना.

सफरचंदाच्या झाडाखालील मातीत ज्यूस सणसणीत मिसळून गेला होता.

इव्ह व अॅडमने एकमेकांकडे आश्चर्याने पाहिले व लागलीच झाडावर चढून त्यांनी बुगॅम्बोऋषींच्या आश्रमातला वायफाय वापरायला सुरुवात केली.

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Anagha ++1

स्वर्गात झाडाला अ‍ॅपलचे
आयपॅड लटकत होते, त्यातुन डाटा खाल्याने अ‍ॅपल खाल्याचा शाप
मिळाला अशी खरी स्टोरी आहे. Proud Proud Proud Proud Proud Proud

Pages