मंत्रालयाची रया गेली

Submitted by दत्तात्रय साळुंके on 15 November, 2019 - 06:57

मंत्रालयाची रया गेली

विधानसभेची निवडणूक झाली
अन मंत्रालयाची रयाच गेली

पाय फुटले मंत्रालयीन खुर्च्यांना
चव्हाण सेंटर, वसंत भवन
मातोश्री, रिट्रीट, जयपूर कमी
काहींनी दिल्ली गाठली
विधानसभेची निवडणूक झाली
अन मंत्रालयाची रयाच गेली

सामान्य जनतेचे लढाऊ प्रतिनिधी
चोराचिलाटाला घाबरले, बसले
ऐशोआरामात पंचतारांकित कुलुपात
तेव्हाच लोकशाहीची धडधड वाढली
विधानसभेची निवडणूक झाली
अन मंत्रालयाची रयाच गेली

हतबल मंत्रालय, पण
मुजोर सत्तेचा सारीपाट
शह, काटशहाच्या राजकारणात
हरवली जनहिताची वाट
सोईस्कर विचारधारा विस्मरण
बळी तत्त्वनिष्ठ राजकारण
जिंके निलाजरे सत्ताकारण
जनता तेव्हा तेव्हा हरली
विधानसभेची निवडणूक झाली
अन मंत्रालयाची रयाच गेली

तोच तोच बातम्यांचा रतीब
तत्पर राजकीय बाईट घेण्यास
गल्लोगल्ली वाहिन्या कॅमेरे खास
ब्रेकींग न्युजचाच नुसता पाऊस
देशात दुसरं काहीच घडत नाही खास
लोकशाहीच्या चौथ्या खांबाला वाळवी लागली
विधानसभेची निवडणूक झाली
अन मंत्रालयाची रयाच गेली

चुंबाचुबीने विटाळल्या ओठावर
दिवस-रात्र लोकशाहीचा जागर
आणि भोळ्या जनतेचं चांगभलं
पुर्वीही असच होतं आताही तसच
मतदारांची वर्षीनुवर्ष टाचच घासली
पण राजकारण्यांनी कात टाकली
विधानसभेची निवडणूक झाली
अन मंत्रालयाची रयाच गेली

राष्ट्रपती राजवट आली
अन मंत्रालयाची रयाच गेली

गजबजून गेलेल्या मंत्रालयात
नांदते आता स्मशान शांत
खिन्न प्रजेचे चेहरे टिपायला
पत्रकार ना ऊरला औषधाला
भ्रांत खुर्चीची राजकारण्या पडली
राष्ट्रपती राजवट आली
अन मंत्रालयाची रयाच गेली

कार्यवाहीची वाट पाहून पाहून
टेबलावरची फाईल शिणली
विश्रांतीसाठी बस्त्यात निजली
लोकांच्या राबता नाही बघून
दारात पट्टेवाल्याने खैनी मळली
सतत वर खाली होत चक्रावलेली
लिफ्टही तळमजल्यावर स्थिरावली
राष्ट्रपती राजवट आली
अन मंत्रालयाची रयाच गेली

मंत्रालयाची भिंत ऐकाची
कधी गा-हाणी जनतेची
आता राजकीय टिव टिव उरली
राष्ट्रपती राजवट आली
अन मंत्रालयाची रयाच गेली

मरणदारी कुणाचा आप्त खास
कुठे अवकाळी पळवी तोडंचा घास
कर्जात कोणाला बसला गळफास
साद घातली मंत्रालयी साह्यास
काळजीवाहू सरकार, फसगत झाली
राष्ट्रपती राजवट आली
अन मंत्रालयाची रयाच गेली

© दत्तात्रय साळुंके
१५-११-२०१९

Group content visibility: 
Public - accessible to all site users