असा प्रवास होणे नाही...

Submitted by बेंगु on 12 November, 2019 - 10:33

झाली! दिवाळी झाली.पुन्हा कामधंद्याला लागावं म्हणून पुण्याचा परतीचा प्रवास सुरु झाला.प्रवासाची सुरुवातच सकाळचा गजर बंद करून साखरझोपेत विरून जाण्याने झाली.उठून पाहिलं तर बाहेर धोधो पाऊस?मग आईला हळूच म्हटलं उद्या जाऊ का?तर आई लगेच म्हणाली नाही जा तू, उद्या पण पाऊस असला म्हणजे?मग काय घेतल्या बॅगा आणि सोडलं बाबांनी बुलडाण्याच्या बसस्थानकावर.(आम्हा बुलडाणेकरांना लालपरीशिवाय पर्यायच नाही,कारण उंचावर असल्यामुळे ना रेल्वे ना विमानतळ) जळगांव जामोद-पुणे गाडी निघालीच होती, कंडक्टर काकांना बाबांनी हाताने खूण केली पण काकांनी चक्क पाहिल्याचं न पाहिल्यासारखं केलं हो!मग काय स्वतःतला उसेन बोल्ट जागा करत मागून जोरजोरात गाडीचा पत्रा ठोकत गाडी पकडली.

गाडीत चढली पण जागा?अहं , जागाच नाही (आता कळलं कंडक्टर काकांनी का पाहिल्याचं न पाहिलं केलं ) माझ्याकडे आणि त्यापेक्षा माझ्याकडे असलेल्या सामानाकडे बघूनच सगळ्यांनी माना फिरवल्या आणि काही जण तर मस्त बेडकासारखे मांड्या फुगवून बसले.तरी आईला सांगत होती नको तो चिवडा, ते लाडू,अन त्या चकल्या.पण ऐकेल ती आई कुठली!बरं वर सामान ठेवायला पण कुठेच जागा नाही.शेवटी एका जोडप्याने (मुस्लीम) स्वतःजवळ बाळ असूनही जागा दिली (धर्म - माणुसकी) दुसरं काय?जागा मिळताच धाड या गावाजवळ मुसळधार पाऊस सुरू झाला(जणू काही पाऊसही म्हणतोय-महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पाहिल्याशिवाय जाणार नाही...मी पुन्हा येईन.. मी पुन्हा येईन... )

इकडेतिकडे नजर फिरवली तर शेजारची छोटी मुलगी कुतूहलाने माझ्याकडे पाहात होती,मी पाहताच ती आईच्या पदरात लपली.त्या छोटया जीवाला कुठे घेणंदेणं होतं कोणाला जागा मिळो अथवा न मिळो ते स्वतः राजासारखं आईच्या कुशीच्या सिंहासनात विराजमान होतं.थोड्या अंतरावरच खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे(पाणी साचल्यामुळे)लालपरीने जोरदार झटका मारला आणि तेवढा झटका बाजूच्या बाईच्या पिशवीतून सिताफळं बाहेर येण्यासाठी पुरेसा होता.घ्या,सगळ्या गाडीत सिताफळचं सिताफळं! (अगदी शेवटच्या बाकापर्यंत,जणू काही पकडापकडी खेळावी तशी पळत होती) कोणी परत केली,कोणी खिशात घातली,लहान लेकरं निरागसतेने देताना त्यांच्या मायबापांनी डोळे वटारून हिसकावून घेतली आणि बॅगेत कोंबली.कसंबसं करत औरंगाबाद आलं आणि त्या जोडप्याला शुक्रिया अदा केला आणि ते खाली उतरले.मी सुटकेचा निश्वास टाकला,आता ऐसपैस जागा मिळाली आणि आपण मस्त मोबाईल वर काही तरी बघत बसू या स्वप्नात असतांनाच एक जाडजूड बाई पोरगं घेऊन माझ्याजवळ आली आणि धाडदिशी खाली बसली.थोडा वेळ शांततेत गेला.

औरंगाबाद-नगरच्या मध्ये गाडी जेवणासाठी अर्धा तास थांबली.निघताना धनगर जसा जातांना आपल्या मेंढ्या मोजून घेतो तसे कंडक्टर काकांना एकेकाला बोलावून आणता आणता नाकी नऊ आले.वरून बाया-"आव्हो काई जेऊ बिऊ देता का नाय?"असं जोराजोरात ओरडत होत्या.असं करत करत गाडी नगरला आली आणि... पंक्चर झाली. अरे देवा!दुष्काळात तेरावा महिना,सगळ्यांनी नाकं मुरडली.मग सगळ्यांना खाली उतरवून जमेल त्या गाडीत कंडक्टर काकांनी बसवायला सुरुवात केली. आधीच उशीर झाला म्ह्णून मी घाईघाईत शिरपूर -पुणे गाडीत चढली,तर तोबा गर्दी! मला माझी मीच सकाळची आठवली.पुन्हा तेच!!! मग ड्रायव्हर काकांपाशी केबिन जवळ खाली बसण्याशिवाय पर्यायच उरला नाही.म्हटलं जेवढे विघ्न यायचे तेवढे येऊन गेले आता निवांत झोपावं.तर ही नवीन गाडी पुन्हा नाश्त्यासाठी थांबली(अर्धा तास) म्हटलं काय कटकट आहे लेकाची! या गाडीतील प्रवाशांना मात्र बोलवायची गरज भासली नाही एव्हाना त्यांनाच घरी जायची गडबड झाली असावी.उलट कंडक्टर काकाच बीडीचे झुरके घेत उशीरा आले.मग हळूहळू गाडी शिरूर कारेगाव रांजणगाव असं करत करत मस्त जात होती,आणि मग आलं... शिक्रापूर.जणू आज देवाला माझी परीक्षा पाहण्याची लहरच आली होती.ट्राफिक.. हुश्श!! अब क्या?बैठो आरामसे। पाऊण तास एकाच जागी. इतकावेळ बसलीही असती एकाजागी..पण मोबाइलला रेंज नव्हती काय करणार?

घड्याळात बघितलं 8:15 वाजले आणि होस्टेल चा इन टाइम 9:30.म्हटलं अजून तर ट्राफिक चा बाप वाघोली तर यायचचं आहे. लगेच माझ्या लोणीकंद ला राहणाऱ्या काकांना फोन करून अंदाज विचारावा म्हटलं जाईन की नाही स्टेशन पर्यंत वेळेत ते म्हणाले,बाळा! हे पुण्याचं ट्राफिक आहे काहीच सांगता येत नाही! मग तर विषयचं संपला,मग काय? काका,म्हणाले ये इकडेच. तुळापूर फाट्यावर उतरताच पावसाने माझं जंगी स्वागत केलं,जणू माझी वाटचं पाहत होता...(आम्ही तुमच्या पेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत असं म्हणणाऱ्यांना आम्ही एकचं पाहिलाय पण भारी पाहिलायं असं म्हणावसं वाटलं त्या वेळी) अश्या प्रकारे पिशव्या घेऊन (फराळाच्या) चालू झाला एक नवीन प्रवास...मला तर चांगलाच आलाय अनुभव..तुम्हाला आलाय का कधी??

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

गावाहून पुण्याला येण्याचे दिवस आठवले. असेच चिवडा - लाडू घेऊन यायचे सगळे जण. आम्ही त्यातल्या त्यात जवळ राहणारे होतो त्यामुळे मध्येच छोट्या सुटीत पण घरी जाता यायचे.

धन्यवाद हर्पेन

धन्यवाद निलुदा..नेहमी प्रयत्न असेन

थँक्स नँक्स

धन्यवाद विनिता. झक्कास

धन्यवाद jayshree ताई

धन्यवाद अज्ञानी

प्रतिसादाबद्दल धन्यवाद धनि.. आमची पण मित्रमंडळी छोट्या सुट्टीत घरी जात असतात (विशेषतः नगरची)

धन्यवाद vichar

इतकावेळ बसलीही असती एकाजागी..पण मोबाइलला रेंज नव्हती काय करणार? >>> अगदीच रीलेट झाल.
मस्त लिहल आहे. अजुन लिहित रहा.

छान लिहलंय.

राजेश्री म्हणून एक आयडी होता, कोल्हापूर साईडचा, तिची आठवण आली.

छान लिहिलंय ...खूप जनाच्या आयुष्यात असा एक तरी प्रवास येतोच की आयुष्य भर लक्षात राहतो..लिहीत रहा Happy