:- ह्यांना वर आणू नका :-

Submitted by jayshree deshku... on 9 November, 2019 - 07:32

:- ह्यांना वर आणू नका :-

आबा सकाळची न्याहरी उरकून नेहमीप्रमाणे वाडीतून चक्कर मारत होते. आबांची चक्कर मारण म्हणजे वाडीची देखरेख करणच असायचं, आबांनी मराठे काकूंना झाडाचे आंबे उतरवताना पाहिलं. आणि लगेच ते बोलले,
“ हे पहा आमच्या झाडाची फांदी तुमच्या कंपाऊंड मध्ये आली याचा अर्थ तुम्ही त्याचे आंबे चोरून काढून घ्यायचे असा नाही होत. प्रामाणिकपणे तुम्ही ते आमच्याकडे आणून द्यायला हवे. आणखी एक आठवण करतो, तुम्ही बारश्यासाठी हॉल घेतला होता, त्याचे भाडे सोसायटीकडे जमा केले ना? कारण आशा गोष्टी तुम्ही सोयीस्करपणे विसरता हो, म्हणून आपली जाता जाता आठवण केली.”
आबांच्या ह्या बोलण्याने मराठे काकूंचा चेहरा लालबुंद झाला. फणकारत काकूंनी आबांना कोपऱ्या पासून नमस्कार केला आणि म्हणाल्या, “ मी नीलाकडे पैसे दिले आहेत म्हणल आबा! हद्द झाली या माणसाची अस पुटपुटत मराठे काकू घरात निघून गेल्या.
आबांच हे नेहमीच होत. वाडी मधल कुणी भेटल की आबा असेच प्रत्येकाशी खवचटपणे बोलत रहायचे. प्रत्येकाच्या वर्मावर बोट ठेवायचे. आख्या वाडीला याची सवय झाली होती.रस्त्यात भेटलेल्या बाळू काकांना म्हणायचे,
“काय बाळोबा ह्या वर्षी तरी लेकीच्या लग्नाचे लाडू मिळणार का?”
तर जाधव वहिनींना म्हणायचे, “मुलीच सार ठीक आहे ना? कारण पळून जाऊन लग्न केल ना? काय पाहिलं त्या मुलात कुणास ठाऊक? न नोकरी न धंद, गावभर उनाडक्या करत असतो.” जाधव वहिनी यावर म्हणाल्या होत्या, “आबा, अहो तुमच्या दारात नाही भिक मागायला येत माझी मुलगी.”
त्यामुळे आबा दिसले की प्रत्येकजण वाट बदलून पुढे चालता व्हायचा. आणि मनात म्हणायचा, ‘बर झालं सावित्रीबाई ह्या माणसाच्या तावडीतून सुटल्या ते. पण बिचारी सुनबाई नीलाताई कशी सहन करते या माणसाला देव जाणे, आता एवढ वय झालं आता तरी स्वभाव बदलावा ना? वगैरे .....
मराठे काकू तसराळ्यात आठ आंबे घेऊन घरी आल्या आणि नीला ताईना म्हणाल्या,
“हे घ्या तुमच्या झाडाचे आंबे आमच्या अंगणात पडले होते. आमच्या पोटात गेले तर उगाच पोटदुखीचा त्रास सुरु व्हायचा.” काय झालं असेल याची नीलाताईना कल्पना आली. त्या मवाळ स्वरात म्हणाल्या, “ सुधा अग अस काय करतेस? इथे अंबे सडून जातात. आणि तू परत काय म्हणून आणून देतेस? आबांचा स्वभाव सर्वांनाच माहीत आहे. दुर्लक्ष करायचं तिकडे!” पण मराठे काकू त्यावर काहीच बोलल्या नाही. तसराळ्यामधले आंबे ओट्यावर काढून ठेवले. आणि म्हणाल्या, “निघते बाई बरीच कामे पडली आहेत.”
तेवढ्यात आबा देवघरातून धूप घेऊन बाहेर येत होते. बाहेर येता येता म्हणाले,
“केदार हे बघ तुझ्या मुलाला संध्या कर आणि नंतर शुभंकरोती म्हण म्हणून सांगितल तर मला तोंड वेडावून निघून गेला बघ. आणि काय त्या मोबाईलवर गेम खेळत बसला आहे. काय पण तुमचे संस्कार!”
केदारने आबांचे बोलणे काना निराळे टाकले आणि पुन्हा कॉम्प्युटर मध्ये डोके खुपसून बसला. कारण नुकत्याच घडलेल्या प्रसंगाकडे केदारचे आणि रमाचे लक्ष होतेच. त्यांना आबांचा मनापासून राग आला होता.
“जाऊ दे आबा, सार जगच त्या मोबाईलच वेड झालय, तिथ ह्या मुलांना बोलून काय उपयोग आहे? तुमची नातवंड तुमचं ऐकत नाहीत तिथ प्रतवंड काय ऐकणार आहेत? आता जमाना बदलला आहे आबा” विश्वासराव आपल्या शहाणव्व वर्षाच्या वडिलांना उद्देशून बोलत होते.
“ अरे विश्वासा एक तर मुंज उशिरा बाराव्या वर्षी केली. केवढा मोठा सोहळा केला त्या मुंजीचा! सगळा शो ऑफ! मुंज होऊन चार दिवसही झाले नाही. पण एक दिवसही ह्या भामट्याने संध्या केली नाही. निदान सोळा दिवस तरी पाळावे.पण काही बोलायची सोय राहिली नाही. मला म्हाताऱ्याला कोण विचारतय? सावित्री फक्त माझं ऐकायची. बाकी कोणी कोणी ऐकत नाही. पाहतेस ना ग सावित्री वरून सार काही.”
नीला ताई स्वंयपाक घरातून आबांच बोलण ऐकत होत्या. त्या विश्वासरावांना म्हणाल्या,
“ काय करतील बिचाऱ्या न ऐकून असा जमदग्नी नवरा भेटल्यावर! ह्या वयात आबा स्वत:च्या जीवाचा एवढा संताप करून घेतात तर तरुणपणीच्या जोशातला संताप किती त्रासदायक असेल. धन्य त्या सावित्री माउलीची ! आता पण सारख, ‘पाहतेस ना ग सावित्री अस म्हणत राहतात.’ वरती सासूबाईंना उचक्या लागत असतील! तिथही त्यांना हे शांत राहू देत नाहीत.”
“ आबा पण ना कशाला तोंडाची वाफ वाया घालवतात? आपला मान ठेवून रहाव खर तर! सगळे जण आपण शेवटी त्यांच्या मनाप्रमाणेच करत असतो तरी आपलं घोड पुढे दामटत रहातात. आई काय गरीबच होती स्वभावाने. सगळ्याचं ऐकून घ्यायची बिचारी आणि आबांचा तर शब्द खाली पडू देत नव्हती.”
“खर आहे. मी पण सासूबाई असेपर्यंत त्यांना मान द्यायचा म्हणून आबांच सगळ ऐकत होते. पण किती दिवस ना? आता आपल्या नातवाची मुंज झाली. आपण सुध्दा ह्या मुलांच्या प्रपंचात लक्ष घालत नाही. हे कशाला घालतात? केदार आणि त्याच कुटुंब परवा परत जाईल मुंबईला. तिथ जाऊन थोडीच तो संध्या करणार आहे? मुंज तरी इथ कोकणात येऊन करावीशी वाटली हेच खुप समजा म्हणाव. आबा मुंबईला यायला तयार नाहीत म्हणून केदारने तेवढा तरी आजोबांचा आणि आपला मान ठेवला आणि इथ मुंज केली.”
विश्वासरावांनी नातवाला जवळ बोलावलं. त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले,
“आर्य बाळा तू शहाणा मुलगा आहेस ना? मग इथ दोन दिवस आहेस तोपर्यंत तरी पणजोबांच ऐकायचं. ते आपल्या सर्वांपेक्षा मोठे आहेत ना? मोठ्यांचा मान ठेवायचा असतो. आणि परवाच मुंज झाली ना तुझी? चल बस बघू संध्येला मी सांगतो तुला संध्येची नाव.”
आर्यने आजोबांच्या बोलण्याला मान डोलावली आणि ताम्हण पळी आणायला गेला.
आबांनी तपकिरीची चिमुट ओढली आणि पुन्हा बोलायला सुरुवात केली.
“ विश्वासा, तुझ्या बायकोला तोंड संभाळून बोल म्हणाव. हिनेच आधी माझी घरातली किंमत कमी केली. सारखी आपली दारातल्या गड्या सारखी डाफरत असते. सावित्री बघ बाई तुझ्या नवऱ्याचे हाल, पाहतेस ना वरून सार!”
“ह्यांना कशाला मध्ये घेता आबा? माझ्याशी बोला ना! घरात तुम्ही वडील म्हणून सार तर तुमच्या मनाप्रमाणे करत असतो. पण तुमच्या मनासारखं होई पर्यंत तुम्हाला दम नसतो. अगदी लहान मुलासारख वागता हल्ली.! अहो, लहान मुलांच्या कलाने काही गोष्टी घ्याव्या लागतात. पण आर्यच्या आधी तुम्हीच लहान झाला आहात.”
“ काही बोलू नकोस सकाळी मी चांगल दिनूला सांगून त्याच्याकडून आंबे उतरवून घेत होतो. केदारला मुंबईला बरोबर न्यायला होतील म्हणून तिथही आडवी आलीस मांजरी सारखी. म्हणे दिनूला बर नाही. मराठे काकूंचा गडी बोलावते. झालं का काम? आला का तो? सावित्री बघ बाई मला कुणी समजूनच घेत नाही.”
“अहो आबा एवढे हायपर होऊ नका, उद्या सकाळी येणार आहे मराठे काकूंचा गडी, आम्हाला काळजी आहे ना! तुम्ही कशाला चिंता करता? तुमचा आजचा जप उरका म्हणजे जेवायला वाढते तुम्हाला.” मग आपल्या सुनबाई कडे वळत नीलाताई तिला म्हणाल्या,
“रमा रस झाला का काढून आंब्याचा? आवर लवकर म्हणजे तुलाच तुझ्या सामानाची आवरा आवर करता येईल.”
“ बघा बघा मी आहे, माझा मुलगा आहे तरी हीच आपली साऱ्या वाडीवर सत्ता चालवत असते. सावित्री तुला असे कधीच जमले नाही ग!” अस पुटपुटत आबा देवघराकडे चालते झाले.
रात्रीची जेवणे उरकली. सगळे टीव्ही बघत बसले. रमाची सामानाची आवराआवर करण्यासाठी लगबग सुरु झाली. नीलाताई पण तिच्या मदतीसाठी आल्या. रमा म्हणाली,
“ अहो आई पाहिला ना केवढा पसारा आवरायचा आहे.”
“अग चालायचं, घरात एवढ मोठ कार्य झालं, तेव्हा पसारा तर होणारच. तरी इथे कामाला लोक मिळतात. आणि मनापासून झडझडून काम करतात. त्यांची मदत असते, म्हणून तर मी हा सारा व्याप संभाळू शकते बाई. पण आता तुमचे कपडे लत्ते, आहेर, सामानाची आवरावर हे आपल्यालाच बघावे लागणार ना!”
“ हो खर आहे आई तुमचं! तरी प्रत्येक वेळी कुणाला काय काम सांगायचं आणि कसं करवून घ्यायचं, या कडे जातीने लक्ष द्यावे लागतेच ना! आणि आपली एवढी मोठी वाडी आंबा, फणस, काजू, नारळ, सुपारी सगळ्याचा उलामाला करायचा, त्यात पुन्हा बाबांनी लॉज सुरु करून ठेवल आहे.” बॉक्स मधून कोकम,काजूगर, अंब्याच साट, फणसपोळी सार भरून देता देता नीलाताई म्हणाल्या,
“हो ना, तिथे लागणाऱ्या गोष्टीची पण सगळी खरेदी करायचीच आहे. पुढच्या महिन्यात चक्कर टाकेन मी मुंबईला, सगळी कडून लोक येतात आपल्या गावाला भेट द्यायला. निवांत रहायला, सुमुद्राचा आनंद लुटायला. घरापासून पाच मिनिटाच्या अंतरावर समुद्र पण तासभर तिथ जाऊन निवांत बसाव म्हणल तर वेळ मिळत नाही. तू हळू हळू केदारच मन वळव बाई. आम्हां दोघांना सारा व्याप वरचेवर झेपायचा नाही. काही कमी नाही आपल्याला, नोकरी सोडून इकडे व्यवसायात लक्ष घाल म्हणावं.”
“ तो म्हणतो, एवढ शिक्षण घेतलं, इंजिनिअर झालो त्याचा काय उपयोग? मध्ये मी बोलले तेव्हा म्हणाला, अजून पाच सहा वर्षे तरी मुंबईत काढू मग जाऊ आपल्या गावी. तसही आई- बाबांच्या खांद्यावरचा भार कमी करायला हवाच ना! असं म्हणत होता. माझा काही प्रश्न नाही. मला करमत इकडे.”
“बर झालं बाई. आई आर्यादुर्गेची कृपा! तुम्ही इथे आल्यावर घर कसं भरून जाईल. नाहीतर एवढ्या मोठ्या घरात आम्ही तिघच, त्यात आता आबांच वय झालय.”
“काही होणार नाही आबांना! सेन्चुरी मारणार आबा. आपण त्यांची शंभरी जोरदार, मोठ्या थाटात करायची.” हॉल मधून आत येत केदार म्हणाला.
“ काही हरकत नाही, आपण तुझ्या आजोबांची शंभरी जोरदार साजरी करूयात. ते जगले तर आम्हाला हवेतच, घरी सणावाराच नमस्काराला मोठ माणूस असल की बर वाटत. पण अजूनही बारीक सारीक गोष्टीत कसं लक्ष घालतात ते पाहिलस ना? मी सकाळपासून शिस्तीत सगळी कामे उरकत असते. पण तरी तोंडाचा पट्टा चालू असतो. घरात काम करणारी नोकर माणस पण त्यांची टिंगल करत राहतात. मग ते मला आवडत नाही. जरा म्हणून कुठल्या गोष्टी सबुरीने घेत नाहीत.सारख येता जाता नोकर माणसांच्या अंगावर खेकसत राहतात. ही लोक आमच्या दोघांकडे बघून गप्प बसतात. प्रत्येक गोष्टीची घाई असते त्यांना, अंघोळ सकाळी सहा वाजता झालीच पाहिजे. देवपूजा सात पर्यंत उरकलीच पाहिजे. त्याशिवाय चहा घेणार नाहीत. चहा झाला की पेपर वाचन. मग नाश्ता. नाश्त्याला आटवल भातच हवा.तर तुझ्या बाबांना पोहे, उपमा हवा असतो. माझी आपली तारांबळ उडते. आठ वाजेपर्यंत सगळ उरकून वाडीत चक्कर मारायला तयार.”
“बर आहे ना ह्या वयात अजूनही सगळे प्रोग्रॅम शिस्तीत चालू आहेत ते!” केदार म्हणाला.
“ अरे बाबा त्याचं ठीक आहे पण त्याचं सार शिस्तीत उरकण्यासाठी मला पहाटे साडेपाच वाजल्यापासून नाचानाच करावी लागते ना! ते अजूनही रोज रात्री दहा वाजता घोरायला लागतात. मला रोज रात्री सगळ आवरून झोपायला बारा वाजत्तात. गौराबाई पहाटे यायला आणि आबांच्या सेवेत थांबायला तयार असते. पण त्याचं सोवळ आडव येत.मीच रोज त्यांच्या बरोबरीने अंघोळ उरकून स्वयंपाकघरात पाऊल ठेवाव ही त्यांची अपेक्षा असते. नाहीतर सकाळपासून सावित्रीचा जप सुरु होतो. आणि हल्ली ‘सावित्री मला तुझ्याकडे घेऊन चल ग बाई! हे नव्याने सुरु केल आहे.’ तुझे बाबा पूजा करायला तयार असतात, पण नाही! अजूनी मीच पूजा करणार हा आबांचा अट्टाहास असतो. ह्या वयात आरामात उठाव, आरामात सगळ उरकाव अस कितीतरी वेळा मी सुचवलं पण लगेच मला बोलतात, ‘तुला माझं करायला नको आहे हे कबुल कर’. आता मी पण वय वर्षे पासष्ठ आहे. किती दिवस रेटायच सार? अजूनी सकाळी पाच साडेपाच वाजता उठते आणि रात्री बारा वाजता पाठ टेकते.” नीलाताईना मध्येच रमाने विचारलं,
“आबांच बायकोवर खुप प्रेम होत का हो? कारण सारखं सावित्रीच नाव तोंडात असत.”
“ छे ग, बायको होती तेव्हा तिची किंमत कधी कळली नाही. त्या खऱ्या पतिव्रता होत्या. त्या कायम आबांच्या मागे सावली सारख्या असायच्या. त्यांचा शब्द खाली पडू देत नव्हत्या. त्या स्वर्गात गेल्यानंतर त्यांना त्यांची किंमत कळली. आपण सारे आबांच्या मनासारखे करत असतोच पण एवढ्या मोठ्या व्यापात कधी तरी मागे पुढे होणारच ना! आता घरात सगळ्या सोई सुविधा आल्या आहेत. घरात सगळीकडे चकचकीत टाइल्स आहेत, बाथरूम चकचकीत आहेत. घरात लाईट, फ्रीज, टीव्ही, सगळी मशीन्स आहेत. विहिरीवर पंप बसवले आहेत. गोबर gas प्लांट आहे. पण आमच्या सासु बाईंनी खुप कष्ट काढले. शेणाने सारवलेली जमीन, चूल, रहाट, पाटा वरवंटा या जमान्यात वावरत, व्यसन लागल्यासारखं कामाला जुंपून घेण, पै पाहुणा सांभाळण हे सार त्या करायच्या आणि तेही हसतमुखाने. न कुरकुरता. कामाचं जाऊ दे पण आबांच्या आणि त्यांच्या आईचा कहारी स्वभाव, दोघांचा जाच निमूटपणे सहन करत त्या राहिल्या. कधी प्रत्युत्तर नाही. मनातल्या मनात घुसमटत राहण्याने त्या मनाने आणि त्याच बरोबर शरीराने लवकर थकल्या. आणि वयाच्या साठव्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. तेव्हापासून मी हा संसाराचा गाडा ढकलत आहे. त्यात मला ह्याचं पाठबळ भरपूर मिळालं. बाजारात नवीन कुठलीही गोष्ट आली की माझी सोय बघण्यासाठी ती प्रथम आमच्या घरात हे घेऊन यायचे. प्रत्येकवेळी आबा म्हणायचे सुध्दा हा विश्वास ना अगदी बाईलवेडा आहे. पण ह्यानी तिकडे दुर्लक्ष केल. सासूबाई लवकर गेल्या आणि आबांची तब्येत मात्र ठणठणीत.
चल बाई रमा बोलता बोलता आपलं सगळ आवरून झालं. बारा वाजले. मी जाते झोपायला आणि हो तुम्ही पण लवकर झोपा.” नीलाताई झोपायला निघून गेल्या. केदार रमाला म्हणाला,
“ खरच रमा सगळे म्हणतात, ‘ आजकाल मुल आई-वडिलांना वृद्धाश्रमात टाकतात, पण बघ ना आई अजूनी किती करते आबांच! त्यांचा सगळा जाच सहन करत. वृद्धांनी सुध्दा आपला हेका कमी करायला नको का? माणस ऐकतात म्हणून आपल्या अपेक्षांचं ओझ सतत त्यांच्यावर लादत रहायचं का? थोडी तडजोड स्कीकारायला नको का? आईची दया येते मला.”
“ जाऊ दे अरे आबांचे आता किती दिवस राहिले आहेत?”
“अस काही म्हणू नकोस सेन्चुरी गाठणार बघ ते!” म्हणत केदारने अंगावर पांघरूण ओढून घेतले.
*****************************
स्वर्गात यमदेव आपल्या दरबारात उद्विग्न अवस्थेत बसले होते. मधूनच आपले आसन सोडून येरझारा घालत होते पुन्हा बसत होते. आणि यमदूतांना झापत होते.
“ त्या सत्यवान उर्फ आबांच काय झालं? दोनदा तुम्ही त्यांना उचलायला गेला आणि हात हलवत परत आला. आता मी जाऊ की काय त्याला उचलायला? शंभरी पार केली त्याने. परवा हृदयक्रिया बंद पडली होती ना? तेव्हाच का नाही झडप घातली? पुन्हा कशी हृदयक्रिया सुरु झाली.” दूत खाली मान घालून म्हणाला,
“ माफ करा देवा! परवा तो सत्यवान चांगला स्वर्गाच्या वरच्या पायरीवर येऊन उभा होता. पण त्याच्या सावित्रीने त्याची वाट अडवली. म्हणाली, ‘पृथ्वीवरच ठीक आहात, वर येऊ नका.’ मग काय मी नेऊन सोडल पुन्हा जागच्या जागी!”
आपल्या जाड मिशांना पीळ देत,चेहरा क्रूर करत, यमदेव गरजले, “तुला काय खेळ वाटला होय? अस का केलस? त्याचा पृथ्वीवरचा मुक्काम संपला आहे.”
“ ते माहीत आहे देवा, पण त्याला तुम्ही सुध्दा आणू शकत नाही. त्याची पृथ्वीवरची बायको सावित्री इथ स्वर्गात आल्यापासून तपश्चर्येत रममाण झाली आहे. इथल्या स्वर्गसुखाचा उपभोग न घेता वनात तपश्चर्या करत बसली आहे.”
“ते का म्हणून?”
ती म्हणते, “पृथ्वीवर त्याने तिचा खुप छळ केला. आता पुन्हा स्वर्गात मला ह्याचा ससेमिरा नको आहे. आम्ही त्याला आणायला निघालो की, ही हात जोडून म्हणते, “कृपा करा पण ह्यांना वर आणू नका ना!” ह्यावर यमदेवांचा दुसरा दूत म्हणाला,
“ देवा त्या सावित्रीच तप सामर्थ्य लई भारी बघा आम्ही निघालो की आमची वाट आपोआप ढगातच हरवून बसते.”
***************************
मागच्या महिन्यातच आबांची शंभरी त्यांच्या मुला-सुनांनी, नातवंडानी, प्रतवंडानी मोठा जंगी समारंभ करून साजरी केली. एकशे एक ब्राह्मण बोलावून त्यांना यथोचित दानधर्म करून मोठा याग केला. सर्व स्नेही, नातेवाईक, घरच्या लोकांचा मित्र परिवार, गावकरी झाडून सर्व लोक उपस्थितीत होते.ते आबांकडे पाहून नव्हे तर नीलाताई आणि विश्वासराव यांच्याकडे पाहून आले होते. मुख्य म्हणजे आबांची तब्येत ठणठणीत होती. ते खवचट पणे तरिही हसून खेळून सर्वांशी बोलत होते. म्हणत होते, “आमची सावित्री असायला हवी होती हो!” नीलाताई मनात म्हणत होत्या, “ कशाला हवी होती? तुमचा छळवाद सहन करायला?” आबांच्या बोलण्याच्या घाईत त्यांची पाव भाजी खाण्याची घाई सुध्दा चालू होती. परिणामी पाव घश्यात अडकला आणि जोरात ठसका लागला. त्यांनी डोळे फिरवले. सगळ्यांनी तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविले. नाडी लागत नव्हती. डॉक्टर नर्सला म्हणाले. ह्यांच्या नातेवाईकांना सांगा, ही इज नो मोअर आणि काय आश्चर्य इकडे आबांनी डोळे उघडले. डॉक्टरांचाच हार्ट फेल होता होता वाचला.
मागच्या दोन – तीन महिन्यात आबांना दोनदा हॉस्पिटल मध्ये ठेवण्याची वेळ आली. आता म्हातारा गचकणार म्हणताना पुन्हा आबा सहीसलामत हॉस्पिटल मधून घरी आले.
नीलाताईची धाकटी मुलगी केतकी तिचा अमेरिकेतून आबांच्या शंभरी निमित्ताने फोन आला होता. ती आईला अमेरिकेला येण्याचा आग्रह करीत होती. लग्नानंतर तेरा वर्षांनी मूल होण्याची आशा सोडून दिल्यानंतर तिच्याकडे गुड न्यूज होती. साहजिकच घरात आनंदी आनंद होता. अजूनी तीन महिन्यांनी तिची ड्यू डेट होती. त्यासाठी तिचा नीलाताईना बोलावून घेण्याचा घायटा चालू होता. नीलाताई रमाला म्हणाल्या,
“मला केतकीकडे जाव लागेल ग! तू इकड येऊन राहशील का? इथला व्याप कोण संभाळणार? इकडे आड तिकडे विहीर अशी माझी अवस्था झाली आहे बघ.”
“ आई सगळ सांभाळण सोप आहे पण आबांच संभाळण अवघड आहे मला.”
कधी नव्हे ते नीलाताईच्या मनात येऊन गेले, आबा आता सुटले असते तर माझा प्रश्नही सुटला असता. ‘देवा तूच मार्ग काढ बाबा!’ नीलाताईनी देवी अर्यादुर्गेला साकडे घातले. आकाशाकडे बघत हात जोडत त्या म्हणाल्या, अजून किती अंत पाहणार सासूबाई, तुमच्या पेक्षा जास्त वर्ष मी आबांना सहन केल ना? शेवटी विश्वासराव सुनेला म्हणाले,
“रमा अग तू आबांची चिंता करू नकोस. मी त्याचं सगळ करेन, हिला जाऊदे अमेरिकेला.”
रमा कशीबशी हो नाही करत तयार झाली. नीलाताईनी सुटकेचा श्वास सोडला. आबांना बातमी लागली, नीलाताई अमेरिकेला जाणार असल्याची. त्यांना काही सुचेनास झालं. आता रमाच्या तावडीत राहण त्यांना कठीण वाटू लागल. आपली आईच आपल्या सोडून जात असल्या सारखे ते कासावीस झाले. अगतिकपणे म्हणाले,
“सावित्री बघते आहेस ना माझे हाल? आता मी काय करू?”
यमदेवानी सावित्रीला सवाल केला. “सावित्रीदेवी आता तरी तपश्चर्या थांबणार का?”
सावित्री यम देवांना म्हणाली, “माझ्या तपश्चर्यचे फळ म्हणून मला आता पृथ्वीवर पाठवा आणि मग ह्यांना स्वर्गात आणा.”
यमदेव ‘तथास्तु’ म्हणाले.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

झकास!

एकदमच मस्त!

सुरुवातीला मला वाटलं, काही धाग्यांविषयी आहे का Lol

मज्जा आली वाचायला.. काहीतरी नवीन! "आबानी नीलाताईला म्हणायचं होता शेवटी कि तू माझा सगळं निभावून घेतले." म्हणजे शेवट गोड गोड सारखा आपला, इंडियन लोकांना वाटत तसं.

भारीच आहे कथा... Lol Lol
टायटल वाचुन काहीतरी वेगळं आहे असं वाटलं होतं.

अजिंक्यराव ,सुहृद, मन्या, मी-माझा, रश्मी, अतरंगी, सा.,मामी, अज्ञातवासी, वावे, आदु ,स्वाती, पीनी, चनस ,मैत्रयी, सीमा, शितलकृष्ण,चंपा, हायझेनबर्ग, अमी, स्वदेशी. AMIT,सिध्दी, आसा आपल्या सर्वांच्या भरभरून प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद

Pages