:- वीण -:

Submitted by jayshree deshku... on 8 November, 2019 - 12:46

:- वीण -:
‘ए दोस्ती हम नहीं छोडेंगे.....’ गाण्याचे सूर कानात घुमत होते.
माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाची पार्टी जोरदार चालू होती. ऑर्केस्ट्राच्या साथीने जुनी हिंदी गाणी गायली जात होती. जी माझी आवडती होती. सर्व मित्र मैत्रिणी. स्नेही पार्टीत रमले होते. पण माझ मन आणि नजर स्नेहलचा शोधत घेत होती. मी तिला आमंत्रणाचा फोन केला तेव्हा ती फोनवर नेहमीप्रमाणे उत्साहाने बोलली नाही.
“माझ्याकडे पाहुणे येणार आहेत. मला जमेलच असं नाही.” एवढ तुटक बोलून तिने फोन ठेवून दिला. मला ती गोष्ट खटकली. माझ्या कडच्या पार्टी पेक्षा असे कोणते महत्वाचे पाहुणे तिच्याकडे येणार होते? तिचे सगळेच पाहुणे आणि नातेवाईक मला माहीत असणारेच. आज तीस वर्षा पासून म्हणजे कॉलेज पासून दोघी एकमेकींना ओळखतो. लग्ना नंतरही पुन्हा दोघी पुण्यातच आलो. त्यामुळे दोघींत कौटुंबिक जिव्हाळा पण वाढत गेलेला. कौटुंबिक सहली आणि पार्ट्या पण काही कमी नाही झाल्या. तिची मुलगी सोनल आणि माझा मुलगा शुभम सुद्धा आमच्या प्रमाणेच वयाने वर्षभरातल्या अंतरातले. त्यामुळे त्या दोघांत सुध्दा घट्ट मैत्रीची वीण विणली गेली होती. आणि त्यांच्या मुळे आमच्या मैत्रीचे धागेही चांगलेच पक्के झालेले. अर्थातच आमचे नवरेही एकमेकांचे तसे चांगले मित्र बनले. असे दृष्ट लागण्या सारखे मैत्रीचे संबंध असताना स्नेहल माझ्याकडे पार्टीला का नाही आली? मला पटण्यासारखे ठोस कारणही तिच्याकडे नव्हते. ऑफिसचे कारणही नव्हते. अनायसे रविवारच पार्टी दिवशी आला होता. तिच्याकडचे पाहुणेही पार्टीला आले असते तरी चालले असते. माझ्या जीवाची घालमेल होत होती. सगळ्याच गोष्टी एकमेकीना आम्ही शेअर करत होतो. मग अस काय घडल की मला तिला सांगावस वाटल नाही? पार्टीला येऊ शकत नव्हती तर साधा फोन करून तरी शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. पण तेही नाही! सोनल तर आधी पार्टीत मिरवायला यायला हवी होती, पण आली नाही.
शुभम आणि सोनालमध्ये नकळत गुंफली जात असणारी प्रेमाची नाजूक वीण माझ्या लक्षात आल्यावाचून राहिली नव्हती. आणि मी तसं स्नेहलला लक्षात आणून दिल होत. पण तिचा चेहरा कोरा होता. मला नवल वाटल. पण मी तो विषय तिथेच सोडून दिला. सोनलला सून म्हणून स्विकारायला माझ्या मनाची मी तयारी केली होती. मग अचानक काय झालं?
मी दुसरे दिवशी स्नेहलला फोन करण्याचा प्रयत्न केला पण माझा नंबर तिने आणि सोनलनेही ब्लॉक केला होता. माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं
पंधरा दिवसा नंतर बाहेरून मला सोनलच लग्न ठरल्याच कळल आणि लग्न लगेचच आठ दिवसात होत. अर्थातच आम्हाला आमंत्रण नव्हत. मी खोदून खोदून शुभमला विचारलं पण त्याचही तेच म्हणण होत. “आई मला काही माहीत नाही. मी परदेशात जाण्याचा माझा plan सांगितल्या नंतर ती एवढच म्हणाली, ‘आपलं जमू शकणार नाही.’ त्यानंतर भेट नाही आणि फोनही नाही. आता माझाही फोन सोनलने ब्लॉक केला आहे.
मी रोज विचार करत रहायची, ह्या सोनलला मी लहानपणापासून पहात आले. मुलीप्रमाणे तिचं कोडकौतुक करत आले. मावशी म्हणून धावत येऊन माझ्या गळ्यात पडणारी सोनल अशी एकदम टोकाची कशी वागू शकते? तिला एक जाण नसेल पण स्नेहल सुध्दा! एवढा दुरावा धरताना एकमेकी सोबत घालवलेले सुख-दुखा:चे सोनेरी क्षण, ती कसे काय विसरू शकते? माझा नवरा म्हणतो ते बरोबर म्हणायला हवं. मला माणसाची पारख नाही हेच खर!
सोनलच लग्न पार पडलं आणि त्यानंतर स्नेहलची एक जुनी मैत्रीण योगायोगाने मला एका पार्टीत भेटली. तिने सांगितल, सोनलला प्रवासात एक मुलगा भेटला तिचं त्याच्यावर म्हणे प्रेम बसल. आणि लग्न ठरवण्या आधी शाररिक संबंध पण आला होता. स्नेहल आणि माझ्या दुराव्यातल कारण मला कळल. पण लग्नासारख्या गोष्टी ह्या योगायोगाच्या असतात. हे मान्य करण्याचा संमजसपणा आमच्या कुटुंबात नक्कीच होता.
एकदा स्नेहल रस्त्यात गाठ पडली. मला चुकवून जाण्याचा ती प्रयत्न करत होती. पण मी जाऊन तिचा हात पकडला, तर म्हणाली, “मला तुझ्याशी बोलायला वेळ नाही.”
तरी मी निर्लज्जपणे म्हणल, “अग मग कधी वेळ काढतेस? घरी ये.”
“ माझ्याशी उगाच लगट करण्याचा प्रयत्न करू नकोस.” मला फटकारून ती निघून गेली. मी कितीतरी वेळ तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वेड्यासारखी पहात राहिले. मागून स्कूटरवाल्या माणसाने हॉर्न वाजवला आणि मी भानावर आले.
दाट घट्ट होत जाणारी आमच्या नात्यातली वीण कुठतरी उसवली होती. मी सांधण्याचा प्रयत्न केला पण ती जास्तच उसवली, कधीही न सांधण्यासाठी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान लिहलं आहे..
असंच होतं कधी कधी. आपलं काय चुकलं हेच समजत नाही. मग नात्यांची वीण उसवत जाते.

सोडून द्या, आपण आपल्याकडून प्रयत्न केला ना! समोरच्याला त्याची जाण नाही, गरज नाही तर मूव्ह ऑन व्हावं Happy

छान लिहीलेय

मैत्रिणीच्या मुलीबद्दल तुम्ही सोशलफोरम वर तिसऱ्या व्यक्तीकडुन ऐकलेली माहीती किती बिंधास्त टाकताय. सोनल कुठल्या प्रवासाला गेली होती आणि तिला कोणता मुलगा भेटला ह्याचे काहीच डिटेल्स न देता नुसत्या मोघम माहिती आणि तर्क ह्याच्या आधारावर काहीपण बोलताय असे वाटते.
मला वाटते कि तुमचा स्वभाव हा गॉसिप करण्याचा आहे आणि म्हणुनच तुमची सो कॉल्ड मैत्रीण तुम्हाला सोडून गेली.
दिसत तसं नसतं, म्हणुन तर जग ....... ..... बरोब्बर !!!

रोचक आहे. पण इतक्या वर्षांचं नातं फक्त एवढ्या कारणाने अस अचानक तुटेल असं वाटत नाही.
स्नेहलच्या दृष्टीतून लिहलेल्या घडामोडी वाचायला आवडेल.

तुमच्या कथा नेहमीच आवडतात. ही पण आवडली. पण वाटले की एवढे घट्ट नाते असे कसे तुटले. कदाचित आम्हाला स्नेहल आणि सोनलची बाजूच माहित नाही त्यामुळे असे वाटत असेल.
कदाचित कथानायिकेला बदलणार्या संबंधांचे संकेत मिळाले असतील पण तिने दुर्लक्ष केले असेल.
तुम्ही स्नेहल ची बाजू सांगणारा दुसरा भाग लिहाच.

भरत,अमी, आसा, मनस्विता प्रतिसादाबद्दल धन्यवाद स्नेहलचा द्दृष्टीकोन लवकरच लिहिणार आहे.