भाग दुसरा
https://www.maayboli.com/node/72240
चक्राताला आल्यापासून सलग तीन दिवस आम्ही गाडीत बसून कधी जवळ, तर कधी लांब अंतरावर जात होतो. गाडीतून उतरल्यावर जरी चालणं-फिरणं-चढणं होत असलं तरी एकूण गाडीतला प्रवासही तसा बराच होत होता. रस्तेही तसे खराबच. विशेषतः खडांबा आणि देवबनला जाता-येतानाचा रस्ता खूपच खराब होता. नाही म्हटलं तरी गाडीच्या प्रवासाचा जरा कंटाळाच आला होता. त्यामुळे खडांबाहून आल्यावर संध्याकाळी पक्ष्यांची यादी करायला बसल्यावर जेव्हा किकांनी दुसर्या दिवशी टायगर फॉल्सला जाताना संपूर्ण अंतर गाडीतून जाण्याऐवजी बरंचसं अंतर त्यांच्याबरोबर दरीतून उतरत आणि नंतर उरलेलं थोडं अंतर गाडीने जाण्याचा प्रस्ताव मांडला तेव्हा आम्ही तिघे (बुधेर गुंफांपर्यंत चढत गेलो होतो ते मेंबर्स) लगेच तयार झालो. बाकी चौघेजण गाडीने येऊन नंतर आम्हाला मिळणार होते.
दुसर्या दिवशी नाश्ता करून रोजच्यापेक्षा जरा लवकरच तयार झालो. हॉटेलपासून जवळच, एखादा किलोमीटर असलेल्या डाकरा गावापर्यंत आम्हाला गाडीने सोडलं. तिथे आम्हाला आधीच ठरवलेला एक वाटाड्या भेटला. त्याच्या मागोमाग आम्ही तिथल्या दरीत उतरलो. यानंतर जवळजवळ ४-५ किलोमीटर आम्ही अधूनमधून दिशा बदलत फक्त उतरत होतो. क्वचित कधी थोडी सपाटी, कधी अगदी किंचित चढ. उतार कधी सौम्य, कधी तीव्र. वाटेवर सुरुवातीलाच डाकरा गावातली घरं लागली. नंतर जंगलात शिरल्यावर तर्हेतर्हेची झाडं, फुलं, फुलपाखरं, वेली, अळंब्या, लायकेन असं सगळं दिसलं. त्या परिसरात सगळीकडेच एक बिच्छू काटा नावाची वनस्पती असते. तिला चुकून स्पर्श झाला तर स्पर्श झालेल्या जागी विंचू चावल्याप्रमाणे वेदना आणि आग आग होते. पहिल्याच दिवशी ही माहिती मिळाल्यामुळे आम्ही नंतर कायम या झुडपापासून सावध राहिलो. इथेही जंगलात आम्हाला सुतारपक्षी आणि छोट्या पक्ष्यांची एक मिश्र टोळी (mixed hunting party) दिसली. पण देवबनला काढले तसे चांगले स्पष्ट फोटो मात्र मिळाले नाहीत.
चालताना वाटेत दिसणारं दृश्य
झाडीतून बराच वेळ चालल्यावर थोडा सपाट गवताळ मैदानाचा भाग लागला आणि मग परत तीव्र उतार आणि समोर एक खळाळता पाण्याचा प्रवाह! चालून चालून दमल्यामुळे ते खळाळतं गार पाणी दिसल्यावर आधी तोंडावर जोरात पाण्याचे हबके मारले. काय छान वाटलं! पुढे चालायचं नसतं आणि कपडे बदलायची सोय असती तर त्या पाण्यात डुंबायलाही आवडलं असतं. पण पुढे चालायचं होतं. असे अजून दोन ओढे ओलांडले. मग एक खोया नावाचं गाव लागलं. तिथे घरांच्या छपरांवर राजमा, मिरच्या, लाल भोपळ्याचे काप अशी वाळवणं घातलेली दिसली. एका शेतात भाताची मळणी चालू होती.
यानंतर मात्र कधी एकदा हे चालणं संपतं असं झालं. कारणं दोन. पहिलं म्हणजे कपड्यांना ठिकठिकाणी लांडगे/ कुत्रे चिकटले होते. म्हणजे गवताच्या काटेरी बिया. दुसरं कारण म्हणजे सतत उतरून उतरून पायाच्या बोटांची थोडी वाढलेली नखं बुटाच्या आतल्या बाजूला टोचत होती आणि ती आता दुखायला लागली होती. प्रत्येक पावलाला ते जाणवत होतं आणि कधी एकदा पायातून बूट काढते असं झालं होतं. शेवटी एकदाचे ठरलेल्या जागी पोचलो. गाडीने आलेली बाकीची मंडळी पोचली होतीच. आधी बूट-मोजे काढून टाकले. तेवढ्यात किकांनी खिशातून एक वस्तू बाहेर काढली. त्यांना येताना वाटेत ती सापडली होती पण सगळ्यांना एकदमच दाखवावी म्हणून ती त्यांनी खिशात टाकली होती. ती वस्तू म्हणजे नमस्कार टोळाची ऊथिका (एक प्रकारचा कोष). नमस्कार टोळ किंवा praying mantis ची मादी नराबरोबर मीलन झाल्यावर नराचं डोकं खाऊन टाकते (आणि अशा प्रकारे तिच्या आयुष्यातला एक मोठा विषय संपतो- इति किका ). त्यानंतर ती अंडी सुरक्षित ठेवण्यासाठी एक प्रकारचा फेसाळ द्राव बाहेर सोडते आणि त्यात अंडी घालते. तो फेस नंतर घट्ट होतो. मग ही कोषासारखी ऊथिका ती एखाद्या झाडाच्या डहाळीला खालून चिकटवून टाकते आणि निघून जाते. पुढे पिल्लांची काळजी घेणं वगैरे प्रकार त्यांच्यात नसतात. भक्षकांपासून वाचलेल्या अंड्यांमधून पिल्लं बाहेर आली की स्वतःच्या बळावर जसं जमेल तसं जगतात. तर किकांना सापडलेली ही ऊथिका अशाच एका नमस्कार टोळाची होती. आम्ही सगळ्यांनी ती हलकी ऊथिका हातात घेऊन पाहिली. जीवसृष्टीत जगण्याचे आणि पुनरुत्पादनाचे किती विविध प्रकार असतात!
ootheca of praying mantis
थोडा वेळ तिथेच इकडेतिकडे फिरलो. तिथेही खाली एक ओढा होता. तिथे आम्हाला plumbeous water redstart हा पक्षी दिसला. दोन दिवसांपूर्वी अशाच एका ओढ्याजवळ याचा चुलतभाऊ white-capped water redstart दिसला होता.
plumbeous water redstart
white-capped water redstart
नंतर तिथेच जेवलो आणि गाडीतून टायगर फॉल्सकडे निघालो. रात्री आणि पहाटे आम्ही थंडीत कुडकुडत असल्यामुळे धबधब्यात भिजण्याची कल्पना आम्ही सगळ्यांनीच उडवून लावली होती. पण जेव्हा धबधब्याजवळ पोचलो तेव्हा ते खूप उंचावरून फेसाळत खाली पडणारं पाणी बघून भिजायचा मोह मात्र झाला. अर्थात भिजलो नाहीच कारण सोबत बदलायला कपडे नेलेले नव्हते आणि दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या दिवशी रविवार होता आणि त्यामुळे भरपूर गर्दी होती. धबधबा, सुट्टी आणि गर्दी हे कॉम्बिनेशनच असं आहे की तिथे जाऊ नये असंच वाटतं. संपूर्ण चार-पाच दिवसांत टिपिकल पर्यटकांची गर्दी आम्हाला या फक्त एकाच जागी दिसली. धबधबा मात्र खरंच मस्त आहे.
तिथून निघून मग आम्ही चक्राता गावाच्या मार्केटला गेलो. तिथे स्थानिक राजमा, गरम कपडे, प्रवासी बॅगा वगैरे वस्तू बर्यापैकी स्वस्त आणि चांगल्या मिळतात असं ऐकलं होतं. त्याप्रमाणे आमच्यापैकी काहीजणांनी थोडीफार खरेदी केली. मुख्य म्हणजे तिथले मोमोज खाल्ले. खूपच आवडले. आजचा कँपचा तसा शेवटचाच दिवस होता. दुसर्या दिवशीही नाश्ता करून बाहेर पडायचं होतं, पण आधी डेहराडूनला एकत्र, आणि मग आपापल्या गावांना जाण्यासाठी.
कॅम्प संपवून निघायच्या दिवशीही सकाळी लवकर उठून पक्षी पाहण्याचा शिरस्ता आम्ही मोडला नाही. त्याचं बक्षीस म्हणून आम्हाला आज कलिज फेजंट या जातीच्या नर पक्ष्याने दर्शन दिलं. कोंबड्याच्या वर्गातला हा पक्षी असतो. याआधी २-३ वेळा मादी पक्षी दिसले होते. पण अर्थातच नर जास्त सुंदर असतो. तो शेवटी आज दिसला. पण हे पक्षी तसे लपूनछपून वावरणारे असतात. झाडीच्या खालीच चरतात. फारसे मोकळ्यावर येत नाहीत. त्यामुळे ’ दिसला’ म्हणण्याइतपतच दिसला.
kalij pheasant female
kalij pheasant male
वर विजेच्या तारेवर ससाणा बसला होता. त्याने अचानक डावीकडच्या कड्याच्या दिशेने एक झेप घेतली आणि क्षणभर थांबून फिरुन परत तो त्याच तारेवर येऊन बसला. तिथे त्या कड्यात त्याचं घरटं होतं! किकांनी स्पॉटिंग स्कोपमधून ते दाखवलं. त्यांच्या नोंदीनुसार गेली सात वर्षं ते घरटं नांदतं आहे. बाकी मग नेहमी दिसणारे पक्षी तर होतेच. हळूहळू नाश्त्याची वेळ झालीच. कधी आलू पराठा, कधी साधा पराठा आणि भाजी, कधी गव्हाची रोटी असे एकाहून एक रुचकर पदार्थ नाश्त्यासाठी असायचे. सोबत चविष्ट दही, चटपटीत लोणचं (अळकुड्यांचं), कधी दलियाची खीर! आज शेवटच्या दिवशी शिरा होता. अतिशय भारी होता. हॉटेलमध्ये काही पदार्थ आणि वस्तू विकायलाही ठेवलेले होते. सफरचंदाची आणि प्लमची, अशा दोन चटण्या होत्या. त्या चवीला कशा लागतात त्याची आम्हाला कल्पना नव्हती म्हणून त्यांनी शेवटच्या दिवशी नाश्त्याच्या टेबलावर त्या चटण्याही ठेवल्या होत्या. ज्यांना आवडल्या त्यांनी एकएक बाटली विकत घेतली. सफरचंदाच्या चटणीत घातलेल्या दालचिनीचा स्वाद छानच लागत होता.
निघायच्या आधी हॉटेलचा सगळा स्टाफ आणि आमच्या चक्रधरांबरोबर एक फोटोसेशन झालं. निघताना सगळ्यांचेच पाय जड झाले होते. चारपाच दिवस कसे संपले ते कळलंच नाही. भरपूर चाललो, भरपूर खाल्लं, भरपूर पक्षी पाहिले, भरपूर मज्जा केली.
पहिल्या दिवशी चक्राताला जाताना वाटेत एका ठिकाणी चहा प्यायला थांबलो होतो. तिथेच बुरांशचं (rhododendron) सरबतही प्यायलं होतं. साधारणपणे गुलाबाच्या सरबताच्या जवळ जाणार्या चवीचं हे फुलांचंच सरबत होतं. त्याचं सिरप तिथे विकत मिळत होतं. घरी नेण्यासाठी तीही बाटली आत्ता थांबून विकत घेतली. पुढे मग डेहराडूनला पोचेपर्यंत कुठे थांबलो नाही. किका आणि त्यांच्या पत्नी सध्या पुणं सोडून पूर्ण वेळ नागझिर्याला राहतात. तिथे निसर्गस्नेही पाणवठे तयार करणे, स्थानिक गोंड आदिवासींसाठी पौष्टिक मूल्यांसाठी वनस्पती संवर्धन करणे असे काही उपक्रम राबवतात. या त्यांच्या कामाची माहिती, त्यांचे अनुभव या प्रवासात त्यांच्याकडून ऐकायला मिळाले.
उत्तराखंडमध्ये त्या वेळी ग्रामपंचायत निवडणुकांचे दिवस होते. चारपाच दिवस जिकडेतिकडे उमेदवारांचे फोटो असलेले बॆनर्स लागलेले आम्ही बघत होतो. उमेदवारांच्या नावांमागे लावण्याच्या विशेषणांमधे आम्हाला सर्वात विनोदी वाटलेलं विशेषण म्हणजे ’ कर्मठ’ ! त्यांच्या भाषेत कर्मठ म्हणजे तडफदारपणे काम करणारा/री. तिथे सगळेच उमेदवार कर्मठ होते. अशी गंमतजंमत करत दुपारी एक-दीडला डेहराडूनला पोचलो. सुरुवातीला पहिल्या दिवशी जिथे एकत्र भेटून जेवलो होतो, त्याच आंगन रेस्टॉरंटमधे जेवलो. इथून मग किका आणि चौघे मेंबर्स डेहराडून विमानतळावर गेले. आमची दिल्लीची ट्रेन रात्री साडेनऊची होती. तोपर्यंतचा वेळ कुठेतरी काढायचा होता. ग्रुपमधले एक काका डेहराडूनला अजून २-३ दिवस राहणार होते. त्यामुळे त्यांनी आधीच एका हॉटेलमध्ये रूम बुक केली होती. चारपाच दिवस ग्रुपमध्ये राहून त्यांच्याशी चांगली ओळख झालीच होती. त्यांनी सुचवलं की हवं असेल तर माझ्याबरोबर चला. माझी रूम आराम करायला, फ्रेश व्हायला वापरलीत तरी चालेल. त्यामुळे आमची खरंच खूपच चांगली सोय झाली. परतीचा प्रवास टू टिअरचा असल्यामुळे जरा जास्त ऐसपैस जागा होती. ट्रेन रात्री वेळेत सुटली असली तरी सकाळी मात्र वेळेवर पोचली नाही. अर्थात आम्हाला घाई नव्हती, कारण आमची पुण्याची फ्लाईट दुपारी साडेतीनची होती. पुरानी दिल्ली स्टेशनवर उतरल्यावर आधी आमचा विचार असा होता की वेटिंग रूममध्ये दोन तास बसून, जरा आवरून मग विमानतळावर जाऊ. पण तिथलं उच्च श्रेणीचं एकमेव प्रतीक्षालय काम चालू असल्यामुळे बंद! असुविधा के लिये खेद है! स्लीपर क्लासच्या वेटिंग रूममध्ये प्रचंड गर्दी. वेटिंग रूम जाऊद्या, त्या पूर्ण प्लॅटफॉर्मवर एकही स्वच्छतागृह नव्हतं. एकंदर परिस्थिती बघून आम्ही लवकरच विमानतळावर यायला निघालो. साडेदहा अकरालाच पोचलो. चेकइनची वेळ होईपर्यंत असाच इकडेतिकडे वेळ घालवला. फ्लाईट थोड्या उशिराने सुटली पण त्या मानाने वेळेत पुण्याला पोचलो. रिक्शा करून घरी.
मुलांना प्रथमच आठ दिवसांसाठी आजी-आजोबांकडे सोपवलं होतं. त्यांचेही (मुलांचे आणि आजीआजोबांचे पण) हे दिवस सुरळीत आणि आनंदात पार पडले. या संपूर्ण कँपमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून सत्तरपेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी पाहिले. (म्हणजे अगदी प्रत्येकाने सगळेच्या सगळे पक्षी बघितले नाहीत, एकूण एवढे पाहिले.) यापैकी मी एकूण ४५ प्रकारच्या पक्ष्यांचे बरेवाईट फोटो काढू शकले. पक्षीनिरीक्षण हा छंद असला तरी तो जोपासताना कशी शिस्त आणि चिकाटी अंगी बाणवावी लागते हे किकांकडे बघून लक्षात आलं. एकंदरीतच अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. पक्ष्यांच्या आणि पक्षीनिरीक्षकांच्या जगातल्या अद्भुतरम्य गोष्टी किकांकडून ऐकायला मिळाल्या. छोटा ग्रुप असल्यामुळे सगळ्यांशी चांगली ओळख झाली. ग्रुपमधले सगळेच स्वभावाला छान असल्यामुळे आणि निसर्गनिरीक्षणाची आवड हा सगळ्यांना जोडणारा समान धागा असल्यामुळे मस्त मजा आली. अशा प्रकारे अनेक अर्थांनी पहिला असलेला हा प्रयोग शंभर टक्क्यांहून जास्त यशस्वी झाला!!
त्रिशुर - कोटमंगलम - मुन्नार
त्रिशुर - कोटमंगलम - मुन्नार रस्ता. कोटमंगलमपासून वीस किमीवर तट्टेखाद आहे. सलीमअलीनी मागणी करून हे अरण्य आरक्षित करायला लावले
ही सगळी लेखमाला आज वाचली.
ही सगळी लेखमाला आज वाचली. तुमचे अनुभव, त्याबद्दलचं तुमचं लेखन आणि फोटोज हे सगळंच अतिशय सुंदर आहे. वाचायला मजा आली. किकांसोबत अनेक वर्षांपूर्वी (तेव्हा ते नागझिर्यात गेले नव्हते) कवडी-पाटस-वरवंड ची पक्षीनिरीक्षण सहल करण्याचा अनुभव घेतला आहे. काय अफाट नॉलेज आहे त्या माणसाला! भन्नाटच आहेत ते!! त्या एकदिवशीय सहलीत सुद्धा खूप काही शिकले. ते आजपर्यंत पक्षीनिरीक्षणासाठी उपयोगी पडतंय. पुन्हा पुन्हा तेच पक्षी पाहण्याचा त्यांचा उत्साह दांडगा आहेच. पण आपल्यालाही ती सवय लागते, खरंतर तसं रिपीट पक्षी पहाणंही आवडायला लागतं असा माझा अनुभव आहे.
इतकी छान माहिती शेअर केलीत त्याबद्दल खूप धन्यवाद, वावे!
अजून एक विचारायचं होतं,
अजून एक विचारायचं होतं, तुमच्या कॅमेर्याबद्दल अजून माहिती कळू शकेल का? कुठला आहे, रेंज किती वगैरे? तुमचे फोटो पाहून मलाही असा कॅमेरा घ्यावासा वाटायला लागलाय
येस, धन्यवाद कांपो, Srd
येस, धन्यवाद कांपो, Srd
छान लिहिलं आहे आणि फोटोही
छान लिहिलं आहे आणि फोटोही मस्त. हा छंद एकदा लागली की जाऊ तिथे आपण पक्षी पाहातो असा अनुभव.
पुलेशु
RMD पक्षीनिरीक्षणासाठी
RMD पक्षीनिरीक्षणासाठी सध्याच्या काळात Nikon D500 Camera Plus Nikon 200-500 lens बेस्ट
rmd, मस्त वाटलं तुमचा
rmd, मस्त वाटलं तुमचा प्रतिसाद वाचून
किका ज्या नोंदी करतात त्या प्रचंड डीटेल्ड असतात. रोज म्हणजे न चुकता रोज ते पक्ष्यांची निरीक्षणं बारीकसारीक तपशीलांसकट, पक्ष्यांच्या संख्येसकट लिहितात. महान शिस्तबद्धपणा आहे हा. ठिकाण, तारीख, वेळेसकट केलेल्या या नोंदी मौल्यवान असतात.

मी या ट्रिपसाठी निकॉन कूलपिक्स पी 900 हा कॅमेरा नेला होता. हा डीएसएलआर नाही. पण काही प्रमाणात शटर स्पीड आणि अपर्चर कंट्रोल आहे. पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी (आणि इतरही, उदा. चंद्राचा फोटो, सूर्यास्त इत्यादी ) प्रीसेट मोड आहे. मुख्य म्हणजे भरपूर झूमिंग आहे. ( Equivalent to a 2000mm lens, as per their claim) .मी या धाग्यांमधले बरेचसे फोटो प्रीसेट बर्डवॉचिंग मोडवर काढले आहेत. Lammergeier उडतानाचे, मोहोळघारीचे असे काही फोटो शटर स्पीड कंट्रोलने काढले आहेत. मी तरी खूष आहे या camera वर. मी सुरुवातीलाच लिहिले आहे त्याप्रमाणे तोफेसारखी लेन्स ४/५ दिवस वापरण्यापेक्षा मला हा camera सुटसुटीत वाटला. विशेषतः जेव्हा शिवाय थोडं ट्रेकिंगही करायचं होतं, तेव्हा कॅमेऱ्याचं लोढणं नाही झालं गळ्यात
पण, पण, पण, डीएसएलआरने काढलेल्या फोटोंंची स्पष्टता आणि तो दर्जा शेवटी वेगळाच
वेका, स्वप्ना, वर्षा, प्रतिसादांंसाठी सर्वांची आभारी आहे.
वावे, कॅमेर्याबद्दल
वावे, कॅमेर्याबद्दल माहितीसाठी खूप खूप थँक्स. माझ्याकडे डीएसएलआर आहे पण ती तोफ लेन्स नाही. ती घ्यावी का सुटसुटीत कॅमेरा बाळगावा असा दोलायमान विचार चालू आहे.
कॅमेऱ्याचं लोढणं >>> ही सगळ्यात महत्त्वाची बाब!
किकांच्या नोंदींबद्दल अगदीच सहमत.
केपी, थँक्स तुलाही
वर म्हटल्याप्रमाणे माझा अजून विचार पक्का झाला नाहीये. पण किंमत, रेंज आणि कॅरी करण्याचा सुटसुटीतपणा या सगळ्याचाच विचार करून ठरवेन म्हणते.
रमड, निकॉनचा P900 छान आहेच.
रमड, निकॉनचा P900 छान आहेच. P1000 पण चांगला आहे असं ऐकून आहे. २४-३००० mm एवढी रेंज आहे. स्वत: ट्रायल घेऊन बघा आणि मगच ठरवा. खूपच पॅशनेट असाल तर केपी म्हणतोय तसं टेलिफोटो लेन्सचा विचार नक्की करा.
वावे, फोटो चांगले आहेत. उत्तराखंडला आता पक्षी बघायला जायला हवंय.
क्याम्रा माहिती आवडली. कारण
क्याम्रा माहिती आवडली. कारण फोटोही आवडलेत.
------
आता फक्त एखादा विडिओ टाका/लिंक द्या. पक्षी दूरवर असतो तो लेन्सने झूम होऊन जवळ येतो पण आवाज दूरवर येतो का टेस्ट.
P900 पेक्षा P1000 दुप्पट महाग
P900 पेक्षा P1000 दुप्पट महाग आहे. दुप्पट किंमत मोजून Raw format, 4k video, 125X Zoom मिळते. यातील झुमचा फारसा उपयोग होत नाही असे मला वाटते. एका ब्रिज कॅमेऱ्यासाठी 70k घालवायचे हेच मला पटत नाही. अर्थात ज्याची त्याची आवड आहे. पण किंमतीचा विचार केला तर P900 उत्तम कॅमेरा आहे. पण हा कॅमेरा लो लाईटमधे काही कामाचा नाही तसेच फोटो क्रॉपही करता येत नाहीत. DSLR सोबत हा कॅमेरा कलेक्शनमधे असला तर जाता जाता दिसलेला एखादा पक्षी अगदी गाडी जरा वेळ थांबवून चटकन पकडता येतो.
शाली, ( तुम्ही आयडी का बदलला
शाली, ( तुम्ही आयडी का बदलला म्हणे?
) लो लाईटमधे शटरस्पीड कमी केला आणि हात स्थिर ठेवले तर येतात फोटो चांगले. क्रॉप करता येत नाहीत म्हणजे काय? मला कळलं नाही.
srd, व्हिडिओ द्यायला जमलं तर नक्की देईन. शालींकडेही असतील. ते या कॅमेऱ्याचे अनऑफिशिअल ब्रँड अँबेसेडर आहेत
येथे कॅमेरा झुमचा जरा अंदाज
येथे कॅमेरा झुमचा जरा अंदाज येईल.
वावे छान माहिती. माझ्याकडे
वावे छान माहिती. माझ्याकडे पूर्वी निकॉन पी६०० होता ज्यानेही छान फोटो यायचे. पी९०० मस्तच असणार. मी पण पॉईंट अॅन्ड शूटवालीच. सुटसुटीतपणा रॉक्स.
सुंदर फोटो आणि लेखमाला. मजा
सुंदर फोटो आणि लेखमाला. मजा अली वाचून. P ९०० ने मस्त फोटो मिळाले आहेत.
धन्यवाद योगेश!
धन्यवाद योगेश!
कोविड आणि लॉकडाऊनमुळे, २०१९ मध्ये केलेले प्रवास मागच्या जन्मी केल्यासारखे वाटतात.
मधून मधून चक्राताची आठवण आली की मीच माझे हे लेख काढून वाचत असते.
Pages