देवा जाग्यावर...१

Submitted by हरिहर. on 6 November, 2019 - 02:46

रात्रीचे दिड वाजले असावेत. अंगणात मुहुर्तमेढ रोवलेली होती. लहानसा मांडव बांधलेला होता. शेजारीच मनगटाएवढ्या जाडजुड उसांनी ऐसपैस चौक बांधला होता. अनेक प्रकारची फुले, फळे, नागवेलीची पाने, सुपारी यांनी चौक रंगीबेरंगी दिसत होता. समोर देवीचे, खंडोबाचे टाक वगैरे होते. तेथेच हातभर उंचीची दिवटी आणि पितळी बुधला होता. त्या दिवटीचा आणि जमीनीत खोचलेल्या मशालींचा उजेड चौकावर पडल्याने तो मोहक दिसत असला तरी भितीदायकही दिसत होता. अंगणात एक-दोन पिवळ्या प्रकाशाचे प्रखर दिवे लावलेले होते त्यांचा काही प्रकाश जागरण-गोंधळ जेथे सुरु होता तेथवर पोहचत होता. सात आठ गोंधळ्यांच्या भोवतीने मोठे कडे करुन श्रोते बसले होते. साडेनऊ दहाला असणारी गर्दी आताशा बरीच कमी झाली होती. लहान मुलांना झोपवायला गेलेल्या आया परतल्या नव्हत्या, कामाची पुरुषमंडळीही केंव्हाच झोपायला गेली होती. अंबरीष राजाचे आख्यान ऐकायला थांबलेले, लोककलेची आवड असलेले व ज्यांना थांबणे कर्तव्यच आहे असे घरातील काही जण एवढेच तेथे उरले होते. काही म्हाताऱ्या बायाबापड्या गोंधळ्याने केलेले विनोदसुध्दा हात जोडून श्रध्देने ऐकत होत्या. चांदव्याची कोर नुकतीच उगवली होती. रात्र पहाटेकडे सरकत होती. बाहेर थंडी आणि चौकासमोर संबळाची काडी इरेसरीने चढीला लागली होती. त्यातच तुणतूण्याची तुण तुण घाईला येऊन भर घालत होती. समोरच्या दिवटीत बुधलीने तेल घालायचे काम माझ्याकडे असले तरी आता मला त्याचा विसर पडला होता. थंडीमुळे मी हात बांधून मुठी बगलेत गच्च धरल्या होत्या. डोळे विस्फारुन मी समेळ आणि धुमावर फिरणारी साधूची काडी पहात होतो. तो दोन मांड्यांमधे दाबलेला धुम घुमवून संबळ वाजवताना बेभान झाला होता. तुणतूण्याच्या कडक घाईसोबत आलेल्या “माझ्या कानड्या मल्हाऽऽरी” या ओळीवर साधूने संबळाची अशी काही सम गाठली की मी नकळत बगलेतला हात वर करुन “आंग्गंऽ आश्शी, भले शाब्बास साधू!” म्हणत ओरडलो. तुणतुण्याची घाई, साधूच्या संबळाचा झपाटा आणि खंडोबाचे कौतूक करताना टिपेला लागलेला गोंधळ्याचा आवाज याचा एकत्रीत परिणाम म्हणून की काय पलिकडे बसलेल्या बायांच्या मागून एक धिप्पाड माणूस नशेत असल्यासारखा तोल सावरत, घुमत चौकासमोर आला. येताना त्याने एक दोन बायांच्या मांड्यांवर पाय दिल्याने त्या बिचाऱ्या कळवळल्या होत्या. कुणीतरी उठून त्या माणसाने बांधलेला केसांचा लहान अंबाडा मोकळा केला. त्याच्या कपाळावर हळद कुंकू फासत “आई राजा उदं उदं! खंडूबाच्या नावानं चांगभलं” अशी जोरदार आरोळी दिली. चांगला उंच व धिप्पाड असणारा, मानेवर केस मोकळे सोडलेला तो माणूस मला एकदम भयंकर दिसायला लागला. कपाळावर हळद कुंकू फासताना ते त्याच्या गालावर व छातीवरच्या अंगरख्यावरही उडाले होते. त्याची थरथरणारी बुबूळे अंतराळी झाल्याने ते ध्यान अधीकच अभद्र दिसत होते. दर्शनासाठी तो चौकाच्या दिशेने यायला लागला. मी दिवटीत तेल घालण्यासाठी चौकाशेजारीच बसल्याने मला तो माझ्याच दिशेने येतो आहे असे वाटले. त्याची धुळभरली घाणेरडी पावले लवकरच माझ्या छातीवर पडतील असं मला वाटलं. माझ्या मणक्यातून बर्फ सरकला. एवढ्या थंडीतही मी घामाने डवरलो. त्या माणसाची जवळ आलेली पावले मला दोन फुटांएवढी मोठी दिसायला लागली आणि मी बेंबीच्या देठापासून जोरात ओरडलो “नान्या बघ रे, मेलो मी आता”
मला वाटले मी ओरडलो पण प्रत्यक्षात घशातून फक्त घर घर बाहेर पडली होती. मी भितीने मान गुडघ्यात घातली व शरीराचे मुटकूळे केले. माझ्यासाठी जग तेथेच संपले होते. आता संबळाचा आवाज दुर डोंगारापलीकडून यावा तसा ऐकायला येत होता. आपण कधी तुडवले जातोय याची वाट पहात मी डोळे गच्च मिटले होते. इतक्यात माझ्या कानावर नान्याचे खणखणीत शब्द आले “होऽऽऽ ओ, देवा जाग्यावर हांऽऽ”
त्या आरोळीबरोबर अंगात आलेला देव अगदी स्थिर झाला आणि मग झुलत झुलत पुन्हा मधे जाऊन हलके हलके झूलू लागला.
तोवर कुणीतरी माझ्या दोन्ही बगलेत हात घातले आणि जमीनीतुन गाजर उपटावे तसे चौकाशेजारुन मला अलगद उचलले.
नान्याच होता तो. माझ्या गालावर थोपटत तो विचारत होता “ए अप्पा, घाबरलास का? अरे साधूच्या घरी आहोत ना आपण? घाबरतो कशाला लहान मुलांसारखा?” शब्दांपाठोपाठ तोंडावर थंड पाण्याचा हपका बसला.
मी काही क्षणातच भानावर आलो. पण शरीरातले त्राणच नाहीसे झाले होते. पाय जमीनीवर ठरत नव्हते. अंगाची थरथर कमी होत नव्हती. मात्र भिती कधीच गेली होती. सोबत नान्या आहे हे लक्षात येताच मला खुप बरे वाटले. नान्याने मला घराच्या अंगनात आणून बसवले. घरातून मुठभर साखर आणून खायला दिली. प्यायला पाणी दिले तेंव्हा मला खुप बरे वाटले.

त्याचे झाले असे होते की साधू हा गेले दोन वर्षांपासुनचा आमचा खुप जवळचा मित्र झाला होता. स्वतः खुप सुरेख संबळ वाजवी. त्याच्या भावाच्या लग्नाच्या गोंधळाला आम्ही त्याच्या गावी आलो होतो. लोकसंगीत हे माझे अगदी जीव की प्राण. या संगीताच्या नादात आम्ही मित्रांनी कोल्हापुर सांगली पासुन नाशिकपर्यंतच पट्टा रात्री अपरात्री तुडवला होता. गावी असताना परिसरातले एकही भजन, भारुड मी सोडले नव्हते. घरातल्या भाकरी व भाजी देऊन एका बैराग्याची एकतारीवरील भजने पहाटे साडेतिन वाजता ऐकली होती. एकदा धनगराचा पावा ऐकून घरच्यांना काळजीत टाकून त्याच्या मेंढ्यांच्या वाड्याबरोबर दोन दिवस सिंहगडचा पायथा फिरलो होतो. एवढे असुनही अगदी न कळत्या वयापासून ‘अंगात आलेली व्यक्ती’ व ‘मरीआईचा देव्हारा घेवून येणारा पोतराज’ यांची मला भयानक भिती वाटायची. पोतराजाचा तो कोरडा म्हणजे मला यमाच्या हातचा पाशच वाटायचा. वय वाढले तशी ही भितीही वाढली. सगळं कळूनही या दोन व्यक्तींना पाहीले की मला काय होई हे समजत नसे. भितीने मला कापरे भरत. शुध्द जाण्यापर्यंत मजल जाई. यातून बाहेर पडायचा मार्ग म्हणजे कुणी तरी प्रेमाने दहा मिनिटे समजुत काढत रहाणे. मग कुठे मी थोडासा भानावर येई. एक प्रकारे मानसीक भितीच होती ही. लहानपणापासुन मित्र असलेल्या नानाला हे माहीत होते. त्यामुळे त्याने मला वेळेवर सावरले होते. सकाळी आम्ही पुण्याला निघालो तेंव्हा एसटी स्टँडवर साधू अगदी अपराध्यासारखा आमच्या समोर उभा होता.
“नाना शप्पथ मला माहित नव्हती ही अप्पाची भानगड. खरच मला माफ कर यार. मी तुम्हाला बोलवायलाच नको होतं”
नाना त्याची समजुत काढत म्हणाला “काही काय साधू! झकास झाला कार्यक्रम. तुमच्याकडे कुणाच्या अंगात येते हे माहित असते तर अप्पाला बसुच दिले नसते मी जागरणात. तुझा काही दोष नाही. का असा गाय मारल्यासारखा चेहरा केलाय? लवकर ये पुण्यात”
तरीही साधूला काही बरे वाटेना. “नाना तुम्हाला सोडू का पुण्यात? मी फिरेन माघारी दुपारपर्यंत”
त्याची तगमग मला जाणवली. मी त्याच्या राजदुतची चावी फिरवत म्हणालो “काहीही काय साधू! घरी कार्याची धावपळ आहे तुझ्या. पुण्याला कुठे येतोस आमच्या मागे. तू जा. आम्ही जाऊ एसटीने”
तो ऐकत नसताना मी त्याला बळेच घरी पाठवले. दुपारपर्यंत आम्ही पुण्यात पोहचलो.

रात्री नानाने मेसला दांडी मारली. मलाही जाऊ दिले नाही. केरु, विन्या वगैरे मात्र नेहमीप्रमाणे मेसला गेले होते. खाली जाऊन नान्याने चटकन खिचडीचे सामान आणले. फ्लॅटवर रोजच्या दुध-बोर्नव्हिटासाठी गॅसची शेगडी होती. त्याने चटकन चवदार खिचडी बनवली. भरपुर तुप टाकून वाफाळती खिचडी, लोणचे वाढले. आम्ही एकाच ताटात बसुन जेवलो. जी काळजी फक्त आई बाबाच घेऊ शकतात त्यापेक्षाही जास्त प्रेमाने नान्याने सर्व केले. (आज हे सर्व आठवून जरी डोळे भरुन येत असले तरी त्यावेळी त्याचे काही वाटत नसे. आई, बाबा यांचे जसे हे कर्तव्य आहे तसे मित्रांचेही हे कर्तव्यच आहे असे वाटे.) ताट व भांडे विसळून तो येऊन माझ्या शेजारी गादीवर पसरला. त्याने “का रे एवढा घाबरलास?” “कसे वाटतेय?” किंवा “आली का ताकद अंगात?” या पैकी काहीच विचारले नाही. हा समजुतदारपणा नानाकडे त्याच्या आईकडून आला असणार. ती माऊलीही कधी अडचणीत आणनारे प्रश्न अवघड वेळी विचारत नसे. मुलांना कधी, काय व कसे विचारावे हे त्या अडाणी बाईला अतिशय अचुक माहित होते.
नाना कुशीवर वळून हाताचा त्रिकोन करत त्यावर कानशील टेकऊन म्हणाला “काय देवाची करणी असते बघ अप्पा, हा साधू ना जातीने गोंधळी, ना घरात संगीताचे वेड, ना संबळ हे वाद्य इतरांनी आवर्जून शिकावे असे, तरी काय संबळ वाजवतं यार हे कार्टं! याचा संबळ ऐकून खंडोबा देखील बाणाईला विसरत असेल”
मी हसुन म्हणालो “साधू काय साधूच आहे नान्या. अरे त्याची काडी आणि हात संबळवर चालत नाही, समोरच्याच्या छातीवरच चालतात जणू. घरचे उगाच राग राग करतात त्याचा संबळवरुन”
नाना नुसताच हुंकारला. मी उत्सुकतेने विचारले “ते मरुदे नान्या, मला एक सांग तु नुसत्या एका आवाजावर देव कसा काय रोखला रे? तोही तुझं ऐकून निमुटपणे थांबला आणि माघारी कसा काय गेला? कसली विद्या शिकला बावा तू?”
“अरे कसली विद्या न काय. आमच्या वाडीत पाटलाची माघारी आलेली बहीण आहे ना, गौरात्या, तिच्या अंगात येते कधीमधी. मग पाटील गावातून जगू गोंधळ्याला बोालावतात. तो येतो संभळ घेऊन. खंडोबाची स्तुती गातो खड्या आवाजात. गौरात्या घुमते पंधरा-विस मिनिटे आणि शांत होते. घुमताना जर ती बेफाम झाली तर जग्गू खड्या आवाजात ओरडतो “बघ हां देवा…जाग्यावं” किंवा “ओ देवा माघारी फिरायचं बरं का” आणि गौरात्या ऐकते त्याचे. तेच सुचलं काल मला. गम्मत म्हणजे साधूच्या घरचा देव सुध्दा फिरला की माघारी”
नान्या मोठ्याने हसला आणि म्हणाला “ते काहीही असुदे अप्पा पण हे अंगात येणे खरे असते. म्हणजे देव वगैरे नाही येत अशा लोकांच्या अंगात पण ती बेभान अवस्था मात्र खरी असते. कुणी फार दुखावलेला, उरात सुरी असलेला या अवस्थेत जातो. सासुरवास असलेल्या बायाबापड्यांच्याही असेच अंगात येते. काही संगीतवेडी माणसेही भान हरपून बसतात. आपण त्रास देवू नये त्यांना शक्यतोवर.
मी नुसताच “हं” म्हणत छताकडे पहात राहीलो.
उशीवर डोके ठेवत नान्या म्हणाला “झोप अप्पा आता. सकाळी माझे तिन शिटस् तुला पुर्ण करुन द्यायचेत. मला ते ड्रॉईंग काय झेपत नाही”
बाकीचेही मेसवरुन आले होते. नान्याने त्यांना हाताने खुण करुन गप्प बसायला सांगितले आणि झोपला. मीही अगदी गलितगात्रच होतो. छतावरच्या फॅनचा कऽट्ट कट आवाज ऐकत, विन्या व केरुचे दबके हसणे ऐकत मग मी देखील झोपी गेलो.

हा नाना माझ्याच गावचा. माझे गाव तसे बऱ्यापैकी मोठी बाजारपेठ असलेले व तालूक्याच्या राजकारणात चांगले वजन ठेऊन असलेले. गावाच्या आजुबाजूला तिन चार किलोमिटरच्या परिसरात पाच वाड्या. त्यातली एक वाडी फक्त नानाच्या गोतावळ्याची होती. कधीतरी त्याच्या पणजोबांच्याही आधी कुणीतरी तेथे वस्ती केली. जसजसा काळ गेला तशा एका चुलीच्या अनेक चुली होत होत आजची वाडी तयार झाली. या वाडीत कुणाकडे कार्य असले की सगळ्यांच्या चुली बंद असत व कुणी गेले की सर्व वाडीला सुतक पडत असे. सध्या या वाडीच्या सगळ्या नाड्या नानाच्या वडीलांकडे होत्या. त्याचे घर म्हणजे एक मोठे खटलेच होते. पंधरा विस म्हशींचा गोठा, दारात दोन ट्रॅक्टर, पंचवीस तिस एकराचे दोन तुकड्यातले सलग काळेभोर रान असा सगळा पसारा होता. वडीलांचे म्हणजे बापूंचे बोलणे फटकळ व शिवराळ असले तरी वृत्ती कर्णाची. पैशांच्या जोरावर नाही तर निव्वळ सत्शिल वृत्तीमुळे आमच्या गावच्या कारभारात, देवस्थानावर बापू वचक ठेऊन होते. कपाळावर नाम, कानांच्या पाळ्यांना गंध व गळ्यात टपोऱ्या मन्यांची तुळशीमाळ असलेल्या बापूंच्या तोंडात मात्र ‘विठ्ठल विठ्ठल’ ऐवजी ‘रांडेच्या’ आणि ‘भडव्या’ हेच शब्द जास्त असत. नान्याची आणि माझी मैत्री आठवीपासून झाली. कारण आम्ही सातवीपर्यंत गावच्या मराठी शाळेत शिकलो तर बापूंनी वाडीतल्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरु करुन पहिला विद्यार्थी म्हणून नान्याला घातले. नान्या याच शाळेत सातवीपर्यंत शिकला.

आम्ही आठवीसाठी हायस्कुलमधे प्रवेश घेतला तेंव्हा नान्या आणि मी एका वर्गात, एकाच बाकावर आलो. आम्हा मित्रांच्या ‘गँगमधे’ आलेला नाना हा शेवटचा सदस्य. हा पहिल्या दिवशी वर्गामधे आला, बेदरकारपणे आमच्या कळपात घुसला आणि थोड्याच दिवसात गँगचा अविभाज्य भाग झाला. आम्ही केलेल्या गुन्ह्यांच्या छड्या त्यानेही निमुट खाल्या, स्वतःच्या व आमच्याही आई बाबांची बोलनी खाल्ली. स्वतःच्याच पेरुच्या बागेत हा आमच्यासोबत गुपचूप पेरु चोरायला आला, कॉलेजमधे आमच्या मारामाऱ्यांमधे हाही समरसुन सहभागी झाला, मार द्यायला आणि खायलाही नान्याने कधी मागेपुढे पाहिले नाही. इंजीनिअरींगला असताना माझे काही मुलांशी वाजले. एकदा मी, नान्या आणि काही मित्र कॅंटीनमधे बसलो असताना ही मुलेही तेथे आली. त्यांना पहाताच मला माझा संताप आवरता येईना. मी समोरचा पाण्याचा जग घेवून त्या मुलांवर धावलो. चार अर्वाच्य शिव्या देणे म्हणजे माझे हमरी तुमरीवर येणे व एखादी मुस्काडात मारणे म्हणजे माझी मारामारी असे. त्यापुढे धाव घ्यायची माझी वृत्ती आणि ताकद दोन्हीही नसे. पण मला धावताना पाहून नान्या स्टिलचे पाय असलेली खुर्ची घेवून असा काही त्या मुलांवर तुटून पडला की आम्हाला त्या मुलांना धोपटण्याऐवजी नान्याच्या तावडीतून सोडवावे लागले. ती मुलं “बघून घेऊ तुम्हाला” अशा धमक्या देत पळून गेली तेंव्हा कुठे नानासाहेब शांत झाले.
पुन्हा चहाची ऑर्डर देत नाना मला म्हणाला “काय केलं रे त्यांनी अप्पा?”
मी डोक्याला हात लावत विचारले “नान्या, भडव्या तुला काहीच माहित नाहीए का? मग खिंड लढवणाऱ्या बाजीप्रभुच्या थाटात कशाला तुटून पडला एवढा?”
नान्या हसत चहाच्या ग्सासच्या कडेवर गोल गोल बोट फिरवत म्हणाला “असं कसं अप्पा! मित्रकार्य म्हटल्यावर मागे कसं रहायचं?”
“अरे नान्या, कसलं बोडक्याचे मित्रकार्य घेवून बसलाय? एखाद्याचा हात पाय मोडला असता तर घरचा रस्ता धरायला लागला असता. तु काय घरची शेतीच सांभाळणार आहे. मला परवडायचं नाही रस्टीकेट होणं”
तर असो.

मी बारावीनंतर इंजीनिअरींगला ॲडमिशन घेतली आणि शिक्षणात नक्की काहीच ध्येय नसलेला पण तल्लख बुध्दीच्या नानानेही माझ्यासोबत ॲडमिशन घेतले. कॉलेजमधे, होस्टेल-मेसमधे भरपुर धिंगाणा करुन नाना माझ्यासोबतच उत्तम ग्रेड मिळवून पास झाला. आयुष्यात पुन्हा कधी छंदांसाठी वेळ मिळेल न मिळेल म्हणून मी स्कल्पचरचा अभ्यास करण्यासाठी पुण्याला ॲडमिशन घेतले आणि मुर्तीकलेतले काहीही कळत नसताना नान्याही माझ्यासोबत फाऊंडेशनला आला. कितीही आणि काहीही शिकला तरी त्याच्या करीयरची गंगा घरच्या सहकारी डेअरीलाच जाऊन मिळणार असल्याने त्याला अभ्यास, सबमिशन, पास-फेल वगैरेंची फिकीर नसायची. मैत्रीशिवाय दुसरे कसले व्यसन नाही, पास-फेलची चिंता नाही व खिशात कधी पैशांची कडकी नाही असे असल्याने तो नेहमीच बेदरकार असे. बुध्दी तल्लख असल्याने नान्याच्या मेंदूतून नेहमी चित्र-विचित्र कल्पना बाहेर पडत. या कल्पनांचा उपयोग तो प्रामुख्याने कुणी त्याच्या मित्रांना त्रास दिला तर त्याचा सुड घेण्यासाठी करायचा.

देवा जाग्यावर...२

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोंधळाचं वर्णन एकदम चित्रदर्शी,
मला वाटलं गोंधळावर संपूर्ण लेख आहे.
पण बघू या नानाच्या गोंधळ लिला क्रमशः
चला... ढंगांळांग...चिपळांग...

मस्त लिहिलंय
अगदी चित्रदर्शी वर्णन.... बारकाव्यांसकट
पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

छान लेख, दिवटी बुधली म्हणजे जेजुरीचा खंडोबा कुलदैवत! कोणता भाग? लोणंद नीरा, फलटण सातारा दहिवडी या भागात सगळयांचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे..

मस्त आहे गावाकडचा बाज.

“आई राजा उदं उदं!" हे कुणाला उद्देशून म्हणतात? माझे शहराळलेले व्याकरण “आई राणी उदं उदं!" असं भुणभुणतंय डोक्यात पण हा शब्द प्रयोग आधीही ऐकलाय त्यामुळे उत्सुकता आहे.

रच्याकने, लोकसंगीताचा खजीना कुठे ऑनलाईन असेल तर लींक शेअर करा. मी पण पंखा आहे.

सगळ्यांचे धन्यवाद!

@माधव ते कौतुकाने म्हटले जाते. सर्व कर्तुम अकर्तूम शक्ती असलेला राजा मानतात आदीशक्तीला. जसे विठ्ठलाला विठाई म्हणतात तसे.

सकाळीच हे पहाण्यात आले. कर्नाटकी संगीत आणि ट्रान्स जेंडर कम्युनिटीचे संगीत आहे.
https://youtu.be/QsHbt6rtXiA

काल वाचलं होतं....
तुमचं अनुभवविश्व खुप विस्तारलेलं आहे. हेवा वाटला...अर्थात तुमच निरीक्षण जास्त महत्वाचं आहेच...नेहमीसारखच रसाळ!

मस्त लिहिलंय
अगदी चित्रदर्शी वर्णन.... बारकाव्यांसकट >>>> + 9999