आनंदाचा निसर्गदत्त ठेवा

Submitted by कुमार१ on 3 November, 2019 - 21:27

माणसाचा जगण्यासाठीचा संघर्ष सनातन आहे. अन्न ही प्राथमिक गरज भागविण्यासाठी आपल्याला बरेच कष्ट करावे लागतात. सजीवांच्या गुणधर्मानुसार आपण पुनरुत्पादन करतो आणि त्यातूनच कुटुंबव्यवस्था निर्माण होते. मग आयुष्यभर आपण संसाराचा गाडा ओढत राहतो. या दीर्घ प्रवासात अनेक चढउतार येतात. अनेक अडीअडचणींना तोंड द्यावे लागते. वेळप्रसंगी शारीरिक व मानसिक वेदना सहन कराव्या लागतात. या सगळ्याचा आपल्या मनःस्वास्थ्यावर परिणाम होत असतो. संसाराच्या या व्यापतापात आनंदाचे चार क्षण मिळवत राहणे ही आपली गरज असते. मग कसा मिळवावा आपण हा आनंद? तो काही आकाशातून पडत नाही किंवा कुठे विकतही मिळत नाही ! मात्र तो आपला आपणच मिळवायचा असेल, तर तशी सोय निसर्गानेच खुद्द आपल्या शरीरात करून ठेवलेली आहे. आपल्या मेंदूमध्ये अशी काही केंद्रे आहेत जिथून काही खास रसायने स्रवतात. एकदा का या रसायनांचा संचार आपल्या शरीरात झाला, की मग कसे आपल्याला काही काळ मस्त मस्त वाटते. आनंद, सुख आणि समाधान यासारख्या भावनांचे आपल्यावर जणू गारुड होते. अशा आनंदाच्या लाटांवर वारंवार तरंगायला आपल्याला नक्कीच आवडते. मग काय करू शकतो आपण त्यासाठी? एक लक्षात घ्यावे. या नैसर्गिक सुखप्राप्तीचे बटन आपल्याच हातात असते; फक्त ते चालू करता आले की झाले. ते कशा प्रकारांनी चालू करता येईल ते लेखात पुढे येईलच.

तर मग पाहूया ही मेंदूतील आनंदजनक यंत्रणा नक्की काय आहे ते. संबंधित रसायने कुठली, ती नेमके काय करतात आणि ती उत्तम स्रवण्यासाठी आपण काय करू शकतो, या सगळ्याचा उहापोह या लेखात करीत आहे.

अशा या अद्भुत रसायनांचे शास्त्रीय नाव आहे Endorphins, अर्थात 'आनंदजनके'. Endorphins हा एक संयोग शब्द असून त्याची फोड अशी आहे:
Endorphin = Endogenous + morphine.

म्हणजेच ही अशी अंतर्गत रसायने आहेत की ज्यांचे काम 'morphine' या रसायनाप्रमाणे असते !
Morphine हे वैद्यकातील 'Opium’ या गटातील महत्वाचे औषध आहे. ते एक प्रभावी वेदनाशामक आहे. म्हणजेच एखाद्या वेदनेची ते मेंदूपर्यंत जाणीव होऊ देत नाही. त्याचा अजून एक गुणधर्म आहे. जर ते विशिष्ट डोसमध्ये घेतले तर त्या व्यक्तीत ते अत्यानंदाची भावना (euphoria) निर्माण करते. याच धर्तीवर आपली आनंदजनके काम करतात. एक प्रकारे ती आपली नैसर्गिक वेदनाशामके आहेत.

मेंदूतील उत्पादन

Pituitary-gland.jpg
इथल्या काही विशिष्ट पेशींत POMC नावाचे एक आकाराने मोठे प्रथिन असते. त्याचे विघटन होऊन अ, ब आणि क या प्रकारची आनंदजनके (‘आज’) तयार होतात. जेव्हा शरीरात एखाद्या वेदनेला सुरवात होते तेव्हा मेंदूतील पिच्युटरी ग्रंथीतून 'आज' सोडली जातात. पुढे ती पेशींतील विशिष्ट प्रथिनांशी संयोग करतात. त्यामुळे वेदना मेंदूकडे पोचविणारी अन्य काही रसायने निष्प्रभ होतात. त्यामुळे आपल्याला आता ती वेदना जाणवत नाही. याच्या जोडीला मेंदूत अजून एक बदल होतो तो म्हणजे तेथील 'डोपामिन' या रसायनाचे प्रमाण वाढते. त्याच्या गुणधर्मामुळेच आपल्यात आनंदाची भावना निर्माण होते.

'आज'चे शरीरातील परिणाम :
विशिष्ट परिस्थितीत त्यांच्या शरीरातील प्रमाणानुसार खालील परिणाम संबंधितास जाणवतात :
१. वेदनेची तीव्रता कमी होणे, जेणेकरून ती सुसह्य होऊ शकते.
२. आपल्याला उत्तेजित ठेवणे. तसेच समाधानाची भावना निर्माण करणे
३. आत्मविश्वास वाढविणे

४. दुःख्खामुळे होणारी भावनिक आंदोलने नियंत्रित ठेवणे
५. अत्यानंदाची भावना निर्माण करणे. विशेषतः 'अमुक एखादी कृती केल्याने मला खूप छान वाटते", अशी भावना त्या व्यक्त्तीत प्रबळ होते. त्यामुळे ती कृती आवडीने वारंवार केली जाते.

'आज'ची निर्मिती वाढवणारे घटक:
विशिष्ट शारीरिक क्रियांच्या दरम्यान मेंदूतून 'आज' अधिक प्रमाणात स्रवतात असे आढळून आले आहे. त्या क्रिया अशा आहेत:

१. दमदार व्यायाम
२. भरपूर मनमोकळे हसणे
३. लैंगिक क्रिया आणि संभोग
४. आवडीचे पदार्थ खाणे
५. आवडीचे संगीत ऐकणे

आता या क्रियांबद्दल सविस्तर लिहितो.
१. दमदार व्यायाम : आरोग्यासाठी व्यायाम ही कल्पना आता सर्वमान्य आहे. इथे एक मुद्दा महत्वाचा आहे. लुटुपुटुच्या व्यायामाने काही 'आज' ची निर्मिती होणार नाही; तो अर्थातच दमदार असला पाहिजे. तो पुरेशा कालावधीसाठी असावा आणि त्याने आपली दमछाकही झाली पाहिजे. मात्र तो अघोरी देखील नको. या संदर्भात पळण्याचा व्यायाम आणि 'आज'-निर्मिती यावर बरेच संशोधन झालेले आहे.

runnning.jpg

'पळणे आणि आनंदनिर्मिती' याचे मूळ मानवजातीच्या इतिहासात सापडते. आपल्या आदिम अवस्थेत 'अन्नासाठी दाही दिशा' हा जगण्यासाठीचा मूलमंत्र होता. अन्न काही सहज उपलब्ध नसायचे. ते हिंडून शोधावे लागे ! मग ते मिळवण्यासाठी अर्थातच स्पर्धा आली आणि स्पर्धेत टिकायचे असेल तर त्यासाठी पळायला, धावायलाच हवे होते. अन्नशोधाच्या या धडपडीतूनच "पळा पळा, कोण पुढे पळे तो" ही वृत्ती निर्माण झाली. या दमदार पळण्यामुळे शरीरात 'आज'ची निर्मिती होऊ लागली. त्यातून आनंदाची भावना वाढू लागली. परिणामी तत्कालीन माणसांचे पळणे अधिक उत्साहात आणि वेगात होऊ लागले आणि पुढे त्यांच्यात अधिक अंतर पळण्याची क्षमता देखील निर्माण झाली. किंबहुना खूप अंतर धावले तरच नंतर 'छान छान' वाटते, हेही त्यातून स्पष्ट झाले.

थोडक्यात व्यायाम आणि 'आज'ची निर्मिती याबद्दल असे म्हणता येईल :
• व्यायाम हा दीर्घश्वसन होणारा असावा
• तो पुरेशा कालावधीसाठी असावा (सुमारे ४० मिनिटे)
• तो दमदार हवा पण एखाद्याच्या कमाल क्षमतेपेक्षा थोडा कमीच असावा
• नियमित व्यायाम सुरु केल्यानंतर लगेचच 'आज' निर्मिती होत नाही. पुरेसा सराव आणि काळानंतर ती जाणवू लागते.

मनमोकळे हसणे

laugh.jpg

हास्य आणि 'आज'-निर्मिती हा कुतूहलजनक, बहुचर्चित आणि काही मतांतरे असलेला विषय आहे. आता हास्यातून मेंदूतील घटनाक्रम कसा होतो ते पाहू. एखादी व्यक्ती जर ठराविक काळ मनमोकळी हसली तर त्यातून मेंदूवरील आवरणाचा (cortex) विशिष्ट भाग उत्तेजित होतो. त्यामुळे खालील घटना घडतात:

१. 'आज'-निर्मिती होते आणि त्यांच्यामुळे वेदनाशमन.
२. जेव्हा आज रक्तप्रवाहात येतात तेव्हा ती रक्तवाहिन्यांच्या आतील आवरणाला उत्तेजित करतात आणि मग त्यातून 'नायट्रिक ऑक्साईड (NO) सोडले जाते.

३. NO मुळे रक्तवाहिन्या रुंदावतात ज्यामुळे एखाद्या भागातील रक्तपुरवठा वाढतो. तसेच NO मध्ये दाह कमी करण्याचाही गुणधर्म आहे.
४. हास्याचा अजून एक परिणाम म्हणजे त्यामुळे Cortisol व Adrenaline ही 'स्ट्रेस हॉर्मोन्स' देखील कमी स्रवतात.
वरील सर्व परिणाम आरोग्यदायी आहेत हे लक्षात येईलच.

आता वरील सर्व फायदे मिळण्यासाठी हास्य कुठल्या परिस्थितीत असावे हा चर्चेचा विषय आहे. हास्यनिर्मिती एकतर मोजक्या व्यक्तींच्या संभाषणातून होते किंवा ठरवून एखाद्या समूहात केली जाते. यापैकी कुठला प्रकार अधिक फायदेशीर आहे यावर तज्ञांत काहीसे मतभेद आहेत.

गेल्या काही वर्षात सामूहिक हास्यात सहभागी होणाऱ्यांचे प्रमाण वाढलेले दिसते. अशा काही गटांवर विविध शास्त्रीय प्रयोग केले आहेत. त्यांचे काही निष्कर्ष असे आहेत:
१. अशा समूहातील प्रत्येक व्यक्ती सारख्याच क्षमतेने हसू शकत नाही. एखाद्याची हास्यक्षमता आणि मेंदूतील विशिष्ट प्रथिने (receptors) यांचा घनिष्ट संबंध असतो.
२. काहींच्या मेंदूत ही प्रथिने भरपूर प्रमाणात असतात आणि त्यांच्यामुळेच तिथे 'आज'चे परिणाम व्यवस्थित होतात.

३. ज्यांच्या मेंदूत अशी प्रथिने बरीच कमी असतात, त्यांच्यात जरी 'आज' निर्माण झालेली असली तरी त्यांचा अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. तसेच ती कमी प्रमाणातच स्त्रवतात.
४. यातून अजून एक निष्कर्ष निघतो. मेंदूत ती प्रथिने भरपूर असलेल्या व्यक्ती अधिक समूहप्रिय असतात.

५. तर, ती प्रथिने कमी असलेल्या व्यक्ती काहीशा एकलकोंड्या असल्याने एखाद्या समूहात मनमोकळे हसू शकत नाहीत.

आता समजा एखादी व्यक्ती समूहप्रिय आहे आणि सामूहिक हास्यात नियमित सहभागी असते. तर अशा व्यक्तीत आज-निर्मिती सुखासुखी होईल का? नक्कीच नाही; त्यासाठी देखील हास्यकष्ट बऱ्यापैकी घ्यावे लागतात ! हास्याच्या कृतीतून दीर्घ श्वसन झाले पाहिजे आणि त्यातून पोटाच्या स्नायूंची अगदी दमछाक झाली पाहिजे. तरच थोडी वेदना निर्माण होते आणि त्यामुळेच आज-निर्मिती चांगली होते. वेदना ही आज-निर्मितीची प्रेरणा (stimulus) आहे हा मुद्दा सर्वांनी ध्यानात घ्यावा.

लैंगिक क्रिया आणि संभोग

lovers.jpg

संभोग ही स्त्री-पुरुष मिलनातील परमोच्च सुख देणारी क्रिया आहे. यातून मिळणाऱ्या आनंदाशी शरीरातील अनेक हॉर्मोन्स निगडीत आहेत. यात मुख्यतः मेंदूतील Oxytocin आणि ‘आज’चा समावेश आहे. यासंदर्भात बरेच संशोधन अलिकडे होत आहे. पण अद्याप त्यातून ठोस निष्कर्ष निघालेले नाहीत. संशोधनाचा साधारण सूर असा आहे :
जेव्हा स्त्री व पुरुष समागमासाठी जवळ येतात तेव्हा सुरवातीच्या काही प्राथमिक क्रिया देखील महत्वाच्या असतात. एकमेकाला स्पर्श, मिठी आणि दोघांच्याही स्तनाग्रे आणि जननेंद्रियांचे उद्दीपन या सगळ्यांमुळे पिच्युटरी ग्रंथीतून Oxytocin स्त्रवते. त्याची पातळी पुरेशी वाढली की मग ‘आज’ देखील स्त्रवतात. आता त्यांचा वेदनाशामक गुणधर्म चांगलाच कामी येतो – विशेषतः स्त्रीच्या बाबतीत. जेव्हा समागमाचे जोडीदार नवखे असतात तेव्हा या क्रियेदरम्यान स्त्रीला वेदना बऱ्यापैकी होण्याचा संभव असतो. अशा वेळी जर ‘आज’ चांगल्यापैकी स्त्रवली असतील तर मग वेदना कमी होतात. त्यातूनच जोडीदाराबद्दलचा विश्वास दृढ होऊ लागतो आणि या क्रियेची गोडी लागते.

आता या क्रियेतील पुढचा भाग फार महत्वाचा आहे. दोघांतही ‘आज’निर्मिती उत्तम होण्यासाठी स्त्री-पुरुष दोघेही परमोच्च बिंदूला पोचले पाहिजेत. इथे पुरुषाचा प्रश्न सोपा आहे; त्यात काही अडचण नसते. मुद्दा आहे स्त्रीचा. पुरुषाच्या तुलनेत स्त्रीचे त्या बिंदूला पोचणे सहज नसते. त्यासाठी पुरेसे ‘कष्ट’ घ्यावे लागतात ! समाजातील बऱ्याच स्त्रियांचे – किंबहुना जोडप्यांचे - याबाबतीत अज्ञान दिसून आले आहे. अशांचे बाबतीत मग संभोग ही केवळ एक यांत्रिक क्रिया होऊन बसते. थोडक्यात, प्रणयाराधन आणि संभोग समरसून करून दोघेही परमोच्च बिंदूला पोचल्यास ‘आज’निर्मिती उत्तम होते. त्यातूनच संबंधित जोडीदारांचे प्रेम व आपुलकी वाढीस लागते.

आवडीचे पदार्थ खाणे
अन्न ही आपली मूलभूत गरज आणि आवडीचे पदार्थ मनसोक्त खाणे ही तर अत्यंत समाधान देणारी गोष्ट. अशा खाण्यातून आपल्याला जो आनंद मिळतो त्याच्या मुळाशीही ‘आज’ आहेत. या संदर्भात काही रोचक संशोधन झालेले आहे. त्यासाठी खाण्याचे विशिष्ट पदार्थ निवडले गेले. त्यांत प्रामुख्याने तिखट झणझणीत पदार्थ, पिझ्झा, चॉकलेट आणि काही पौष्टिक पेयांचा समावेश होता. ही यादी वाचल्यावर आपल्यातील काही जणांच्या तोंडाला नक्की पाणी सुटले असेल !

spicy.jpg

यापैकी तिखट पदार्थांची शरीरातील क्रिया आता बघू. स्वयंपाकाचे तिखट पदार्थ तयार करताना विविध प्रकारच्या मिरच्या वापरल्या जातात. त्यांमध्ये capsaicinoids या प्रकारची रसायने असतात. जेव्हा तिखट पदार्थ आपण तोंडात घेतो तेव्हा या रसायनांमुळे स्थानिक वेदनानिर्मिती होते. ही जाणीव चेतातंतूंच्या द्वारे मेंदूस पोचविली जाते. त्यातून खूप प्रमाणात ‘आज’निर्मिती होते आणि ही ‘आज’ अखेर चेतातंतूंच्या टोकाशी पोचतात. त्यामुळे काहीसे ‘वेदनाशमन’, समाधान आणि आनंद अशा भावना शरीरात क्रमाने निर्माण होतात.

याचप्रमाणे चॉकलेटमधील ‘कोको’ शरीरात अशीच प्रक्रिया घडवतो. अर्थात त्यासाठी चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण भरपूर असावे लागते.
खाणे आणि ‘आज’निर्मिती यावरून एक गोष्ट लक्षात येईल. आपल्या प्रत्येकाच्या खूप आवडीचे असे काही पदार्थ असतात. ते जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपण आवडीने खातोच आणि त्यातून समाधान प्राप्त करतो. त्यामुळे आपल्याला आनंद देणारा एखादा खाद्यपदार्थ वारंवार मिळावा अशीही इच्छा मनात घर करून राहते. इथे एक सावधगिरीची सूचना द्यावी वाटते. जर का आपण अशा आवडीच्या पदार्थांबाबत संयम ठेवला नाही तर बघा काय होते. समजा ते पदार्थ उच्च उष्मांकयुक्त आहेत. आता ते जर आपण वारंवार आणि प्रमाणाबाहेर खात सुटलो तर मात्र ते इष्ट नाही. मग शरीरातील घटनाक्रम असा होतो:

आवडीचे खाणे >> आनंद व समाधान >> अधिकाधिक तेच खाणे >> अधिक ‘आज’निर्मिती आणि आनंद >> प्रमाणाबाहेर खात राहणे >>> भरपूर मेदनिर्मिती >> लठ्ठपणा !

अर्थात खाणे आणि लठ्ठपणा हा इतका सोपा विषय नाही. खाण्याचे प्रमाण ही बाब व्यक्तिसापेक्ष आहे आणि जीवनशैलीतील इतरही अनेक घटकांचा त्याच्याशी संबंध आहे. तूर्त एवढे लक्षात घेऊ, की आवडीचे पदार्थ बेसुमार खाण्याने आपल्या ‘आज’निर्मिती यंत्रणेवर फाजील ताण येऊ शकतो. त्यातून ते खाणे अजून प्रमाणाबाहेर होऊ शकते. हे दुष्टचक्र टाळले पाहिजे.

संगीत आणि वाद्यवृंद

लेखात वरती व्यायाम आणि हास्य यांचा ‘आज’निर्मितीशी असलेला संबंध आपण पाहिला आहे. आपले मन रिझविणाऱ्या कलांमध्ये संगीताचे स्थान बरेच वरचे आहे. कुठल्या ना कुठल्या प्रकारचे संगीत माणसांना आवडतेच. व्यक्तिगत आवडी भिन्न असतात पण अजिबात संगीत न आवडणारा माणूस तसा विरळाच. समाजातील बहुसंख्य माणसे संगीत ऐकतात, त्यातील काही ते शास्त्रशुद्ध शिकतात आणि काही मोजके जण त्याचे कार्यक्रम सादर करतात. पण या सर्व गटांत एक बाब समान असते. ती म्हणजे संबंधित माणूस त्या संगीतातून आनंद मिळवतो. या आनंदप्रक्रियेत ‘आज’चा महत्वाचा वाटा आहे.

orcheastra.jpg

संगीत ऐकणे आणि सादर करणे या दोन्ही क्रियांचे दरम्यान आपल्या मेंदूचे विशिष्ट भाग चेतविले जातात आणि त्यातून बरीच ‘आज’निर्मिती होते. अर्थात त्यांच्या जोडीला Oxytocin, Cortisol आणि अन्य काही हॉर्मोन्सचा देखील या आनंदप्रक्रियेत वाटा असतो. या संदर्भात बरेच संशोधन चालू आहे. समूहाने संगीत सादर करणारे आणि निव्वळ ऐकणारे अशा दोन्ही गटांवर निरनिराळे प्रयोग झालेले आहेत. त्याचा थोडक्यात आढावा घेतो.

प्रथम संगीत सादर करणारा गट पाहू. यासाठी वाद्यवृंदातील कलाकार हे उत्तम उदाहरण आहे. यात एखादे गाणे सादर होत असताना गायक समरसून गात असतो, तर विविध वाद्ये वाजविणारे एका तालबद्धतेत साथ देत असतात. काही वेळेस एक सूत्रधार त्याच्या हाताच्या लयबद्ध हालचालींनी त्या सर्वांना एकत्र गुंफत असतो. प्रत्येक जण अगदी झोकून देऊन काम करीत असतो. अशा या सामूहिक कृत्यातून त्या कलाकारांच्या मेंदूत उत्तम ‘आज’निर्मिती होते. जसजसे हा समूह पुढे अधिकाधिक कार्यक्रम करू लागतो तशी त्या सहभागींची एकत्रित आनंदभावनाही वाढीस लागते. संगीताशी परिश्रमपूर्वक जोडल्या गेलेल्या लोकांत वेदना सहन करण्याची क्षमताही वाढलेली दिसून येते. अगदी भिन्न संस्कृतीतील माणसे देखील जर संगीतामुळे एकत्र आली तर त्यांच्यात एक आपलेपणाचे नाते तयार होते. असा हा समूहसंगीताचा महिमा आहे.

आता संगीत निव्वळ ऐकणाऱ्यांबद्दल पाहू. सामूहिक प्रकारापेक्षा या बाबतीतले संशोधन तसे कमीच आहे. संगीताचे अनेक प्रकार आहेत आणि व्यक्तीनुसार आवडीही भिन्न असतात. जे लोक विशेषतः उच्च तालबद्धता असलेले संगीत वारंवार ऐकतात त्यांच्या बाबतीत काही गोष्टी समजल्या आहेत. अशांच्या मेंदूचे आदेश देणारे भाग (motor regions) या संगीताने उत्तेजित होतात. त्यातून पुढे ‘आज’निर्मिती होते. त्यामुळे अशा लोकांना देखील आनंद व समाधान मिळते. तसेच त्यांची बारीकसारीक वेदना सहन करण्याची क्षमताही वाढते.

संगीत आणि ‘आज’निर्मिती या विषयाला अजून एक पैलू आहे. ‘आज’मुळे शरीरात वेदनाशमन होते हे आपण जाणतोच. या मुद्द्याचा उपयोग वैद्यकातील उपचारांत करता येतो. गेल्या काही वर्षांत वैद्यकात ‘संगीत उपचार’ याबाबतीत उत्साही संशोधन होत आहे. विशेषतः शस्त्रक्रियेच्या रुग्णांना याचा उपयोग होतो. हे रुग्ण शस्त्रक्रियेपूर्वी मानसिक ताणाखाली असतात. तेव्हा जर त्यांना आवडीचे संगीत ऐकवले तर त्यांचा ताण थोडाफार कमी होतो. काही शस्त्रक्रियांत शरीराच्या खालच्या निम्म्याच भागाला भूल देतात आणि अशा वेळी त्या रुग्णास गुंगीचे औषध जोडीने दिले जाते. इथे जर संगीताचा योग्य वापर केला तर गुंगीच्या औषधाचा डोस बऱ्यापैकी कमी करता येतो. तसेच शस्त्रक्रियेनंतर देखील वेदनाशामके कमी प्रमाणात लागतात. मेंदूच्या काही दीर्घकालीन आजारांतही या संदर्भातील संशोधन जोरात चालू आहे. भविष्यात ‘संगीत उपचार’ ही एक पूरक उपचारपद्धती म्हणून विकसित झालेली असेल.

मानवी मेंदू हे निसर्गातील एक आश्चर्यकारक प्रकरण आहे. त्यातील लाखो चेतातंतूंच्या जाळ्यात असंख्य रासायनिक घडामोडी सतत चालू असतात. त्या घडामोडी आणि मानवी भावना यांचा घनिष्ट संबंध असतो. आनंदजनके ही त्यातील एक निसर्गदत्त रसायने. ती चांगल्यापैकी स्त्रवण्यासाठी आपण काय करू शकतो हे आपल्यापुढे या लेखातून सादर केले. त्यातील जमेल तितक्या क्रिया आपण मन लावून करीत राहायचे, बस्स ! त्यातून नियमित निर्माण होणारी ‘आज’ आपल्याला कायम आनंदी ठेवतील यात शंका नाही.

..... हे नववर्ष आपणा सर्वांना आनंददायी आणि समाधानाचे जावो हीच आंतरिक इच्छा.
*********************************************
पूर्वप्रसिद्धी : ‘मिसळपाव डॉट कॉम’ दिवाळी अंक, २०१९.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन छान विषय मांडल्याबद्दल धन्यवाद डॉक्टर. काही यौगिक क्रिया वा आध्यात्मिक पातळ्यांवर मिळणारा आनंद देखील याच 'आज' मुळे होतो का? त्यांचा काही संबंध असेल का?

वरील सर्वांचे आभार ! तुमच्यासारखे अभ्यासू वाचक लाभल्यामुळे लेखन करण्यास हुरूप येतो.

@ प्राचीन,
यौगिक क्रिया वा आध्यात्मिक पातळ्यांवर मिळणारा आनंद देखील याच 'आज' मुळे होतो का? >>>>

चांगला प्रश्न. योग आणि मेंदूतील घडामोडी हा एक विस्तृत विषय आहे. त्यात माझा अभ्यास नाही. थोडक्यात काही लिहितो.

मनाची एकाग्रता वाढविणाऱ्या विविध क्रिया, भावना, इ. गोष्टी आणि मेंदूतील काही रसायने यांचा संबंध आहे. यात मुख्यतः ३ रसायने येतात: सिरोटोनीन, डोपामिन आणि ‘आज’. त्यांची आपापली विशिष्ट कार्ये आहेत. हा विषय गुंतागुंतीचा असून त्याला अनेक पैलू आहेत.

<<<<आपल्या मेंदूमध्ये अशी काही केंद्रे आहेत जिथून काही खास रसायने स्रवतात. एकदा का या रसायनांचा संचार आपल्या शरीरात झाला, की मग कसे आपल्याला काही काळ मस्त मस्त वाटते. आनंद, सुख आणि समाधान यासारख्या भावनांचे आपल्यावर जणू गारुड होते. >>> लेख छान आहे.

आवडते छंद जसे शिल्पकला, चित्रकला, विनोदी लिखाण वाचन याविषयी तुमचे विचार वाचायला आवडेल.
आनंद या विषयाचा आवाका खूप मोठा आहे.

तुम्ही दिलेला आज शब्द फार सुंदर आहे... आज चा दुसरा अर्थ वर्तमानात जगणे. हाही आनंदी राहण्याचा पर्याय आहे. वर्तमानावर लक्ष केंद्रित केले की भविष्य आपोआप मर्जी बरहुकूम होईल.
आनंदी राहण्यासाठी तुमच्या गरजा कमी करा म्हणजे एखादी गोष्ट न मिळाल्याने होणारे दु:ख टळेल. फुटपाथवर राहणारी काही लहान मुलं चांगल्या परिस्थितीत राहणा-या मुलांपेक्षा जास्त हसत खेळताना दिसतात कारण त्यांनी वास्तव स्वीकारलय. मिळेल त्याचे खेळणे करुण आनंद उपभोगत असतात. सायकल ऐवजी जुन्यापुराण्या सायकलचा टायर फिरवणं हेही आनंददायी आहे हे ती जाणतात.

आनंदी राहणं ही एक कला आहे.

मला सुखी माणसाचा सदरा गोष्ट आठवली. ऐश्वर्यात लोळण घेणारा राजा सुखी माणसाचा सदरा शोधतोय. अशीच काहीशी अवस्था भौतिक सुखं उपभोगताना होते. काल जे नवीन होतं ते मिळालं की लगेच जुनं झालं. त्याची मजा सरते. पुन्हा नव्याची हाव. मग स्पर्धा, हेवेदावे, असुरक्षिततेची भावना, मिळविलेलं जपण्याची भावना आणि न जपलं गेल्याचं शल्य... सगळचं अद्भुत...
माफ करा शारीरिक पातळीवरुन मनावर आलो...

अनिंद्य, धन्यवाद.
दत्तात्रय,
खूप छान भावनिक प्रतिसाद. तो वाचून माझ्यात थोडी आज-निर्मिती झाली, हे नक्की !

• आवडते छंद जसे शिल्पकला, चित्रकला, विनोदी लिखाण........आनंद या विषयाचा आवाका खूप मोठा आहे.

>>>>>>>
चांगला मुद्दा. या सर्व गोष्टी मनापासून करण्याने थोडीफार आज-निर्मिती जरूर होते. एका अभ्यासात तर असे दिसून आले. आपण नियमित स्वरुपात उत्स्फूर्तपणे दुसऱ्या गरजूस मदत (आर्थिक किंवा अन्य) करीत राहिलो तरीही आपल्यात आज-निर्मिती होते.

• सुखी माणसाचा सदरा गोष्ट आठवली.
>>>> + १११११...... !

डॉक्टर
<<<<आपण नियमित स्वरुपात उत्स्फूर्तपणे दुसऱ्या गरजूस मदत (आर्थिक किंवा अन्य) करीत राहिलो तरीही आपल्यात आज-निर्मिती होते. >>> अगदी खरं आहे.
माझ्या मते तुम्हाला तहान भूक विसरायला लावणा- या सत्कर्मात आज निर्मिती होत असावी. असे करताना आपण
अप्रत्यक्ष इतर समस्या दाह कमी करतो.

तिकडे वाचला होता. फार सुंदर लेख आणि त्यावर खूप सुंदर प्रतिसाद दसांचा ! 'आजआज' शब्दही खूप समर्पक !
थोडं अवांतर नाही पण एक धागा वाचतेय ... पंचेचाळीसाव्या वर्षी रिटायरमेंट व एक करोड रुपये .... ह्या सगळ्या गोष्टी इक्वेशनमध्ये मांडता येऊ शकतात का? आणि मांडल्या तरी त्या अचूक असतील का? जीवनाला अर्थच नसेल तर त्या 'अर्थाच' काय करायचं?माणूस खूप असुरक्षितेच्या भिती खाली वावरतोय म्हणून आज, 'आज' त्याला गवसतच नाहीये ..
गरजूंना मदत करणे ... हेच ठाकुर, स्वामी विवेकानंद सांगून गेलेत ना ...

मंजूताई, धन्यवाद.

जीवनाला अर्थच नसेल तर त्या 'अर्थाच' काय करायचं?

>>>>>
अगदी समर्पक बोललात ! यावरून ‘घर’ ही विमल लिमयेंची सुंदर कविता आठवली. त्यातल्या दोनच ओळी लिहितो:

... त्या अर्थाला अर्थ असावा
नकोत नुसती नाणी ....
घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती .

खूप छान माहितीपूर्ण लेख डॉक्टर.
आनंदजनके हे नाव फारच सुंदर आहे.
द सा यांच्या पूर्ण प्रतिसादास +७८६

छान लेख.

हे सगळे नैसर्गिकपणे होते तेव्हा ठिक. पण जेव्हा लोक बाहेरून अश्या प्रकारची रसायने/औषधे घेतात आणि उसना आनंद मिळवतात. त्याने ह्या नैसर्गिक प्रक्रियेत कायमचा बिघाड होऊ शकतो का?
तसेच एखाद्या गोष्टीचे व्यसन लागते कसे? दारु पिणारे सगळेच व्यसनी होत नाहीत ना, मग व्यसन लागण्यामागे आपल्याच शरिरातल्या घडामोडी कारणीभूत असतात का?

धन्यवाद डॉक्टर , खूप सुंदर विषय आणि मांडलाय पण छान.

मग कसा मिळवावा आपण हा आनंद? तो काही आकाशातून पडत नाही किंवा कुठे विकतही मिळत नाही ! मात्र तो आपला आपणच मिळवायचा असेल, तर तशी सोय निसर्गानेच खुद्द आपल्या शरीरात करून ठेवलेली आहे. >> +१.
हि खरंच निसर्गाची किमयाच म्हणावी लागेल. आनंद बाह्य गोष्टीत ना ठेवता त्याची सोय आपापल्या शरीरात अंतर्गत करून ठेवली आहे. त्याकडे दुर्लक्ष करून कुठे आपण तो खोट्या खोट्या लाईक्स आणि कंमेंट्स मध्ये शोधात असतो. हि आजच्या आधुनिक जगाची शोकांतिका आहे.

दत्तात्रय साळुंके, आपला प्रतिसाद पण आवडला. डॉक्टरांनी दिलेल्या यादीत अजून काही गोष्टी टाकता येतील उदा. आपल्या एखाद्या आवडत्या व्यक्तीला भेटणे. मग तो आपला खूप वर्षांनी भेटलेला वर्गमित्र असो किंवा एखादा नातलग असू शकतो. त्या भेटीची सर फेसबुक च्या पोस्ट किंवा व्हाट्सअप च्या message ला नाहीच.
त्यानंतर कृतज्ञता (gratitude) ह्यामुळे सुद्धा आपल्या मानसिक स्वस्थानात छान सुधारणा होते असे वाचले आहे. गरजू लोकांना मदत करणे हा मुद्दा वर आलेलाच आहे.

तूर्त एवढे लक्षात घेऊ, की आवडीचे पदार्थ बेसुमार खाण्याने आपल्या ‘आज’निर्मिती यंत्रणेवर फाजील ताण येऊ शकतो. त्यातून ते खाणे अजून प्रमाणाबाहेर होऊ शकते. हे दुष्टचक्र टाळले पाहिजे. >> फास्टफूड बनवणाऱ्या कंपन्यांनी ह्याच गोष्टीचा वापर आपले प्रॉडक्ट विकसित केले आहेत. जेणे करून आपले प्रॉडक्ट्स लोक जास्तीत जास्त खातील व जास्त नफा मिळवता येईल असे प्रयत्न ते नेहेमीच करत असतात असे ऐकले आहे.

वरील सर्व अभ्यासू आणि नियमित प्रतिसादकांचे आभार !

सोनाली,
तुमचा प्रश्न गहन आहे. त्याचे सवडीने वाचन करून एखादा परिच्छेद लिहीन. व्यसन लागण्यामागे जनुकीय, वांशिक आणि अन्य काही घटकांचे योगदान असते. तो गुंतागुंतीचा विषय आहे.

बुन्नु,
छान सविस्तर प्रतिसाद.

कुमारदा, खुप छान आणि माहीतीपुर्ण लेख!
लेख वाचताना दोन प्रश्न पडले..
1. अपुर्या झोपेचा आपल्या 'आज' वर नेमका कसा आणि किती प्रभाव पडतो?
2. लाफींग गॅस नेमका कसा काम करतो?

मन्या,
तुमचे दोन्ही प्रश्न रोचक आहेत. आता पहिला घेतो.

‘आज’ आणि झोप :
दिवसाच्या २४ तासांत असे दिसते की ‘आज’ची पातळी रात्री १० ते पहाटे ४ या काळात न्यूनतम, तर पहाटे ४ ते सकाळी १० मध्ये सर्वोच्च असते. अपुरी झोप आणि आज या बाबतीतले संशोधन सुस्पष्ट नाही. त्याबद्दल उलटसुलट मते आहेत. किंबहुना झोपेच्या संदर्भात सिरोटोनिन आणि अन्य काही रसायने अधिक महत्वाची आहेत.

आज हे व्यायामाशी अधिक संबंधित आहे. खूप व्यायाम संध्याकाळी केला असता आजची पातळी बरीच वाढते. त्यामुळे काहींना झोप लागण्यात अडचण येऊ शकते.

@ मन्या,

आता ‘हास्यवायू’ बद्दल.
हा वायू म्हणजे नायट्रस ऑकसाईड. तो शरीरात गेल्यावर मेंदूतील वेदना केंद्रांवर परिणाम करतो. त्यातून पुढे काही वेदनाशामके तयार होतात. तसेच त्या व्यक्तीस काहीशी झोप लागते.

हा वायू आणि ऑक्सिजन यांचे मिश्रण दंतवैद्यकीय शस्त्रक्रिया करताना वापरले जाते. त्यामुळे रुग्ण गुंगीत जातो पण शुद्धीत असतो.

प्रतिसादांतूनही चांगली माहिती मिळते आहे.

अति खाणे आणि आज संदर्भात एक शंका आहे. काही लोकांना आवडीचा पदार्थ दिसला की त्यांची प्रचंड खाखा होते. ते खाणे कंट्रोल करूच शकत नाहीत. ही हाव कमी करणारी काही औषधे असतात का ?

@ साद,
चांगला प्रश्न.
या विषयाला भूक आणि हाव असे दोन पैलू आहेत. लठ्ठ रुग्णांची भूक कमी करणारी काही औषधे काही काळ वापरात होती. परंतु, त्यांचे अन्य काही दुष्परिणाम घातक होते.

आता ‘हाव’ कमी करणे हा प्रांत चालू धाग्याशी संबंधित आहे. त्यासाठी औषधांपेक्षा अन्य प्रकारचे संशोधन चालू आहे. त्यात एका यंत्राच्या सहाय्याने चुंबकीय तंत्राने मेंदूला चेतवतात. असे उपचार नियमित दिल्यास मेंदूतील ‘आज’निर्मिती नियंत्रित होते, असे प्राथमिक निष्कर्ष आहेत.

हे तंत्र फक्त खाण्याच्याच नव्हे तर अन्य व्यसनांच्या मुक्तीसाठीही भविष्यात उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे.

धन्यवाद डॉ.
>>>>>हे तंत्र फक्त खाण्याच्याच नव्हे तर अन्य व्यसनांच्या मुक्तीसाठीही भविष्यात उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. >>>>
हे रोचक आहे. मग ते वरदान असेल.
पु लेशु

@ सोनाली,
तसेच एखाद्या गोष्टीचे व्यसन लागते कसे? दारु पिणारे सगळेच व्यसनी होत नाहीत ना...

>>>>>>
चांगला प्रश्न. उत्तर अर्थातच गुंतागुंतीचे आहे. मद्याचे व्यसनाबाबत भरपूर संशोधन झालेले आहे. त्यातून १०० टक्के असा काही निष्कर्ष निघालेला नाही. या व्यसनाधीन लोकांबद्दल काही मुद्दे नोंदवतो:
१. सुमारे निम्म्या व्यसनी रुग्णांत काही जनुकीय बिघाडांचा वाटा असतो. आपली वागणूक नियंत्रित करणाऱ्या काही जनुकांचा इथे संबंध असतो.

२. परंतु अशा लोकांत देखील वातावरणीय घटक हे तितकेच महत्वाचे असतात. त्यांत प्रामुख्याने कामाच्या ठिकाणचे ताणतणाव, कौटुंबिक संघर्ष, समूहाचे दडपण, सामाजिक एकलेपण .... इत्यादींचा समावेश आहे.

३. विशिष्ट मानसिक आजार हे जनुकांशी निगडीत असतात. अशा आजारांचे रुग्ण व्यसनाधीन होण्याचा धोका अधिक असतो.

चर्चेत सहभागी वरील सर्वांचे आभार. समारोप करताना हा लेख सुचला तेव्हाची एक आठवण लिहितो.

हा लेख मुळात दिवाळी अंकासाठी लिहीत होतो. आनंदाच्या या सणानिमित्त आनंद आणि शरीर यावर लिहावे असे ठरवले. मेंदूत तयार होणाऱ्या Endorphins वर विचार करताना एकदम त्यासाठी मराठी शब्द सुचला -'आनंदजनके.' तो क्षण माझ्यासाठी सर्वात आनंदाचा होता. पुढे माहितीचे संकलन आपसूक घडले. ते निव्वळ टंकनश्रम.

लेख आपल्याला पसंत पडला याचे समाधान आहे. धन्यवाद!

या लेखात शस्त्रक्रियेदरम्यान संगीताचा वापर याचा उल्लेख आहे.

आता यापुढची भन्नाट घटना बघा:
एका रुग्णाच्या मेंदू-शस्त्रक्रियेदरम्यान खुद्द ती स्वतः व्हायोलिन वाजवत आहे !

बातमी :
https://futurism.com/watch-play-violin-during-brain-surgery

Pages