छोडो ये निगाहों का इशारा...

Submitted by अतुल ठाकुर on 29 October, 2019 - 10:48

inkar1.jpg

हिन्दी चित्रपटसृष्टीतलं मर्दानी देखणेपणाचं परिमाण म्हणजे विनोद खन्ना असं मला नेहेमी वाटतं. आणि त्याच्या व्यक्तीमत्वाला सजेशी रांगडी भूमिका मिळाली तर त्याचं सोनं करणारा हा अभिनेता. "इन्कार" मध्ये हे घडलं आणि चित्रपट गाजला. त्यावेळी (आणि आजसुद्धा) स्लोमोशन चित्रिकरणाचं मला आकर्षण वाटतं. हवेत हळुवारपणे उडाल्याप्रमाणे वाटणारे हे देखणे जोडपे. एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने काळ जणू त्यांच्यासाठी थांबलाच आहे. त्यामुळे "छोडो ये निगाहों का इशारा" हे गाण्याइतकंच चित्रिकरणामुळेही लक्षात राहिलं. विद्या सिन्हा एरवी मध्यमवर्गिय दिसणारी पण या गाण्यातील निसर्गाने, त्या लाल साडीने कुठल्याशा जादूने परीसारखी भासणारी. विनोदखन्नाचं साधं चालणंदेखील देखणं. या अभिनेत्याला नृत्य कधीही जमलं नाही. तो त्याचा प्रांतच नव्हे. पण नुसतं चालण्यातून आपलं मर्दानी पण दाखवणारे फार कमी अभिनेते आपल्याकडे असतील. त्याच्या शर्टचा डार्क चॉकलेटी रंग त्याचं मर्दानी देखणेपण आणखी गडद करणारा.

समुद्राच्या पार्श्वभूमीवर हे प्रेमात पडलेले युगुल. अस्सल मर्द गडी आणि त्याच्या सहवासात आणि प्रेमभावनेने आणखीच देखणी भासणारी विद्या सिन्हा. तिला या गाण्यात साडी नेसायला लावणार्‍या माणसाच्या कल्पनाशक्तीला माझा सलाम. तसंही बाई साडीत देखणीच दिसते आणि येथे तर लाल अबोली रंगाची साडी नायिकेने घातली आहे. गाण्याच्या दुसर्‍या कडव्यात पिवळी जर्द साडी आहे. या गाण्यात नायक नायिकेने परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगसंगतीवर विशेष लक्ष दिले आहे असे मला नेहेमी वाटते. मागे असलेल्या रमणीय निसर्गाशी एक तर्‍हेचा काँट्रास्ट या रंगसंगतीमुळे साधला आहे.

मजरूह सुलतानपुरीने हलके फुलके शब्द लिहिले आहेत. प्रियकराला प्रेयसीच्या नुसत्या विभ्रमावर समाधान मानण्याची इच्छा नाही. त्याला रांगड्या गड्याला तिच्या भावना कळताहेत. ती त्याच्या प्रेमात पडली आहे हे देखील त्याला माहीत आहे. पण "मै तो मानु यार मेरा दिल नही माने..." ही त्याची अवस्था झाली आहे. त्यामुळे त्याला "हमको तुमसे प्यार है" हे तिच्या तोंडून शब्दशः ऐकायचं आहे. येथे खट्याळ नायिका मात्र हे लगेच कबूल करायला तयार नाही. ती "दिलवाले को काफी है इशारा" म्हणते आहे. शेवटी मात्र ती आपल्या प्रियकराची इच्छा पूर्ण करते. त्यावेळी एकदम काळ स्तब्ध होतो. सारे संगीत थांबते. "हमको तुमसे प्यार है" म्हटल्यावर क्षणभर सारे थांबून जाते. त्यावेळी विनोद खन्ना आणि विद्या सिन्हाच्या चेहर्‍यावरचे भाव पाहण्यासारखे.

बाकी त्यावेळची मंडळी सुचकतेत सारे काही सांगून जातात. मला जुन्या काळातले सर्वात जास्त काही आवडत असेल तर तो हा सूचकपणा. आतातर चित्रपटात सारे काही दाखवले जाते. सूचकतेची गरजच नाही. पण आमचा नायक मात्र "क्या है मेरे दिलमें अभी से, ये कह देना दुश्वार है.." म्हणून जातो आणि त्याच्या मनातील सारा शृंगार सुचवून जातो.

खन्नाच्या मर्दानी देहयष्टी अगदी फिट्ट बसेल असा किशोरने लावलेला आवाज. प्रेमाने भिजून गेलेल्या प्रेयसीचा आशाचा स्वर आणि राजेश रोशनची आधुनिक बाजाची सुरेख चाल. हे सारे एकत्र आले आहे. आशाने आपल्या आवाजाने एक प्रकारची लाडीक प्रेयसी उभी केली आहे.जी गमतीने आपल्या प्रियकराला थोडावेळ झुलवते आहे. किशोरचा मर्द गड्याचा थेट आणि रोखठोक आवाज "छोडो ये निगाहों का इशारा" या पहिल्या ओळीतच या मर्दानीपणाची आवाजात झलक मिळून जाते. राजेश रोशनने स्लो मोशनसाठी खास संगीत योजना केलेली दिसते. समुद्र किनार्‍यावर, माडांमधुन हळुवारपणे फिरणारे हे देखणे जोडपे आणि तिने शेवटी दिलेली आपल्या प्रेमाची कबूली यामुळे आधीच ऐकायला गोड वाटाणारे हे गाणे पाहायलाही सुरेख वाटते.

अतुल ठाकुर

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. मस्त. हे गाणं माहीत नव्हते बघते आता. विनोद खन्ना बेस्ट. मी त्याच्या काळात कॉलेजला असते तर माझा क्रश तोच असता no doubt Happy