ग्रेसफुल एजिंग

Submitted by सामो on 25 October, 2019 - 15:46

"ममा - ग्रेसफुल एजिंग चा अर्थ काय?" माझ्या १६ वर्षीय मुलीकडून हा प्रश्न अनपेक्षित होता. पण प्रश्न विचारल्यावर माझ्या डोळ्यासमोर माझ्या एजिंगची एकदम फिल्लमच चमकून गेली. म्हणजे केस काळे करायचा केलेला आटापिटा आणि पार्लरमध्ये भरमसाठ पैसे देऊन, पर्स रिकामी करुन आल्यावर घरी आरशात बघताना दिसणारे पांढरेशुभ्र केस पाहून होणारी तणतण. आतापर्यंत केलेले "फक्त कॉटेज चीझ डाएटींग" कुठे "नो बटाटा आणि भात डाएटींग", "पानात घेतलेल्याच्या अर्धच खायचा केलेला निश्चय आणि तो पूर्ण करण्याच्या भरात मूळातच तिप्पट भरुन घेतलेली प्लेट" ......... अन या सर्व सव्यापसव्यानंतरही "वाढता वाढता वाढे , भेदिले शून्यमंडळ" जाडी. गालाला लावलेला ब्लश, ब्लश न सापडल्यास लावलेले लिप्स्टिक आणि पावसात सगळा मेक-अप ओघळून झालेला अवतार, फेसबुकवर टाकलेले थालपीठसम थोबाडाचे फोटो आणि अगदी फक्त कट्टर लॉयल (आणि स्वतः गुटगुटीत असलेल्या) मैत्रिणींकडून आलेले "वा!" , "सुंदर", "किती गोड" प्रतिसाद पाहून स्वतःचीच थोपटलेली पाठ. घातल्यानंतर १० मिनिटात उसवलेल्या टाइटस, स्लीव्हलेसमधून दिसणारे बलदंड बाहू, क्रो फीट लपविण्याकरता विकत घेतलेली माहागडी क्रीम्स..... अन बरच काही आठवलं.
.
पण हे सगळे सांगते कोणाला. मग मी मुलीला म्हटले ग्रेसफुल एजिंग म्हणजे बघ - अगदी सहजतेने स्वीकारलेली वार्धक्याची चाहूल. म्हणजे बघ बेटा तुला मी कधी व्यायाम करताना दिसते का? तर नाही कारण वयोमानानुसार माझं शरीराचा लवचिकपणा जाणार, मला तितकीशी धावपळ, ट्रेड्मिलवरची पळापळ अन वेट-लिफ्टिंग, फ्लोअर एक्झर्साइझ, अमकं टमकं जमत नाही - हे स्वीकारलेलं सत्य - यालाच म्हणतात ग्रेसफुल एजिंग.
.
पण ममा मला तर शाळेत टॅमी म्हणत होती की तिची आई म्हणते की - मेक अप न करणं, केस काळे न करणं, पांढरेच राहू देणं म्हणजे "ग्रेसफुल एजिंग. पण तू तर डाय करतेस. डझ दॅट मीन यु आर नॉट एजिंग ग्रेसफुली?" नाही म्हणायला, यावर मला थोडा विचार करावा लागला. मग मी म्हटले - बरोबर आहे टॅमीचं. पण त्याचं काय आहे. केस सॉल्ट & पेपर पेक्षा, एकदम पेपर तरी नाहीतर एकदम सॉल्ट तरी असे बरे वाटतात. हे असे सॉल्ट-पेपर केस मला आवडत नाहीत म्हणून मी डाय करते. त्यात तरुण रहाण्याचा अट्टाहास नाही गं. फक्त माझा प्रेफरन्स आहे. अन मेक अप चं म्हणशील तर आपल्याकडे हवा किती थंड असते, मग त्वचा कोरडी पडून फुटू नये म्हणून त्यावर मी लेप (च्या लेप) लावते. मुलीला माझी सारवासारव पटल्यासारखी वाटली. मी हुश्श होणार तोच तिने विचारले पण गेल्या पार्टीत तुला जेव्हा माया आंटींनी वय विचारलं तेव्हा तू का ते १० वर्षांनी कमी करुन का सांगीतलस? यावर काय बोलायचे ते न सुचून आणि मुलीच्या प्रश्नांच्या सरबत्तीला कंटाळून मी म्हटले - अगं पण तुला का इतक्या चौकशा? त्यावर कन्यारत्न उवाच - आज भांडताना मला मैत्रिणी म्हणाल्या की त्यांच्या आया म्हणत होत्या की तू ग्रेसफुली एज होत नाहीयेस.
.
मी मनात म्हटलं बघतेच या अमेरिकन आयांना. आजच फोटोसेशन करुन, फेसबुकवरती छान छान फोटो टाकते. बघू देत अन जळू देत त्यांना. पाप्याची पितरं कुठची. आमच्या एशिअन जीन्स मधे आहे गुटगुटीतपणा. पण आम्ही त्याला अज्जिबात लाजत नाय. मी ताबडतोब परवाच आणलेला नवाकोरा टीशर्ट आणि मांडीवर उसवलेली टाइट (फोटोत दिसतेय कुणाला? वरती तर टी शर्टच येणारे) घालून, लिपस्टिक लाऊन एकदम तय्यार झाले. आज मुलीची थोरली बहीणच वाटले पाहीजे या निर्धारानेच. माझ्या २८ लॉयल मैत्रिणींकडून तरी नक्कीच मला लाईक येणार याची खात्री होतीच. खुश्शाल कोणी म्हणा ना का - तरण्या झाल्या बरण्या नि म्हातार्‍या झाल्या हरण्या. म्हणे ग्रेसफुल एजिंग ... माय फुट! इथे व्हायचय कोणाला ग्रेसफुली एज? एजच नाही होणार तर ग्रेसफुली राहीलं दूरच. काय बरोबर बोलले ना मंडळी? Wink

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त खुसखुशीत लिहलं आहे ! लिहित रहा. शेवटीची ओळ छान जमली आहे.
@भरत , अहो हा विनोदी लेख आहे. इतकं सिरियस्ली घेऊ नका हो.

हा हा, मस्त लिहिलंय.

वाढता वाढता वाढे, भेदिले वजनकाट्याला

टाइमलेस माईंड अँड एजलेस बॉडी आठवले.

आपण तरुण दिसणं यात काहीही गैर नाही. फक्त हे तरुण दिसणं स्वतःसाठी असावं! आपल्याला आतून तसं वाटलं पाहिजे!
आरशात आपला चेहरा पाहून आपल्याला प्रफुल्लित वाटलं पाहिजे.
कारण तरुण दिसणं ही तरुण "असण्याची"पहिली पायरी असू शकते.
अन्यथा आमच्या वैद्यकीय व्यवसायात पस्तिशीतच mental menopause झाल्यामुळे नवरा बायकोत बेबनाव दिसून येणारी किती तरी जोडपी दिसून येतात.

>>आरशात आपला चेहरा पाहून आपल्याला प्रफुल्लित वाटलं पाहिजे.>>>>> करेक्ट!!! आत्मविश्वास नक्कीच वाढतो.

TI , वेडोबा व बोकलत - आपले खूप आभार.