धरणांसाठी समांतर पर्याय - भाग तीन पाणी पारेषण केंद्र (water transmission centers)

Submitted by सुनिल प्रसादे on 24 October, 2019 - 22:42

धरणांसाठी समांतर पर्याय - भाग तीन
पाणी पारेषण केंद्र
(water transmission centers)
----------------------------------------------

(For special attention of Govt. of Maharashtra/Govt. of India)

भाग - तीन
--------------

अगोदरच्या दोन भागांमध्ये "पागोळी वाचवा अभियान" अंतर्गत 'पाणी पारेषण केंद्र' ह्या संकल्पनेमागची पार्श्वभूमी, राज्याची भौगोलिक रचना, राज्यातील ठिकठिकाणचे पर्जन्यमान आणि 'पाणी पारेषण केंद्र' ही संकल्पना आपण समजून घेतली. ह्या लेखात आपण ही संकल्पना अधिक विस्तृतपणे समजून घेऊया आणि तीची अंमलबजावणी कशाप्रकारे करता येईल हेदेखील समजून घेऊया.

मागच्या लेखात पाहिल्याप्रमाणे 'पाणी पारेषण केंद्रा'ची संकल्पना थोडक्यात पुढीलप्रमाणे आहे.

"उंच पर्वतांच्या माथ्यावर प्रचंड प्रमाणात पडणारं पावसाचं पाणी नैसर्गिकरित्या, आणि गरज लागेल तिथे कृत्रिमरीत्यादेखील, वरच्यावरच आपल्याला सोयीचं होईल अशा ठिकाणी, म्हणजेच 'पाणी पारेषण केंद्रा'च्या ठिकाणी, प्रयत्नपूर्वक गोळा करून तत्क्षणी एव्हढ्या प्रचंड उंचीवरून कोणत्याही यंत्राच्या मदतीशिवाय पाईपमधून नैसर्गिक प्रभावाने (gravity force) उंचीने कमी असलेल्या राज्याच्या सर्व पठारी भागामध्ये, विशेषतः कमी पर्जन्यमानाच्या भागांमध्ये प्राधान्याने, पोहोचवणे".

ह्या लेखातील उंचीचा उल्लेख हा समुद्र सपाटीपासूनच्या उंचीचा आहे हे लक्षात घ्यावे. आता आपण 'पाणी पारेषण केंद्र' म्हणजे काय ते पाहूया.

पाणी पारेषण केंद्र
----------------------

'पाणी पारेषण केंद्र' म्हणजे डोंगरमाथ्यावर आणि डोंगरउतारावर पडल्यानंतर वेगवेगळ्या दिशांना वाहणारं पावसाचं पाणी वरच्यावर गोळा करून पुढे आपल्याला इच्छित असलेल्या स्थळी मार्गस्थ करण्याचं ठिकाण. डोंगरमाथ्यावर आणि डोंगरउतारावर पडणारं पावसाचं पाणी पुढे मार्गस्थ होण्यासाठी वाहत येऊन ह्या केंद्रांमध्ये गोळा होईल किंवा केले जाईल. ही केंद्र आकाराने खूप लहान असतील परंतु संख्येने जास्त असतील आणि धरणांप्रमाणेच कायमस्वरूपी असतील. ह्या केंद्राची रचना काही ठिकाणी बंधारे किंवा लहान धरणांप्रमाणे ( check dams ) असेल. हे बंधारे सरळसोट असण्याऐवजी लांबीने कमी, इंग्रजी 'C' आकाराचे असतील आणि तळातून पाईप बाहेर काढणे शक्य होईल एव्हढे खोल असतील. अशाप्रकारच्या बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा दबाव मोठ्या प्रमाणावर निर्माण होऊ शकेल. काही केंद्र वेगळ्या प्रकारचीही असू शकतील. त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून ते आपल्याला ठरवावं लागेल. ही केंद्र धरणांप्रमाणे पाणी अडवतील परंतु साठवून ठेवणार नाहीत. पाऊस पडायचा थांबला की काही वेळातच ती रिकामी होतील. अडवलेलं पाणी पुढे मार्गस्थ करण्यासाठी ह्या केंद्रांना तळातून काढलेला पाईपलाईनचा मार्ग असेल. त्या पाईपच्या मार्गाने केंद्रामध्ये जमा होणारं पाणी केंद्राची उंची आणि जमा होणाऱ्या पाण्याचा दबाव ह्यांच्या परिणामाने नैसर्गिक प्रभावाने ( gravity force ) लांब अंतरापर्यंत जाऊ शकेल. अनेक लहान लहान केंद्रांचं पाणी वरच्यावर एका मोठ्या केंद्रामध्ये जमा करूनदेखील पाण्याचा मोठा दबाव आपण निर्माण करू शकतो.

डोंगरमाथ्यावरून कोसळणारा एखादा धबधबा जर आपण डोळ्यांसमोर आणला तर त्या धबधब्याचं पाणी ज्या केंद्रामध्ये जमा होईल तेथील पाण्याचं प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणारा दबाव ह्यांची कल्पना आपल्याला सहजपणे येऊ शकेल. केंद्रामध्ये जमा होऊ शकणाऱ्या पाण्याचं प्रमाण लक्षात घेऊनच आपल्याला केंद्राचा आकार आणि केंद्राच्या तळात टाकायच्या पाईपच्या आकाराचा विचार करावा लागेल. जास्त लांब अंतरावरच्या प्रदेशात पावसाचं पाणी नेण्यासाठी जास्त उंचीवरच्या जास्तीतजास्त पाण्याचं प्रमाण असलेल्या केंद्रांचा वापर करावा लागेल.

खरं पाहता डोंगर पर्वतांमधला प्रत्येक धबधबा, प्रत्येक घळ, एव्हढंच कशाला घाटामधून प्रवास करताना प्रत्येक दिडदोनशे मीटरवर असलेली घाटातल्या रस्त्यावरची प्रत्येक मोरी ही सर्व पाणी पारेषण केंद्रच आहेत. त्यांना केवळ दिशा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मोऱ्यांच्या पाईपमधून वेगात बाहेर पडणाऱ्या पाण्याला जर पुढे पाईपलाईन जोडली तर तेच पाणी उतारावरून खूप लांबवर आपल्याला नेता येईल.

उत्तम कामाची परिभाषा
------------------------------

जे काम कमी खर्चात, कमी वेळेत, किमान तंत्रज्ञान असलेले, कमीत कमी संसाधनांचा वापर करून, उच्चतम दर्जाचे दीर्घकालीन परिणाम देतं ते काम सर्वोत्तम म्हणायला हरकत नाही. अशी कामं करण्याची आस आपण सर्वांनी आपल्या मनाशी धरायला हवी.

पाणी पारेषण केंद्राचे बांधकाम
--------------------------------------

ठिकठिकाणी तयार होणारी 'पाणी पारेषण केंद्र' आणि तिची संलग्न पाईपलाईन ही एक दीर्घकालीन टिकणारी व्यवस्था असायला हवी. राज्यात बांधलेल्या धरणांप्रमाणेच ही व्यवस्थादेखील भविष्यात किमान दीड दोनशे वर्षे टिकेल ह्या दृष्टीने तिच्याकडे पाहायला हवं.

डोंगरउतारावर अवघड जागी ही केंद्र बांधताना दोन गोष्टी होऊ शकतात. एक म्हणजे नैसर्गिकपणे वाहणाऱ्या पाण्याच्या मार्गात भौगोलिकदृष्ट्या सोयीचं असेल तर अशा ठिकाणी अशी केंद्र बांधणे शक्य होईल, अन्यथा नैसर्गिक उतार आणि पाण्याच्या प्रवाहाच्या अनुषंगानेच परंतु थोडी वाकडी वाट करून जिथे ही केंद्र बांधणे सोयीचं होईल अशा ठिकाणी बांधून प्रवाहाचं पाणी आपल्याला कृत्रिमपणे तिकडे वळवावं लागेल. अशाप्रकारे पाणी केंद्राकडे वळवण्यासाठी आपल्याला बांध, चर ह्याव्यतिरिक्त काही ठिकाणी पाईपलाईनचा वापरदेखील करावा लागू शकतो.

पाणी पारेषण केंद्र कशी असावीत किंवा बांधावीत हे समजण्यासाठी आपण आतापर्यंत बांधलेल्या धरणांचं आणि छोट्या बंधाऱ्यांचं मॉडेल आपल्यासमोर आहेच. डोंगररांगांमध्ये उंचावर जिथे कुठे अशाप्रकारची अनुकूल जागा मिळेल तिथे सिमेंट काँक्रीटचे पक्के बंधारे तयार करून त्यामध्ये पाणी अडवून पुढे पाठवू शकतो. पारेषण केंद्राच्या इतर पर्यायी रचनांसाठी आपल्याला आपल्या महाराजांनी बांधलेल्या गडकिल्ल्यांचा अभ्यास मार्गदर्शक ठरू शकतो. महाराजांनी सगळ्याच गडांवर पाण्याचा साठा होण्यासाठी अनेक मोठमोठे तलाव किंवा टाक्या खोदल्या आहेत. अशाच प्रकारच्या टाक्या डोंगरमाथ्यावरील पाण्याचे प्रवाह लक्षात घेऊन साधारण खोलगट जागेवर आणि शक्यतो डोंगरकड्याच्या किंवा तीव्र उताराच्या कडेला आपण ठिकठिकाणी खोदू शकतो. जेणेकरून त्यांच्या तळातून निघालेल्या पाईपला लगेचच उतार मिळून पाण्याला वेग मिळेल आणि पाईपलाईनसाठीचे खोदकामदेखील कमी होऊ शकेल. अशाप्रकारच्या टाक्या खोदणे खर्चाच्या दृष्टीनेदेखील किफायतशीर होऊ शकेल आणि त्यामधून निघालेला दगड तिथलंच काही बांधकाम करायला उपयोगी येऊ शकेल. काही ठिकाणी मात्र पाणी गोळा करण्यासाठी आपल्याला काँक्रीटच्या विहिरसदृश्य मोठ्या गोल टाक्यांचे बांधकाम करणे क्रमप्राप्त ठरेल.

केंद्रातून बाहेर पडणारी सुरवातीची काही अंतरापर्यंतची पाईपलाईन आकाराने मोठी असेल आणि पुढे पुढे ठराविक अंतरावर तिचा आकार लहान होत जाईल. त्यामुळे पाईप लाईनमधील पाण्याचा दबाव कायम राहण्यासाठी मदत होऊ शकेल. पाणी दूरवर वाहून नेण्यासाठी आपण कोणत्याही यंत्राचा किंवा ऊर्जेचा वापर करत नसल्याने ते करणे आवश्यक आहे.

पाणी गोळा करण्यासाठीची व्यवस्था पाहिल्यानंतर हे पाणी राज्यात आपल्याला कुठे कुठे आणि कसं न्यायचं आहे ते पाहू.

आपल्या राज्याची भौगोलिक रचना आपण अभ्यासली. राज्यातील डोंगर पर्वतांची उंची एक हजार मीटर ते चौदाशे मीटर आहे आणि त्यांच्याखाली पसरलेल्या पठारी प्रदेशांची उंची सहाशे ते दोनशे मीटर एव्हढीच असून ती पूर्वेकडे आणि उत्तरेकडे कमी कमी होत गेली आहे. ही रचना आपल्याला आपली संकल्पना राबवण्यासाठी अनुकूल अशीच आहे. तसंच राज्याचं ( 1000 मिमी ते 4000 मिमी ) सरासरी एक हजार मिलिमीटर असलेलं पर्जन्यमानदेखील आपल्याला अनुकूल असंच आहे. राज्याच्या पाच विभागांपैकी पश्चिम आणि पूर्व विभागांमध्ये मुबलक पर्जन्यमान असल्याने बाहेरून पाणी तिथे नेण्याचं प्रयोजन उरत नाही. तेव्हा ज्या ठिकाणी मुळातच पाऊस कमी आणि अनियमित आहे अशा उत्तर, मध्य आणि दक्षिण असे तीन विभाग आपल्यासमोर राहतात, ज्यांचं स्वतःचं नैसर्गिक पावसाचं साधन अत्यंत कमकुवत आहे. ह्या तीन विभागांची मिळून दक्षिणोत्तर लांबी सातशे किमी आहे तर पूर्व पश्चिम लांबी सुमारे चारशे किमी आहे. सह्याद्री आणि राज्यातील इतर पर्वतांमधील उंच ठिकाणांवर बांधलेल्या पाणी पारेषण केंद्रांच पाणी आपल्याला प्राधान्याने ह्या दोन लाख ऐंशी हजार चौ. किमी प्रदेशात न्यायचं आहे, जे सहजशक्य आहे.

पाणी पारेषण केंद्रांची ही कायमस्वरूपी व्यवस्था जर आपण सक्षमपणे उभी करू शकलो तर ज्यावेळी पश्चिम विभाग पावसाच्या पाण्यात चिंब भिजत असेल त्याचवेळी तिथल्याच पावसाच्या पाण्याने उत्तर, मध्य आणि दक्षिण विभागातील जमिनीदेखील, जरी त्याक्षणाला त्या विभागांमध्ये पाऊस पडत नसला तरी ओल्या होत राहतील आणि विहिरी पाण्याने भरतील.

शुष्क, कोरड्या आणि निर्जीव बनत चाललेल्या जमिनी पुनर्जीवित होऊन पर्यावरण वाढवणे हे आपलं मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी जमिनींच्या आतील, भूगर्भातील,पाण्याची पातळी वाढणे आणि जमिनींमध्ये कायमस्वरूपी टिकणारा ओलावा निर्माण होणे ह्याशिवाय दुसरा उपाय नाही. त्यासाठी "पागोळी वाचवा अभियान" सांगत असलेल्या मार्गांनी जर आपण प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवलं तर पाण्याच्या उपलब्धतेच्या आणि त्या अनुषंगाने असलेल्या जमीनविषयासह इतर सर्वच समस्यांचं निराकरण आपोआप होईल.

वाहून आणलेलं पाणी कुठे सोडावं ?
----------------------------------------------

पाणी पारेषण केंद्राच्या माध्यमातून वाहून आणलेल्या पाण्याचे उच्चतम् परिणाम आपल्याला मिळावेत ह्यासाठी हे पाणी आपण कुठे सोडायला हवं ह्याचे निकषदेखील ठरवणं गरजेचं आहे. वाहून आणलेलं हे पाणी जमिनीच्यावर साठवण्याचं उद्दिष्ट आपण कदापिही आपल्यासमोर ठेऊ नये. म्हणूनच ते उपलब्ध धरणांमध्ये सोडण्याचा मोह प्रयत्नपूर्वक टाळायला हवा.

आपल्या राज्याचं अर्ध्याहून अधिक सिंचन हे विहिरी आणि कुपनलिकांच्या माध्यमातून होत असतं. आपल्या पिण्याच्या पाण्याचं मुख्य साधनदेखील ह्या विहिरी आणि कुपनलिकाच आहेत. राज्यातल्या विहिरी आणि कुपनलिकांची संख्यादेखील प्रचंड मोठी आहे. तेव्हा सर्वप्रथम आपण आपल्या ह्या विहिरी आणि कूपनलिका प्रबळ आणि सक्षम करण्यावर भर द्यायला हवा. त्यासाठी वाहून आणलेलं हे पाणी आपण "पागोळी वाचवा अभियान"ने सांगितलेल्या मार्गांनी प्रभावीपणे आपल्या जमिनींमध्ये जीरवलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला ह्या तीन विभागांमध्ये पाईपच्या वाहिन्यांचं जाळं तयार करावं लागेल आणि त्या माध्यमातून ते पाणी आपल्याकडे (पिण्याच्या पाण्याच्या सोडून) मोठ्या संख्येने उपलब्ध असलेल्या विहिरी, कूपनलिका आणि तयार केलेली 'जलकुंडं' (recharge pit) ह्यांच्यामध्ये प्राधान्याने सोडावं लागेल. अशाप्रकारे अरुंद तोंडं असलेल्या साधनांमध्ये पाणी सोडल्यामुळे बाष्पीभवन होण्यापासून त्याचा बचाव होईल आणि जसं जसं अधिकाधिक पाणी त्यामध्ये पडत जाईल तस तशी जमीन आतून ओली होत जाईल. त्यासाठी उपलब्ध विहिरी आणि कुपनलिका सोडून अधिकाधिक विहिरी आणि कूपनलिका खोदल्या जाणे आवश्यक आहे. जिथे विहिरी किंवा कूपनलिका कमी पडतील किंवा उपलब्ध नसतील त्या त्या ठिकाणी पाणी जमिनीमध्ये जिरवण्यासाठी अधिकाधिक संख्येने 'जलकुंड' (recharge pits) तयार केली जावीत. जून महिन्यातली ह्या विभागांमधली उष्णता आणि जमिनीचं तापमान लक्षात घेता वाहून आणलेलं पाणी जमिनीवर सांडून त्याचं बाष्पीभवन होऊ नये याकरता ह्या सर्व ठिकाणांमध्ये सोडण्यासाठी जाणीवपूर्वक फक्त पाईपचाच वापर करावा. त्यानंतर ठिकठिकाणचे तलाव आणि सरतेशेवटी धरणं असा क्रम लावावा. स्थानिक पावसाच्या जोडीने पाणी पारेषण केंद्र आणि पाईपलाईनचे जाळे ( नेटवर्क) अशाप्रकारची सक्षम व्यवस्था जर आपण निर्माण करू शकलो तर त्यानंतरच्या केवळ तीन ते चार पावसाळ्यांमध्ये ह्या तीनही विभागांमध्ये 'खणू तिथे पाणी' अशी कायमस्वरूपी परिस्थिती निर्माण होणे अजिबात अशक्य नाही.

पावसाचा स्वभाव बदलत आहे. नियमितपणा सोडून त्याने अनियमितपणाची कास धरली आहे. त्यामुळेच पाणीटंचाईच्या प्रदेशांमध्ये ह्यावर्षी रखरखीतपणाबरोबरच महापुरदेखील अनुभवास आले. वर चर्चिल्याप्रमाणे अशाप्रकारची व्यवस्था निर्माण करण्यामध्ये जर आपल्याला यश आले तर ह्या अनियमित पावसाकडूनदेखील आपण नियमित पावसाची फळे संपूर्ण राज्यभर मिळवू शकू.

पाण्याच्या आत्यंतिक दुर्भिक्षामुळे जरी आपण उत्तर, मध्य आणि दक्षिण ह्या तीन विभागांवर लक्ष केंद्रित केलं असलं तरी मुबलक पर्जन्यमान ही जमेची बाजू सोडल्यास पश्चिम आणि पूर्व विभागाच्या पाणी आणि जमीनविषयक समस्याही तेव्हढ्याच गंभीर आहेत. त्यावर मात करण्यासाठीही आपल्याला "पागोळी वाचवा अभियान"ने सांगितलेल्या 'प्रभावी जलसंवर्धन' आणि 'पाणी पारेषण केंद्र' ह्या दोन संकल्पनांची कास धरावी लागेल.

हे सर्व पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की आपला महाराष्ट्र खरं तर नंदनवन होण्याच्या योग्यतेचा आहे, परंतु आपण आपल्याच हातांनी त्याच वाळवंटात रूपांतर करत आहोत.

(समाप्त)

सुनिल प्रसादे.
दापोली.
8554883272 (WA)

दि. 13 ऑक्टोबर 2019.

(इतर माहिती आणि संदर्भांसाठी कृपया आमच्या फेसबुक पेजवरील लेख वाचावेत)

अधिक माहिती- https://www.facebook.com/profile.php?id=100001449118448

#प्रभावीजलसंवर्धन
#पागोळीवाचवाअभियान
#rainwaterharvesting

Group content visibility: 
Use group defaults

तीनही भाग वाचले.
सर्व प्रथम हे पारेषण कितपत व्यवहार्य आहे अशी शंका मनात येते आहे.
निदान छोट्या प्रमाणावर असा प्रयोग करून बघितला आहे का?

हर्पेंन ह्यांच्याशी सहमत. पारेषण केंद्र आणि पाइप्सचं जाळं वगैरे काम सरकारी मदतीशिवाय होणे नाही. त्यासाठी त्याना कन्व्हींस करणंही सोपं नाही. रस्त्यावरचे खड्डे जिथे पेव्हर ब्लॉक्स टाकून बुजवले जातात तिथे अश्या कामासाठी पैसा आणि मनुष्यबळ उपलब्ध होणं कठीण वाटतं. एखादा पायलट प्रोजेक्ट केला असेल तर बाब वेगळी. पण पायलट प्रोजेक्ट खर्चाचा विचार केल्यास कोण तडीस नेणार हा प्रश्न आहे. पुन्हा पाइप्स जमिनीखालून नेणार म्हणजे contamination चा प्रश्न आहे. हागणदारीमुक्त गाव अश्या कितिही घोषणा झाल्या तरी वस्तुस्थिती बर्याचादा निराळी असते. हे पाणी प्रदूषण सहजी डीटेक्ट होणार नाही. त्यामुळे बाकीचे पाणी साठे प्रदुषित होऊ शकण्याची शक्यता आहे का?

तुमचा उद्देश खूप कौतुकास्पद आहे. कल्पनांमध्ये नाविन्य आहे. परंतु त्यास व्यवहार ज्ञानाची जोड असेल तरच ते प्रत्यक्षात येणे शक्य आहे. आत्ता तुम्ही लिहिलेले लेख हे हायपोथिसिस लेव्हलचे आहेत. थोडेफार आकडे तुम्ही भाग २ मध्ये दिलेत, पण ते पुरेसे नाहीत. हायपोथिसिस टेस्ट करण्यासाठी अगदी सविस्तर आकडेमोड करून त्यात अभियांत्रिकी, पर्यावरण, आर्थिक निकष, कालावधी - या सर्वांचा विचार करून एक अभ्यास मांडावा लागेल. प्रयोग करावे लागतील. ते सप्रमाण प्रत्यक्ष मोजमापे करून सिद्ध करावे लागतील. त्यानंतरच हे तंत्र सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करणे योग्य ठरेल, अन्यथा ही केवळ कवीकल्पना होऊन बसेल.

ही वरची प्रोसेस तुम्ही किंवा अन्य कुणी आधीच केली असेल तर त्या अभ्यासाचा रेफरन्स क्रुपया या लेखांखाली द्यावा म्हणजे आपल्या म्हणण्यास वैधता येईल.